May 30, 2024
book-review-of Googlebaba Dr suresh sawant
Home » निसर्ग अन् विज्ञान यांचा समन्वय साधणारा बालकवितासंग्रह…
काय चाललयं अवतीभवती

निसर्ग अन् विज्ञान यांचा समन्वय साधणारा बालकवितासंग्रह…

जीवनात हरघडी प्रत्येकाला अनेक प्रश्न पडतात. जिथे प्रश्न असतात तिथे त्यांचे उत्तरही असते. ‘शोधा म्हणजे सापडे’ हाच मूलमंत्र हा गूगलबाबा आपणास देतो आहे. तो चुटकीसरशी प्रश्नांतील गुंता सोडवितो. हवामानाचा अंदाज बांधतो. सगळ्याच शब्दांचे अर्थ सांगतो. त्याच्या पोटात माहितीचे अनेक साठे लपलेले आहेत. जगाचे नकाशे त्याला तोंडपाठ आहेत.

डॉ. श्रीकांत श्री पाटील

कोल्हापूर
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,
राज्यशासन पुरस्कार प्राप्त साहित्यिक
बालकविता हा मुलामुलींच्या आवडीचा विषय आहे. त्यातील विषय, रंगीत चित्रे, कवितेची चाल, नावीन्य , बालकुमारांच्या काव्यप्रेमाला बळकटी देण्याचे कार्य करतात. बालकांची अभिरूची ओळखून डॉ. सुरेश सावंत यांचा 'गुगलबाबा' बालचमूच्या भेटीला आला आहे. निसर्गातील झाडेझुडपे, पानेफुले, प्राणी, पक्षी यांच्याबरोवर विज्ञान, भूगोल आणि खगोलातील विषयांच्या आविष्काराने हा संग्रह सजला असून निसर्ग आणि विज्ञान यांचा समवाय यात पाहावयास मिळतो.
'जे न देखे रवी, ते देखे कवी' असे कवीच्या प्रतिभाशक्तीबाबत म्हटले जाते. साक्षात सूर्यनारायणाला जे दिसत नाही, त्यात डोकावण्याचे सामर्थ्य कवी अंगी बाळगून असतो. आपले निरीक्षण आणि कल्पनाशक्तीच्या सामर्थ्यावर अगदी साध्या विषयातही मोठा अर्थ शोधत असतो. 'गूगलबाबा'मध्ये विविध विषयांतील अर्थशोधाबरोबरच, मूल्यसंस्कार, नीतिबोध व रंजन यांची खाण गवसते. शब्द आणि अर्थाची सुंदर वीण गुंफून उत्तमोत्तम काव्यलेणी कोरली गेली आहेत. त्यामध्ये आशयसौंदर्याबरोबर भावसौंदर्याची पेरणी करून काव्यसौंदर्य खुलविलेले आहे. 

आपण २१व्या शतकातील तिसऱ्या दशकात पदार्पण केलेले आहे. आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. नेट, इंटरनेटचे जाळे सर्वदूर पसरलेले आहे. आज भ्रमणध्वनी हा माणसाचा मित्रच नव्हे तर, सहायकही बनला आहे. अध्ययन - अध्यापन प्रक्रियेत आज ऑनलाईन जमाना आला असून मोबाईल, रोबो मुलांचेही मित्र बनू पाहत आहेत. बालकुमारांच्या, किशोरांच्या जीवनात शालेय स्तरापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड आणि गरज दोन्हीही निर्माण होत आहे. त्यामुळेच अलीकडे कवितेत भाषासौंदर्याबरोबर माहिती आणि तपशीलाला खूपच महत्त्व आलेले आहे. आज 'जे न देखे कवी, ते विज्ञान दाखवी' असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. दिवसागणिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये, भूगोल आणि खगोलामध्ये नवनवे शोध लागत आहेत. त्याचा परिचय मुलांना व्हावा, त्यांची जिज्ञासातृप्ती व्हावी, तसेच त्यांना माहिती, ज्ञान याबरोबर मनोरंजनाचाही लाभ मिळावा, या हेतूनेच 'गूगलबाबा'ची निर्मिती झालेली दिसते.


 'गूगलबाबा' ही कविता या बालकवितासंग्रहाचे ठळकपणे प्रतिनिधित्व करते. त्यासोबत निसर्ग, निसर्गातील ऋतुचक्र, वार आणि वर्षाची गंमत, ज्ञान आणि विज्ञानाची योजना अशा जवळपास २७ कविता या संग्रहात समाविष्ट असून, कवितेतील विषयाच्या आकलन सुलभतेसाठी आखीव- रेखीव अशा सुंदर सुंदर चित्रांची केलेली योजना लोभसवाणी आहे. पानाफुलांतून बालकवितेचा प्रवास गूगलकडे होतो आहे. याचा अर्थ काळाचे भान राखून मुलांच्या बालविश्वात प्रवेशलेल्या नवनव्या गोष्टींना कवीने आपलेसे केले आहे.
       पावसाळ्यातील टपोऱ्या थेंबांची घसरगुंडी' ही आरंभीची कविता उत्तम शब्दयोजना आणि यमक प्रास रचनेमुळे लक्ष वेधून घेते.
       'अंगओल्या आनंदाने, 
      पिंपळपाने सळसळती.
      बाजूच्या छपरावरुनी,
      पाणीदार पागोळ्या गळती'
        निसर्ग हा मानवाचा गुरु आहे. तोच आपली जडणघडण करतो. आपल्याला शिकवितो. काळानुरूप ऋतुचक्राबरोबर जगायला आणि वागायला भाग पाडतो. या निसर्गातील शेतीची शाळा हीच खरी जीवनाची शाळा असून निर्मिती आणि संगोपनाचा संदेश देणारी आहे. येथे सुट्टी नाही. ही शाळा बारमाही असून येथे रंगागंधांची उधळण तर आहेच, पण आनंदाची गोड गाणीही आहेत. शेती आणि मातीबरोबरच भूमातेवर प्रेम करायला ही कविता शिकविते.
      'शेतीची शाळा म्हणजे,
      हिरवाईची शाळा
      बारमाही फुलाफळांनी,
      भरलेला मळा.' 
या शेताशिवारातील 'झाड' होण्याचा संदेश कवी मुलांना देतो. ऊन, वारा झेलत वाटसरुंना सावली देणे, पाखरांना आसरा देणे, लतावेलींना आधार देणे, एकूण काय तर परोपकारासाठी आपली काया झिजवण्याचे कार्य झाडे करीत असतात. आशेचा किरण आणि जगण्याची उमेद शिकविणाऱ्या झाडांबाबत ते म्हणतात -

      'झाड कधीच थकत नाही,
      पिवळी पानं टाकून देतं.
      एक फांदी तुटली तरीही
      नवे धुमारे घेऊन येतं.' 
        त्यामुळे झाडाझुडपांच्या साथीने आपणही झाड होऊया, असे कवी सांगतो. आपल्या सर्वांचे पोषण करणाऱ्या निसर्गाची महती आणि किमया 'निसर्ग माझा गुरु' या कवितेत वर्णिलेली आहे. झाडांप्रमाणे फुलझाडे हाही प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो . ही फुलझाडे चित्ताकर्षक तर असतातच, पण मनही मोहून टाकतात. 'पारिजातक' या कवितेत त्याच्या रंगागंधांची उधळण रानफुलांच्या माध्यमातून झाली आहे. सुंदर सुंदर शब्दांचा सडाच 'पारिजातक' मध्ये पडलेला आपल्याला दिसून येतो. चराचराला गंधित करणारा पारिजातरकाचा सुगंध घराला घरपण बहाल करतो. नाजूक आणि मोहक शब्दकळेने 'पारिजातक' ही कविता नटलेली, सजलेली आहे. 

       प्राणी आणि पक्षी यांच्याविषयी बालमनाला विशेष ओढ असते. त्यांना पाहण्यासाठी मुले प्राणिसंग्रहालयात, अभयारण्यात किंवा जंगलात पालक व शिक्षकांसोबत जात असतात. आईविना पोरक्या पाडसाला सिंहिणीनं लळा लावल्याचे आश्चर्य कविकल्पनेने पाहिले आणि 'गीरच्या जंगलात' पाहिलेला घटनाक्रम चित्रित झाला. आई ही वात्सल्याची खाण असते. त्यामुळेच त्या पाडसाची शिकार न करता उलट त्याला पान्हा देते. निसर्गातील चमत्कारसदृश्य घटनाच कवी येथे चित्रित करतो.          
'भीतीदायक सिंहीण,
      पाडसाला चाटायची.
      तिच्या वात्सल्यानं
      यशोदाच वाटायची'. 
मातेची महतीच कवीने गायली आहे. 

या झाडावरून त्या झाडांवर लपंडाव खेळणाऱ्या खारुताईच्या पिलांची खेळकरवृत्ती, बिनधास्तपणाही कवी शब्दबद्ध करतो.

आज ‘कोरोना’ या अतिसूक्ष्म विषाणूने संपूर्ण मानवजातीला वेठीस धरले आहे. निसर्गाला आव्हान दिल्यानंतर अनेक संकटे येतात, पण हे मानवनिर्मित संकट आहे. यामुळे लॉकडाऊनसारख्या प्रक्रियेला आपणास सामोरे जावे लागले आहे. याची जाणीव मुलांना व्हावी म्हणून ‘गूगलबाबा’ काव्यसंग्रहामध्ये काही कवितांची योजना केली गेली आहे. ‘अजब गजब’ मध्ये फुले, फुलपाखरे, ससे, मासे, आई, बाळ, विद्यार्थी, शिक्षक, रोगी, डॉक्टर, चोर, पोलीस यांची अजबगजब कहाणीच काव्यरुपात साकारली आहे. कोरोनामुळे सुट्टीचा उबग आला आहे. कवी म्हणतो –
‘उन्हाळ्याची सुट्टी झाली,
दिवाळीची सुट्टी झाली
कोरोनाच्या भीतीमुळे,
शाळाच सुट्टीवर गेली.’

‘कोरोनाच्या काळातील शाळा’ ही कविता ऑनलाइन शिकवणी, अन् शाळा बंद असल्याने दुरावलेले घटक यांच्या आठवणींची उकराउकार करते. आज वही, पुस्तक, खडू, फळा यापासून दुरावलेल्या मुलांना बंद घरात भरणारी शाळा बंदिशाळा वाटते आहे.
‘टिफीन आणि दप्तर,
कोपऱ्यात जाऊन पडे
मोबाईलवर मिळू लागले
रूक्ष अभ्यासाचे धडे.’

या अभ्यासात खेळाचा तास नाही, ही विद्यार्थ्यांची खंत आहे. त्यामुळे त्यांना हवीहवीशी खरी शाळा लवकरच सुरू होईल, हा आशावाद कवी व्यक्त करतो.

आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. शाळेत बंदी असणारा मोबाईल आणि घरात बंदी असणारा टी.व्ही. आज इंटरनेट आणि गूगलच्या सहाय्याने शाळा चालवितो आहे. जीवनात हरघडी प्रत्येकाला अनेक प्रश्न पडतात. जिथे प्रश्न असतात तिथे त्यांचे उत्तरही असते. ‘शोधा म्हणजे सापडे’ हाच मूलमंत्र हा गूगलबाबा आपणास देतो आहे. तो चुटकीसरशी प्रश्नांतील गुंता सोडवितो. हवामानाचा अंदाज बांधतो. सगळ्याच शब्दांचे अर्थ सांगतो. त्याच्या पोटात माहितीचे अनेक साठे लपलेले आहेत. जगाचे नकाशे त्याला तोंडपाठ आहेत. त्यामुळेच आज या मुलांची गूगलबाबाशी गट्टी जमली आहे. नानाविध प्रश्नांची उत्तरे देताना हा गूगलबाबा थकत नाही. तो हजरजबाबी आहे. माहितीचे बारकावे तो जाणतो. त्यामुळेच गूगलबाबा संपावर गेला तर, आमचे कसे होईल, असा प्रश्न कवितेतील चिमुकल्यांना पडतो. त्यामुळे ते त्याचे कौतुकच करतात.
‘गूगलबाबा गुगलबाबा,
तुझी माझी यारी
तुझी माझी यारी
आहे जगात भारी.’

‘सूर्याची शाळा’ या कवितेत कवीने बालकुमारांना खगोलशास्त्राचा परिचय करून दिला आहे. ग्रह, त्यांचे रंग, त्यांची वैशिष्ट्ये सांगत कवी संपूर्ण ग्रहमाला मुलांना परिचित करून देतो. या ग्रहमालेत पृथ्वीसारखा दुसरा सुंदर ग्रह नाही, हे सांगायला ते विसरत नाहीत.
सगळ्या ग्रहांमध्ये भारी
वसुंधरा निळीशार
सजीवांचे पोषण करते
माझी पृथ्वी पाणीदार.’

इतर ग्रहांवर जीवसृष्टी नाही, कारण तिथे पाणी नाही. पण माझी पृथ्वी पाणीदार असून इथे सौंदर्य ठायी ठायी भरलेले असल्याचे नमूद करतो.

मानवाने आपल्या कार्यसुलभतेसाठी यंत्रमानवाला जन्माला घातले असून संगणकाशी नाळ असलेले हे विज्ञानाचे बाळ आहे. हा दानवासारखी अचाट कामे करतो. माणसाच्या आज्ञेचे पालन करतो. हवेत उडतो, पाण्यात बुडतो, आभाळातून कोलांटउड्या मारतो. एक दिवस हा यंत्रमानव माझ्या हाती येईल, अशी कवितेतील मुलाला खात्री आहे. तो माझा सगळा गृहपाठ पूर्ण करेल, ही आशाही आहे.
‘आज्ञाधारक यंत्रमानव
रजनीकांतचा भाऊ.
अवघड कामे करून देतो
त्याला शाबासकी देऊ.’

मुलांना शाळा, शिक्षण याबरोबर खेळाची आणि विविध छंदांची बालपणी फारच आवड असते. ‘नोटा आणि नाणी’ मध्ये बालपणी पाहिलेल्या आणि उपयोगात आणलेल्या सगळ्या नाण्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे मोल तर कवितेतील मुलगा सांगतोच, पण नाण्यांसारखा नोटांचा आवाज येत नाही आणि नाण्यांची जागा नोटांनी घेतली तरी नोटांमुळे खोटा माणूस कधीच मोठा होत नाही, हे सत्यही कवी मुलांच्या नजरेस आणतो. या कवितेत कवी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देतो, असे वाटते.

‘मायेची गोधडी’ मधून आई, आजी यांची माया, मुलांसाठीचे खपणे, त्यांच्या हातातील गोधडी विणण्याचे कौशल्य, त्याला नटविण्याची सौंदर्यदृष्टी कवी अभिव्यक्त करतो आहे. आपल्याला हवी असणारी ऊब ह्याच गोधडीत मिळते आणि गोधडी पांघरल्यानंतर थंडी पळून जाते. हे गोधडीचे उपयुक्ततामूल्यही सांगितले आहे. आठवड्यातील वारांची गंमत, त्यांचा क्रम, वेगळेपणा ‘वारांची लपाछपी’ मध्ये आला आहे. त्यात रविवारची सुट्टी, त्यातून मिळणारी विश्रांती आणि मिळणारी ऊर्जा पुढे आठवडाभर पुरणारी आहे.
‘राजेशाही रविवार
आनंद घेऊन येतो
पुढच्या सहा दिवसांसाठी
नवीन ऊर्जा देऊन जातो.’

रविवारच्या विश्रांतीनंतर माणूस ताजातवाना होऊन नव्या जोमाने, उमेदीने कामाला लागतो. मुलांना आठवड्यातील वार, त्यांचा क्रम समजावा, तो त्यांच्या मनीमानसी बिंबवावा, हाच या लेखनामागील हेतू आहे. निढळाचा घाम, मानव्याचे गीत, पुरोगामी विचारांची देण, सत्याचे दर्शन, सुविचारांची भूक, उन्नतीचा मंत्र, नवनिर्मितीचा ध्यास, विकासाची वाट, मनबुद्धीची श्रीमंती हेच खरे दागिने आहेत, हा मूल्यसंस्कार ‘अलंकार’ या कवितेतून रूजविला गेला आहे. दिखाऊ दागिने आणि रत्ने शरीराची शोभा वाढवितात, पण व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी विचारांच्या दागिन्यांची आवश्यकता असल्याचे सूचक भाष्य यातील चरणांचरणांतून पेरलेले आहे.

प्रत्येक जण उगवत्याचे स्वागत करतो, पण कवीने ‘मावळते वर्ष’ मध्ये सरत्या वर्षाचे गुणगाण गाईले आहे.
‘मावळत्या वर्षाने मजला
पाठीवरती वळ दिले
अखंडित ऊर्जा आणि
जगण्याचे बळ दिले.’

मुलांनी वर्तमानात जगत असताना भूतकाळातील अनुभवांची शिदोरी बाळगून भविष्याची वाटचाल करावी, असाच संदेश ही कविता देते. ‘अक्कल आणि नक्कल’ मध्ये मुलांच्या करामती प्राणी आणि पक्ष्यांची नक्कल करून त्यातून मौजमजा लुटण्याच्या सहजप्रवृत्तीचा उहापोह आहे. मैत्री माणसाला साबेतीचं वरदान देते. सुख, समाधान आणि आनंद बहाल करते. ‘आई माझी बेस्ट फ्रेंड’ मधील मुलगी आपल्या कला, क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या मैत्रिणींबाबत अभिमानाने सांगते. त्या एकापेक्षा एक भारी असल्याचे प्रशस्तिपत्र देते, पण या सगळ्यात ‘आईच माझी बेस्ट फ्रेंड’ असल्याचे कबूलही करते. आईविषयीचे प्रेम, लळा आणि कृतज्ञतेचा भाव, तिचा आदर करण्याचा संस्कार देणारी ही कविता आहे.

‘पाडव्याची गुढी’ आणि ‘धमाल’ या दोन सणांचे माहात्म्य बिंबविणाऱ्या कविता असून त्यातून सणातील उत्सवप्रियता व पावित्र्याची मुलांना ओळख करून दिली आहे. ‘सुई आणि कातरी’ या कवितून मनामनाला जोडण्याचा संदेश कवीने दिला आहे. कातरी कापण्याचे तर सुई जोडण्याचे काम करते. सुई कातरीला म्हणते –
‘कौतुकाचे काम नव्हे हे
तुकडे करणे लहान लहान
मनामनाला जोडण्याचे
कार्य आहे जगात महान’.

आपण चुकत चुकत शिकले पाहिजे आणि शिकता शिकता एक दिवस यशाचे शिखर गाठले पाहिजे. जो चुकतो तोच शिकतो, हाच संदेश ‘मीच माझा खोडरबर’ या कवितेतून मिळतो. या विश्वात अशक्य असे काहीच नाही, हे ‘हर प्रश्नाला असते उत्तर ‘ या कवितेतून कवी सांगतो. सकारात्मक आणि आशादायी विचारांची ‘फुलवात’ या कवितेतून मुलांच्या मनात प्रज्वलित करतो.
‘समुद्राच्या काठावर’ ही कविताही मुलांनी व्यापक, उदार आणि उदात्त व्हावे, सागराचे अथांगपण त्यांच्या ठायी यावे, हे सूचित करते.
‘ समुद्राचे अथांगपण
थोडे माझ्या अंगी यावे
खळाळत्या लाटांसारखे
माझे जीवनगाणे व्हावे’.

‘भाज्यांची जत्रा’ ही कविता मुलांना अनेक प्रकारच्या रानभाज्यांची आगळीवेगळी ओळख करून देते.

निसर्ग, विज्ञान, भूगोल, खगोल, नेट, गूगलबाबा अशा अनेकविध विषयांना स्पर्श करीत, मुलांच्या बुद्धीला खुराक देत, त्यांना ज्ञान, माहिती, तपशील याचबरोबर रंजन आणि त्यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कार्य ‘गूगलबाबा’ मधील कविता करतात. आज पावशा गात नाही. आभाळाला माया राहिली नाही. ढग रुसल्याने पावसाळी आभाळ रिते, सुने वाटते आहे. म्हणून पावसासाठीची एक प्रार्थनाही ह्या संग्रहात समाविष्ट केली आहे. त्यात कवी म्हणतो –
‘वरुणराजा कृपा कर
दीनदयाळा दैन्य मिटू दे
धावत येई दयाघना
धरित्रीचे पांग फिटू दे.’

‘गूगलबाबा’मधील कविता साधार, सप्रमाण तर आहेतच , पण ती मुलांना रुचेल, पचेल अशी मनोरंजक मांडणी करणारी आहे. ह्या कवितेत ज्ञान आहे, विज्ञान आहे आणि त्याला काव्यात्मकतेची जोड आहे. मुक्तछंद आणि यमकांची सोय आहे. साध्या सोप्या भाषेत वैज्ञानिक आणि भौगोलिक संज्ञा आणि संकल्पनांची काव्यात्म उकल करण्याची कवीची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि काव्यसौंदर्याने नटलेली ही कविता बालकुमारांबरोबरच जेष्ठांच्याही प्रसंतीस नक्की उतरेल. मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावेल. त्याच्या मनामध्ये आनंदाची कारंजी फुलवेल, असा मला विश्वास वाटतो. अशी विषयवैविध्याने नटलेली , विज्ञान आणि निसर्गाबरोबरच दैनंदिन जीवनातील घटनांचा आविष्कार करणारी, प्रतीकांतून शिकवण देणारी सर्वांगसुंदर कविता साकारल्याबद्दल डॉ. सुरेश सावंत यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

पुस्तकाचे नाव – ‘गूगलबाबा’ (बालकवितासंग्रह)
कवी -डॉ. सुरेश सावंत
प्रकाशक – दिलीपराज प्रकाशन, पुणे.
पृष्ठे ६४, किंमत रु. १३०

Related posts

मातब्बरांचे विचार असणारा उपयुक्त असा संदर्भग्रंथ

रामसर साईट्‌स म्हणजे काय ? त्या कोणत्या ?

अमरवेल पुस्तकास शब्दांगण पुरस्कार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406