February 6, 2023
a-literary-figure-that-has-nurtured-my-education-dr-nagnath-kottapalle
Home » माझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले
करिअर अन् स्पर्धा परिक्षा मुक्त संवाद

माझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले

ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. डॉ. लबडे यांनी कोत्तापल्ले सरांची सांगितलेली ही आठवण…

मी विभागात गेलो. मागे मी भाग १ ला होतो तेंव्हा आनंद यादव विभागप्रमुख होते. त्यानंतर सु. रा. चुनेकर झाले. त्यानंतर डॉ कल्याण काळे झाले.आता नवीन विभागप्रमुख डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांच्या नावाची पाटी बाहेर झळकत होती. माझी त्यांच्याशी तशी काहीच ओळख नव्हती. त्यामुळे ते माझ्याशी कसे वागतील या बाबतीत मी साशंक होतो. मनाचा हिय्या केला. दरवाजा वाजला. मी म्हटले” आत येऊ का सर”

प्रा. डॉ बाळासाहेब लबडे. Mob 9145773378

समोरच उंच डोंगर होता. त्यावर दगडी खंडोबाचं मंदिर होतं. कर्णा वाजत होता. नऊ लाख पायरी जेजुरी गडाला…माझा खंडेराया आला..दावडीगावाला..वाघ्या मुरळी चे ताफे गडावर पायऱ्या चढत होती. भंडारा उधळत होता .येळकोट होत होता…संबळांग..बंबळांग..वाजत होतं…दिमडी घुमट होती…मुरळी नाचत होती….गडावरून येणारे लोक देवाचा महिमा गात होते….आमचा टेंम्पो अर्धा तास झाला येऊन थांबला होता. आणि आम्ही सगळे माल उतरत होतो. कलि़गड बऱ्याच वाणांची होती. काकड्या पोतंभरून होत्या. त्यांची एक टोपली भरून मी बाजुला काढली. मग टेंम्पोवाला निवांत झाला. गडावर निघून गेला. त्याच्या मनात मुरळी घुमत राहीली. दिवटी पेटत राहिली. सदानंदाचा येळकोट झाला.

तेंव्हा माझे नुकतेच बी.एड. पुर्ण झाले होते. त्या आधी एक वर्ष मी एम .ए .भाग एक पुणे विद्यापीठातून पुर्ण केला होता. दुसऱ्या वर्षाला प्रवेश घ्यायला नको अशा मतावर मी आलो होतो. जवळ जवळ तीस मुलाखती मी दिल्या होत्या. त्यात मला निराशा आली होती. कोणीतरी आपल्या ओळखीचं असल्याशिवाय, नाहीतर पुढाऱ्याचा वरदहस्त असल्याशिवाय आपली डाळ शिजणार नव्हती. डोनेशन शिवाय आपल्याला विचारणार कोण ? पैसे तर माझ्याजवळ नव्हतेच अशा परिस्थितीत काय करावे हा प्रश्नच होता. त्यामुळे शिकणे हे आता आपले काम नाही. आईला कॅन्सर झाला होता आणि ती दर पंधरा दिवसाला ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. बीएड झाल्यानंतर आपण आता नोकरी पाहूनच घरी जायचे नाहीतर घरीच जायचे नाही असे मी मनाने पक्के ठरविले होते. घरी जाऊन आईला तोंड तरी काय दाखवणार? काहीही करायचं आणि यश मिळवायचं असं म्हणणारा मी आता पोटापुरतं काही करायला पाहिजे या निर्णयावर आलो. जगलो तर पुढे जगू.आता या दोन मिळवलेल्या पदव्या विसरून गेलो पाहिजे. म्हणून आई बरोबर टेंम्पोत बसून दावडी लिंबगावच्या उरसाला गेलो. आई आणि बहिणीची काकडीची टोपली माझ्याजवळ दिली. बैलगाडीच्या शर्यती चालू होत्या. बारी झाली.बारी झाली. झिंगचिकी झिंगचिकी..कर्ण्यावर कामेंट्रीवाला कोकलत होता. घाटाच्या दोन्ही बाजुला माणसं उत्साहाने जमली होती. पळणाऱ्या गाड्यांकडे पाहून शिट्टया मारीत होती. मी काकडीची टोपली घेतली.

सुरवातीला मनात वाईट वाटलं. आपण एव्हढं शिकलेलो. आपलं शिक्षण वाया गेलं. पाण्यात गेलं. हेच करायचं होतं तर शिकलो कशाला ? खिन्न मनाने मी चालू लागले.थोडा पुढं गेलो. एका म्हाताऱ्याने मला आवाज दिला.” ए काकडीवाल्या कितीला दिली काकडी”

मी म्हणालो” दोन रूपयाला” त्याला मी काकडी सोलून दिली. त्याने माझ्या हातावर दोन‌ रूपये ठेवले. मी त्या दोन रूपयाकडं कितीतरी वेळ बघत राहिलो. माझी तंद्री भंगली ती गाडा उधळला आणि लोक पळायला लागले. मी स्वत:ला वाचवून कमरेवरची काकडीची टोपली सावरली. माझी तंद्री तुटली. मी स्वतःला झटकलं. लांबवर लोकांची गर्दीच गर्दी होती. लोकं शिट्टया मारीत होते. फेटे टोप्या उडवित होते. मग मला आईचं वाक्य आठवलं. चोरीची लाज धरावी कामाची नाही. मी टोपली डोक्यावर घेतली आणि” काकडी घ्या काकडी” आवाज दिला.

लोकांचं जास्त लक्ष गाड्याकडं होतं. मला असं वाटलं कोणीतरी म्हणेल तू शिकलेला दिसतो आणि काकड्या विकतो. पण कोण ओळखतो मला. मी उताराने खाली आलो तसं मला एक एक करून काकडीचं गिर्हाईक भेटतं गेलं. तसा तसा माझा उत्साह वाढत गेला. दोन दोन रूपये मिळत होते. माझी खुशी वाढत होती. मी एक काकडी उत्साहात सोलत होतो. हळूहळू माझी भीड मेली आणि मी आता चा़ंगला काकडी विकणारा झालो असं समजू लागलो.

अर्धी टोपली संपली. माझी एक चक्कर संपली. मग आई म्हणाली आता बस आणि तासाभराने परत चक्कर मार. दिवस मावळला. आमचा टेंम्पो भरला. गडावरून ड्रायव्हर परत आला. घरी आल्यावर आईने पैसे मोजले. त्यातले परत माल खरेदीला लागणार होते. दुसऱ्या दिवशी कुठं जाणार दररोजच काही जत्रा किंवा ऊरूस असतं नाही.

मी काहीतरी काम शोधावं म्हटलं. काय करावं. जवळ एक रूपया होता. गावात दिवसातून दोनवेळा एसटी यायची मी बिनाटिकीटाचाच पुण्याला आलो. मनात म्हटले पन्नास पैसे‌ वाचले. काम शोधायचंय..काम शोधायचं….शिवाजीनगर वरून चालत चालत निघालो..तानाजी नगर वर आलो..पोलिस क्वार्टर ग्राऊंडला आलो. मनात आलं आपलं काॅलेज फर्गसन काॅलजला प्रा.नंदा कांबळे आहेत. त्यांनीच आपल्याला पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण कर म्हणून सुचवलं होतं. त्या नेहमी पाठीशी असायच्या. आम्हा पोरांना चार उपदेशाच्या गोष्टी सांगायच्या. त्या कॅन्टींगला घेऊन जायच्या. त्याचे मला विशेष वाटायचे. त्यांची माया ममता सहकार्य करण्याची वृत्ती कायम मनात राहिली. त्यांचे सगळे गुण आठवले. हा त्याच मला मार्ग दाखविला. त्यांच्या खुप ओळखी आहेत. काहीना काही आपल्याला काम मिळवून देतील.

माझी आशा वाढली. मी चालत राहिलो. चालत राहिलो. आनंदात उत्साहात. माझी पावलं झपाझपा पडू लागली. समोरच‌ मला एक कपड्याचं दुकान दिसलं.अरे ! याला विचारायला काय हरकत आहे. मिळालं तर मिळालं काम. मनाने उचल खाल्ली. धीर केला. दुकानात गेलो. एक जन कपड्यांचे माप घेत होता. त्याने विचारलं “काय पाहिजे”
“काम मिळालं का?”
मग त्याने माझी चौकशी केली.
कपड्याचं माप घेता येतं का?
“शिकून घेतो”
त्याला माझ्यावर विश्र्वास वाटला.
उद्यापासून ये कामाला असं म्हटला.

मला खुप आनंद झाला आणि दुःखही बीएड होऊन आपण कपड्याच्या दुकानात काम करणार. मी लगेच निराशा झटकली. फर्गसनमध्ये आलो. बाईंना भेटलो व परिस्थिती सांगितली. त्यांनी मला पहिल्यांदा कॅटींगला नेले खाऊ घातले. मला खूप एनर्जी आली. त्या म्हणाल्या “तुमच्या सारख्या पहिल्या आलेल्या मुलाने असं काम करावं मला काही पटत नाही. तुम्ही परत एम ए भाग ला एडमिशन घ्या.”

आता माझ्याकडे एक रूपया आहे फक्त त्यांनी माझ्या खिशात शंभर रूपये घातले.” जा विद्यापीठातून फार्म घेऊन या. तुमची फी माफी मी कोत्तापल्ले सरांना करायला सांगते.”
परत माझ्या मनात शिकण्याची उर्मी उसळून आली. थोड्याच वेळात मी जमीनीवर आलो.” मला काहीतरी काम बघा मी करेन”

“आधी अॅडमिशन घ्या मग बघू काय करायचं ते”
मला पढं काही बोलवलं नाही. मी तसाच विद्यापीठात गेलो. फार्म घेतला. भरला. पुढचा प्रश्न माझ्यापुढं आ वासून होता. मी विभागात गेलो. मागे मी भाग १ ला होतो तेंव्हा आनंद यादव विभागप्रमुख होते. त्यानंतर सु. रा. चुनेकर झाले. त्यानंतर डॉ कल्याण काळे झाले.आता नवीन विभागप्रमुख डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांच्या नावाची पाटी बाहेर झळकत होती. माझी त्यांच्याशी तशी काहीच ओळख नव्हती. त्यामुळे ते माझ्याशी कसे वागतील या बाबतीत मी साशंक होतो. मनाचा हिय्या केला. दरवाजा वाजला. मी म्हटले” आत येऊ का सर”

“हो या”
ते माझ्याकडे काही न बोलता नुसते पहात राहिले. माझा अवतार तसाच होता. कपडे साधे मान बगळ्यासारखी. केस वाढलेले. गाल आत गेलेले. शरिरयष्टी किडकिडीत. जनू आजारी असल्यासारखी. माझ्मावरच मी थोडा खजील झालो. माझ्या मी ला मी निरखुन पाहिले.
“हो बोला काय काम आहे.”
माझा फार्म मी सहीसाठी त्यांच्या समोर केला. त्यांनी तो निरखुण पाहिला.
तुम्हाला बीए ला डिस्टिंशन आहे. एम १ ला सुद्धा.हुशार आहात.
मी थोडा मिश्कील हसलो. स्वत:वरच.

“माझ्याकडे फी भरायला पैसे नाहीत. मी झोपडीत राहतो. मिळेल ते काम करतो. प्रा. नंदा कांबळे यांनी मला तुमच्याकडे पाठवलंय. सध्या माझ्याकडं फक्त एक रूपया आहे.” त्यांनी माझ्याकडं फक्त एकवार पाहिलं .मनात काही विचार केला.आपली सही केली आणि रजिस्ट्रारला संदेश लिहीला. म्हणाले तुमची ईबीसी हे मंजुर करतील आणि आता तुम्हाला फक्त अडिचशे रूपये भरावे लागतील.

मला आनंद झाला. माझी फी माफ होणार. मी घाईघाईने त्यांचे आभार मानले. ते म्हणाले
” काही काळजी करू नका. येत जा. भिऊ नका. मी आहे. विभाग आपलाच आहे”
मी रजिस्टारांकडे गेलो. त्यांनी काहीच न विचारता सही केली मला आश्चर्य वाटले. मी परत कांबळे मॅडमकडे गेलो. सारा वृत्तांत कथन केला. त्यांनी माझ्या शिखात अडिचशे रूपये घातले. माझा एम. ए .भाग दोनचा प्रवेश निश्चित झाला. सरांनी केलेल्या आणि मॅडमनी केलेल्या मदतीने मी पुन्हा शिकु शकलो. माझ्या मनाला नव्याने पालवी फुटली.

Related posts

मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेतील शब्द रत्ने..

पान मुखवास कसे तयार करायचे ?

क्रिया पालटे तात्काळ…(भाग – १)

Leave a Comment