December 8, 2022
Ego of Money article by Rajendra Ghorpade on Dnyneshwari
Home » धनाचा अहंकार…
विश्वाचे आर्त

धनाचा अहंकार…

पैशाचा मोह माणसाला संपवितो. हा मोह सुटला की मग समाधानच समाधान. या समाधानातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

ऐसेनि धना विश्‍वाचिया । मीचि होईन स्वामिया ।
दिठी पडे तया । उरों नेदी ।। 351 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ – अशा रितीने विश्‍वाच्या धनाला मी एकटाच मालक होईन मग माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल, त्याला मी शिल्लक ठेवणार नाही.

पैसा हा सध्याच्या नव्या युगाची अत्यावश्‍यक गोष्ट आहे. पैसा असेल तर सर्व काही सुलभ होते. पैशाशिवाय आज माणसाला काहीच किंमत नाही. यामुळे प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत आहे. या धनाच्या लोभातूनच अनेक प्रश्‍न उत्पन्न होत आहेत. खून, मारामाऱ्या तर आजकाल नेहमीच्याच घटना झाल्या आहेत. तसे पूर्वीच्या काळीही ह्या समस्या होत्या. राजेशाहीत स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी, वाढविण्यासाठी लढाया होत होत्या. सारा कोणी वसूल करायचा, यातून वाद होत होते. पैशासाठीच ह्या लढाया झाल्या. 

सध्या तर कोणताही कामधंदा न करणारे गुंड लोकांकडून हप्ते वसूल करून स्वतःचे गुंडगिरीचे साम्राज्य प्रस्थापित करत आहेत. पैशाच्या लोभानेच हे साम्राज्य उभे राहात आहे. चंगळवादातून गुन्हेगारी वाढत आहे. यामध्ये अशिक्षित आहेत असे नाही, तर सुशिक्षितांचीच संख्या अधिक आहे. अनेक शिकली सवरलेली माणसेच हे काम करत आहेत. राजकीय नेते तर ही माया जमविण्यासाठी रोज नवनव्या युक्‍त्या शोधतात. त्याचा अवलंब करतात. योजना राबविण्यापेक्षा त्यातून किती माया आपणास जमा करता येते, यावरच त्यांचा भर अधिक असतो. अशा योजनांसाठी ते दिल्ली वाऱ्या, मंत्रालयाचे खेटे मारतात. योजनेचा पैसा लाटण्यातच त्यांना अधिक रस वाटतो. 

पैसा कमविण्यात मठ, मंदिरेही मागे नाहीत. अशाने अध्यात्माचा खरा अर्थच नष्ट झाला आहे. अनेक साधूंनी वैराग्याच्या नावाखाली भली मोठी माया जमविलेल्याची अनेक उदाहरणे आहेत. सर्वाधिक पैसा कमविणारे देवस्थान सर्वाधिक श्रेष्ठ समजले जाते. हा बदललेल्या समाजाचा आरसा आहे. उलट अशा पद्धतीने अध्यात्मातही बदल करायला हवेत, असे तत्त्वज्ञानही ही मंडळी सांगत आहेत. पैसा हेच वर्चस्व आहे, असा ग्रह त्यांचा झाला आहे. 

पैशाने सारे जग जिंकता येते, असे त्यांना वाटते; पण समाधान जिंकता येत नाही, प्रेम कधीही पैशाने तोलता येत नाही. हे परखड सत्य आहे. पैशाचा मोह माणसाला संपवितो. हा मोह सुटला की मग समाधानच समाधान. या समाधानातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. पैसा आज आहे उद्या नाही. हे विचारात घ्यायला हवे.

संपत्तीचा मोह सुटावा यासाठी पूर्वीच्याकाळी राजेही सन्यास आश्रम स्वीकारत. कारण मी पणाचा अहंकार पैशामुळे बळवतो. हे माझे, हे मी घेतले. माझे माझे म्हणण्यातून मी पणा उत्पन्न होतो. हा मीपणाचा अंहकार सर्वकाही विकत घेण्याची भाषा करू लागतो. जे दृष्टिस पडेल त्याची हाव त्यांना सुटते ती संपवल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हा मीपणाचा अहंकार सुटण्यासाठी पैशाचा त्याग हा करावा लागतो. त्याशिवाय तो सुटत नाही. 

Related posts

बीज अंकुरण्यासाठी हवा गुरुकृपेचा वर्षाव

सोन्याचा डोंगर, प्रेमाचा डोंगर ( एकतरी ओवी अनुभवावी)

मुक्त होणे म्हणजे तरी काय ? 

Leave a Comment