February 19, 2025
A poem that immortalizes the self-absorbed sadness of loneliness
Home » एकाकीपणाच्या आत्ममग्न दुःखाला चिरंतन करणारी कविता !
मुक्त संवाद

एकाकीपणाच्या आत्ममग्न दुःखाला चिरंतन करणारी कविता !

कवीला दुःखाला चिमटीत पकडून त्याला ‘तू कस्पट आहेस’ म्हणून सांगायचं आहे. पण त्याला ते शक्य झाले का? हे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. डिप्रेशन, घुसमटीचे संदर्भ, वादळ, हतबल, भीती , उदास दिवसात, उदास संध्याकाळ, संदर्भहीन वाट एकट्याची, काहीतरी तुटत जाताना या कविता वेगवेगळ्या वाटत असल्या, तपशील वेगळे असले तरी एकाच भावनेचे वेगवेगळे पदर आहेत, असे म्हणता येईल.

राजा माळगी, 94 217113 67

तथागत गौतम बुद्धांनी त्यांच्या तत्त्वज्ञानात चार आर्य सत्ये सांगितले आहेत. ती म्हणजे, मानवी समूहात दुःख आहे. त्याला कारण असते. आणि ते कारण मानवनिर्मित असते. ते कारण निराकरण केले तर दुःख नष्ट करता येते. कवी धर्मवीर पाटील यांच्या ‘दिवस कातर होत जाताना…’ या कवितासंग्रहातील कविता म्हणजे बुद्धाच्या पहिल्या दोन सत्याच्या भोवती फिरणाऱ्या आहेत.

या संग्रहातील प्रत्येक कवितेमधून कवीने त्याच्या आयुष्यामध्ये पावलोपावली अनुभवाला आलेली दुःखे मांडली आहेत. कवी वरकरणी सामान्य माणसासारखा चारचौघात राहतो. हसतो. मिसळतो, पण त्याच्या आतमध्ये कुठेतरी खोल एकाकीपण लपले आहे. हे एकाकीपण त्याला अस्वस्थ करत राहते. ते वाट्याला आलेले एकाकीपण त्यांने जीवनसाथी म्हणून स्वीकारले आहे. त्या एकाकीपणातून मुक्त होऊन नव्याने जीवनगाणे गायचा त्याचा प्रयत्न आहे; परंतु त्याला दुःखाने कवटाळले आहे. त्यामुळे त्यातून निर्माण होणारे एकाकीपण आणि दुःख त्याला चिरंतन वाटते.

माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याला एकमेकांच्या सहवासात राहावेसे वाटते. त्या सहवासाच्या गरजेतून त्याने आपल्याभोवती नात्यांचे एक जाळे विणले आहे. पण, कोळी ज्या पद्धतीने आपणच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतः अडकत जातो. त्याप्रमाणे कवीने कधीकाळी स्वतःभोवती जाळे विणले. आपल्या अवतीभवतीच्या लोकांकडून त्याने काही सुंदर स्वप्ने पाहिली. वेळ येताच एकेक करत जोडलेली माणसं दूर होत गेली आणि पाहता-पाहता कवीला जीवनाच्या निर्जन रस्त्यावरून एकट्याचा प्रवास सुरू करावा लागला.

कवीला साहीर लुधियानवी म्हणतात त्याप्रमाणे,
“तू नही तो और
और नही तो और सही… ” असे म्हणता आले असते. पण तो इतका संवेदनशील आहे की, त्याचे मन त्याला व्यवहारिक होऊ देत नाही. इंदिरा संत नावाच्या जुन्या पिढीतल्या एक कवयित्री होऊन गेल्या. त्यांच्या प्रत्येक कवितेमधून अभावाचे वास्तव चित्रण दिसते. धर्मवीर पाटील याच्याही प्रत्येक कवितेतून कोणाचातरी अभाव सातत्याने जाणवत राहतो. त्याच्या अवतीभवती अनेक माणसं आहेत. पण आपलं कोणीतरी हरवले आहे, याची खंत त्याच्या मनाला सातत्याने लागून राहिली आहे. ही खंतच त्याच्या कवितेची प्रेरणा आहे.

दिवसाच्या अनेक प्रहरांपैकी ‘कातरवेळ’ ही माणसाला नेहमी अस्वस्थ करत असते. मंदा कदम नावाच्या कवयित्रीने त्यांच्या एका कवितेत म्हटले आहे की,
या भयानक कातरवेळी
आठवती ती राघववेळा
घेऊन झडीचे दुःखे
जातात कोठे या राया…”
कवीलाही ही कातरवेळ अशीच छळत राहते. दिवस म्हणजे त्याचे जीवन आणि हे जीवन कातर म्हणजे अस्वस्थ करत जाते. कवीला परिस्थितीशी बिलकुल झगडायचं नाही. तो निमुटपणे त्याच्या वाटेला आलेली परिस्थिती स्वीकारतो आणि आलेल्या एकटेपणात दुःख उगाळत बसतो. आपल्या वाट्याला आलेल्या दुःखाला तो कोणालाही दोषी ठरवत नाही. ते दुःख आपले प्रारब्ध आहे आणि ते आपल्याला सोसावेच लागेल हे त्याने निश्चित केले आहे. अस्वस्थ करणाऱ्या क्षणांना त्याने काव्यबद्ध केले आहे.

अगदी अर्पणपत्रिकेपासूनच या कवितासंग्रहाचा प्रवास सुरू होतो…
‘ज्यांच्या वाट्याला
नियतीने एकटेपण लादले
त्या प्रत्येकासाठी…’ त्याने हा संग्रह अर्पण केला आहे. कवी प्रत्येक कवितेतून आपलं नातं मानवी जीवनातील चिरंतन आदिम दुःखाची जोडतो. हे दुःख नष्ट करण्याचा बुद्धाचा चौथा पर्याय तो स्वीकारत नाही. उलट हे दुःख नाहीसे करण्यापेक्षा, तो हे दुःख कोणीतरी नीटसं समजून घेण्याची इच्छा बाळगतो. हे दुःख समजावून घ्यायचं म्हणजे तथाकथित सुखाचे बुरखे फाडून, आपला अहंकार सोडून त्याच्या दुःखाशी एकरूप होणं होय.

या संग्रहामध्ये दिवस कातर होताना (२१ कविता), सोलून काढता येत नाही त्वचा (४०) चिकटलेलं असतं दुःख देहाला (२०) आणि सलत राहते आत दीर्घ जीवघेणे (८) अशा ४ विभागात एकूण ८९ कविता आहेत. या चारही विभागातील कवितेचा तपशील वेगवेगळा असला तरी या साऱ्या कविता एकाकीपण आणि त्यातून आलेले चिरंतन आणि न टाळता येणारे दुःख या एका विषयाशी घट्ट जोडल्या गेल्या आहेत.

कवी ज्या काळात राहतो, तो त्याचा काळ त्याला छिन्नविछिन्न वाटतो. त्या काळाच्या घड्या अस्ताव्यस्त आहेत आणि त्यातील संदर्भ कणाहीन आहेत. अशा अस्वस्थ काळात तो स्वतः गुरफटत गेला आहे. त्यातून त्याला बाहेर पडायचे आहे; पण स्वतःचे गुरफटलेपण मांडताना त्याने ‘काळाच्या जबड्यात विशाल पटावर कस्पटासमान जगण्याचे महत्व समजूनही मी सोडू शकत नाही माझ्या हातातले डिवाइस दोन हाता-बोटांच्या तालावर आयुष्य नाचवत’ ही परिस्थिती त्याने स्वीकारून टाकली आहे. कवीला रडताही न येणारे वास्तव कोणासमोर मांडण्याचे धारिष्ट्य नाही. त्याला या दुःखाला कोणाला जबाबदारही धरायचं नाही. पण ते दुःख असह्य होतं, त्यावेळी मन मोकळं करण्यासाठी त्याला बुद्धाला जवळ करावेसे वाटते. कारण, त्याच्याइतकं दुःख नीट कोणीच समजावून घेणार नाही, याची कवीला खात्री आहे.

‘जिवंत असल्याची खूण’ या कवितेमध्ये कवी विलक्षण गोंधळलेल्या मनःस्थितीत आहे. पहिल्या कडव्यात ‘निराशेची प्रेषिते’ त्याची पाठ सोडत नाहीत त्यावेळी ‘आपण जिवंत आहोत की नाही’ अशी शंका त्याच्या मनात येते. तर शेवटच्या कडव्यामध्ये या निराशेच्या लाटेतून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी त्याला ‘इतिहासाच्या बळकट दोरीला धरून’ राहायचे आहे. अगदी ‘जीवात जीव असेतोवर’ असेही तो म्हणतो. या कवितेत गोंधळलेली भावावस्था असली तरी, निराशेची प्रेषिते, गढूळ शंका, तकलादू प्रयत्नांच्या जंजाळात या प्रतिमा खोल खोल आतून आलेल्या वाटतात.

कवीला घुसमटीच्या या संदर्भात एकटेपण नेहमीच ताकदीने घुसखोरी करते, असे सतत वाटत आहे. आणि मग तो वाट पाहतो आहे ‘एकटेपणाच्या रात्रीची सवय होण्याची…’ मन पोकळ आहे, निर्वात आहे. त्यामुळे त्याला या पोकळीत दिवे लावण्याची इच्छा असूनही लावता येत नाही. मग ती पोकळी घेऊनच त्याला पुढे सरकावे लागते.

‘आपल्या असण्याने आणि नसण्याने नसतो कोणाला फार काही फरक पडत, असते ती फक्त त्या त्या क्षणाची गरज… जी आपल्या नसण्याने भागवत असतोच कुणीतरी…’ या ओळीमधून कवी आपल्या आयुष्यातून गरज भागवून निघून गेलेल्या सोयऱ्यांबद्दल विलक्षण आर्ततेतून राग व्यक्त करतो. कुठेतरी सुरू झालेला त्याचा जीवनाचा प्रवास तो चालत राहतो. दमछाक होते, पण मागे वळून पाहिले तर आपण पुढे सरकलेलोच नाही, याची जाणीव होते. आणि ते रुतलेपण त्याला आणखी अस्वस्थ करत राहते.

या संग्रहातील अतिशय सुंदर कविता म्हणजे ‘प्रिय अँजोलिना’ ही. अँजोलिना ही एका ‘The bone Collector’ नावाच्या सिनेमातील सुंदर अभिनेत्री आहे. कवीला त्या अभिनेत्रीच्या डोळ्यात आपला हमसफर दिसतो आहे. त्या सिनेमात अँजोलिनाच्या वाट्याला आलेल्या दुःखात कवी स्वतःला शोधतो आणि तिला आपल्या कवितेची नायिका बनवून स्वतःचं दुःख हलकं करण्याचा मार्ग वापरून मोकळा होतो. कवितेच्या शेवटी तिचे पाणीदार डोळे कवीचे दुःख सावरायला पुरेसे असतात ही जाणीव त्याने शब्दबद्ध केलीय. इंग्रजी सिनेमा पाहणाऱ्या रसिकांना ही कविता चांगली कळेल.

कवीला दुःखाला चिमटीत पकडून त्याला ‘तू कस्पट आहेस’ म्हणून सांगायचं आहे. पण त्याला ते शक्य झाले का? हे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. डिप्रेशन, घुसमटीचे संदर्भ, वादळ, हतबल, भीती , उदास दिवसात, उदास संध्याकाळ, संदर्भहीन वाट एकट्याची, काहीतरी तुटत जाताना या कविता वेगवेगळ्या वाटत असल्या, तपशील वेगळे असले तरी एकाच भावनेचे वेगवेगळे पदर आहेत, असे म्हणता येईल.

दुसऱ्या आणि तिसऱ्या विभागातील कवितांमधून कवीला पुन्हा एकटेपण अस्वस्थ करते; मात्र आता त्याला या एकटेपणात कोणाच्यातरी अभावाची जाणीव असते. या संग्रहातील चौथा विभाग महत्त्वाचा आहे. या विभागातील कवितेमधून कवी त्याच्या वाट्याला आलेल्या एकटेपणातील आदिम दुःख त्याला कवी कसे बनवते? हे सांगतो. त्याची स्पष्ट कबुली त्याने संग्रहाच्या प्रस्तावनेतच दिली आहे. कवीला आपल्या जीवनातील दुःख नाहीसे करता येत नाही; मात्र त्यातून आपण सृजनशील काव्य निर्माण करू शकतो, याची जाणीव त्याच्या दुखऱ्या मनाला सुखावून जाते. धर्मवीर पाटील यांच्या या ‘दिवस कातर होत जाताना’ या संग्रहातील कविता वाचताना इंदिरा संत, मंदा कदम, आरती प्रभू यांच्या कविता आठवत राहतात. कदाचित त्यांच्या आणि या कवितेतला घाट वेगळा आहे; मात्र यातील प्रतिमा, प्रतीके त्यांच्या कवितेशी नातं सांगतात हे मात्र खरे. एकूणच हा कवितासंग्रह समकाळातील एक महत्त्वाचा संग्रह म्हणता येईल. कारण यापूर्वी मानवी जीवनातील दुःखाचे इतके तपशील आणि पदर अन्यत्र कोठेही पहावयास मिळत नाहीत.

कवितासंग्रह – दिवस कातर होता जाताना
कवी: धर्मवीर पाटील
प्रकाशन: रेड स्पॅरो ए मीडिया हाऊस’
मुखपृष्ठ: अन्वर हुसेन
किंमत: २९९ रुपये
संपर्क: ७५८८५८६६७६


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading