मुक्त होणे म्हणजे तरी काय ? मुक्त होणे म्हणजे बांधलेले नसणे. मुक्त होणे म्हणजे मोकळे आहोत असे वाटणे. आपणांवर कोणतेही दडपण नाही असे अनुभवास येणे म्हणजेच मुक्त होणे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
एकी देहाची डिरी तुटे । तंव देहांकुरी बहुवी फुटे ।
ऐसेनि भवतरु हा वाटे । अव्ययो ऐसा ।। 132 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा
ओवीचा अर्थ – या संसारवृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो, तो अनेक देहरूपी अंकुर त्याला संसारवृक्षाला फुटतात. अशा तऱ्हेनें हा संसारवृक्ष अव्यय (अविनाशी) आहे, असा वाटतो.
एखादे बी मातीत रुजते. त्याला पान-फुल येते. फुलातून मग परागीभवन होऊन फळ तयार होते. फळात पुन्हा बिया तयार होतात. या बिया पुन्हा मातीत रुजवल्या की पुन्हा त्यापासून रोपटे तयार होते. ही मालिका सुरुच राहाते. जसे आजचा दिवस सरला की उद्याचा दिवस उजाडतो. तो मावळला की पुन्हा सकाळी दुसरा दिवस उजाडतो. असे कित्येक दिवस जातात. कित्येक महिने जातात. कित्येक वर्षे जातात. हे सुरुच राहाते. ही क्रिया कित्येक युगे सुरु असेल. एक युग संपले की लगेच दुसरे युग सुरु होते. अशी युगानुयुगे ही येत आहेत आणि पुढे जात आहेत.
आपण जन्मला आलो. आपल्या आई वडीलांनी आपणास जन्म दिला. आपल्या आई वडीलांना आपल्या आजी-आजोबांनी जन्म दिला. त्यांना पणजोबा-पणजीने जन्म दिला. म्हणजे ही जन्माची वंशावळ पिढ्यानपिढ्या सुरुच आहे. हा संसार हा पिढ्यानपिढ्या सुरुच आहे. झाडाप्रमाणे तोही रुजतो आहे. पुन्हा फुलतो आहे. फुला-फळाला आलेला संसार पुन्हा बिजरुपाने पुढे येतो आहे. हे सर्व नित्य सुरु आहे. त्याला अंत नाही असे वाटते आहे. पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्षे हे सर्व सुरु आहे त्यामुळे ते आपणाला अविनाशी वाटते आहे. मग यातून मुक्ती कशी मिळवायची ? जन्म-मरणाच्या या फेऱ्यातून मुक्त कसे व्हायचे ? मोक्ष मिळवायचा तरी कसा ?
यासाठीच सर्व प्रथम मुक्त होणे म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे. परमपूज्य साने गुरुजी यांनी याचा अर्थ अगदी थोडक्यात आणि मोजक्या शब्दात सांगितलेला आहे. साने गुरुजी म्हणतात, मुक्त होणे म्हणजे बांधलेले नसणे. मुक्त होणे म्हणजे मोकळे आहोत असे वाटणे. आपणांवर कोणतेही दडपण नाही असे अनुभवास येणे म्हणजेच मुक्त होणे. ना वासनांचा गुलाम, ना जगात कोणत्याही सत्तेचा गुलाम. स्वतःच्या समाधानाने, आनंदाने, उत्साहाने कर्म करीत राहणे म्हणजेच मोक्ष होय, असे साने गुरुजी म्हणतात. पण कर्माचा बोजा आपणास वाटू लागतो. यावर साने गुरुजी म्हणतात, कर्माचा बोजा वाटायला नको असेल तर स्वधर्म शोधा.
स्वधर्म म्हणजे मी कोण आहे याचा शोध ? स्वतःच स्वतःचा शोध घेणे हा प्रत्येक मानवाचा धर्म आहे. स्वतः कोण आहे हे शोधणे. आत्मा आणि देहातील फरक शोधून स्वतःची ओळख जेव्हा आपणास होईल तेव्हा आपण मुक्त होऊ. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊ. संसाराच्या फेऱ्यातून मुक्त होऊ. स्वःच्या ओळखीतूनच संसारवृक्षाची खरी ओळख आपणास होते. यासाठी स्वतःला शोधा. तेव्हाच खरे अमरत्व आपणास प्राप्त होईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.