December 21, 2024
Attainment of liberation only through guidance of Sadhguru
Home » सद्गुरुंच्या मार्गदर्शनानेच मुक्ततेची प्राप्ती
विश्वाचे आर्त

सद्गुरुंच्या मार्गदर्शनानेच मुक्ततेची प्राप्ती

सद्गुरु हे स्वतः आत्मज्ञानी असतात. त्यांनी केलेली साधना त्यांच्याकडून समजून घ्यायला नको का ? आपण ज्ञानी होण्यासाठी त्यांनी सांगितलेले ज्ञान हे अभ्यासायला हवे. दृढअभ्यासाने, दृढनिश्चयाने जे प्रयत्न करतात ते निश्चितच ब्रह्मत्वाला पोहोचतात. असा विश्वास सद्गुरु शिष्यास देत असतात. यासाठी सद्गुरुंची उपासना ही करायची असते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

जे मुक्ताते निर्धारितां । लाभे आपलीच मुक्तता ।
जैसी दीपें दिसे पाहतां । आपली वस्तु ।। ३९७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – कारण की, ज्याप्रमाणें अंधारातील आपली वस्तु दिव्याच्या साहाय्यानें पाहिली असतां दिसते, त्याप्रमाणें मुक्त पुरुषाविषयीं विचार केला असतां आपलीच मुक्तता आपणांस प्राप्त होते.

सद्गुरुचे महत्त्व सांगणारी ही ओवी आहे. गुरु कशासाठी असावा लागतो ? गुरू कोणास म्हणावे ? पुस्तके वाचून ज्ञान समजून घेता येऊ शकते. मग गुरूंची गरज काय ? अध्यात्म ज्ञान हे नुसते समजून समजत नाही, तर त्या ज्ञानाचा अनुभव घ्यावा लागतो. त्याची अनुभुती यावी लागते. तरच ते ज्ञान अवगत होते. यासर्वांसाठी गुरूंची गरज आहे. यासाठी गुरू हा आत्मज्ञानी असावा लागतो. त्याला या ज्ञानाची अनुभुती आलेली असावी लागते. वाचनातून आपणास ज्ञान काय आहे हे कळू शकते, पण ते आचरणात आणण्यासाठी गुरुंचे मार्गदर्शन हे गरजेचे असते. गुरुंच्या मार्गदर्शनाने अंधारातील ती वस्तू सहज सापडू शकते. अंधारात चाचपडत मार्ग शोधण्यापेक्षा गुरूंनी दिलेल्या दिव्याच्या साहाय्याने मार्गक्रमण करावे. म्हणजे वाट चुकण्याची शक्यता नसते.

गुरुंनी हे ज्ञान स्वतः अनुभवलेले असते. अनुभवातून ते आपणास ज्ञान समजावून सांगत असतात. त्यांना आलेली अनुभुती ते सांगत असतात. या त्यांच्या अनुभुतीतूनच आपणही हे ज्ञान समजून घेऊन ज्ञानी होण्याचा प्रयत्न करायचा असतो. दोरीला साप म्हणून आपण घाबरतो. जोपर्यंत तो साप नाही दोरी आहे हे आपण स्वतः हात लावून जाणून घेत नाही तोपर्यंत आपला विश्वास त्यावर बसत नाही. म्हणजेच आत्मज्ञान हे जोपर्यंत आपण अनुभवत नाही तोपर्यंत त्याबद्दल आपण अज्ञानीच असतो. आत्मा आणि देह हे वेगळे आहेत हे अनुभवातून जाणून घ्यावे लागते, तेव्हाच त्याचे ज्ञान होते. मनाला या ज्ञानाची खात्री पटायला हवी म्हणजे आपल्या मनातील भिती दूर होईल. मनातील अज्ञान दूर होईल. म्हणजेच अनुभव घेतल्याशिवाय ज्ञान होत नाही. अनुभवाने हे शास्त्र शिकता येते. समजून घेता येते, अन्यथा हे शास्त्र समजणे कठीण आहे. यासाठी या अनुभुतीने पांरगत झालेल्या गुरूंकडून हे ज्ञान आपण घ्यायचे असते अन् आपणही ज्ञानी व्हायचे असते. यासाठीच गुरुंची गरज आहे. रस्ता दाखवणारा वाटाड्या असेल तर रस्ता चुकण्याची शक्यता कमी असते. आपली होणारी व्यर्थ भटकंती टळू शकते. यासाठीच वाट दाखवणाऱ्या गुरुंच्या सोबत राहून हे ज्ञान समजून घ्यायचे असते.

नुसती ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानी होता येत नाही, तर प्रत्यक्षात त्या ज्ञानाची अनुभुती घ्यावी लागते. अध्यात्म हे अनुभवशास्त्र आहे. अनुभवातून हे शास्त्र समजून घ्यायचे असते. यासाठी या ज्ञानाचा प्रयोग ज्यांनी केला आहे. त्यांनी काढलेले निष्कर्श, त्यांनी केलेली कृती ही अभ्यासायला हवी. आपणासही तो प्रयोग करायचा आहे, तर मग निष्कर्श ज्यांनी मिळवला त्यांच्या प्रयोगाचा अभ्यास हा करायलाच हवा. त्यांनी मांडलेल्या मतांचा विचार हा करायलाच हवा. त्यावर चिंतन, मनन करून आपल्या प्रयोगातील होणाऱ्या चुका समजून घ्यायला हव्यात. त्या चुका टाळून प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, तरच आपण योग्य निष्कर्शापर्यंत पोहचू शकू.

सद्गुरु हे स्वतः आत्मज्ञानी असतात. त्यांनी केलेली साधना त्यांच्याकडून समजून घ्यायला नको का ? आपण ज्ञानी होण्यासाठी त्यांनी सांगितलेले ज्ञान हे अभ्यासायला हवे. दृढअभ्यासाने, दृढनिश्चयाने जे प्रयत्न करतात ते निश्चितच ब्रह्मत्वाला पोहोचतात. असा विश्वास सद्गुरु शिष्यास देत असतात. यासाठी सद्गुरुंची उपासना ही करायची असते. सद्गुरुंचे ध्यान हे यासाठीच करायचे असते. त्यांनी जे अनुभवले त्याचा अनुभव घेऊन आपणही ज्ञानी व्हायचे असते. स्वतः मुक्त असणाऱ्या, ज्ञानी असणाऱ्या गुरुंची आराधना करून त्यांच्याकडून हे शास्त्र समजून घेऊन स्वतःची मुक्ती आपण साधायची असते. गुरुंच्या मार्गदर्शनाने, आशिर्वादाने आपलीही मुक्तता होते. या मार्गात येणारे अडथळे, होणाऱ्या यातना, कष्ट सद्गुरुंच्या मार्गदर्शनामुळे दूर होतात. अन् आत्मज्ञानाचे ध्येय आपणास सहजपणे गाठता येते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading