काळ्या दगडावरची रेघ या कवितांची भाषा प्रमाण आहे. बोली भाषेतील प्रचलित अनेक शब्दांचा यामध्ये वापर केला गेला आहे. त्यामुळे वाचकाला सहज अर्थबोध होतो. कविता वाचनाचा आनंद मिळतो निश्चितच अतिशय सुंदर कविता संग्रह आहे.
मनोहर भोसले
सैनिक टाकळी.ता.शिरोळ
दगडावर कोरलेली अक्षरे. शिलालेख. त्यावरूनच एखादी गोष्ट कधीही न बदलणारी, खात्रीची असेल तर तिचे वर्णन करताना ‘काळ्या दगडावरची रेघ ‘ असा वाक्प्रचार वापरला जातो. याच शीर्षकाचा कवितासंग्रह आला आहे. कवी आहेत, डॉ. श्रीकांत पाटील. पेठ वडगाव मधील बळवंतराव यादव हायस्कूल मधील हे आदर्श शिक्षक आहेत. यांनी दोन वेळा राष्ट्रपती पदक मिळवले आहे. विद्यार्थ्यांमधून लेखक, कवी घडावेत यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्या ‘सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल ‘ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी बाल वांड़:मय पुरस्कार मिळाला आहे.
लॉकडाऊन, ऊसकोंडी या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. म्हणूनच वाचकाला सतत ओढ लागलेली असते की डॉ. श्रीकांत पाटील यांनी नवीन काय लिहिलेलं आहे? नवीन आहे ‘काळ्या दगडावरची रेघ ‘ कविता संग्रह.
खरंतर कविता म्हणजे कवी सांगतो एक आणि दाखवतो वेगळच ही शैली असते परंतु डॉ. श्रीकांत पाटील यांच्या कविता आरशासारख्या अगदी स्पष्ट समाजाचे प्रतिबिंब दाखवतात. कविता वाचताना ‘चेहरे पर धूल थी और हम आईना साफ करते रहे ‘ असे अवस्था वाचकाची होते यात शंकाच नाही.
‘काळ्या दगडावरची रेघ ‘ या कवितासंग्रह मधील प्रत्येक कविता वेगळी आहे. शिक्षण, राजकारण ,समाज, शेती, शेतकरी, पाऊस, पूर,दुष्काळ, स्त्री,पुरुष, नातेसंबंध असे अनेक वेगवेगळे विषय आहे. कविता निवडक शब्दांची ,स्वच्छ आणि दमदार मत व्यक्त करणारी आहे. काही कवितांमध्ये एक एक वाक्य इतकं प्रभावी आहे की वाचकाच्या ‘काळजावर रेघ ओढून जाते. जसे की –
भाकरीच्या शोधात भटकणाऱ्याला भुकेची तक्रारही करता येत नाही. इथल्या प्रत्येक गोष्टीला टच झालंय राजकारण सगळी नीतीमूल्ये पायदळी तुडवत झपाट्याने होत चाललेला बदल समाजासाठी किती घातक आहे. हे स्पष्ट दाखवण्यात आलेलं आहे. तरी कवीने आशा सोडलेली नाही. सर्वश्रेष्ठ काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
जीवन तंत्रज्ञानाच्या प्रयोगशाळेत
सुरू आहे आपली धडपड
जन्म मृत्यूचा तळ शोधणारी
आपल्या अस्तित्वाची काय शाश्वती
शेवटी सगळ्या गणिताची बाकी शून्यच
अशा शब्दात कवीने रेघ मारून ठेवली आहे. भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार मांडताना कवी म्हणतो,
झाडाच्या फांदी फांदीवर बांडगुळांची वाढते आहे गर्दी
राजकारणात सारं काही
दिसतं तसं नसतं कातड्याखाली वाघाच्या कितीदा गाढवच असतं
सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाचा सर्रास वापर केला जात आहे. ई लर्निंग , मोबाईल, इंटरनेटचा वापर वाढला आहे. परंतु याचा गैरवापर केला जातो आहे. त्याचे मोठे दुष्परिणाम नव्या पिढीवर होत आहेत. शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांची झालेली दुरावस्था कार्टून्स, कुठे हरवली शाळा, काहीही न करता, जीवनाचा वाटसरू, नेट इंटरनेट या कविता मधून सांगितली गेली आहेत. तरीही ग्रंथालयाचे महत्त्व हे ‘काळ्या दगडावरच्या रेषे’ सारखे समजावून सांगितले आहे.
या संग्रहामधील प्रवास, श्रमाची भाकरी, आता तरी सावध व्हा, कुठे हरवली शाळा, कार्टून्स, आर्टिफिशियल जग अशा एक ना अनेक कविता सुंदर आहेत. पेरा, मातीवर पाय ठेवून, मातीची बाराखडी, माती सोसते उन्हाळा, बुजगावणं, दया कर मेघराजा, अतिवृष्टी, असा कसा हा निसर्ग अशा अनेक कविता शेतकऱ्याच्या कथा आणि व्यथा मांडणाऱ्या आहेत. झेंडे, बांडगुळ, सापशिडीचा खेळ,थवे, ॲनाकोंडा या कविता प्रतीकात्मक आहेत.
कवितेच्या माध्यमातून अस्वस्थ करणाऱ्या अनेक गोष्टी मांडल्या असल्यास तरीसुद्धा एक अशा,एक नवी उमेद जागी करण्याचा प्रयत्न कवीने अस्सल पुरावे, आज अंधारून आलं, आता तरी सावध व्हा, उत्खनन,ओअॅसिस, झुला झुलू दे या कवितेमधून केला आहे.
काळ्या दगडावरची रेघ या कवितांची भाषा प्रमाण आहे. बोली भाषेतील प्रचलित अनेक शब्दांचा यामध्ये वापर केला गेला आहे. त्यामुळे वाचकाला सहज अर्थबोध होतो. कविता वाचनाचा आनंद मिळतो निश्चितच अतिशय सुंदर कविता संग्रह आहे.
पुस्तक : काळ्या दगडावरची रेघ
कवी : डॉ.श्रीकांत पाटील
प्रकाशन : ललित पब्लिकेशन,मुंबई
संपर्क : 9834342124/ 8879039143