December 8, 2023
Chilapi Fish and River pollution article by Vilas Shinde
Home » चिलापी मासा अन् नदी प्रदुषण !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

चिलापी मासा अन् नदी प्रदुषण !

चिलापी आणि नद्या प्रदूषण

पंचगंगा नदी तर केवळ शंभर किलोमीटरपर्यंत जाण्याअगोदरच प्रदूषित झाली आहे. या नदीतील पाणी अगदी इचलकरंजी शहराला कोणत्याही कारणासाठी वापरता येत नाही. त्यातच दरवर्षीप्रमाणे पावसाळा संपला की पंचगंगेतील मासे मरतात. यावर्षी हा प्रश्न केवळ पंचगंगेचा न राहता अनेक नद्यांचा बनला आहे.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

पर्यावरणात सजीव-निर्जीव दोन्ही घटकांचा समावेश होतो. त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक पाणी. पाणी केवळ सजीवांची मूलभूत गरज नाही, तर सजीवांची निर्मितीच पाण्यात झाली. डार्विनचा उत्क्रांतीवाद जगाने स्विकारला आहे. त्यानुसार पृथ्वीवर पहिला जीव तयार झाला, तो एकेपशीय अमिबा. त्यापासून पुढे बहुपेशीय जीवांची निर्मिती झाली. पाण्यामध्ये प्रथम शैवाल, जलचर तयार झाले. त्यानंतर वनस्पती, झाडे, उभयचर, प्राणी आणि पक्षी तयार झाले. त्यांच्या जगण्यासाठी आवश्यक घटकांची निर्मितीही त्यासोबत होत होती. पाण्यात निर्माण झालेल्या सजीवांची पाण्याची गरज मोठी असते. सजीवांतील विविध घटकांचा विचार केला, तर त्यामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

सजीवांतील पाण्याचे प्रमाण सरासरी ९० टक्के इतके असते. मानवाच्या शरीरात, हाडांसह सर्वच भागांमध्ये पाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. लहान बाळाच्या शरीरात ७५ टक्के पाणी असते. प्रौढ पुरूषात ६०, तर महिलांमध्ये ५५ टक्के असते. स्नायु आणि मूत्रपिंडात ९८ टक्के पाणीच आहे. हृदय आणि मेंदूत ७३ टक्के आहे. कातडीत ६४, तर हाडात ३१ टक्के पाणीच आहे.

असे हे पाणी. सजीवांना शुद्ध रूपात उपलब्ध व्हावे, यासाठी निसर्गाने स्वत:ची रचना केलेली असते. पृथ्वीवरील पाण्याची वाफ होते. ती वाफ हलकी असल्याने आकाशात जाते. त्या वाफेचे ढग बनतात. ढगाना थंड हवा लागताच, वाफेचे रूपांतर पाण्यात होते. हेच जलबिंदू पावसाच्या रूपात पृथ्वीवर अमृताच्या रूपात येतात आणि वसुंधरा पुन्हा हिरव्या रंगात सजते. पावसाच्या रूपात उपलब्ध होणारे पाणी शुद्ध असते. मात्र ते मानवाने पिण्यास वापरले, तर, तो जगू शकत नाही. पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यावर त्यामध्ये अनेक क्षार मिसळतात आणि ते पाणी मानव पिण्यासाठी वापरू शकतो. जे पाणी शुद्ध म्हणून आपण पितो, ते वैज्ञानिकदृष्ट्या अशुद्ध असते. शुद्ध पाणी म्हणजे निव्वळ हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन मूलद्रव्यांचे संयुग. गंमत अशी की, यातील हायड्रोजन हा तीव्र ज्वालाग्राही वायू; तर, ऑक्सिजन ज्वलनाच्या प्रक्रियेतील आवश्यक घटक. ज्वलनशील आणि ज्वलनपूरक अशा दोन मूलद्रव्यांचे पाणी बनते. ते जगण्यासाठीची मूलभूत गरज असल्याने, त्याला ‘जीवन’ असेही म्हणतात.

निसर्गातील प्रत्येक घटकाला शुद्ध रूपात राखण्याची निसर्गत: एक यंत्रणा विकसित झालेली असते. पाण्यातही ही यंत्रणा कार्यरत असते. काही वनस्पती पाण्याच्या तळाशी उगवतात आणि पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. काही जलचर पाण्याबरोबर वाहून येणारे इतर मृतजीव खाऊन पाण्याला प्रदूषीत होण्यापासून वाचवतात. स्थानिक मासे यात अग्रेसर असायचे. मात्र आज तेही नामशेष होत चालले आहेत. याला कारण केवळ मानवी स्वार्थ आहे. या स्वार्थातून होणारे खाणकाम, डोंगर खोदाई, कारखाने, नागरी वस्त्या आणि अनिर्बंध बांधकामे यांचा वाटा सिंहाचा आहे.

पाणी मानव आणि एकूण जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी सर्वात महत्त्वाचे. मात्र पाण्याच्या सरंक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या पाण्याची जगण्यासाठी असणारी गरज ओळखून मानवी संस्कृतीचा विकास नद्यांच्या काठावर झाला. वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडू लागले म्हणून तलाव बांधले. पाणी पिण्याखेरीज स्वच्छतेसाठीही वापरले जाते. कारखाने आणि शेतीसाठीही वापरले जाते. स्वच्छतेसाठी, कारखाने आणि उद्योगांसाठी वापरलेले पाणी अशुद्ध रूपात पुन्हा स्वच्छ पाण्यांच्या साठ्यात मिसळू लागल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. पंचगंगा नदी तर केवळ शंभर किलोमीटरपर्यंत जाण्याअगोदरच प्रदूषित झाली आहे. या नदीतील पाणी अगदी इचलकरंजी शहराला कोणत्याही कारणासाठी वापरता येत नाही. त्यातच दरवर्षीप्रमाणे पावसाळा संपला की पंचगंगेतील मासे मरतात. यावर्षी हा प्रश्न केवळ पंचगंगेचा न राहता अनेक नद्यांचा बनला आहे.

त्यामुळेच यावर्षीच्या भारतीय विज्ञान परिषदेच्या जानेवारी-२०२३ च्या पहिल्या आठवड्यात नागपूर येथे झालेल्या अधिवेशनातही हा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. या परिषदेमध्ये जल प्रदूषण वाढल्याने, मासे मानवी आरोग्यास धोकादायक बनल्याचे संशोधकांनी जाहीर केले. उद्योगधंद्यातील रसायनमिश्रीत पाणी नद्यांमध्ये सोडल्याने नद्यांचे, तलावांचे पाणी प्रदूषित होते. अशा रसायनमिश्रीत पाण्यामध्ये वाढलेले मासे खाणे खरोखरच धोकादायक बनले आहे. इंडियन कौंसिल ऑफ अग्रिकल्चरल रिसर्च अँड फिशरीजचे उपमहासंचालक डॉ. जे. के. जेना यांनीच हे निष्कर्ष जाहीर केले. त्यामुळे हे निष्कर्ष अधिकृत आहेत. त्याचबरोबर वाढते तापमानही माशांच्या अस्तित्वासाठी धोकादायक बनले आहे. मागील काही वर्षांपासून सरासरी तापमानामध्ये सातत्याने वाढ होते. १९९० ते २०१० या काळात सरासरी तापमान ०.९९ सेल्सियस वाढले. मागील दहा वर्षातील हीच वाढ १.०९ डिग्री सेल्सियस आहे. याचा परिणाम माशांचे पुनरूत्पादन आणि वाढ दोन्हीवर होतो.

मानवाने त्यातही आपला स्वार्थ शोधल्याने समस्या आणखी गंभीर बनली. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी त्यामध्ये बाहेरून आणून स्थानिक नसलेल्या माशांचे वाण आणून वाढवायला सुरुवात केली. यातीलच एक प्रजाती चिलापी. चिलापीने अन्य माशांचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. पूर्वी नदीमध्ये अनेक प्रकारचे मासे बघायला मिळायचे. चिंगळ्या, आंबळी, डाकू, मरळ, सुरकी, लोळी, वांबट इत्यादी अनेक प्रकार असायचे. आता नद्या आणि तलावांमध्ये केवळ चिलापीच सापडतो. इतर माशांच्या जाती केवळ जलप्रदुषणामुळे नष्ट झालेल्या नाहीत. चिलापी इतर माशांच्या पिल्लांना फस्त करत असल्याने इतर माशांची संख्या रोडावली आहे. हा एकिकडे प्रजाती नष्ट करत असताना याची पिल्ले जर कोणी खाल्ली तर खाणारा मासा मरतो. दुसरीकडे चिलापीच्या मादीच्या पोटात कायम अंडी सापडतात. खायला आणि चवीला चांगला असल्याने, पुनरूत्पादन वेगाने होत असल्याने या माशाचे पैदास केली. मात्र आता चिलापी नदीच्या अस्तित्वावरच उठला आहे. चिलापी मासा स्वत: मात्र प्रदूषीत पाण्यातही चांगला वाढतो. गढूळ, प्रदूषीत पाण्यात टिकून राहण्याचे कसब याच्याइतके कोणीच लवकर शिकत नाही. दुसरे म्हणजे पाण्याबाहेर आल्यानंतरही हा बराचं वेळ जिवंत राहतो.

चिलापीने नदीच्या पाण्यातील संपूर्ण जीवसृष्टी नष्ट करत आणली आहे. यातील डुक्कर माशासारख्या काही माशांच्या प्रजाती प्रदूषण कमी करण्यासाठी सहाय्य करणाऱ्याही होत्या. मात्र आता त्यांचे अस्तित्व त्यांच्याच एका भावंडाने संपवत आणले आहे. पाण्याला आपण ‘जीवन’ म्हणत असलो तरी ते मूक आहे. त्याला बोलता येत नाही, दु:ख मांडता येत नाही, विव्हळता येत नाही. स्वत:चे दु:ख स्वत:च सहन करते. त्याचे बिघडलेले आरोग्य ओळखून आपणच ते सुधरायला हवे. तरच नद्या वाचतील, जीवन वाचेल; आपले आणि इतरांचेही!

Related posts

सकारात्मक विचारांची उभारू गुढी

चंद्राची आरती…

कागदी फुल…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More