महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात आढळले नव्या प्रकारचे पठार; हवामान बदलामुळे प्रजातींच्या अतिजीवितेवर होणाऱ्या परिणामांविषयीची या पठारावर मिळू शकेल माहिती
नवी दिल्ली – समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर क्वचितच आढळणारे बसाल्ट दगडाचे पठार (याला ‘सडा’ असेही म्हणतात) महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत आढळले असून या पठारावर वनस्पतींच्या 24 विविध कुळांमधील 76 प्रजातींची नोंद झाली आहे. जागतिक पातळीवर जैवविविधतेसाठी महत्त्वपूर्ण आणि म्हणून धोक्यात असलेल्या भारतातील चार ‘ग्लोबल बायोडायवर्सिटी हॉटस्पॉट’पैकी एक सह्याद्रीची रांग आहे. या रांगेत आढळलेल्या या नव्या पठारावरील प्रजातींचा अभ्यास केल्यास हवामान बदलामुळे प्रजातींच्या अतिजीवितेवर (survival) होणाऱ्या परिणामांविषयक माहितीचा साठा त्यातून खुला होईल, अशी शक्यता आहे. या माहितीमुळे खडकाळ पठारांचे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्व व त्यांच्या संवर्धनाच्या गरजेविषयी जनजागृती करण्यास मदत होईल.
पुणे स्थित ‘आघारकर संशोधन संस्था’ गेले दशकभर सह्याद्रीतील, विशेषतः खडकाळ पठारांवरील जैवविविधतेचा अभ्यास करत आहे. खडकाळ पठारांवर मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या प्रदेशनिष्ठ प्रजातींमुळे ही पठारे महत्त्वपूर्ण अधिवास ठरतात. या अधिवासात जगण्या-वाढण्यासाठी प्रजातींना आव्हानात्मक नैसर्गिक बाबींशी सातत्याने जुळवून घ्यावे लागते. या पठारांवर पावसाळ्यापुरते पाणी उपलब्ध होते, माती व अन्नांश मर्यादित असतो. त्यामुळे हवामान बदलाचे प्रजातींच्या अतिजीवितेवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी हा अधिवास सुयोग्य प्रयोगशाळा ठरेल. अतिविषम परिस्थितीत प्रजाती कशा टिकाव धरतात याविषयीच्या माहितीचा ही पठारे उत्तम स्रोत आहेत.
आघारकर संशोधन संस्थेच्या चमूचे नेतृत्त्व करणाऱ्या डॉ. मंदार दातार यांनी अलीकडेच ठाणे जिल्ह्यातील मांजरे गावात समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर असलेले बसाल्टचे पठार उजेडात आणले. या प्रदेशात असलेल्या खडकाळ पठारांचा हा चौथा प्रकार आहे. समुद्रसपाटीपासून उंचावर असलेली बसाल्टची, लॅटराईट (जांभा) ची आणि कमी उंचीवर असलेली जांभ्याची पठारे असे तीन प्रकार यापूर्वी या प्रदेशात दिसून आले आहेत.
या नव्या प्रकारच्या पठाराच्या सर्वेक्षणात वनस्पतींच्या 24 विविध कुळांमधील 76 प्रजाती आढळल्या. अन्य तीन प्रकारच्या पठारांवर आढळणाऱ्या प्रजातींचा त्यात समावेश आहे. त्याचबरोबर, या पठारावरच आढळलेल्या विशिष्ट प्रजाती त्यात आहेत. हे पाहता बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीत प्रजातींचे आपापसांतील संबंध कसे बदलतात हे अभ्यासण्याकरता हे उदाहरण विशेष ठरेल.
या संशोधनाबाबतचा शोधनिबंध स्प्रिंगर नेचरवर उपलब्ध संशोधन पत्रिका ‘नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्स लेटर्स’ मध्ये प्रकाशित झाला. ठाणे जिल्ह्यात उत्तर सह्याद्रीत असलेल्या मांजरे गावात आढळलेल्या समुद्रसपाटीपासून कमी – 156 मीटर – उंचीवरील बसाल्ट पठाराचे महत्त्व या शोधनिबंधात अधोरेखित केले आहे.
Publication Link: https://doi.org/10.1007/s40009-022-01188-6
अधिक माहितीसाठी संपर्क – डॉ. मंदार दातार (mndatar@aripune.org, 020-25325057), वैज्ञानिक, जैवविविधता व पुराजीवशास्त्र गट आणि डॉ. पी. के. धाकेफाळकर (director@aripune.org, 020-25325002), संचालक (स्थानापन्न), आघारकर संशोधन संस्था, पुणे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.