April 18, 2024
Awaking voting Ceremony of Democracy article by Laxman Khobragade
Home » सोहळा लोकशाहीचा , जागर मताधिकाराचा
सत्ता संघर्ष

सोहळा लोकशाहीचा , जागर मताधिकाराचा

मतदानासारखे दुधारी शस्त्र म्यान करण्यात शहाणपण नाही. संविधानाने प्रत्येक नागरिकांच्या मनगटात भरलेले बळ आहे. मतदार गर्भगळीत झाला तर, सत्तापिपासू गैरमार्गाने व्यभिचार करायला मोकळे. नव्या युगात स्वतःला जागरूक समजणारा मतदार, मतदानापासून गाफील राहतो. यापेक्षा लोकशाहीचे मोठे हत्यारे कोण ?

लक्ष्मण खोब्रागडे

जुनासुर्ला, ता. मूल, जि. चंद्रपूर

‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव’. बदल घडविण्यासाठी मोठा पहाड फोडावा लागणार नाही, एका मताचा स्वाभिमान जागवावा लागेल. लोकशाहीतील मताचा अधिकार प्रत्येक नागरिकांच्या मनगटातील सामर्थ्य आहे. मताच्या पेटीतून शासनाचा जन्म होतो, कोण्या संपत्तीच्या भांडारातून नाही. ही अलौकिक देणं अन्य शस्त्रात सापडणार नाही. मतदानाचे शस्त्र मुजोरांना त्यांची जागा दाखवून देते. मुजोरांना वठणीवर आणणे नागरिकांच्या हाती असल्याने, हुकूमशाहीची नांगी ठेचल्या जाते. सार्वभौम गणराज्याची मुहूर्तमेढ मजबूत बनते. गणराज्याला बळकटी देणे मतदानाचा गाभा आहे. मतदान लोकशाहीचा डोलारा उभा करते. त्यामुळे स्वैराचारी राज्यसत्ता थरथर कापत असते. मतदानाचा पहारा अंदाधुंद अनैतिक मानसिकतेचे खच्चीकरण करून, सर्वलौकीक कल्याणाला खतपाणी घालते. त्यामुळे लोकशाहीचा कणा अधिक ताठ होऊन, देशाची एकात्मता सौख्यशिखर गाठते. मतदानाने सत्तेवर बसवून लोकहितासाठी झटण्याची संधी उपलब्ध करून देता येते. त्याप्रमाणेच अहितकारक सत्तेला पायउतार करण्याचा उत्तम उतारा म्हणजे मतदान. अशाने लोकशाहीचे आरोग्य धोक्यात येत नाही. सुदृढ लोकशाहीचे सोहळे साजरे करता येतात.

मताधिकाराचा जागर होणे गरजेचे आहे. मताची शक्ती कळणार नाही, तोपर्यंत जुलमी मनोवृत्ती डोके वर काढत राहील. भारतासारख्या विशाल देशात, अनेक बाबतीत विविधता आढळते. प्रांत, भाषा, जात, धर्म यापलीकडे एकोपा साधत भारतीय म्हणून एका धाग्यात बांधण्याचे काम लोकशाही करीत असते. पण लोकशाहीच्या अथांग सागरात अज्ञानाची वादळे उलथापालथ घडवून आणतात. अज्ञानापोटी विविधतेतील भेदाचा वापर करून, लोकशाहीवर हल्ला करणारे सत्ता हस्तगत करू पाहतात. अशांच्या हातात सत्ता आली की, गणराज्याची गळचेपी करण्याचे तंत्र त्यांना चांगले अवगत असते. अशावेळी आक्रंदणाऱ्या लोकशाहीचे सांत्वन करण्याखेरीज मतदाराच्या हाती काहीच नसते. मताचे मूल्य न कळल्याने भेदाच्या वादात अडकून, मतदार लोकशाहीच्या हत्येत सहभागी होत असतो.

बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात बुद्धिभेदाची जळमटे पसरताना दिसतात. यात मतदार फसत जातो. नीती, अनितीच्या तार्किकतेला फाटा देत, भेदाच्या प्रेमात पडून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. पर्यायाने लोकशाहीला खिंडार पाडण्याचे पातक आपल्या माथी पाडतो. विकल्या गेलेली प्रसारमाध्यमे मतदारांच्या बुद्धीत खोट्या थापांचे बीज पेरून, द्वेषाला खतपाणी घालतात. मताचे अवमूल्यन केल्या जाते. लोकशाहीचे मूल्य रुजविणाऱ्या शक्ती सत्तास्थानी गेल्या तरच, मताची किंमत वाढते. त्यासाठी मतदार जागरूक होऊन मतदानाची उपयोगिता जाणला पाहिजे. मतदारांपुढे रेटून खोट्याला सत्यात मांडणारी वृत्ती, चकवा देत असते. खोट्याची जित झाली की, निराश मतदार हतबल होऊन मतदानापासून फारकत घ्यायला लागतो. स्वतःला मिळालेला वरदान विसरून, बांडगुळांना आयते आशिष मिळते. लोकशाही प्रवर्धित होण्याऐवजी घसरणीला लागते.

मतदानासारखे दुधारी शस्त्र म्यान करण्यात शहाणपण नाही. संविधानाने प्रत्येक नागरिकांच्या मनगटात भरलेले बळ आहे. मतदार गर्भगळीत झाला तर, सत्तापिपासू गैरमार्गाने व्यभिचार करायला मोकळे. नव्या युगात स्वतःला जागरूक समजणारा मतदार, मतदानापासून गाफील राहतो. यापेक्षा लोकशाहीचे मोठे हत्यारे कोण ? मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून मजा मारणारे कपाळकरंटे वेळ निघून गेल्यावर देशाच्या चिंतेने, परिस्थितीवर ताशेरे ओढण्याची चढाओढ लावतात. प्रत्यक्ष मतदानातून पर्याय शोधण्याचा शहाणपण कधी येणार ? लोकशाहीचा खरा सोहळा साजरा करायचा असेल, तर आधी हक्क नव्हे कर्तव्य म्हणून मतदान केले पाहिजे.

आर्थिकतेची दरी मतदाराला मजबूर बनवते, ही बतावणी लोकशाहीला घातक आहे. पैशासाठी मत विकण्याची दरिद्री परंपरा त्यागली पाहिजे. पैशाने लाचार बनून, लोकशाही खिळखिळी करण्याचे भिकारधंदे सोडायची गरज आहे. आपल्या कष्टाने पाच वर्षे सुखाने उदरनिर्वाह करणारा मतदार, एक दिवसासाठी भिकारी कसा होतो ? याचा फायदा उचलत प्रस्थापित श्रीमंत गरिबीची दरी खोल करीत जातात. याला कारणीभूत मतदार आहे. जिथे लोकांनी लोटांगण घालावे; अशी मताची श्रीमंती गहाण ठेवून दबेल बनलेला मतदार, लोकशाहीला झुकायला भाग पाडतो. म्हणून मताचे मूल्य पैशात न मोजता, स्वाभिमान जागा केला पाहिजे. स्वाभिमानाचे मोल जिवाहून लाखमोलाचे. तेव्हा साधा चिवडा आणि दारुची बोळवण पाहून, मताची माती करण्यात कसला पुरुषार्थ ? मतदानाच्या जोरावर लोकशाहीला पोषक सत्ता उभी करण्यात पुरुषार्थ आहे ; मत विकण्यात नाही.

मताच्या अधिकाराने सर्वांना समान दर्जा दिला आहे. महालातील श्रीमंत असो की झोपडीतील रंक, पुरुष असो की स्त्री, जात, धर्म, वर्ण कोणताच भेद ठेवला नाही. प्रत्येकाच्या मताचे मूल्य समान. त्यामुळे प्रत्येक नागरिक समान दर्जाचा आहे. दर्जा खालावण्याची नामुष्की मतदार स्वतः ओढवून घेतो. विकल्या गेलेला गुलाम असतो. गुलाम सदोदित वंचित असतो. वंचिताची परंपरा खंडित करायची असेल तर, समान दर्जाच्या मताधिकाराचा मार्ग सोडता कामा नये. लोकशाहीच्या उदात्त ध्येयाकडे नेणारा मतदानाचा मार्ग आपला तारणहार आहे. संविधानाच्या गर्भातून भेटलेला अनमोल ठेवा जोपासत, स्वतः देशाचे मालक बनण्याचा राजमार्ग म्हणजे मताधिकार. या अधिकाराचा योग्य वापर झाला तर, लोकशाहीत समानता आणि समता बहरण्यास वेळ लागणार नाही. मताधिकार विकून लाचारी पत्करली जाते, तेव्हा विषमतेची दरी वाढायला सुरुवात होते. आपले हक्क,अधिकार मिळवायचे असतील तर, बाणेदारपणे कर्तव्य बजावता आले पाहिजे.

एका बोटावरच्या शाईची किंमत ज्याला कळली, तो लोकशाहीचा शिलेदार झाला आहे. त्याच्या बोटावरच्या शाईने भल्याभल्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याची धमक ठेवली. अभिमानाने बोटावर लागलेली शाई, लोकशाहीचे सोहळे सजवत असते. याच प्रतापाने कित्येक स्थित्यंतरे घडवून आणली. जागरूक मतदाराचे महान कार्य लोकशाहीची धुरा सांभाळत आहे. म्हणून मताधिकाराचा जागर घालण्याची गरज असून त्याचे सामर्थ्य वाढवले पाहिजे. बोटावरची शाई मिरवण्याची नसून सत्तापिपासू वृत्तीला ठेचून काढण्यासाठी आहे.

शपथ घेण्यापेक्षा बाणा बनला पाहिजे. मत विकण्याची लाचारी खूप झाली. लोकशाहीचे मारेकरी पिटाळून लावण्यासाठी धमक भरली पाहिजे. लोकशाही कोणत्याही व्यभिचाऱ्याच्या अत्याचाराने हंबरडा फोडणार नाही, यासाठी दक्ष बनून मताधिकार बजावला पाहिजे. मताची शक्ती लोकशाहीचा पाया बळकट करेल, तेव्हाच स्वातंत्र्यपताका फडकत राहील. गैराला वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होणार नाही. हाच लोकशाहीचा खरा सोहळा. सुरक्षित नागरिकत्वाची हमी देत, भेदाची विषमता नष्ट करून एकसंघ राष्ट्राची महत्ती वाढेल. मताच्या मुल्यातून राष्ट्राचे मूल्य वाढत जाते. याची जाणीव प्रत्येकाच्या हृदयात साठून राहावी.

Related posts

मनानेंच मागे हटवा मनातील विषय

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरील मराठी कादंबरी – विश्वास पाटील.

दैव अनुकूल झाले, तर….

Leave a Comment