June 18, 2024
Review of Ratnmala Bhoyar Book Ratnanandini
Home » मनाच्या आंदोलनाचे अनोखे दर्शन
मुक्त संवाद

मनाच्या आंदोलनाचे अनोखे दर्शन

कवयित्री प्राचार्य रत्नमाला भोयर यांच्या काव्यभाषा साधी वाटत असली तरी प्रकृतीने ती प्रगल्भ आणि भावसमृध्द आहे. त्यांच्या कवितेतून शेतकऱ्यांचे दुःख, नीतिमूल्यांचा मांडलेला बाजार, समाजाची संवेदनशून्यता, वाढता स्वार्थभाव दिसून येतो, पण हे विषम दिवस लवकरच संपतील, असा आशावाद बाळगणारे विचार त्यांच्या कवितेतून जागोजागी प्रकट होतात.

ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर

गडचिरोली

मुल (जि. चंद्रपुर) येथील माजी नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर यांचा रत्ननंदिनी हा काव्यसंग्रह वाचतांना आनंद होतोय. तीन वर्षांपूर्वी त्यांची भेट बालविकास शाळा मूल येथे आयोजीत झाडीबोली साहित्य मंडळाच्या वार्षिक कार्यक्रमात झाली होती, त्यावेळी झालेल्या कविसंमेलनात त्यांनी आपल्या रचना सादर केल्या होत्या. त्या रचना ऐकल्यावर आपण काव्यसंग्रह काढावा, असे मी त्यांना सुचवले होते. पुढे त्या गडचिरोली येथे आयोजीत ‘आपली माणसं आपले शब्द ‘ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. झाडीबोली साहित्य मंडळाच्या व्हॉट्सअप ग्रुप त्यांनी पोस्ट केलेल्या अनेक रचना मी वाचलेल्या आहे. त्या साऱ्या
रचना आजच्या ज्वलंत प्रश्नांना हात, घालत त्यावर सडेतोड विचार व्यक्त करणाऱ्या आहेत. तोच रचनाबंध कवयित्री प्रा. रत्नमाला भोयर यांनी ‘रत्ननंदिनी ‘ यात योजलेला दिसून येतो. पहिल्याच कवितेत शब्द चमत्कृती सादर करून श्रावण मासातील निसर्गाचे अप्रतिम वर्णन त्या करतात,

ऊन पावसाचा खेळ
छाया प्रकाशाची मौज
ब्रम्हांडात निरंतर चाले
जीवन संघर्षाची पैज !!

हिरव्याईची नवलाई
किती वर्णावी तरीही
शब्द चमत्कृती किमया
ना पेले जिव्हेलाही !!

( हिरवी नवलाई)

श्रावण मास जमिनीवर हिरवळ निर्माण करते पण निसर्ग प्रेमीच्या हृदयांनाही तो हिरवळीने काबीज करतो. स्वर्गीय आभास निर्माण करणारा श्रावण सर्वांना हवाहवासा वाटतो. बालकवी ठोंबरे यांना ‘श्रावण मासी’, जसा भासला तसा, त्याहूनही अधिक सप्तरंगाची उधळण करणारा हा मास कवयित्री भोयर यांना जाणवला. झाडीपट्टीचा प्रदेश हा हिरवागार, तितकाच धानाचा – तलावाचा असा समृद्ध भाग आहे. त्यामुळे हिरवाई प्रत्येकाला आकर्षित करून घेणारी आहे. याचा प्रत्यय निसर्ग कवितेतून दिसतो.

त्या लिहितात,

निसर्गरम्य हिरव्या वातावरणी,
अलगूज वाजवी शारंगपाणी
त्या वेणूचा षड् ज ऐकता,
स्तब्ध जाहला तो निर्माता (निसर्ग)

डोंगरदऱ्या, कडेकपारी जेव्हा हिरवा शालू नेसतो, तेव्हा ते नयनरम्य दृश्य मानवी मनाला प्रसन्न करून जाते. इंद्रधनूची रंगीन कमान तर मनःपटलावर कायमची कोरली जाते आणि असा निसर्ग प्रत्येकाला खुणावत असतोच. एकंदरीत या कवितेतून केले गेलेले वर्णन बालपणीच्या आठवणीत कवयित्री रंगून गेल्याचे नमूद करते. निसर्गाचा आनंद घेतांना, त्यातील सौंदर्यभाव जो कवयित्रीने टिपलेला आहे, तो निश्चितपणे वाचकांना फुलवणारा आहे.

हायकू रचनेतील ‘पाऊस साक्ष’ या कवितेतील ओळी अशा आल्या आहेत.

येता पाऊस
चराचरा हर्ष
झोंबे अंगास

भिजवी रान
आसूसली धरती
हर्षल कण

मन मोकळे झाले, की आनंदाने ते नाचू लागते आणि अशा मनाला प्रेमाचा स्पर्श होऊन अंगी रोमांच उभे राहते. ते शब्दांत व्यक्त करताना त्या लिहितात,

मन मयूर
थुई थुई नाचती
गळा गाती !

ओढ वाढली
साजणी मीलनाची
स्पर्श सुखाची
(मेघदूत)

जीवनाचे सारे रंग ज्याप्रमाणे सृजनशील व्यक्ती अतिसंयतपणे कथन करतो. अगदी त्याप्रमाणे सदर कवयित्री ने नात्यातील मृदुता जपण्याचे भान उलगडून दाखविलेले आहे.
पावसाळ्यात पाऊस पडला की पेरलेले बी वापून येते .
अन् पाहता पाहता आपली धरा हिरवा शालू नेसते.

भिजली माती
सुगंध सभोवती
हर्षल नाती

शालू नेसली
हिरवाकंच भारी
धरा नटली

( भिजली माती)
मृग बरसे
धरती झाली ओली
अंगी आरसे

केला शृंगार
सजले अंग अंग
गंध बहार

( भिजले मन)
पाऊस गाणी
ओठावरती येई
आनंद मनी

मनमयुर
डोलते हृदयात
मनी काहूर
( मनमयूर)

निसर्गाचं लावण्य न्याहाळत निर्मळ मांगल्याचा सदोदित ध्यास घेत पुढे जाणाऱ्या ह्या कविता कवयित्रीच्या अंतर्मनातील देखणं रूप प्रकट करणाऱ्या आहेत. कवयित्री प्राचार्य सौ. भोयर या काव्यसंग्रहात काही निरीक्षणे ठळकपणे नोंदवतात.

नशिबी तयांच्या दगडधोंडे
दगडाच्या नशिबी छिन्नी हातोडे
गावों-गाव भटकंती अशीही
पायी बांधली भिंगरी जशीही
( पाथरवट)

पाथरवट ह्या कवितेतून मूर्त्या कोरणाऱ्या समाजबांधवाचे कौशल्य त्या अधोरेखित करतात, त्याचबरोबर त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधतात.

आजवर कुण्याही कवींनी पाथरवट समाजाबाबत चिंतन प्रस्तुत केलेले दिसत नाही.

पाटे, वरवंटा घेऊन डोई
फिरतात गावोगाव विकावया

समाजात असे अनेक घटक आहे, की जे भटक्या अवस्थेत आजही आहे. अशा भटकंती समाजाचे उत्थान होणे आवश्यक आहे. मानवी मनाची आंदोलने कवी टिपत असतो, दाहक जीवनानुभव आल्यानंतर तो शब्दात मांडत असतो.

सत्य सर्वाना माहीत असताही करू नये तो करतो
आपले सदाचाराचे जीवन सोडून अत्याचाराचे मागे लागतो
( सत्यता)
तथा

अजूनही धग आहे ह्रदयात पेटतात ज्वाला
कुस्करल्या जातात किती
अजाण बालां
नैतिकता, माणुसकीचे वारे हवेतच विरले
तरी या दुःखावर माझ्या फुंकर ना कोणी मारले ( सल)
मानवी जीवन विचित्र अनुभूतींनी व्याप्त असून समाजातील अन्याय, अत्याचाराने मन पेटवून उठल्याने बदलत्या वास्तवाचे चित्रण त्या बेधडकपणे मांडतात.
स्वार्थी जगाचा कवयित्रीला वीट आला असल्याचे आणि राष्ट्रजीवन धोक्यात आल्याने कविमन भयावह स्थितीने व्याकूळ झालेले दिसून येत आहे.

भ्रूणपरीक्षण करून तिची
हत्या करू नका रे
खूप झाला अत्याचार
आता थांबवा हत्या रे
(अत्याचार)

  काम झाले कमी
 दारू पिणे झाले मस्त
  पैसे न मिळता मला
 शिव्या देऊन मारी मस्त
       (व्यथा स्त्रीची)
   केवळ स्वतःचाच विचार न करता सभोवती घटीत होणाऱ्या घटनांच्या नोंदी कवयित्रीने प्रकर्षाने केलेल्या दिसून येतात.स्त्रीभ्रूण हत्या, महिलांवर होणारा अत्याचार कवितेतून व्यक्त करून संबधिताचा खरपूस समाचार घेतलेला दिसतो. वरील कवितेतून कवयित्रीचा निर्भीडपणा सिध्द होतो.
 माणसात देवाचे देवत्व असते हे माणूस विसरून तो सतत भौतिक सुखासाठी धावत सुटतो आणि आयुष्याचा कार्यकाळ अचानक संपतो.

माझे माझे करता
कोणी उरला न आता
मरण सत्य आहे कळले
चितेवर जाता जाता
(आयुष्य)
जीवन हे क्षणभंगूर असून ते बालपणापासून संस्काराने सजविले पाहिजेत केवळ प्रपंचाच्या लटक्या मोहपाशात गुंतून न जाता ममता, जिव्हाळा जपला पाहिजे. प्रत्येकांनी एकमेंकाशी समर्पित भावनेने सहयोग केला पाहिजे, अशा आशयांच्या सुरेख वैचारिक मंथन करणाऱ्या ह्या कविता आहे.
आई ही प्रत्येकांच्या ह्रदयावर संस्कार करते. तिच्या अनंत उपकाराचे अंतर्मुख होऊन केलेले वर्णन निरनिराळ्या भावांनी सजलेले आहे.

आम्हा नको मिठाई ,दुधावरील मलाई
मुलांना फक्त हवे असते बाबा आई
( आर्जव )

कवयित्री प्राचार्य रत्नमाला भोयर यांच्या काव्यभाषा साधी वाटत असली तरी प्रकृतीने
ती प्रगल्भ आणि भावसमृध्द आहे. त्यांच्या कवितेतून शेतकऱ्यांचे दुःख, नीतिमूल्यांचा मांडलेला बाजार, समाजाची संवेदनशून्यता, वाढता स्वार्थभाव दिसून येतो, पण हे विषम दिवस लवकरच संपतील, असा आशावाद बाळगणारे विचार त्यांच्या कवितेतून जागोजागी प्रकट होतात. त्यांनी केलेली शब्दांची निवड, रचना व नियोजन ही काव्य स्वरूपाशी सुसंगत असून यापूर्वीच्या मोठ्या कवींचे अनुसरन न करता स्वतःचे वेगळे काव्यविश्व साकारण्यात त्या यशस्वी झालेल्या आहेत. निसर्गातील विविधतेचे चित्रण या काव्यसंग्रहाच्या निसर्ग, भिजली माती, ओली माती, हिरवे रान, पाऊस साक्ष, जादूगरी, उसंत, विनवणी कवितांमधुन केले आहे. निसर्ग आणि मानवी जीव यातून चैतन्याचा झरा प्रवाहित होत असतो. मानवी भावनेच्या अनंत रंगाच्या छटा मनात उधळल्या जातात. त्याचे प्रत्यय या कविता वाचताना अनुभवास येतात. ग्रामजीवनातील विसंगतीचे, नैराश्याचे चित्र त्यांनी नरबळी, बन मानवतेचा पुजारी, पोशिंदा, निर्भर, वास्तव, ग्रामीण जीवन, व्यसनाचा भस्मासूर या कवितेतून समर्थपणे रेखाटले आहे, सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलेले आहे .हे भाष्य केवळ वरपांगी नसून चिंतनपर आहे. त्यात जीवनाचा व्यामिश्र अनुभव असून कवितेत योजलेली प्रतिमासृष्टी विद्ग्ध वाचकांचे मन हळुवार व्यापून टाकते. एकंदरीत जीवनाचे तत्त्वज्ञान आत्मचिंतनातून पुढे येऊन या मूल्यगर्भ कविता कल्पकतेचे विविध जीवनानुभवाचे बंध घेऊन साकारली आहे.

Related posts

छंदातून आनंदाची बाग फुलवणार्‍या कविता

स्वागत फाऊंडेशनतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

आंतर सांस्कृतिक रुची आणि सहयोग वाढवणे हा चित्रपट महोत्सवाचा मुख्य उद्देश

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406