मातृव्यथा या कथासंग्रहातील सर्वच कथा लेखिकेच्या सभोवताली घडलेल्या घटनांशी संबंधित असून वास्तवाचे उत्कट दर्शन घडविणाऱ्या आहेत. केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर अनुभवांच्या बीजाला तावून – सुलाखून योग्य त्या आकारात सालंकृत करून शब्दांची बांधणी लेखिकेने केली आहे.
डॉ. वर्षा गंगणे
मातृव्यथा हा सामाजिक आशयप्रधान, सभोवतीच्या परिस्थितीतील अनेक घटनांवर प्रकाश टाकणारा डॉ. पुष्पा तायडे लिखित कथासंग्रह आहे.अत्यंत देखणे, बोलके तसेच साजेसे मुखपृष्ठ, संग्रह वाचायला भाग पाडणारे आहे. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे मुखपृष्ठावरील चित्र हे लेखिकेच्या आईचे आहे. आणि म्हणून ते उत्तम आहेच, याबाबत दुमत नाही. लेखिका डॉ. पुष्पा तायडे या वर्धा येथील लोक महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत असून त्या उत्कृष्ट लेखिका तसेच वाचक आहेत. अनेक पुस्तकांचे तसेच ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे.
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर त्यांनी लिहिलेल्या कथा ‘मातृव्यथा’ या कथासंग्रहातून वाचकांच्या भेटीला आल्या आहेत. यातील प्रत्येक कथा म्हणजे आपलाच अनुभव आहे असे वाटते. प्रत्येक कथा अनुभवावर आधारित आहे. या कथासंग्रहाला डॉ. किशोर सानप यांची दिर्घ प्रस्तावना लाभली आहे. त्यावरून कथांचा सविस्तर परिचय होतो. अत्यंत साध्या, सोप्या व लालित्यपूर्ण भाषेत लिहिलेली ही प्रस्तावना प्रत्यक्षात मातृव्यथा या कथासंग्रहांच्या वाचनाची इच्छा निर्माण करते. या कथासंग्रहातील सर्वच कथा अत्यंत वाचनीय असून घटनेचे बारीक-सारीक वर्णन करणाऱ्या तसेच तपशीलवार वर्णन करणाऱ्या आहेत.
मातृव्यथा हा कथासंग्रह गौरी प्रकाशनने प्रकाशित केला असून लेखिकेची ही पहिलीच आवृत्ती असल्याची छाप कुठेच दिसत नाही. कमलिनी या कथेत शालेय जीवनातील अल्लडपणा, बारकावे, शब्दांची जुळवणी मनाला स्पर्श करून जाते. प्राचार्यपदाचा कार्यभाग सांभाळून पुस्तक प्रकाशित करणे हे काही सोपे काम नाही. पण, लेखिकेने अथक परिश्रमाने ते करून दाखवले. क्रांतिरत्न महात्मा फुले या समग्र ग्रंथाचे संपादन करताना एखादे पुस्तक प्रकाशित करणे हे जिकरीचे कार्य आहे. यावरून त्यांचा साहित्यातील व्यासंग आणि रुची दिसून येते.
या कथासंग्रहातील दर्गा ही कथा हृदय पिळवटणारी आहे. आईला आलेले अनेक अनुभव, जीवनातील चटका लावणारे प्रसंग, परिसर व त्यातील घटना उघड्या डोळ्यांनी वाचण्याचे कसब यामुळे सगळ्याच घटनांनी कथेतून जीवंत रूप घेतलं आहे. विविध नाती, सृष्टी, माणसं व भावनांमध्ये रमणारा हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल.
मातृव्यथा या कथासंग्रहातील सर्वच कथा लेखिकेच्या सभोवताली घडलेल्या घटनांशी संबंधित असून वास्तवाचे उत्कट दर्शन घडविणाऱ्या आहेत. केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर अनुभवांच्या बीजाला तावून – सुलाखून योग्य त्या आकारात सालंकृत करून शब्दांची बांधणी लेखिकेने केली आहे. व्यवहारातील शब्द आणि सहज प्रसावणारी भाषा यांची सांगड घालत प्रत्येक कथा लेखिकेने फुलवत नेली आहे. त्यामुळे वाचकाला ती आपलीच असल्याचे आभास होतात. हेच या संग्रहाचे बलस्थान आहे. लेखिकेच्या सशक्त लेखणीचा परिचय आहे.
पुस्तक – मातृव्यथा (कथासंग्रह)
लेखिका – डॉ. पुष्पा तायडे
प्रकाशक – गौरी प्रकाशन, वर्धा
किंमत – ७५ रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
पदलालची…