गुरुकडून विद्या घेतल्यानंतर, गुरूंचा अनुग्रह घेतल्यानंतर आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्नच केला नाही, तर त्या विद्येचा उपयोग काय ? त्या अनुग्रहाचा, त्यांच्या आर्शिवादाचा उपयोग काय ? यासाठी त्या विद्येचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
तैसा गुरू प्रसन्नु होये । शिष्य विद्याही कीर लाहे ।
परी ते फळे संप्रदायें । उपासिलिया ।। 1484 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें गुरु प्रसन्न होतील व शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल. परंतु त्या विद्येचे संप्रदायाप्रमाणें अनुष्ठान केले तरच तो फलद्रुप होईल.
गाय पाळली. तिला भरपूर खाऊ पिऊ घातले. तिची चांगली सेवा केली. पण तिचे दुध कसे काढायचे हेच माहीत नसेल तर त्या गायीचा उपयोग काय ? गाडी विकत घेतली. उत्साहाने तिची सजावट केली. रोज तिला पाण्याने धुऊन स्वच्छ ठेवली. पण ती गाडी चालवताच येत नसेल, तर त्या गाडीचा उपयोग काय ? कोणतीही गोष्ट साध्य झाली, पण तिचा उपभोग घेता येत नसेल तर त्याचा काय उपयोग ? यासाठी प्राप्त गोष्टीचा लाभ घेता यायला हवा. अन्यथा ती निरर्थक ठरेल.
शाळेमध्ये पहिला क्रंमाकाने पास व्हायचा. पुढे शिक्षणात मोठी प्रगती केली. अगदी पी. एचडीही मिळविली. पण त्या ज्ञानाचा व्यवहार उपयोग करता आला नाही. इतके घेतलेले शिक्षण व्यर्थच ना ! पत्रकारातेची पदवी घेतली. त्यामध्ये पी. एचडीही केली. पण एखाद्या छोट्याश्या घटनेवर त्याला योग्यप्रकारे परखडपणे लेख लिहीता आला नाही. आपले मत मांडता आले नाही. सडेतोड लिखाण करता आले नाही. तर या पुस्तकी ज्ञानाचा उपयोग काय ? घेतलेले शिक्षण व्यवहारात उपयोगी पडले तर त्याचा उपयोग अन्यथा ते व्यर्थच.
आजही ग्रामीण भागात अनेक अनपढ व्यक्ती पाहायला मिळतात. पण त्या व्यक्तींनी शेतीत मोठी प्रगती केली आहे. अनेक अंगठे बहाद्दुरांनी मोठे व्यवसाय, उद्योग उघडल्याची उदाहरणे आहेत. शिक्षणाचा योग्य उपयोग व्यवहारात करता आला पाहीजे. तरच खरी प्रगती साधली असे म्हणता येईल. संशोधन खूप केले पण ते संशोधन सर्वसामान्यांच्या उपयोगात आलेच नाही. ते पुस्तकातच राहीले तर त्याचा काय उपयोग ? जे शोधले त्याचा उपयोग करता यायला हवा. जे ज्ञान मिळवले ते वाटता यायला हवे.
गुरुकडून विद्या घेतल्यानंतर, गुरूंचा अनुग्रह घेतल्यानंतर आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्नच केला नाही, तर त्या विद्येचा उपयोग काय ? त्या अनुग्रहाचा, त्यांच्या आर्शिवादाचा उपयोग काय ? यासाठी त्या विद्येचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा. आत्मज्ञान प्राप्तीसाठी त्याचा उपयोग करायला हवा. ज्ञान प्राप्तीनंतरही परंपरेनुसार अनुष्ठान करता यायला हवे. तरच ती विद्या फुला फळाला येईल. ब्रह्मसंपन्न झाला आणि पण ते ज्ञान इतरांच्या उपयोगी पडले नाही तर त्याचा काय उपयोग. गुरु-शिष्य परंपरा ही ज्ञानदानाची परंपरा आहे. त्या अनुष्ठान करून ती परंपरा पुढे न्यायला हवी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.