कोल्हापूर हे कलाकारांचे माहेरघरच आहे. या मातीत अनेक कलाकार घडले अन् घडतही आहेत. संभाजीराजे मालिकेमधील कोंडाजीबाबा फर्जलच्या भुमिकेतून अभिनेता आनंद काळे हे सर्वांनाच परिचयाचे झाले. सर्वांच्या कायम आठवणीत राहील असा अप्रतिम अभिनय आनंद यांनी यामध्ये केला होता. सध्या आनंद माझी तुझी रेशीमगाठ यामालीकेमध्ये श्रेयस तळपदेच्या काकांची भूमिका करत आहेत. सौदामीनी ताराराणी या ऐतिहासिक मालिकेमध्ये हंबीरराव मोहीते यांची भूमिकाही ते करत आहेत. लेक माझी दुर्गा या नव्या मालिकेत लवकरच ते दिसणार आहेत.
अभिनय क्षेत्रात करियर करायचे हा उद्देश ठेऊनच आनंद काळे यांनी यामध्ये पाऊल टाकले. तसे त्यांनी यामध्ये चांगले नावही कमावलेले आहे. त्यांचा दिनक्रम यामुळेच नेहमी व्यस्त असतो. अशा व्यस्त दिनक्रमातूनच त्यांनी आपला बाईक रायडिंगचा छंदही मोठ्या उत्साहाने जोपासला आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी कोल्हापूर ते मुंबई, मुंबई ते गोकर्ण व तेथून गोवामार्गे कोल्हापूर अशी राईड केली. समुद्र किनारपट्टीला लागून जाणारा हा मार्ग होता. या राईडमध्ये त्यांच्यासोबत 28 जण सहभागी झाले होते. निसर्गाचा मनमुराद आनंद घेत, किनारपट्टीवरील जनजीवनाचा ओळख करून घेत त्यांनी ही राईट पूर्ण केली.
यापूर्वी कोल्हापूर ते गुजरात मधील सापुदरा हिल स्टेशन व पुन्हा कोल्हापूर अशी बाईक राईड त्यांनी केली आहे. या राईडमध्ये त्यांच्यासोबत मुंबई येथून ५१ जण सहभागी झाले होते. अवघ्या चार दिवसात त्यांनी १४०० किलोमीटरचा प्रवास दुचाकीवरून केला. या राईड्सचा फायदा काय ? यावर बोलताना आनंद म्हणाले, अशा या राईड्समधून फिटनेस राखला जातो. फिटनेससाठी प्रत्येकाने कोणत्याही आऊटडोअर खेळात भाग घेतला पाहीजे. मग तुम्ही क्रिकेट खेळा किंवा ट्रेकिंगला जावे तसेच बायकिंगलाही जायला हवे. यातून खूप काही शिकायला मिळते.
नुकत्याच पूर्ण केलेल्या सात दिवसांच्या गोकर्ण राईडबद्दल सांगताना ते म्हणाले की मुंबईहून कोस्टर हायवेने ते रत्नागिरीतील भाटे येथे पोहोचले. तेथून ते गोवा व पुढे गोकर्णला पोहोचले. तेथून पुन्हा गोवामार्गे कोल्हापूरला आले. हा समुद्र किनाऱ्यावरून जाणारा मार्ग असल्याने एक वेगळाच अनुभव होता. काही ठिकाणी तो छोटा व एकमार्गी आहे. चढ-उतार आणि स्वच्छ हवेचा आस्वाद घेत मनाला एक वेगळा आनंद देणारी अशी ही राईड होती.
आत्तापर्यंत आनंद यांनी छोट्या छोट्या म्हणजे सहा ते सात दिवसाच्या राईड्स केल्या आहेत. आता यापूढे ते मोठ्या राईड्स करणार आहेत. साधारण चौदा दिवसाच्या राईड्स करण्याचे त्यांचे नियोजन आहे. राईड्सच्या या छंदाबाबत बोलताना आनंद म्हणाले, २००२ मध्ये त्यांनी प्रथम दुचाकी घेतली. पण राईड्सवर जाता आले नव्हते. जवळपास 20 वर्षे ते राईड्सवर जाण्याचा प्रयत्न करत होते. पण तशी संधीच मिळत नव्हती. एकतर कामाचे व्यस्त तास अन् काही इतर अडचणी अशाने त्यांना छंदाकडे फारसा वेळ त्यांना देता आला नव्हता. पण आता वेळ देता आला नाही तर हे बायकिंगचे वेड राहूनच जाईल अशा उद्देशाने कामाच्या व्यस्त वेळातून वेळ काढत त्यांनी हा छंद आता सुरु ठेवला आहे.
रायडिंगसाठी आनंद यांनी कावासाकिची निंजा १००० सीसी मशीन असणारी दुचाकी खरेदी केली आहे. बायकिंग ब्रदर हुड नावाचा एक ग्रुप आहे. हा ग्रुप जगभर आहे. रायडिंग जाताना या ग्रुपची मदत त्यांना होते. हा ग्रुप एकमेकांना मदत करत असतो. ओळख नसली तरी सुद्धा एक बायकर दुसऱ्या बायकरला मदत करतो. हे या ग्रुपचे वैशिष्ट्य आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
great… Anand nehmich asa energetic asto.tyane kahi tharavle tar purn effort lawun te kartoch.
keep going ahead Dear…