September 9, 2024
Garlic Cultivation article by Krushisamarpan
Home » जाणून घ्या, लसूण लागवडीबद्दल…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जाणून घ्या, लसूण लागवडीबद्दल…

🌰 लसूण लागवड 🌰

जमीन व हवामान –

लसूण शेतीकरिता मातीचा सामू 6.5 ते 7.0 या दरम्यान असावा. भारी, क्षारयुक्त, चोपण जमिनी लागवडीसाठी टाळाव्यात. पाण्याचा निचरा होणारी, हलकी ते मध्यम, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी.
हे पिक तापमानाबाबत संवेदनक्षम आहे. पीकवाढीच्या सुरवातीच्या काळात किंचित दमट व थंड हवामान, तर गड्डा पक्व होताना व काढणीवेळी कोरडे हवामान लागते.

सुधारित जाती –

गोदावरी (सिलेक्‍शन-2), श्‍वेता (सिलेक्‍शन-10), फुले बसवंत, ऍग्रिफाउंड व्हाइट (जी-41), यमुना सफेद (जी-50) जी-1 व जी-323 इ. जाती मैदानी भागाकरिता उपयुक्त आहेत.
राज्यात प्रामुख्याने जांभळ्या लसणाला जास्त मागणी असते व बाजारभावही पांढऱ्या लसणापेक्षा चांगला मिळतो.

बियाणे निवड प्रक्रिया –

लागवडीसाठी 1.5 ग्रॅम वजनाच्या पाकळ्या वापराव्यात. पोचट किंवा पिवळसर रंगाच्या, लहान पाकळ्या वापरू नयेत. त्यामुळे गड्डे उशिरा तयार होतात व उत्पादन घटते. मागील हंगामात तयार झालेले व थंड आणि कोरड्या जागेत साठवून पुरेशी विश्रांती मिळालेले मोठ्या आकाराचे गड्डे लागवडीसाठी वापरावेत. एकरी दोन ते अडीच क्विंटल बियाणे लागते.
लागवडीसाठी पाकळ्या वेगळ्या करताना वरच्या पापुद्य्राला अथवा पाकळ्यांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या बुरशीनाशकाच्या द्रावणात दोन तास बुडवुन नंतर लागवड करावी.

पूर्वमशागत व लागवड-

खोलवर नांगरट करून लव्हाळ्याच्या गाठी व हरळीच्या काशा वेचून नष्ट कराव्यात व दोन-तीन कुळवाच्या पळा घालाव्यात.
शेवटच्या कुळवणीच्या वेळी एकरी आठ ते दहा टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. लागवड सपाट वाफ्यावरच करावी, त्यासाठी जमिनीच्या उतारानुसार 4 किंवा 3 मीटर अंतराचे सपाट वाफे तयार करावेत. जमिनीला उतार जास्त असल्यास लहान आकाराचे सपाट वाफे तयार करावेत.

लसणाच्या पाकळ्या टोकण करून लावाव्या लागतात. निवडलेल्या पाकळ्या सपाट वाफ्यात 15 X 10 सेमी अंतरावर व 2 सेमी खोलीवर लावाव्यात. साधारणपणे या अंतराने 60 झाडे प्रती चौ. मीटरला बसतात. रूंदीशी समांतर वाफ्यात दर 15 सेमी अंतरावर पाकळ्या किंवा कुड्या उभ्या ठेवाव्यात व नंतर मातीने झाकुन घ्याव्यात.

पाकळ्या उभ्या लावल्यामुळे उगवण एकसारखी होते. सपाट वाफ्यात फार ढेकळे असतील तर हलके पाणी देऊन नंतर लागवड करावी. लागवडीसाठी मजुरीचा खर्च बराच येतो. लागवड खर्चात कपात करण्यासाठी गुजरातमधील शेतकरी पाकळ्यांची पेरणी करतात. पेरणीमध्ये 2 ओळीत अंतर राखता येते परंतु दोन झाडातील अंतर कायम राखता येत नाही. दोन किंवा त्यापेक्षा अधीक पाकळ्या जवळ पडल्या तर गड्डे चपटे होतात. शिवाय पाकळ्या आडव्या किंवा उलट्या पण पडतात. यामुळे उगवण एकसारखी होत नाही. अलिकडे हाताने ओढता येणारे लसुण लागवडीचे यंत्र लुधीयाना कृषि विद्यापीठाने विकसीत केले आहे. या यंत्रामुळे लागवड खर्चात बरीच कपात  होते व ओळी आणि झाडे यातील अंतर सारखे राखता येते. ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनावर लागवड करताना संच चालवुन वाफ्यात पाणी द्यावे व नंतर वाफस्यावर पाकळ्यांची टोकणी करावी.

हंगाम –

ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागवड करावी. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी हा काळ लसणाचा गड्डा भरण्यास अनुकूल असतो. उशिरा लागवड झाली तर गड्ड्यांचा आकार कमी होतो. वजन कमी भरते व उत्पादनदेखील कमी येते.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन –

लसणाच्या उत्तम वाढीसाठी व अधिक उत्पन्नासाठी शेणखताची गरज असते. एकरी किमान आठ ते दहा टन शेणखत मशागत करतेवेळी जमिनीत मिसळावे. या व्यतिरिक्त नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा पुरवठा रासायनिक खतातून देणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्रातील जमिनीसाठी एकरी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश देण्याची शिफारस आहे. 50 टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश यांची मात्रा पाकळ्यांची टोकण करण्यापूर्वी द्यावी. उर्वरित नत्राची मात्रा दोन भागांत किंवा हप्त्यांत विभागून द्यावी.

पहिली मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी व दुसरी मात्रा 45 ते 50 दिवसांनी द्यावी. नत्राची मात्रा लागवडीनंतर 60 दिवसांनी देऊ नये, यामुळे उत्पादन व साठवणीवर विपरीत परिणाम होतो.
कांदा व लसूण ही पिके गंधकयुक्त खतास प्रतिसाद देतात असे दिसून आले आहे,
म्हणून भरखते देताना अमोनिअम सल्फेट व सुपर फॉस्फेट यांसारख्या खतांचा उपयोग केल्यास आवश्‍यक गंधकाची मात्रा पिकास मिळते. मिश्र खते वापरल्यामुळे आवश्‍यक गंधकाची पूर्ती होत नसल्याने लागवड करण्यापूर्वी प्रति एकरी 20 किलो गंधक जमिनीत खताबरोबर मिसळावे. सल्फेक्‍स 85 वेटेबल पावडर दीड ते दोन ग्रॅम या प्रमाणात पाण्यात चिकटणा-या पदार्थाबरोबर मिसळून फवारणी करणे लाभदायक असते.

शेणखताच्या कमी वापरामुळे सूक्ष्म तत्त्वांची कमतरता जाणवते. यासाठी आवश्‍यक असल्यास झिंक फॉस्फेट, मॅंगनिज सल्फेट व कॉपर सल्फेट यांची फवारणी 0.5 टक्‍के, तर फेरस सल्फेटची फवारणी 0.5 ते 0.1 टक्के या प्रमाणात करावी.

पाणी व्यवस्थापन –

लसणाची मुळे जमिनीच्या 15 ते 20 सें.मी.च्या थरात असतात, त्यामुळे वरच्या थरात ओलावा कायम असणे आवश्‍यक असते. या पिकास जुजबी, परंतु नियमित पाणी लागते. लसणाच्या पाकळ्या कोरड्यात लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे. आंबवणी साधारणतः तीन-चार दिवसांनी द्यावे. नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यांत दहा ते 12 दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात सात-आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. साधारणपणे 12 ते 15 पाण्याच्या पाळ्या लागतात.

ठिबक सिंचनासाठी इनलाइन ड्रीपर असणा-या 16 मि.मी. जाडीच्या लॅटरलचा वापर करावा. दोन ड्रीपरमधील अंतर 30 ते 40 सें.मी. असावे, त्याची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता अडीच ते चार लिटर प्रति ताशी असावी. तुषार सिंचनासाठी ताशी 135 ते 150 लिटर पाणी सहा ते सात मीटर अंतरावर फेकणारे नोझल असावेत. तुषार सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असावी.

काढणी, उत्पादन व साठवणूक –

पिकाची 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाने पिवळी पडून सुकल्यावर पीक काढणीस तयार होते. अशा अवस्थेपूर्वी 8 ते 15 दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे. लसूण पिकापासून एकरी तीन ते चार टन उत्पादन मिळते. वर्षभर साठवण करण्यासाठी लसणाच्या वाळलेल्या पातीसहीत जुड्या बांधून साठवण करता येते. जुड्या टांगून ठेवाव्यात. पात कापून निवड करून जाळीदार पिशव्यांमध्ये लसणाची साठवण करता येते. साठवण करण्याच्या ठिकाणी हवा खेळती राहणे आवश्यक आहे. तसेच साठवणीपूर्वी लसून चांगला वाळलेला असला पाहिजे. लसूण पूर्ण पक्व न होता काढणी केल्यास साठवणीत नुकसान, वजनात घट होते.
 
​​|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||​​

📚 संकलन- कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

भक्ती, अध्यात्म पैशात तोलू नये

गझल मंथन पुरस्कारासाठी गझलसंग्रह पाठविण्याचे आवाहन

कोरकू बोलीसाठी उन्नती संस्थेचा उपक्रम

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading