गणराया हे बुद्धीचे दैवत आहे. आपले करिअर घडविण्यासाठी मराठी तरुणांच्या झुंडी योग्य दिशेने कधी जाणार, हा खरा प्रश्न आहे. भाई-दादांच्या मागे धावाधाव, आंदोलने, घोषणाबाजी, हुल्लडबाजी यापेक्षा मराठी मुलांनी आपले शिक्षण आणि उत्तम करिअर घडविण्यासाठी अधिक वेळ देऊन जिद्दीने प्रयत्न करावेत, अशी सद्बुद्धी त्यांना गणरायाने द्यावी.
डॉ. सुकृत खांडेकर
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, या घटनेला जवळपास १३० वर्षें उलटली. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय जनजागृतीसाठी घरगुती गणेशोत्सव सार्वजनिक जागेवर आणला. मुंबईतील गिरगावातील केशवजी नाईक चाळीत लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन व्हावे, तरुण मुलांना शौर्याची स्फूर्ती मिळावी आणि लोकांमध्ये स्वातंत्र्याची ऊर्मी निर्माण व्हावी या हेतूने त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.
शिवसेनेचे दिवंगत नेते प्रमोद नवलकर हयात असताना त्यांनी लोकमान्यांचे विचार सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून मुंबईत सर्वत्र रुजविण्याचा प्रयत्न केला होता. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात लोकमान्यांची प्रतिमा व्यासपीठावर दिसावी ही परंपरा त्यांनी सुरू केली.
गेल्या २५ ते ३०वर्षांत सार्वजनिक गणेशोत्वाचे स्वरूप वेगाने बदलले. या उत्सवाला एक इव्हेंट म्हणून रूप प्राप्त झाले. लक्ष-लक्ष आणि कोटी-कोटी रुपये वर्गणी व देणग्यांच्या रूपाने मिळू लागली. मोठे जाहिरातदार हे आयोजक व प्रायोजक बनले. प्रचंड देखावे, भव्य मंडप, विद्युत रोषणाई, उंच मू्र्ती, रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणी, बॅण्ड आणि बेंजो वाजत राहतो. पप्पी दे पप्पी दे पारुला, चिमणी उडाली भुर्रर्र, झिंग झिंग झिंगाट अशी गाणी आता सुरू होतील. गणेश विसर्जनाची मिरवणूक ही वर्षानुवर्षे प्रतिष्ठेची मानली जाते. पण गेल्या काही वर्षांत गणपतीच्या आगमनाच्या मिरवणुका तितक्याच भव्य, दिव्य निघू लागल्या आहेत.
ऐन गर्दीच्या वेळी गणेश आगमनाच्या मिरवणुकींनी तासनतास वाहतुकीचे रस्ते अडवले जात आहेत. मोठ्या आवाजातील बॅण्ड आणि बेंजो मध्यरात्रीपर्यंत ऐकायला मिळतो आहे. लाऊड स्पिकरवर रात्री १० नंतर निर्बंध घालणारा न्यायालयाच्या आदेश सर्वत्र धाब्यावर बसवला जातो आहे. गणेशोत्सव मंडळांच्या आवाजी ताकदीपुढे व त्यांना मिळत असलेल्या राजकीय नेत्यांच्या व स्थानिक भाई-दादांच्या संरक्षणामुळे पोलीस-प्रशासनही हतबल झालेले दिसत आहे.
यंदा दहीहंडीचा उत्सव मुंबईत दणक्यात साजरा झाला, आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारा गणेशोत्सव त्याहीपेक्षा मोठ्या उत्साहात, दणक्यात नि मोठ्या डिजेच्या आवाजात साजरा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या मागे तरुणांचे तांडेच्या तांडे धावताना दिसत होते, त्यांच्या सभांना गर्दीच्या झुंडीच्या झुंडी जाताना दिसत होत्या. दहीहंडीला उत्साही तरुणांच्या फौजा पुढाऱ्यांची नावे आणि त्यांचे फोटो असलेले रंगीत टी-शर्ट घालून हंड्या फोडताना दिसत होते. आता गणेशोत्सवातही राजकीय पक्षांच्या विविध रंगाची उधळण बघायला मिळेल.
गणराया हे बुद्धीचे दैवत आहे. आपले करिअर घडविण्यासाठी मराठी तरुणांच्या झुंडी योग्य दिशेने कधी जाणार, हा खरा प्रश्न आहे. भाई-दादांच्या मागे धावाधाव, आंदोलने, घोषणाबाजी, हुल्लडबाजी यापेक्षा मराठी मुलांनी आपले शिक्षण आणि उत्तम करिअर घडविण्यासाठी अधिक वेळ देऊन जिद्दीने प्रयत्न करावेत, अशी सद्बुद्धी त्यांना गणरायाने द्यावी.
एसटी कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या तोंडावर वेतनवाढीच्या मागणीसाठी संप केला. कोकणात जाणाऱ्या लक्षावधी चाकरमान्यांचे कमालीचे हाल झाले, राज्याच्या ग्रामीण भागाची जनवाहिनी अशी लालपरीची ओळख आहे. आपल्या मागण्यांसाठी निदान यापुढे तरी जनतेला वेठीला धरू नये, अशी सद्बुद्धी गणरायांनी कर्मचारी संघटनांना द्यावी. सत्ता येते व जाते, सरकारे येतात व जातात, पण मतांच्या राजकारणासाठी कररूपाने आलेल्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये अशी सद्बुद्धी गणरायाने राज्यकर्त्यांना द्यावी.
मुंबईच्या विस्तारीत पूर्व उपनगरात बदलापूर येथे चार वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्यांनी अत्याचार केला. या घटनेवरून महाराष्ट्र हादरला. बदलापुरात प्रक्षोभ प्रकट झाला. राज्याच्या पोलीस प्रमुख महिला आहेत, राज्याच्या मुख्य सचिव महिला आहेत. बेटी बचाव बेटी पढाव हे केंद्राचे अभियान चालू आहे. मग मुलींवर अत्याचाराच्या घटना वारंवार का घडत आहेत ?
मालवण येथे राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक कोसळल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. गेट वे ऑफ इंडिया, प्रताप गड, शिवाजी पार्क अशा असंख्य ठिकाणी महाराजांचे पुतळे दिमाखाने वर्षानुवर्षे उभे आहेत. मग मालवणला ही दुर्घटना का झाली ? कलासंचालयाने ६ फूट उंचीच्या पुतळ्याला परवानगी दिली असताना ३५ फूट उंचीचा पुतळा कोणाच्या सांगण्यावरून उभारला ? पुतळा स्टेनलेस स्टील असता, तर कोसळला नसता, असे सांगून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.
जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून मुंबईतील धारावीची ओळख आहे. धारावीत महापालिकेचे तीन वॉर्ड व एक विधानसभा मतदारसंघ आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे जवळपास तेवीस हजार कोटींचे काम एका दिग्गज व शक्तिशाली खासगी उद्योग समूहाला दिले आहे. या प्रकल्पातील रहिवाशांना घरे देण्यासाठी सार्वजनिक भूखंड देण्याचा सपाटा चालू आहे.
मुलुंड-भांडुपमधील भूखंड दिले जाणार आहेत, मिठागरांच्या जमिनीही दिल्या जाणार आहेत. धारावीमधील बेस्ट बसेसच्या डेपोंच्या जागाही पुनर्वसनासाठी मागितल्या जात आहेत. विशेष म्हणजे अपात्र ठरलेल्या हजारो घरांतील रहिवाशांना तिथे हलविण्याचा घाट घातला जात आहे. अनधिकृत रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी मौल्यवान सार्वजनिक जागांची मागणी केली जात आहे, २५ वर्षांपूर्वी मुंबईत झोपडपट्टी हटविण्यासाठी एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन) योजना सुरू झाली. इतक्या वर्षांत झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देऊन त्या जागांवर शेकडो उत्तुंग टॉवर्स उभे राहिले. पण झोपड्यांची व त्यातील रहिवाशांची संख्या कमी झाली का? आजही मुंबईत ६५ लाख लोक झोपडपट्टीत राहात आहेत. मिळालेली घरे विकून ते दुसरीकडे गेले, मग या योजनेला लाभ नेमका कोणाला झाला. ही योजना नेमकी कोणासाठी राबवली जात आहे ?
गेल्या काही वर्षांत मुंबईतील मराठी भाषिकांची संख्या विलक्षण कमी झाली. दीड कोटींच्या मुंबईत पंचवीस लाख मराठी भाषिक असावेत. मुंबईचे मराठीपण टिकविण्यासाठी गेल्या २५-३० वर्षांत आलेल्या सरकारने काय नेमके केले? आज मुंबईत मराठी माणूस अमराठी गर्दीत घुसमटून राहतो आहे, याचे भान सरकारला आहे का ? किमान दोन हजार झोपू प्रकल्प रखडले आहेत, एकाच वेळी मुंबईत मेट्रोची अनेक कामे सुरू आहेत, म्हणून रस्ते खोदलेले आहेत. वाहतुकीची कोंडी हा मुंबई-ठाण्याचा तर जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे. न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही मुंबईच्या फेरीवाल्यांचा फास सैल करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणे कोणालाही शक्य नाही, पण मुंबईचे महत्त्व पद्धतशीर कमी केले जात आहे, अशी भावना मुंबईकरांच्या मनात खदखदत आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई-महाराष्ट्रातून किती उद्योग, व्यवसाय, रोजगार अन्य राज्यांत गेले, यावर सरकार कधी स्पष्ट सांगत नाही आणि विधिमंडळातही चर्चा होत नाही. सर्वस्तरावर वाढलेल्या भ्रष्टाचाराने लोक वैतागले आहेत. आपण अनाथ आहोत का, असा प्रश्न मुंबईकरांना भेडसावू लागला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या लाडकी बहीण हा मुद्दा सरकारच्या अजेंड्यावर अग्रक्रमावर आहे. जोडे मारो विरुद्ध खेटरे मारो इतक्या खालच्या स्तराला महाराष्ट्रातील राजकारण गेले आहे. गद्दार, खोके, नालायक, कलंक अशा आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण गढूळ झाले आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन गुंतागुंत वाढली आहे. राजकीय पक्षांच्या तोड-फोडीने राजकारण अिस्थर झाले आहे. पैशातून सत्ता आिण सत्तेतून पैसा याचभोवती सत्तेचे राजकारण िफरत आहे. जनतेच्या दैनंदिन प्रश्नावर सरकार संवेदनशील असावे. कामावर सुखाने जायला मिळू दे व सुरक्षित घरी परत यायला मिळू दे, एवढीच सामान्य मुंबईकरांची अपेक्षा आहे. हे गणराया सर्वांना सद्बुद्धी दे…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.