कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीमसंघाचे सर्वेसर्वा मुख्य संरक्षक स्वर्गीय बाळासाहेब गायकवाड “दादा ” यांच्या पुण्यतिथीचा आज दिवस. त्यानिमित्य त्यांना विनम्र अभिवादन आज त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण व नवीन बांधलेले आधुनिक मल्ल वसतिगृहाचे उदघाटन समारंभाचे नियोजन आहे. या निमित्ताने मोतीबाग तालमीचा इतिहास व दादांच्या आठवणींना उजाळा या दृष्टीकोनातून कांही शब्दफुलांची सहृदय उधळण होणे क्रमप्राप्त आहे.
पी. जी. मेढे,
उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ
मोतीबाग तालीम आखाडा हा 150 वर्षांहून अधिक जुना असून कुस्तीच्या बाबतीत त्यांचे एक ऐतिहासिक महत्व आहे. हा आखाडा राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेला आहे. कुस्तीसाठी त्यांनी आपली शक्ती व धन समर्पित केले. त्यांनी संपूर्ण भारतातीतल आणि शेजारील आशिया खंडातील नामांकित कुस्तीगिरांना जास्तीतजास्त सुविधा आणि आर्थिक मदत देवून या आखाडयात राहण्यास आमंत्रित केले. या मागील हेतू इतर स्थानिक कुस्तीगिरांना जास्तीतजास्त प्रशिक्षित करणे आणि तयार करणे हा होता. त्यांच्या या सक्रीय प्रयत्नांमुळे कोल्हापूर संस्थानात कुस्तीची भरभराट झाली आणि ती आजपर्यंत चालू आहे. याच मोतीबाग आखाडयाचा वारसा चालू ठेवणेचे काम कोणी केले असेल तर ते याचे सर्व श्रेय बाळदादा यांनाच जाते.
सन 1960 च्या दशकात माजी मंत्री कै. श्रीपतरावजी बोंद्रे दादा यांच्या सोबत आणि लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, बाळदादा यांनी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली. ही संस्था कुस्ती प्रतिभेच्या संगोपनासाठी एक आधारस्तंभ बनली. शिवाय कुस्तीपटू आणि प्रशिक्षण केंद्रांना सढळ पाठिंबा देत राहिली आहे. स्व. बाळासाहेब गायकवाड यांची या कुस्तीप्रती असलेली निष्ठा अतुलनीय अशीच होती. त्यांनी कुस्तीच्या प्रगतीला पूर्ण वेळ देता यावा यासाठी अविवाहित राहण्याचा निर्णय घेवून आपणास पूर्णपणे कुस्तीसाठी झोकून दिले हे अव्दितिय उदाहरण असून कुस्तीच्या जगात जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ते पूर्णपणे रमले. त्यांच्या शिस्तबध्द आणि कडक स्वभावामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी मिळवणाऱ्या असंख्य कुस्तीगिरांना घडविण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या अथक समर्पणामुळे त्यांना “कुस्तीचे भिष्माचार्य” ही पदवी आम जनतेतूनच प्रदान करण्यात आली.
त्यांच्या योगदानाने कोल्हापूरच्या कुस्ती समुदायावर अमीट छाप सोडलेली आहे. आजमितीस त्यांच्या अनुपस्थितीमुळे झालेली पोकळी खोल आणि कधीही भरून न येणारी अशी आहे. बाळदादांचा वारसा त्यांच्या जीवनकार्याचा पुरावा आहे आणि त्यांची स्मृती भावी कुस्तीक्षेत्रातील पिढ्यांना निश्चितपणे प्रेरणा देत राहील.
त्यांच्या कार्यकौशल्याच्या विशेष बाबी
- खरी कॉर्नर येथील खाजगी जागेत प्रथमतः जिल्हा तालीमसंघाची मुहूर्तमेढ रोवली.
- त्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेत संघाचे ऑफिस विनमोबदला जीवनाच्या अंतापर्यंत चालू ठेवले.
- गेल्या 100-150 वर्षातील नावाजलेल्या देशातील व परदेशातील कुस्तीगिरांचे कुस्ती दंगलीचे फोटोंचे दालन तयार करून नवीन कुस्तीगिरांना त्याव्दारे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
- कुस्तीगिरांसाठी विशेष निवासी इमारत बांधून त्यामध्ये प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण करण्याचे नियोजन केले त्याचीच आता ही परिपूर्तता झालेली आहे.
- कुस्तीगिरांना त्यांचे कौशल्य आणि तंत्र सुधारण्यासाठी जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा केंद्र शासनाकडून मॅट व इतर साहित्याची उपलब्धता करवून घेतली.
- स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली यांची 2 ट्रेनिंग सेंटर्स मोतीबाग आखाडयासाठी मिळवून कोल्हापूर जिल्हयातील ग्रामीण भागातील कुस्तीगिर मुलांना आधुनिक कुस्तीतंत्रज्ञानाची सोय करून दिलेली आहे.
- कोल्हापूर गावासारख्या एका लहान खेड्यातून आलेल्या छोटया मुलाला जवळजवळ दत्तकच घेवून त्याला कुस्तीसम्राट युवराज पाटील या नावाने तयार केले व त्याच्या करवी देशात व परदेशात ज्याने आपल्या नावाचा डंका निर्माण केला होता अशा बलाढ्य पैलवान सतपाल नवी दिल्ली याला 13 वेळा चितपट करून दाखविले.
दादांचे विशेष गुणांचा लेखाजोखा
- दादा म्हणजे कडक शिस्तीचा माणूस
- फक्त दुसऱ्याला शिस्त लावत नसून स्वतः ही अत्यंत शिस्तीने वागत असत बोलण्यापेक्षा कणभर कृती या महात्मा गांधीच्या ब्रिदवाक्यास प्रमाण मानून ते प्रत्यक्ष आणले हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते.
- त्यांच्या अभ्यासू वृत्ती वाखाणण्यासारखी होती. कुस्तीपेशावरील अनेक पुस्तकांचे त्यांनी वाचन व मनन केले होते व त्याचा उपयोग कुस्तीगिरांना कसा होईल या दृष्टीकोनातून मार्गदर्शन केले.
- कुस्तीपेशातील अनेक खाचाखुणांचा डावपेचांचा सखोल अभ्यास करून कुस्तीगिरांना आखाडयात येवून मार्गदर्शन केले.
- त्यांच्या निस्वार्थीपणाला तोड नाही.
- स्वतः अविवाहित राहून घरच्या कामांना पूर्ण फाटा दिला. संपूर्ण आयुष्य कुस्तीगिरांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी वेचले
- जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचा एकूणच कारभार चोख ठेवून संघाची आर्थिक स्थिती भक्कम ठेवली व शिल्लक रकमेच्या येणाऱ्या व्याजातून संघाचे कामकाज चालविले.
- राज्यातील तसेच संपूर्ण देशातील कुस्तीक्षेत्रात त्यांच्या करारी स्वभावामुळे वचक होता. कुस्तीक्षेत्रात त्यांच्या बाणेदार व निस्वार्थी स्वभावामुळे त्यांचा शब्द हा अखेरचा मानला जात असे.
- दादांनी संपूर्ण आयुष्यामध्ये कुस्तीपेशाला कधीही राजकारणाची झालर लागू दिली नाही.
- सर्वाना समान न्याय हा त्यांचा बाणा होता व चुकीला क्षमा नाही असा त्यांनी आपला एकप्रकारचा दरारा ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण कुस्तीगिरांवर त्यांचा एक प्रकारचा वचक होता व कुस्तीगिरांकडूनही त्यांना आदरयुक्त प्रेम मिळत गेले
- दादांच्या नियोजन कलेला तोड नव्हती. मोठमोठ्या कुस्ती दंगलींचे केलेले नियोजन वाखाणण्यासारखे होते. कुस्तीदंगलीत कांही मतभिन्नता झालेस दादांचा शब्द हा अखेरचा शब्द असायचा व कुस्ती दंगली योग्य प्रकारे विनातकार पार पडायच्या.
- दादांनी जिल्हयातील तसेच बाहेरील जिल्हयातील मोतीबाग व इतर तालमीत आलेल्या इतर अनेक कुस्तीगिरांना मार्गदर्शन करून महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी रूस्तुमे हिंद वगैरे या राष्ट्रीय पातळीवरील तसेच निरनिराळया वजनगटातील कुस्तीगिरांना सुवर्ण रौप्य आणि ब्रॉझ अशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदके मिळविण्यासाठी जिवापाड कष्ट केले.
आज आपण या दादांच्या पुतळ्याचे अनावरण करीत असताना दादांच्या अढळ समर्पणाचे. त्यांच्या शिस्तबध्द भावनेचे आणि कुस्तीच्या जगात त्यांच्या अमूल्य योगदानाचे प्रतिक म्हणून तो उभा राहूद्या. त्यांचा वारसा या प्रेमळ खेळात उत्कृष्टतेचा पाठलाग करण्यासाठी आपल्याला प्रेरणा आणि मार्गदर्शन देत राहो अशी मनोमन भावना.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.