सचिन वसंत पाटील यांनी विविध बोली भाषेतील उत्कृष्ट कथांचे संकलन करून “मायबोली, रंग कथांचे” हा कथासंग्रह प्रसिद्ध केला आहे. लक्षवेधक आगळे-वेगळे वारली चित्राचे मुखपृष्ठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांची मार्मिक, सखोल पाठराखण या संग्रहास लाभली आहे. शब्दान्वय प्रकाशन, मुंबई यांची सुबक मांडणी व उत्कृष्ट बांधणी यामुळे हा संग्रह देखणा झाला आहे. मराठी भाषेला आताशा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी ती आधीपासूनच सर्वांगसुंदर व समृद्ध आहे, यात शंका नाही. बोलीभाषांच्या भगिनी या तिच्या समृद्धीत मोलाची भर घालतात. ग्रामीण संस्कृती लोप पावत असताना बोलीभाषा पण काळाच्या ओघात लुप्त होतात की काय अशा शंका भाषा अभ्यासकांच्या मनात पिंगा घालत असताना काही मोजके लोक मात्र बोलीभाषा संवर्धनासाठी आपल्या परीने, इमाने इतबारे काम करत आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे हा ‘मायबोली, रंग कथांचे…’ हा कथासंग्रह होय.
डॉ. माधुरी चौधरी, छत्रपती संभाजीनगर
एकूण बावीस बोलीभाषांमधील बावीस कथांचा यात समावेश आहे. या कथां वैविध्यपूर्ण विषय, उत्तम कथाबिज, त्या त्या प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण शब्दभांडार, तेथील संस्कृतीचे प्रातिनिधित्व करतात. मायबोली मराठीसह, आपली संस्कृती जपणाऱ्या बोलीभाषा जपण्यासाठी, शब्दभांडार संवर्धनासाठी, आणि भाषा जिवंत ठेवण्यासाठी अशा बोली भाषेतील कथांचे संपादन करणे ही काळाची गरज होती. मायबोलीवर प्रेम असणार्या या सर्व कथाकारांचे बोली भाषा चळवळीतील हे एक महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल.
मराठीतील तावडी, आगरी, मालवणी, जालनी, गोंडी, बंजारा, दख्खनी, पावरा, माणदेशी, महानगरीय, वऱ्हाडी, पोवारी, नगरी, मराठवाडी, अहिराणी, झाडी, सोलापुरी, भिलाऊ, लेवा गणबोली, चांदवडी या बोलीभाषांमधील कथांचा या संग्रहात समावेश आहे. या शिवायही आपली मायमराठी अनेक बोली भाषांनी समृद्ध आहे.
सचिन पाटील यांचे ‘सांगावा’, ‘अवकाळी विळखा’, ‘गावठी गिच्चा’ यासारखे कथासंग्रह प्रकाशित आहेत. समकालीन कथा विश्वातील ते एक महत्वाचे नाव आहे. त्यांच्या कथासंग्रहांना अनेक पुरस्कार मिळाले असून वाड्मय क्षेत्रात त्यांची चांगलीच चर्चा आहे. त्यांना कथेविषयी असलेली जाण सर्वश्रुत आहे. या संपादनामुळे मायबोलीविषयी असणारी त्यांची आस्था, प्रेम दिसून येते. या संग्रहातील सचिन पाटील यांनी लिहिलेले सखोल संपादकीय वाचनीय, माहितीपूर्ण आहे. समावेश असणाऱ्या प्रत्येक बोलीभाषेचा घेतलेला आढावा, संदर्भ, शब्दसौंदर्य, उपयुक्त संदर्भग्रंथांचा उल्लेख त्या त्या भाषेत झालेल्या साहित्यिक कार्याचा थोडा उल्लेख, प्रादेशिक संदर्भ यामुळे सुरुवातीलाच वाचकांना त्या बोली भाषेबद्दल प्राथमिक माहिती मिळते. कथेच्या खाली दिलेली शब्दसूची ती बोली व कथा समजून घेण्यासाठी मदत करते. अवघड शब्दांचा अर्थ समजल्याने आपण त्या कथेच्या अजून जवळ जाऊन ठेपतो. ग्रंथाच्या शेवटी दिलेला लेखकांचा परिचय व लेखकांच्या नावासह दिलेली संदर्भ ग्रंथांची सूची या ग्रंथास अजून समृद्ध बनवते.
आशय-विषय, वाचनियता आणि शब्दसौंदर्याच्या दृष्टीने या संग्रहातील सर्वच कथा सुंदर आहेत. माझ्या लेवा गणबोलीतील ‘बिन बापाची लेक’ या कथेचाही या कथासंग्रहामध्ये समावेश आहे याचा आनंद आहे. लेवा गणबोलीतील साहित्य परंपरा खूप मोठी आहे. शेतकरी आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबाची होणारी वाताहात या कथेत मांडायचा मी प्रयत्न केला आहे.
कोरोना काळात जी जिवित हानी झाली त्यापेक्षाही भयंकर अशा अनेक घटना घडल्या. त्याचेच प्रतिनिधित्व करणारी ज्येष्ठ साहित्यिक, तावडीपुत्र अशोक कोळी सर यांची ‘डफडं’ ही कथा महामारीच्या काळात होणाऱ्या भुकमारीचे दाहक सत्य मांडते. डॉ. संजय बोरूडे सरांची नगरी बोलीतील ‘कुजबुजणाऱ्या भिंती ‘ ही कथा वाचताना वाचकाच्या काळजाला हात घालते. प्रेमात फसवणूक झालेली सुनीता आयुष्यभर सुधारगृहात चार भिंतींच्या आत देणगीदारांचा अत्याचार सहन करत सामाजिक भाषेत प्रायश्चित्त घेत असते. तर सरिता पवार यांच्या मालवणी बोलीतील ‘या मातयेचो लळो’ ही कथा कोकणी बोलीभाषेच्या प्रेमळ गोडव्यात आपल्याला न्हाऊमाखू घालते. कोकणातील राजेशाही जीणं सोडून मुंबईत दहा-बाय दहाच्या खोलीत किड्या मुंग्यासारखं आयुष्य काढणाऱ्या कोकणी लोकांना समज देणारी ही कथा शेवटपर्यंत वाचकांना खिळवून ठेवते. अंतर्मुख करते. तर गुलाब बिसेन यांच्या पोवारी भाषेतील ‘बंधे मुठकी ताकद’ ही राजकारणातील गलिच्छ, पैसेखाऊ वृत्ती विरूद्ध युवाशक्तीची एकजूट किती ताकदवर असते हे दाखवून देते. छोटी पण खूप आशय सांगणारी मस्त कथा आहे.
तात्पर्य हेच की सचिन यांनी कथा निवड करताना विविध विषयांवरील सामाजिक संदर्भ असलेल्या वैविध्यपूर्ण कथांची निवड केली आहे. प्रत्येक कथेला एक सामाजिक किनार आहे व चांगला संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे. जो वाचकाच्या मनात खोलवर रूजतो. तसेच या संग्रहात जालनी बोलीतील ‘कुबदा’, गोंडी भाषेतील ‘भूक’, पावरा बोलीतील ‘धोंडी’, दख्खनी बोलीतील ‘उजाले की ईद’, आदिवासी पावरा मधील ‘इंद्रधनुष्य नी एकलव्य धनुष्य’, माणदेशी बोली भाषेतील ‘आठवण’, महानगरीतील ‘गिरीजा’, वर्हाडी साज नेसलेली ‘दगुड’, मराठवाडी तडका असलेली ‘देवकी’, विशेष लय जपणारी अहिराणीतील ‘लाखीपुनी’, झाडीबोलीतील ‘इब्लिस’, आगरी साज ल्यालेली ‘टिटवी’, आदीवासी परंपरेतील तडवी, भिल भाषेतील ‘बोरखेडाची येस्टी’, कोल्हापुरी बोलीतील काळ्या कभिन्न दगडाखालचा मायेचा शोधणारी ’उमाळा’…. अशा या पुस्तकातील सगळ्याच कथा वाचनिय व त्या त्या भाषेचा गोडवा घेऊन येणाऱ्या भारी कथा आहेत.
एकंदरीत हा कथासंग्रह बोलीभाषेतील दमदार आणि समृद्ध खजाना आहे. मायमराठीच्या शिरपेचातील अस्सल ग्रामीण हिरा आहे. वाचकांनी व मराठी भाषेच्या अभ्यासकांनी संग्रहित ठेवावा इतका अमुल्य असा ठेवा आहे. नव्या पिढीला बोली भाषांची ओळख करून देण्यासाठी, अभ्यासासाठी या कथासंग्रहाचा संदर्भ ग्रंथ म्हणून नक्कीच उपयुक्त ठरेल, असे वाटते.
कथासंग्रह – ‘मायबोली रंग कथांचे
संपादक – सचिन वसंत पाटील
प्रकाशन – शब्दान्वय प्रकाशन, मुंबई
पृष्ठे- १८८, मूल्य- ३०० ₹
सवलतीत २०० रुपये
संपर्क: 8275377049
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.