शेती हा उद्योग म्हणून करायला हवा. हे खरे आहे. पण उद्योगात अधिक कमविण्याची हव्यासापोटी नुकसान होते हे विचारात घ्यायलाच हवे. हाव ठेवून उत्पादने घेतल्याने उद्योग रसातळाला गेल्याची अनेक उदाहरणे देता येतील. दुग्ध व्यवसायातही हाच नियम लागू आहे.
परी मनीं धरुनि दुभतें । चारिजे जेवीं गाईतें ।
का पेंव करुनि आइतें । पेरुं जाइजे ।। 285 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा
ओवीचा अर्थ – परंतु, मनात दुभत्याची इच्छा धरून ज्याप्रमाणें गायीला पोसावें, किंवा दाणे साठविण्याकरितां अगोदर चांगले पेव तयार करून मग पेरावयास जावें.
कष्टकरी जनावरांची संख्या घटत आहे. वाढत्या महागाईमुळे अशी जनावरे पाळणे आता अशक्य झाले आहे. पण दुभत्या जनावरांची संख्या वाढत आहे. अधिकाधिक दुधाचे उत्पादन देणारी जनावरेच पाळली जात आहेत. देशी गाय दुधाचे उत्पादन कमी देते त्यामुळे तिचे संगोपन केले जात नाही. मानव आता इतका लालची झाला आहे. की त्याला चांगल्या-वाईट गोष्टींची दखलही घ्यायला वेळ नाही. केवळ भरघोस उत्पादन हेच त्याच्या डोक्यात शिरले आहे. जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या गायी-म्हशींचे संगोपन आज केले जात आहे.
शेती हा उद्योग म्हणून करायला हवा. हे खरे आहे. पण उद्योगात अधिक कमविण्याची हव्यासापोटी नुकसान होते हे विचारात घ्यायलाच हवे. हाव ठेवून उत्पादने घेतल्याने उद्योग रसातळाला गेल्याची अनेक उदाहरणे देता येतील. दुग्ध व्यवसायातही हाच नियम लागू आहे. दुधाचा दर फॅटवर ठरविला जातो. फॅट कसे वाढवता येते यावर दूध उत्पादक भर देत आहेत. काही शेतकरी भेसळ करून फॅट वाढवितात. अशा भेसळीमुळे दुधाची प्रत आता खालावली आहे. याचा मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. भेसळ ओळखणेही कठीण असते. दुधात पाणी मिसळले जाते व फसवणूक केली जाते. दुधात पाणी मिसळलेले महिलांच्या लक्षात येते. गवळ्याला लगेच याबाबत त्या सुनावतातही. पण आता दुधात अनेक रासायनिक पदार्थांची भेसळ केली जात आहे. ही भेसळ पटकण ओळखण्याचे तंत्रज्ञानही आपल्याकडे उपलब्ध नाही. अशामुळे ही भेसळ अधिकच होताना पाहायला मिळते.
भेसळीचे दूध नुसत्याच नजरेने, वासाने व चवीने ओळखले जात नाही. वेगळेही करता येत नाही. भेसळ ओळखण्यासाठी रासायनिक चाचण्या केल्या जातात. पण अशा चाचण्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. प्रयोगशाळांचीही कमतरता आहे. दुधात विविध प्रकारची भेसळ ओळखण्यासाठी आता प्रबोधनाचीही गरज आहे. दुधात सोडा, हायड्रोजन पॅरॉक्साईड, फॉरमॅलीन, साखर, स्टार्च किंवा मैदा, ग्लुकोज, युरिया, अमोनियम सल्फेट, मीठ, साबणाचा चुरा, स्किम मिल्क पावडर, वनस्पती तूप आदीची भेसळ केली जाते. अशाने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. समस्त मानव जातीचे आरोग्य उत्तम राखायचे असेल तर आता शेतकऱ्यांनीच याबाबत पाऊल उचलण्याची गरज आहे.
शेतकरी हे करू शकतो. उत्तम, आरोग्यास पोषक असेच उत्पादन घेण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी केला तर यावर आळा घालता येणे शक्य आहे. दुधासाठी संकरित गायी-म्हैशींच्यासह एक देशी गाय पाळण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी करायला हवा. देशी गायीचे महत्त्व शेतकऱ्यांनी ओळखायला हवे. तिचे फायदे विचारात घ्यायला हवेत. कमीत कमी स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठीतरी शेतकऱ्यांनी देशी गाय पाळावी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.