काऱ्या मातीतील हिवरा इसरा या प्रातिनिधीक काव्यसंग्रहात झाडीबोलीच्या गौरवाबरोबर झाडीपट्टीची लोकधारा, परंपरा, मातीत रुजलेल्या भावभावना म्हणजे भूतलावरील स्वर्गसुंदर राजमहालतील विलोभनीय सजावटीतला हिरवा कशिदा. वैनगंगेचे संथ वाहणारे पाणी या भूमीला सुजलाम सुफलाम करीत आपल्या काठावर जगवलेल्या मानवी संस्कृतीचे उदात्त सोहळे या काव्यसंग्रहाचा आत्मा आहे. त्यामुळे हा काव्यसंग्रह वाङ्मय उदयगिरीच्या शिखरावर विराजमान झालेला दिसतो .
जुनासुर्ला, ता. मूल, जि. चंद्रपूर
लक्ष्मण खोब्रागडे
काळजातून जोवर हृदयाला पाझर फुटत नाही तोवर मनात भावनांची सरिता वाहून कवितांचा समुद्र बनत नाही. कविता म्हणजे शब्दांचा खेळ नसून रक्तात भिनलेल्या कंपनातील नवनिर्मितीचा आविष्कार आहे. आविष्कार करताना उसन्या घेतलेले अवसान कुचकामी ठरते. त्यासाठी शाश्वत आत्मविश्वासाची शिदोरी जवळ असावी लागते. कवितेतून प्रसवणाऱ्या शब्दागणिक कवीच्या अंतरातील दूरदृष्टीचा परिपाक असतो, जो निश्चित उद्दिष्टाला प्रेरित करण्यासाठी प्रतिभा पणाला लावून उठणाऱ्या वेदना स्फुलिंग बनून चेतवत असतात.
मोरपिकाची बागड गुपुनी
काऱ्या मातीत चढली लाली
हिवरी पगडी साज कुणाचा
मुकुट सिरावर झाडीबोली
महाराष्ट्राच्या वैभवशाली मानाचा शिरपेच झाडीपट्टी. तिचा गौरव करताना आपली झाडीबोली प्रगल्भ करण्यासाठी हिरव्या गर्भातील कविवर्यांनी शब्दफुलांची काऱ्या मातीतला हिवरा इसरा ही प्रातिनिधिक काव्यसंग्रहमाला ओवली. साहित्याच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेल्या अर्थरसाचा अलंकार घडविला. सौंदर्याची भुरळ मानवीप्रवृत्तीच्या अग्रस्थानी अधिराज्य करीत आलेली आहे. या सौंदर्याला अधिक खुलविण्यासाठी अलंकारांची उधळण केल्यास डोळ्यांची पारणे फिटणारच । निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याच्या विविध छटेबरोबर मातीत रुजलेल्या मानवी मनाची विशालता बहाल केलेल्या झाडीपट्टीचा महिमा वर्णन करताना कवींच्या हृदयातून काळजाच्या खाणीतील शब्दरत्ने बाहेर पडली. मनाच्या भावसाच्यात घडवून अलंकृत भावार्थात सजवलेली दुसरी सौंदर्य पर्वणी कोणती ?
माझ्या मराठीची बोलू कौतुके ,
अमृतातेही पैजा जिंके ।
यामागे मराठी भाषेच्या पाठीशी उभ्या असलेल्या अद्वितीय अशा बोलीत शब्दांचा समृद्ध वारसा आहे. भाषेचा मुकुटमणी म्हणून त्या गर्वाने मिरवीत आहेत. झाडीपट्टीतील हिरव्या निसर्गाचे सौंदर्य व लोकजीवनाच्या भरभराटीची वैभवसंपन्न परंपरा आहे. तिला घेऊन शुद्ध अंतःकरणात फुटलेल्या शब्दझऱ्याची गुंफण करीत बोलीभाषेतुन कवितारुपी नद्यांचा मेळ घालणारा प्रातिनिधिक कवितासंग्रह ; काऱ्या मातीतील हिवरा इसरा झाडीपट्टीतील विविध रत्नशलाकांना आपल्या हृदयात साठवून , भाषेच्या अभ्यासकांना शांत अमर्याद समुद्रच.
प्रमाणभाषेच्या अट्टहासापायी मराठी भाषेला समृद्ध करणारी बोली इतिहासजमा होत असताना, झाडीबोली साहित्य मंडळाने आपल्या बोलीला उर्जितावस्था प्राप्त करून देत चालवलेला उपक्रम म्हणजे बोलीभाषेला मिळालेली संजीवनी आहे. यामूळे भाषेचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना सोयीस्कर वाट उपलब्ध झालेली आहे.
लोककलेचे आमिर पाकरे
पांग फेडती तुजीस लेकरे
काऱ्या मातीतील हिवरा इसरा या प्रातिनिधीक काव्यसंग्रहात झाडीबोलीच्या गौरवाबरोबर झाडीपट्टीची लोकधारा, परंपरा, मातीत रुजलेल्या भावभावना म्हणजे भूतलावरील स्वर्गसुंदर राजमहालतील विलोभनीय सजावटीतला हिरवा कशिदा. वैनगंगेचे संथ वाहणारे पाणी या भूमीला सुजलाम सुफलाम करीत आपल्या काठावर जगवलेल्या मानवी संस्कृतीचे उदात्त सोहळे या काव्यसंग्रहाचा आत्मा आहे. त्यामुळे हा काव्यसंग्रह वाङ्मय उदयगिरीच्या शिखरावर विराजमान झालेला दिसतो.
हिरव्या रानातील मुक्त वातावरणात विहार करणारे पाखरे आपल्या गुंजरवातून झाडीमातेच्या गुणगौरवाबरोबर निरीक्षणातून उमगलेले सत्य अभिव्यक्त करण्यात लिन दिसतात. जन्मभूमीचे पांग फेडण्यास सज्ज झालेले मावळेच आपल्या काव्यातून कृतज्ञतेच्या नादाने चैतन्यमय ऊर्जा निर्माण करीत आहे. साहित्यक्रांतीतील सकारात्मक पाऊल म्हणजे संपादक अरुण झगडकर यांची गरुडझेप भाषिक अभ्यासाचा आसमंत पादाक्रांत करणारी भरारी म्हणावी लागेल.
पळत्यामागे धावून गजबजाटात हरवलेल्या जीवनप्रवाहात स्वअस्मिता जोपासणारे झाडीपट्टीतील कवी. आपल्या काळजाच्या ओलाव्यात रुजलेले प्रतिभेचे हिरवे अंकुर झाडीबोलीत काव्यरुपाने वाचकांच्या पदरात टाकून, अरण्याचा निसर्ग सोहळ्याबरोबर गोड मेवा उधळीत आहेत. कवितासंग्रह प्रातिनिधिक असला तरी झाडीबोलीचा गर्भ असल्याने, प्रत्येक कवीच्या प्रतिभेतून स्फुरलेली चेतना एका केंद्रात एकवटलेली दिसते. तयार अनुबंध भाषेच्या संस्काराचा मानबिंदू ठरणारा आहे.
काऱ्या मातीतील हिवरा इसरा महाराष्ट्राच्या गर्भश्रीमंत प्रांताचे प्रतिनिधित्व करीत असून, झाडीपट्टीतील वनसंपदा व खनिजसंपतीबरोबर ऐतिहासिक वारस्याची लोकपरंपरा बहाल करते. मांडलेला प्रत्येक कवितेतील रचनात्मक भाव काव्यात्मकतेची वैविध्यता वृंद्धीगत करीत जाते. राजकीय पटलावर विकासाच्या दृष्टीने सदा दुर्लक्षित भूभाग म्हणून झाडीपट्टीची अवहेलना होत आलेली आहे. पण या झाडी भूभागाच्या प्राकृतिक, भौगोलिक, सामाजिक व सांस्कृतिक उच्चतम मूल्याची वास्तविक संपन्नता या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून जगासमोर येणार हे महाराष्ट्राला अभिमानास्पद ठरावे.
पुरातन काळापासून निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गर्द अरण्यात, विविध लोककला उगम पावल्या. त्याचा वारसा सांगणारे अनेक लोककलावंत आजही निस्वार्थीपणे निर्मळ झरा बनून लोककलांचा प्रवाह आटणार नाही यासाठी जीवापाड प्रयत्नरत आहेत. या शृंखलेतील एक कडी असलेल्या झाडीपट्टीतील कवींची ताकतीची नैसर्गिक प्रतिभा या काव्यसंग्रहातून दिसून येते. ‘वाट कोणतीही असली तरी ध्येयापर्यंत मजल मारायचीच’ हा बाणा अंगी असलेला झाडीचा कवी. म्हणून अभिव्यक्त होणारा प्रत्येक कवी झाडीबोलीत मतितार्थाच्या कळस शिखरावर विराजमान झालेला दिसून येतो. भाषा समृद्धीसाठी संपादक अरुण झगडकर यांनी अनेक कवींना विश्वासात घेऊन संपादित केलेला काऱ्या मातीतील हिवरा इसरा भाषिक अभ्यासाचा मैलाचा दगड ठरावा असाच हा ग्रंथ आहे.
प्रातिनिधिक काव्यसंग्रह नाव – काऱ्या मातीतला हिवरा इसरा
संपादक – अरूण झगडकर
प्रकाशक – समिक्षा पब्लिकेशन, पंढरपूर
किंमत – १२० रुपये
ग्रंथासाठी संपर्क मोबाईल – 9405266915
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
कवी लक्ष्मण खोब्रागडे सरांनी कार्या मातीतला हिवरा इसरा या प्रतिनिधी कवितासंग्रहावर अतिशय सुंदर समीक्षा लिहिली आहे.