स्त्रियांना सन्मान देणे शिकावे तर त्याच्याकडून. आपल्याला वाटते की त्याला सोळा सहस्त्र बायका होत्या. पण त्या सगळ्या स्त्रिया कंसाने बळजबरी करुन बंदिवासात कोंडून ठेवलेल्या स्त्रिया होत्या. त्यांना घरात सुध्दा कुणी पुन्हा घ्यायला तयार नव्हते तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना जगात सन्मान मिळण्यासाठी त्यांच्याशी विवाह केलेला आहे.
सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी
सखा द्रौपदीचा सखा राधिकेचा
सखा तोची माझ्या असे अंतरीचा…
श्रीकृष्ण जयंती.. गोपालकाला.. नुसतेच पुजा आणि दहीहंडी एवढेच आहे का ? त्याची गीता.. त्यातला कर्मयोग त्याचा प्रेमयोग याचा तर आपल्याला विसरच पडला आहे. त्याने मित्रप्रेम कसे असावे याची सुदामा भेटीने आपल्याला एक मिसाल दाखवली आहे. मैत्री कशी असावी ? याचे उदाहरण पेंद्याला आपला मित्र मानून पण दाखवले आहे. त्याला आपण द्वारकेचा राजा म्हणतो पण तो कधीच राजसिंहासनावर बसला नाही. त्याची दहीहंडी सुध्दा सगळ्या सवंगड्यांना दुध दही लोणी मिळावे म्हणून होती. नाहीतर त्याला दुध दह्याची काय कमी होती ?
आयुष्यात प्रेम करावे तर.. राधा कृष्ण नाव प्रथम ओठावर येते. आणि मार्गदर्शक तर तो युगानुयुगे आहेच. नेहमी राहिलेच. शंभर अपराध झाल्याशिवाय शिक्षा न करणारा तो म्हणजे क्षमा करून सुधारण्याची वारंवार संधी देणारा तो आहे. पण तरी त्यानंतर मर्दन करणारा तो आहे… कर्मावर विश्वास ठेवावा.. हे सांगणारा तो कर्मयोगी आहे.
खरे तर महाभारतात एक सुदर्शन चक्र सोडले तर त्याने युद्ध जिंकले असते पण त्याचा कर्मावर भर असल्याने त्याने ते पांडवांकडून लढूनच करून घेतले. आपण देवावर सगळा भार टाकून हातपाय बांधून घेऊन स्वस्थ बसून कशी कामे होणार ? स्वतः जो स्वतःची मदत करतो त्यालाच मग तो कर्मयोगी युक्तीच्या चार गोष्टी मात्र नक्की सांगतो.
तसेच तो नेहमी शक्तीपेक्षा युक्तीवर भर देणारा आहे. आपण सारेच अर्जुन असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येतेच की समोर आपलेच कुणी असते आणि आपल्याला दुखावत असते तेव्हा तोडू की नको असे होत असते. तेव्हा कृष्ण गीतेत सांगतो तेच पटते. तेव्हाचे ते बोल आजही घरीदारी समाजात वावरताना उपयोगी पडतात.
स्त्रियांना सन्मान देणे शिकावे तर त्याच्याकडून. आपल्याला वाटते की त्याला सोळा सहस्त्र बायका होत्या. पण त्या सगळ्या स्त्रिया कंसाने बळजबरी करुन बंदिवासात कोंडून ठेवलेल्या स्त्रिया होत्या. आणि कंसवधानंतर जेव्हा मोकळ्या करण्यात आल्या. तेव्हा त्यांना घरात सुध्दा कुणी पुन्हा घ्यायला तयार नव्हते तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना जगात सन्मान मिळण्यासाठी त्यांच्याशी विवाह केलेला आहे. आणि द्रौपदीचे केलेले लज्जारक्षण तर सगळेच जाणतात. तेव्हा त्याची पुजा करा. पण त्याला समजून घेऊन आणि त्याची गीता समजून घेऊन. अंगी कर्मयोग आणि प्रेमयोग बाणून घेऊन.
श्रीकृष्णाय नमः