किल्ल्यांनी हजारो वर्षांचा इतिहास पाहिला आहे, अनुभवला आहे. अनेक राज्य उदयाला आलेली पाहिली आहेत, नामशेष झालेली पाहिली आहेत. समाजात झालेली स्थित्यंतरे या किल्ल्यांनी पाहिली आहेत, त्यांनी माणुसकीचे टोकाचे धडे जसे अनुभवले आहेत, तसेच विश्वासघाताचे प्रसंगही पाहिले आहेत. या किल्ल्यांमधे जो काही इतिहास दडला आहे तो किमान उपलब्ध साधनसामग्रीनिशी आणि प्रचंड अशा कल्पनाशक्तीनिशी समोर आला पाहिजे.
सुधाकर घोडेकर
महाराष्ट्र राज्याचं वर्णन करताना आम्ही नेहमीच गडकिल्ल्यांचा देश असं म्हणत असतो. महाराष्ट्र खरोखरच गड किल्ल्यांचा देश आहे आणि महाराष्ट्राला लाभलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगात ही किल्ल्यांची रत्ने ठिकठिकाणी पाहायला मिळतात. हे किल्ले केंव्हा अस्तित्वात आले, त्या ठिकाणी कुणी कुणी आणि केंव्हा केंव्हा वास्तव्य केलं याविषयी सलग अशी माहिती सापडतच नाही. या किल्ल्यांची दुर्दशा का झाली, आम्ही त्यांचं रक्षण करण्यात का अपयशी झालो, किंवा आम्हाला त्यांचं नेमकं महत्व का समजलं नाही हे प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहणार आहेत. आपापल्या परीने, उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे काही अभ्यासक त्यावर प्रकाश टाकतीलही. पण हे सगळं मागच्या दोन तीनशे वर्षांपुरतं मर्यादित असेल. हे किल्ले मात्र मागील काही हजार वर्षे अस्तित्वात आहेत. हे सगळे किल्ले म्हणजे संपूर्ण न उलगडणीरी कोडी आहेत.
आम्ही किल्ल्यांबाबत, किंबहुना इतिहासाबाबतच उदासीन बनलेलो आहोत. मोगल आणि इंग्रजांच्या राजवटीनंतर तर आम्ही या किल्यांचं अस्तित्वही विसरुन जायला लागलो होतो अशी अवस्था मात्र झाली होती. हे किल्ले म्हणजे स्वयंपूर्ण अशी व्यवस्था होती. संरक्षण आणि जीवनावश्यक गोष्टी तिथेच उपलब्ध असतील याची काळजी करतच या किल्ल्यांची उभारणी झाली आहे. या प्रत्येक किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची उत्तम अशी व्यवस्था होती. काही ठिकाणची ही व्यवस्था आता उत्तम अवस्थेत राहिलेली नाही. इुल्या दगडी पायर्या, प्रचंड अशा मोठ्या दरवाज्यांची दारे आता आतापर्यंत शिल्लक होती. याचं केवळ महत्वच आम्हाला न समजल्याने लोकांनी त्याची वाट लावली आहे. या किल्ल्यांकडे आता वेगळ्या भिंगातून पाहाण्याची, त्याचं मोल समजून घेण्याची मात्र नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.
या किल्ल्यांनी हजारो वर्षांचा इतिहास पाहिला आहे, अनुभवला आहे. अनेक राज्य उदयाला आलेली पाहिली आहेत, नामशेष झालेली पाहिली आहेत. समाजात झालेली स्थित्यंतरे या किल्ल्यांनी पाहिली आहेत, त्यांनी माणुसकीचे टोकाचे धडे जसे अनुभवले आहेत, तसेच विश्वासघाताचे प्रसंगही पाहिले आहेत. या किल्ल्यांमधे जो काही इतिहास दडला आहे तो किमान उपलब्ध साधनसामग्रीनिशी आणि प्रचंड अशा कल्पनाशक्तीनिशी समोर आला पाहिजे. दुर्दैवाने या किल्ल्यांना इतिहासाचे साक्षीदार समजण्यापेक्षा पर्यटनस्थळ म्हणून अधिक महत्व यायला लागलं आहे. शाळेच्या सहली अनेक किल्ल्यांवर जातात. तिथे गेल्यावर गुरुजींनी तिथला इतिहास सांगायला पाहिजे. पण गुरुजींनाच जर त्याचा पुरेसा अभ्यास नसेल तर मग गुरुजी तरी काय सांगणार. बहुतेक वेळा किल्ल्यांवर सहलीला जाताना मुले क्रिकेटची बॅट, बॉल, रबरी रिंग असलं काही घेवून जातात आणि किल्ल्यावर काय केलं तर क्रिकेट खेळलो, मस्त जेवलो, गाणी म्हटली, भेंड्या खेळलो इतक्यावरच ही किल्यांची सहल संपते. केंव्हा तरी या किल्ल्यांकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची दृष्टी देण्याची आवश्यकता आहे. या किल्ल्यांवर इतक्या उंचावर पाणी कसं लागलं असेल असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत नाही. खाली गावात तीनशे फूट खोल बोअर घेतलं तरी पाणी लागत नाही, मग किल्ल्यांवर कसं हा प्रश्न पडायला पाहिजे. आणि कोणतं तंत्र वापरुन पाण्याची नेमकी जागा शोधली असेल हे कुतुहल मुलांमधे निर्माण व्हायला पाहिजे.
प्रत्येक किल्ला म्हणजे एका महाकाव्याचा साक्षीदार आहे. त्याच्या पोटात प्रचंड असा इतिहास दडला आहे. संस्कृतीच्या बदलाच एक नेटका आलेख हे किल्ले रेखाटू शकतात. गरज आहे ती या किल्ल्यांकडे पाहण्याचं एक वेगळं भिंग पुरविण्याची. अनेक लेखकांनी किल्ल्यांवर पुस्तके लिहिली आहेत. काही शेकडा पुस्तके असतील. या प्रत्येक लेखकाने लिखाण करताना आपला एक उद्देश ठेवून लिखाण केलं आहे. कुणी त्याच्या स्थापत्य शास्त्राला फोकस करुन लिहिलं आहे, कुणी भौगोलिक परिस्थितीला समोर ठेवून लिहिलं आहे. या किल्यांचा सर्वंकष अभ्यास सादर करणं हे कुणा एका लेखकाचं काम नाही आणि काही हजार पानांच्या ग्रंथात ते न बसणारं आहे. त्यामुळे प्रत्येक लेखकाने एकेक पैलू धरुन लिखाण केलं आहे. अर्थात इतकंं साहित्य उपलब्ध झाल्यानंतर तरी किल्ले या विषयात मुलांचं कुतुहल वाढायला पाहिजे तितकं वाढलं नाही. सध्या अनेक ट्रेकींगचे ग्रुप निर्माण झाले आहेत आणि शेकडो तरुण नियमितपणे किल्ल्यांना भेटी देत आहेत. अर्थात या बहुतेक गटांचा उद्देश मात्र अॅडव्हेंचर हा आहे असं जाणवतं. उंच सुळक्यावर चढणे, दुर्गम वाटेने वर जाणे या असल्या गोष्टींना प्राधान्य मिळतं. या अशा किल्ला भेटीतून थोडा खोलात इतिहास शोधायची मानसिकता निर्माण व्हायला पाहिजे. अनेक तरुण मात्र आता या किल्ल्यांच्या इतिहासाकडेही डोकावू लागली आहेत.
इतिहासकार आणि किल्ला हा ज्यांचा ध्यास आणि श्वास आहे असे संदीप भानुदास तापकीर यांचं नुकतंच महाराष्ट्राची दुर्ग पंढरी-नाशिक जिल्ह्यातील किल्ले हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. यामधे नाशिक जिल्ह्यातील सत्तर किल्ल्यांपकी तब्बल 62 किल्ले समाविष्ट झाले आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात इतक्या संख्येने किल्ले आहेत हे बहुतेकांना माहीतही नसते. सामान्य मराठी माणसाची मजल मोठमोठ्या आणि आधुनिक ऐतिहासिक घटनांमुळे प्रसिध्द असलेल्या किल्यांपर्यंतच जाते. ही संख्या जेमतेम दहा बारा असेल. जुन्नर तालुक्यात सहा किल्ले आहेत. पण खुद्द जुन्नरमधल्या नागरिकांना शिवनेरी आणि जिवधन सोडला तर इतर नावे सांगता येणार नाहीत ही अवस्था आहे.
संदीप तापकीर यांनी नाशिक जिल्ह्यातल्या 62 किल्ल्यांना समक्ष भेट दिली आहे. इतिहासाच्या अभ्यासूच्या नजरेतून त्यांनी या किल्ल्यांचा अभ्यास केला आहे. या ठिकाणी कसं जायचं, जाताना कोणकोणती काळजी घ्यायची, कुठवर रस्ते आहेत, किती चालायला लागतं, किल्ल्यांवर जाताना काय काय बरोबर न्यावं, कोणत्यावेळी निसर्गाचं रुप कसं बदलतं अशा अनेक पैलूंचा अभ्यास करुन त्यांनी प्रत्येक किल्ला आपल्यासमोर सादर केला आहे.
पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या जन्मस्थान डुबेरगडापासून त्यांनी आपल्या किल्ले अख्यानाला सुरुवात केली आहे आणि बागलाणचं दक्षिणेकडील प्रवेशद्वार समजल्या जाणार्या गाळणापाशी येवून ते थांबले आहेत. प्रत्येक किल्ल्याचं भौगोलिक स्थान, त्यामागे असलेला संक्षिप्त इतिहास, त्यामागच्या अख्याईका असं आवश्यक ते वर्णन दिलेलं आहे. तापकीर ग्रामीण भागातून आलेले असल्याने त्यांनी या प्रत्येक किल्ल्याच्या परिसराचं आणि तिथल्या निसर्गाचं वर्णन अतिशय आत्मीयतेने केलेलं आहे. प्रत्येक किल्ला हे बोलकं शब्दचित्र बनलं आहे. हे पुस्तक वाचून, किल्ल्याची माहिती घेवून किल्ल्यावर पाऊल टाकाल तर कोणताच किल्ला एक उजाड डोंगर वाटणार नाही, की केवळ एक पर्यटनस्थळ वाटणार नाही. इतिहासातला एक महापुरुष आपल्या समोर आहे असंच जाणवेल. मग अशा किल्ल्यावर गेल्यावर तिथल्या प्रत्येक गोष्टींची काळजी करावीशी वाटेल.
दुर्गपंढरी हे पुस्तक अथक भटकंती, इतिहासाचा सखोल अभ्यास आणि प्रचंड अशी तळमळ यातून निर्माण झालेली कलाकृती आहे हे जाणवेल. इतकं उपयुक्त, अभ्यासपूर्ण लिखाण होण्यासाठी तुम्हाला एखाद्या विषयाचं वेड लागायला पाहिजे. संदीप तापकीर यांना किल्ल्यांनी अगदी तरुणपणीच झपाटलं असल्याने ते आणि किल्ले एकमेकांपासून विभक्त होवूच शकत नाहीत.
भरपूर माहिती, प्रत्यक्ष घेतलेली अनुभूती, आत खूल रुतलेलं दुर्ग प्रेम आणि कोणत्याही अलंकारीक सजावटीशिवायचं रोकडं, सरळधोक लिखाण यामुळे हे पुस्तक वाचण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. विश्वकर्मा प्रकाशनने त्यांच्या नेहमीच्या गुणवत्तेसह प्रकाशित केलेलं हे पुस्तक म्हणजे प्रत्येक घरात आवश्यक असलेला ग्रंथ आहे. सध्या मुलांना केवळ आर्थिक कमाई करणारी यंत्रे म्हणून वाढवण्यापेक्षा त्यांना अनेक मूल्ये शिकविण्याची आवश्यकता आहे. इतिहासातली व्यक्तिमत्वे म्हणजे अशा मूल्यांची प्रतिकेच आहेत. मुलांना नियमित अभ्यासाबरोबर आवर्जून शिकवावं ते म्हणजे इतिहास. सुदैवाने आपल्याला अभिमान वाटावा असा इतिहास आहे. तो आपणच आपल्या मुलांपुढे उघडायला हवा.
पुस्तकाचे नाव – महाराष्ट्राची दुर्ग पंढरी – नाशिक जिल्ह्यातील किल्ले
लेखक – संदीप भानुदास तापकीर
प्रकाशक – विश्वकर्मा प्रकाशन, पुणे
किंमत – ४५० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.