July 22, 2024
Acharya Na Go Thute comment in Danapur Marathi boli Sahitya Samhelan
Home » तरुणांना प्रेरणादायी असा बोली भाषेचा जागर
काय चाललयं अवतीभवती

तरुणांना प्रेरणादायी असा बोली भाषेचा जागर

आठवे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन दानापूर ( जि. अकोला) येथे झाले. दानापूर येथील कै श्यामराव बापू सार्वजनिक वाचनालय, स्व. बापूसाहेब ढाकरे कला अकादमी आणि नागपूर येथील मराठी बोली साहित्य संघाच्यावतीने याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ प्रतिमा इंगोले यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. अनिलदादा गावंडे स्वागताध्यक्ष तर आचार्य ना. गो. थुटे हे संमेलनाध्यक्ष होते. मराठी बोली साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. हरिचंद्र बोरकर यांची ही चळवळ आमच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी अशी ठरली. या निमित्ताने हा लेख प्रपंच…

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

इतक्या दूर विदर्भात आणि महाराष्ट्राचे हे दुसरे टोक पाहण्याची संधी कधी लाभली नव्हती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही संधी मला मिळाली. येथील माणसे जवळून पाहाता आली. पुण्यात आणि कोल्हापुरात या भागातील लोक कामाच्या निमित्ताने आहेत. ती भेटतात. पण तेवढ्यापुरताच त्यांचा परिचय असतो. त्यांच्या भाषेतील फरक मात्र जाणवतो. आवाजातील चढउतार यावरून या प्रदेशाची ओळख होऊन जाते. पण येथील माणसांचा स्वभाव इतरांपेक्षा खूपच वेगळा आणि आपलासा वाटतो. हे मात्र येथे भेट दिल्यानंतर जाणवले. अध्यापही या भागात परंपरा टिकवून ठेवल्या जात आहेत. येथील ग्रामीण संस्कृतीत स्वच्छतेला प्राधान्य आहे. बदलत्या काळानुसार या परिसरात जुन्या घरांनी आधुनिक चेहरा घेतला असला तरी या आधुनिकतेत येथील माणसांनी आपले संस्कार मात्र जपले आहेत. या संस्काराचा वारसा तरुणपिढीनेही जोपासावा यासाठी त्यांचे निश्चितच प्रयत्न सुरु आहेत.

मराठी भाषा भावीकाळात टिकेल की नाही याची शाश्वती वाटत नसताना मराठीतील बोली भाषा संवर्धनाचे कार्य नागपूरच्या मराठी बोली साहित्य संघाने घेतले आहे. सध्याच्या पिढीला तर मराठी कोणत्या बोली भाषा आहेत याचीच कल्पना नाही. इतकी मराठीची पिछेहाट झाली आहे. मालवणी, कोरकू, पोवारी, वऱ्हाडी, झाडी, निहाली, अहिराणी, तावडी, लेवा पाटिदारी, पारपट्टी, मराठवाडी, झाडी, ढिवरी, चंदगडी, कोल्हापूरी, गोंडी, हलवी अशा विविध बोली भाषा मराठीत आहेत. संमेलनाच्या निमित्ताने या बोली भाषांचा जागर दानापूरच्या भूमीत झाला. येथे उपस्थित तरुणपिढीला हे संमेलन निश्चितच प्रेरणादायी असे होते.

कोणत्याही भाषेला त्यातील साहित्यामुळे उभारी मिळते. येणारे साहित्य बदलत्या काळानुसार सुसंगत आणि ज्ञान देणारे असेल तर ती भाषा निश्चितच टिकते. पण मराठी भाषा लोप पावत आहे. असा सुर अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो आहे. याच चुक असे काहीच नाही. कारण मराठी टिकण्यासाठी ती ज्ञानभाषा होणे गरजेचे आहे. मराठीत ज्ञानाचा विचार आपल्या संतांनी सांगितला आहे. पण तो जोपासण्याचे कार्य भावी पिढीने घेणे आवश्यक आहे. धकाधकीच्या जीवनात तरुणपिढीकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने मराठीला फारसे भवितव्य वाटत नाही. यासाठी मराठीतील ज्ञानाचा वसा आपण जोपासायला हवा. इये मराठीचिये नगरी । ब्रह्मविद्येचा सुकाळू करी । हे स्वप्न संत ज्ञानेश्वरांनी पाहीले होते. वारकरी संप्रदायाने हा विचार जोपासत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन केले आहे. ज्ञानेश्वरीच्या पारायण सप्ताहातून मराठी संवर्धनाचेही काम पुढे चालू राहीले आहे. इतकेच नव्हेतर सर्व जाती धर्मात लोक हे ज्ञान घेऊन संतपद प्राप्त करू शकतात हे संत ज्ञानेश्वरांनी दाखवूनही दिले आहे. यामुळेच महाराष्ट्रात संत नामदेव शिंपी, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत चोखोबा, संत तुकाराम असे विविध जातीतील लोक संतपदापर्यंत पोहोचले. समानतेची, मानवधर्माची शिकवण यातून देण्यात आली. या ब्रहमज्ञानाचा या मराठीच्या नगरीत सुकाळ करायचे स्वप्न संत ज्ञानेश्वरांनी पाहीले आहे. यासाठी वारीच्या परंपरेतून, गुरु-शिष्य परंपरेतून या ज्ञानाचा प्रसार आजही केला जातो. ही ज्ञानदानाची परंपरा पुढेही चालू ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच माऊलींना मराठीच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ करून ही मराठी पताका विश्वात फटकवून हे विश्वची माझे घर करायचे होते. हा विचार जोपासला तर मराठीचे संवर्धन निश्चितच होईल.

2019 च्या जनगणनेनुसार भारतात मराठी बोलणाऱ्यांची संख्या दहा कोटीवर आहे. मराठी ही जगातील 19 व्या क्रमांकाची भाषा आहे. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्ठात समाविष्ठ केल्या गेलेल्या बावीस भाषापैकी मराठी ही महत्त्वाची भाषा आहे. दरवर्षी अंदाजे 90 हजार ते एक लाख पुस्तके भारतात प्रसिद्ध होतात. यामध्ये मराठी भाषेचा वाटा 15 ते 20 टक्के आहे. म्हणजे मराठीमध्ये अंदाजे 15 ते 20 हजार पुस्तके दरवर्षी प्रकाशित होतात. इतक्या मोठ्या प्रमाणात पुस्तके बाजारात येतात. साहजिकच खपासाठी स्पर्धा ही होणारच. अनेक नवे लेखक घडत आहेत. असे असले तरी मराठी तसेच मराठी बोली भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी जागर हा आवश्यकच आहे. यातूनच संवर्धनाचे कार्य होते हे लक्षात घ्यायला हवे.

आज तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. दर दहा दिवसाला आपणाला नवे तंत्रज्ञान उदयाला आलेले पाहायला मिळते. अशा परिस्थितीत बदलत्या काळानुसार बदलत राहीले तरच मराठी भाषा आणि मराठीतील अन्य बोली भाषा टिकणार आहेत. नव्या तंत्रज्ञानात मराठी तसेच त्यातील बोली भाषांचा प्रसार वाढावा यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. यासाठी सोशल मिडीयावर मराठी बोलीत व्यक्त व्हायला शिकले पाहीजे. मराठीतील आपले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचले पाहीजे, यासाठी या माध्यमांचा वापर केला पाहीजे, दानापूरच्या मराठी बोलीच्या संमेलनात याबाबतचा जागर करण्यात आला.

दानापूरच्या संमेलनात आचार्य ना. गो. थुटे यांनी कोणतीही बोली मूळ प्रमाण भाषेला समृद्ध करते असे सांगत थुटे यांनी वऱ्हाडी, अहिराणी, मालवणी, झाडीबोली, कोल्हापुरी व अन्य बोलींच्या समृद्धीच्या दिशेने होणाऱ्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी बोलींचा प्राचीन इतिहास, प्रमाण मराठी भाषेचा वरचष्मा, बोलींकडे दुर्लक्ष, भाषा विषयक सर्वेक्षणे बोलींची घेतलेली दखल यावर लक्ष वेधले. काही बोलींची छटादर्शन झलकही त्यांनी सांगितली. मागासलेला मुका समाज लेखणीतून अभिव्यक्त होऊ लागला. तरीही राज्यात पुस्तकांची भाषा पुणेरी प्रमाणभाषा म्हणून कायम आहे त्यामुळे मराठी बोलींच्या लेखकांची घुसमट होत राहिली. वास्तविक प्रमाण मराठीच्या अन्य बोलींचे शब्दधन घेऊन मराठीला अधिक समृद्ध करायला हवे होते, पण मनमोकळेपणाने असे झाले नाही, अशी खंतही थुटे यांनी व्यक्त केली.

दानापूर हे डॉ प्रतिमा इंगोले यांचे आजोळ. आईचे जन्मगाव. सध्या त्या दानापुरातच वास्तव्यास आहेत. या संमेलानात त्यांनी दानापूरच्या इतिहासावर प्रकाश टाकला. दानापूरच्या कोटावर तुयसी, इथं नांदते केसोराजाची मावशी, अशी ओळ लोकगीतात सापडते. त्यामुळे या गावचा कृष्णाशी संदर्भ असावा, असे मत इंगोले यांनी व्यक्त केले. वारी येथील मारुतीची मूर्ती ही रामदास स्वामींनी स्थापन केली नाही तर ते लोकदैवत आहे, तसा ताम्रपट असल्याचेही त्यांनी सांगितले. नरनाळा किल्ला पाचव्या शतकाच्या पूर्वीपासून अस्तित्वात होता मात्र शासनाच्या माहिती पुस्तिकेत किल्ल्याची स्थापना आठव्या शतकात झाली असल्याची चुकीची माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार पुरषोत्तम आवारे यांनी व्यवहारात बोलीभाषेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. जेथे जी बोली बोलली जाते तेथे वर्तमानपत्रांनी त्याच बोलीत बातम्या देण्याचा प्रयत्न करावा. बोली भाषा बोलताना न्युनगंड बाळगता कामा नये असे सांगत केंद्र सरकारने वऱ्हाडी बोलीची अधिकृतपणे दखल घेतली नाही अशी खंतही व्यक्त केली.

ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी संत तुकडोजी महाराज, सत्यपाल महाराज यांनी वऱ्हाडी बोलीचा सुगंध दूरपर्यंत पसरवला. त्यामुळे बोलीची चळवळ ही आध्यात्मिक आहे असे सांगितले. तसेच ग्रामगीतेत 298 झाडीबोलीतील शब्द आहेत तर 59 वऱ्हाडी, 35 इंग्रजी व 90 हिंदी शब्द असल्याचे सांगितले.

मराठी बोली साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ हरिश्चंद्र बोरकर यांनी भाषा, बोलीचा संबंध मांडला. साहित्यिकांच्या हाती युनोस्कोचे परिपत्रक लागले, की वीस वर्षात भारतातील दोन भाषा मरणार, त्यात एक मराठी आहे. तेव्हा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत बहिणाबाईंची मराठी मरणार नाही यावर आपण ठाम होतो असे सांगितले फक्त ही भाषा टिकवावी लागेल असे ते म्हणाले.

या संमेलनात मराठी बोली भाषांचा जागर झाला. मालवणी बोलीमध्येच बोलत डॉ. बाळकृष्ण लळीत मालवणी भाषेचा जागर केला. माझ्या बोलीचे प्रमाण मराठीला योगदान यावरील परिसंवादामध्ये डॉ रावसाहेब काळे आणि डॉ श्रीकृष्ण काकडे तर माझ्यो बोलीची वैशिष्ट्ये या परिसंवादामध्ये डॉ. वासुदेव वले, डॉ जतीन मेढे, संदीप माळी, डॉ राजा मुसने ( वऱ्हाडी) यांनी सहभाग नोंदविला. राज्यातील विविध बोलींनी मराठीला उभं करून मोठे केले आहे. त्यामुळे मराठीचा वटवृक्ष हा बोलींच्या फांद्यावर उभा असल्याचे मत विविध बोलींच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले. कोणतीही बोली श्रेष्ठ, कनिष्ठ नसते तर प्रत्येक बोलीचे सौंदर्य त्या त्या भागात दिमाखात नांदत आहे. असा सूर परिसंवादातून व्यक्त झाला.

दानापूर येथे झालेले संमेलनात दोन ठराव करण्यात आले. महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बोली भाषांचे संवर्धन व्हावे यासाठी त्यांनी बोली साहित्याचा समावेश अभ्यासक्रमात करावा व सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज चिंचोळीकर (अकोट) यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करावे. हे ठराव करण्यात आले.

संमेलनामध्ये साहित्यिकांनी पुस्तकाचे स्टॉल मांडले होते. यामध्ये उन्नती संस्थेने मांडलेला स्टॉल सर्वांनाच आकर्षित करत होता. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मराठी शिकण्यात येणारी अडचण असो किंवा प्राथमिक शाळेतील शिक्षकांना कोरकू विद्यार्थ्यांना शिकवताना येणारी अडचण. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन मुंबईतील उन्नती संस्थेने कोरकू भाषेत अभ्यासक्रम रुपांतरीत करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्थर उंचावण्याचा वसा हाती घेतला आहे. त्यांनी याबाबत मांडलेली पुस्तके सर्वांनाच प्रोत्साहित करत होती.

दानापूर येथे संत तुकडोजी महाराज यांच्या अस्थिंचे स्मारक आहे. येथे भेट देण्याची संधी मला मिळाली. स्मारकाचा परिसर निश्चितच प्रेरणादायी असा आहे. याचा विचार करता तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतून मराठी तसेच बोलींचे संवर्धन करता येणे शक्य आहे. या स्मारकामध्ये संस्कृती संवर्धनाच्या अनुषंगाने नित्य पाठ, प्रार्थना करण्यात येते. हा उपक्रम या गावात येणाऱ्या पाहुण्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. पण त्या बरोबरच केवळ पुस्तकी ज्ञाना बरोबरच ग्रामगीतेत सांगितलेल्या विचारांनी दानापूरचा विकास होणे निश्चितच आवश्यक आहे. भावी पिढीच्या आणि आरोग्याच्या अनुषंगाने तुकडोची महाराज यांच्या स्वप्नातील आदर्श गाव उभा करता येणे शक्य आहे. हा आदर्श देशातील अन्य गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरू शकेल. यातून दानापुरात विकासाची गंगाही आणता येऊ शकेल. मराठी संवर्धनासह, पर्यावरण आणि देशी बियाणे व गायींचे संवर्धन असे उपक्रम घेऊन सेंद्रीय शेती व ठिबक सिंचनातून गावाचा विकास होऊ शकतो. यासाठी गावाने आता पुढाकार घेतल्यास एक आदर्शगाव म्हणून विकसित होऊ शकेल. यातून संत तुकडोजी महाराज यांच्या गाथेतून देशाला नवा आदर्श उभा राहू शकेल.

सध्या वाढते आजार, आरोग्याच्या समस्या, कर्करोगाचे तरुणामध्ये वाढते प्रमाण विचारात घेऊन आदर्श गावाची संकल्पना राबवणे आज गरजेचे आहे. गावातील सर्वच घटकांना याचा लाभ होऊ शकतो. मुळात आरोग्याच्या या समस्येचे मुळ किडनाशके, रासायनिक खतांचा अतिवापर हे आहे. यासाठी सेंद्रीय शेतीची कास धरून गावचा विकास केल्यास यातून संवर्धनाचे उपक्रम राबवून आदर्श गावाचा प्रकल्प उभा राहू शकतो. हा आदर्श देशासाठीच नव्हेतर विश्वासाठी महत्त्वाचा ठरू शकेल. यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. असे आम्हाला वाटते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मानवतेच्या मूळ भूमीतून उफाळलेला लाव्हा ” अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त “

अमरत्वाची अनुभुती देणारे अक्षर

बेधडक वळणाची कोल्हापुरी बोली

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading