भारतात बहु औषध-प्रतिरोधक क्षयरोगावर नवीन लहान आणि अधिक प्रभावी उपचार पद्धती सादर करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली मान्यता.
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, शाश्वत विकास उद्दिष्टांतर्गत क्षयरोग या आजाराचे उच्चाटन करण्याच्या निर्धारित जागतिक उद्दिष्टीत कालावधीपेक्षा पाच वर्षे अगोदर, 2025 पर्यंत देशाला क्षयरोगमुक्त करण्यासाठी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने BPaLM उपचार पद्धती सुरू करण्यास मान्यता दिली आहे. BPaLM उपचार पद्धती ही राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) अंतर्गत बहु औषध प्रतिरोधक क्षयरोगावर (MDR-TB) एक अत्यंत प्रभावी आणि लहान उपचार पर्यायाच्या रुपात एक नवीन उपचार पद्धती आहे. या उपचार पध्दतीत प्रीटोमॅनिड सोबतच बेडक्विलिन आणि लिनेझोलिड (मोक्सिफ्लॉक्सासिनसोबत किंवा मोक्सिफ्लॉक्सासिनविरहित) नावाच्या नवीन क्षयरोग-विरोधी औषधांचा समावेश आहे.
BPaLM उपचार पद्धतीमध्ये चार औषधांचा समावेश –
बेडाक्विलिन, प्रीटोमॅनिड, लिनझोलिड आणि मोक्सीफ्लॉक्सासिन. या चार औषधांचे मिश्रण पूर्वीच्या MDR-TB उपचार पद्धतीपेक्षा जास्त सुरक्षित, अधिक प्रभावी आणि जलद उपचार पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे. पारंपरिक MDR-TB उपचार पद्धतीत सुमारे 20 महिने उपचार सुरू ठेवावे लागत असून रुग्णांना गंभीर दुष्परिणांचाही सामना करावा लागतो. तर, BPaLM उपचार पद्धती केवळ सहा महिन्यांत उच्च उपचार यश दराने बहु औषध प्रतिरोधक क्षयरोग बरा करू शकते. भारतातील सुमारे 75,000 बहु औषध प्रतिरोधक क्षयरोग रूग्ण आता या नव्या लहान उपचार पद्धतीचा लाभ घेऊ शकतील. या उपचार पद्धतीत इतर फायद्यांसह, एकूण खर्चातही बचत होणार आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने, आरोग्य संशोधन विभागाशी सल्लामसलत करून या नवीन क्षयरोग उपचार पद्धतीचे प्रमाणीकरण सुनिश्चित केले आहे. यासाठी देशातील विषय तज्ञांनी पुराव्यांचा सखोल आढावा देखील घेतला आहे. हा बहु औषध प्रतिरोधक क्षयरोग उपचार पर्याय सुरक्षित आणि किफायतशीर आहे याची खात्री करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने, आरोग्य संशोधन विभागामार्फत आरोग्य तंत्रज्ञान मूल्यांकन देखील केले आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे क्षयरोग संपवण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशाच्या प्रगतीला लक्षणीय चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.