June 18, 2024
rajendra-ghorpade-article-on-dnyneshwari-in-vishwache-aart
Home » रागद्वेष घालवण्यासाठी विषयांचा त्याग
विश्वाचे आर्त

रागद्वेष घालवण्यासाठी विषयांचा त्याग

लोभ, स्वार्थ, काम यांचे प्राबल्य वाढल्यानेच हातून या चुका होऊ लागल्या आहेत. स्वार्थामुळे आपण अनेकांची मने दुखावत आहोत. घरामध्ये वागतानाही या गोष्टीचा विचार करायला हवा. आपल्या वागण्याने कोणी दुखावणार नाही असे वागणे आपण शिकायला हवे. हीच अहिंसा आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे ।
रागद्वेष स्वभावे । नाशतील ।। 331।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा

ओवीचा अर्थ – म्हणून हे सर्व विषय पूर्णपणें मनातूनच काढून टाकावे, मग रागद्वेष आपोआप नष्ट होतील.

सतत अनेक विचार घोळत असतात. हे विचार जोपर्यंत संपत नाहीत, तो पर्यंत मनाला शांती लाभणार नाही. मन स्थिर होणार नाही. वृद्धापकाळात किंवा वयाच्या 40 नंतर अनेक आजार जडतात. यावर डॉक्‍टर विचार करणे कमी करा असा सल्ला देतात. मुळात अति विचार करण्यामुळेच हे रोग जडलेले असतात. या रोगावर विरक्त मन हा उपाय आहे. असे असेल तर पाश्‍चात संस्कृतीत या रोगावर इलाज नाहीत.

आपल्या संस्कृतीत मात्र निश्‍चितच यावर उपाय सांगितले आहेत. विशेष म्हणजे यासाठी पैसा खर्च करण्याचीही गरज नाही. इतके सोपे सहजपणे हे उपाय आपणास सांगितले गेले आहेत. संस्कृतीमध्येच याचा आचार – विचार सांगितला आहे. मग आपण आपल्या संस्कृतीचा तिरस्कार का करतो ? एखादी गोष्ट आपल्या संस्कृतीत सांगितलेली असेल, तर त्याचा सखोल अभ्यास का केला जात नाही. यावर सखोल विचार केला तरच हे तत्त्वज्ञान आपणास आत्मसात होणार आहे. अन्यथा तिरस्कार करून हे तत्त्वज्ञान अयोग्य आहे. असेच आपण म्हणत बसणार. आपल्या संस्कृतीला नावे ठेवत बसणार. पण भावी काळात आपणच आपल्या संस्कृतीच्या संवर्धनाकडे वळू. आपणाला त्याचे फायदे निश्‍चितच पटू लागतील.

अनेक रोग हे मनापासूनच उत्पन्न होतात. यासाठी मनावर नियंत्रण ठेवायला हवे. आपल्या संस्कृतीत हेच सांगितले आहे. मनावर बंधने घालण्याची सवय आपणास पडावी यासाठी काही गोष्टी शिकविल्या गेल्या आहेत. पण नेमके येथेच आपण चूक करत आहोत. नेमक्‍या याच गोष्टीचा त्याग आपण करत आहे. विषयांचा वाढता प्रभाव हेही यामागचे कारण आहे. विषयांना धरून राहिल्यानेच आपल्या डोळ्यावर झापड आली आहे. चांगल्या गोष्टी याचमुळे आपल्या दृष्टीस पडेनाश्‍या झाल्या आहेत. यासाठी विषयांचा त्याग करायला हवा.

लोभ, स्वार्थ, काम यांचे प्राबल्य वाढल्यानेच हातून या चुका होऊ लागल्या आहेत. स्वार्थामुळे आपण अनेकांची मने दुखावत आहोत. घरामध्ये वागतानाही या गोष्टीचा विचार करायला हवा. आपल्या वागण्याने कोणी दुखावणार नाही असे वागणे आपण शिकायला हवे. हीच अहिंसा आहे. अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरू करायला हवे. याची सुरवात ही स्वतः पासून करायला हवी.

आजच्या बदललेल्या जगात असे करणे निश्‍चितच आव्हानात्मक असणार आहे. पण हे आव्हान आपण स्वीकारायलाच हवे. पूर्वीच्या कालात ही परिस्थिती वेगळी होती. पण त्याकाळातही असे वागणे हे आव्हानच होते. त्याकाळातील लोकांनी हे स्वीकारले त्यामुळेच ते पुढे संत, महात्मा झाले. विषयांचा त्याग त्यांनी केला. साहजिकच त्यांच्यात उत्पन्न होणारा राग, द्वेषही नष्ट झाला. यामुळे त्यांचे ते सतत निरोगी राहिले. रोग त्यांना जडलेच नाहीत. जे रोग जडले त्याला प्रतिकार करण्याचीही क्षमता त्यांच्यात उत्पन्न झाली. विषयांचा त्याग केल्याने हे सर्व आपणास सहज प्राप्त होते.

Related posts

महाराष्ट्र कृषिसमृद्ध करणारी पिकं

आळसंद ला सोमवारी पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

विदर्भात पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406