March 28, 2023
nature of miracles in spirituality article by Rajendra Ghorpade
Home » अध्यात्मातील चमत्काराचे स्वरुप…
विश्वाचे आर्त

अध्यात्मातील चमत्काराचे स्वरुप…

चमत्कार म्हणजे शिष्याला खूष करण्यासाठी केलेली जादू नव्हे. अशा जादूने शिष्य अशा बुवांना वश होऊ शकतो. पण हे अध्यात्म नव्हे हे जाणून घ्यायला हवे. यासाठी अध्यात्मात चमत्कार कशाला म्हणतात याचा अभ्यास हा गरजेचा आहे. सद्गुरुंच्या मनातील गोष्टी जाणणे हा चमत्कार येथे अपेक्षीत आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

श्री गुरुंचे मन । जया देईल अवधान ।
तें मी पुढा होईन । चमत्कारू ।। 425 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – श्री गुरुंचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तू मीच होईन. मी असा चमत्कार करीन.

ढोंगींच्या चमत्काराला अध्यात्मात थारा नाही. चमत्कार करणारे, अंगठी काढूण दाखवणारे, सोन्याचे अलंकार काढून दाखवणारे बुवा यांनी देशातील गरीबी हटवण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत. असे जर विविध अलंकार, सोने चांदी त्यांच्या जादूने उत्पन्न होत असेल तर आपला देश किती श्रीमंत झाला असता, याचा विचार निश्चितच करायला हवा. प्रत्यक्षात असे बुवाबाजी करणारे आपला देश कर्जमुक्त करू शकले असते. देश सोडा, एखाद्या गरीबाला त्यांनी श्रीमंत केले असते तरी पुरे झाले असते. तसे झाले नाही, कारण ते चमत्कारी बाबा होते. चमत्काराने म्हणजेच जादूने ते अशा वस्तू बाहेर काढत अन् वाटत. अशाने सर्व सामान्यांचे दुःख त्यांना दूर करता आले असते. सर्व सामान्यांना ते काहीच काढून देत नसत. चमत्काराने सर्वसामान्यांचे प्रश्न कधीच मिटू शकले नाहीत. अशा बुवांच्या मागे अनेकजण लागतात. कारण माणसाचा स्वभाव हा पैशाचा लोभr आहे. माणसाला मोह आवरत नाही. पैशाच्या हव्यासापोटी अशांच्या नादी अनेकजण लागतात. पण फाटकी झोळीच घेऊन ते फिरतात.

सर्वसामान्यांचे प्रश्न, दुःख समजून घेऊन ज्या संतांनी कार्य केले तेच खरे संत. त्यांच्या सामर्थ्यांने त्यांनी अनेकांचे दुःख दुर केले. अडीअडचणीतून त्यांना सोडवले. पण ते चमत्काराने नव्हे, हे सुद्धा विचारात घ्यायला हवे. पैशाचा पाऊस पाडतो म्हणून सांगणाऱ्या बुवांनी कधी पाण्याचा पाऊस तरी पाडला आहे का ? पण आपण अशांच्या नादाला लागतो. यासाठी चमत्कार हा कशाचा असतो, हे समजून घेणे गरजेचे आहे. अध्यात्मातील चमत्कार नेमके कोणते हे अभ्यासने गरजेचे आहे.

अध्यात्मात चमत्कार हा साक्षात्कार आहे. स्वःची जाणीव होण्यासाठी होणारी अनुभुती ही चमत्कार असू शकते. त्या अनुभुतीने आश्चर्यकारकरित्या बदल शिष्यामध्ये झालेला पाहायला मिळतो. हा बदल त्याच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी गरजेचा असतो. यासाठी सत्पुरुष अशा अनुभुतीतून असे चमत्कार घडवतात. ते शिष्याला आत्मज्ञानाचा लाभ करून देण्यासाठीच असे चमत्कार करतात. चमत्कार हा आत्मज्ञानाचा साक्षात्कार आहे. स्वः ची ओळख हा साक्षात्कार आहे. मी कोण आहे हे जेव्हा समजेल तेव्हाच त्या शिष्याची अध्यात्मिक प्रगती होईल.

सद् गुरुंच्या मनात काय चालले आहे हा अनुभव येणे म्हणजे सद् गुरुच्या मनाचा वेध घेण्यासारखेच आहे. सद्गुरुंच्या मनातील गोष्टी आपण केव्हा ओळखू शकू ? जेव्हा आपण त्यांच्याशी एकरूप होऊ. यामध्ये सद्गुरुंच्या मनाप्रमाणे बाह्यसेवा आणि अंतरंगातील सेवा आपण करायला हवी. स्वामीचिया मनोभावा । न चुकीजे हेची परमसेवा ।। स्वामींच्या मनात काय आहे त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवणे आवश्यक आहे. सद्गुरुंना पाणी हवे आहे हे त्यांनी सांगण्याअगोदर आपण समजायला हवे. त्यांनी बोलण्यापूर्वीच त्यांच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवायला हवा.

शिष्य सद्गुरुंच्या मनाचा असा वेध केव्हा घेऊ शकेल. जेव्हा त्याला आत्मज्ञानाचा हा ठेवा प्राप्त होईल तेव्हाच तो सद्गुरुंच्या मनातील विचार ओळखू शकेल. म्हणजेच तो सद्गुरुंशी तितका एकरूप झालेला असेल. साधनेने सद्गुरुंचा मनोभाव जाणून घेऊन त्यांच्याशी एकरूपता साधता येते. यासाठी नित्य साधना गरजेची आहे. हा चमत्कार तेव्हाच घडेल जेव्हा आपण आत्मज्ञानी होऊ. म्हणजेच चमत्कार कसा घडतो, चमत्कार कसा असतो याची अनुभुती येईल. शिष्याने अध्यात्मिक प्रगतीसाठी चमत्काराचे हे रुप जाणून घेणे गरजेचे आहे.

चमत्कार म्हणजे शिष्याला खूष करण्यासाठी केलेली जादू नव्हे. अशा जादूने शिष्य अशा बुवांना वश होऊ शकतो. पण हे अध्यात्म नव्हे, हे जाणून घ्यायला हवे. यासाठी अध्यात्मात चमत्कार कशाला म्हणतात याचा अभ्यास हा गरजेचा आहे. सद्गुरुंच्या मनातील गोष्टी जाणणे हा चमत्कार येथे अपेक्षीत आहे. शिष्य जेव्हा आत्मज्ञानी होईल तेव्हाच हा चमत्कार करू शकेल. यासाठी साधनेने सद्गुरुंना हा चमत्कार करून दाखवावा. म्हणजे सद्गुरु निश्चितच कृपार्शिवाद देतील. शिष्य आत्मज्ञानी व्हावा. आपल्यासारखा ज्ञानी व्हावा, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. यासाठी शिष्याला ते अनुभुती देऊन जागृत करतात. अशा या अनुभुतीच्या चमत्काराने शिष्याची प्रगती होऊन तो सद्गुरुंशी एकरूप होतो. मनकवडा होतो. सद्गुरुरुप होऊन शिष्याने सेवा करावी, हा चमत्कार सद्गुरुंना अपेक्षीत असतो.

Related posts

सेवाभाव हा स्वधर्म अंगी जोपासावा

जप, साधना कशी असावी ?

सोन्याचा डोंगर, प्रेमाचा डोंगर ( एकतरी ओवी अनुभवावी)

Leave a Comment