August 14, 2022
Poem on Bapusaheb Dhakare Guruji by Shivraj Jamode
Home » मानवतेचे पुजारी बापू गुरूजी
काय चाललयं अवतीभवती

मानवतेचे पुजारी बापू गुरूजी

स्वातंत्र्य सैनिक कविवर्य लोकनेते गुरुवर्य स्व. बापूसाहेब ढाकरे यांची चार एप्रिल रोजी जयंती साजरी झाली. तसेच दानापूर येथे त्यांच्या नावे असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाचा वर्धापनदिन प्रा. प्रतिमा इंगोले यांच्या उपस्थितीत साजरा झाला. या निमित्ताने काव्यपुष्पांजली….

कवी शिवराज जामोदे

सातपुडा पायथ्याशी
गाव आहे दानापूर
बापू गुरूजींमुळे
नाव त्याचे दूरदूर !

चिमुकल्या पाखरांचा
लागला त्यांना लळा
वानतिरी फुलविला
ज्ञानाचा श्रीमंती मळा

अभंग कविता गाणी
नाचे त्यांच्या ओठांवरी
त्यांच्या विद्वत्तेला देत
मान सदा गावकरी

मलखांब व्यायामाने
कसले होते शरीर
गाव विकासासाठी
सदा असती अधीर

सातपुड्यातून वाहे
झुळझुळ नदी वान
नदी तिरावरी त्यांची
गढी उभी हो महान

संकटकाळी मदतीला
गुरूजी जात धावून
आठवण येते त्यांची
आज राहून राहून !

कर्मयोगी ते महान
विद्यार्थी घरी नि दारी
लोक म्हणती त्यांना
मानवतेचे हो पुजारी

स्थापिले गावी बोर्डिंग
उघडली नवी शाळा
निशुक्ल सेवा अर्पण
‘मा’स्तर असा वेगळा

विद्यार्थ्यांसाठी जीवन
दिले अन्न विनामूल्य
झाला सर्वांची माऊली
हिरा असा हा अमूल्य

संसार म्हणजे शाळा
विठ्ठल लेकुरवाळा
सारा गाव गुरूजींचा
नित्य चाले हो सोहळा

माणसामधला देव
बापूसाहेब ढाकरे
चंदनापरी झिजले
नाव संताचे श्याम रे

केले गुप्तपणे कार्य
भारत मुक्ती लढ्यात
भोगला तुरुंगवासही
तोही तरुण वयात

घरचे सोने केले दान
भारत चीन युद्ध वेळी
फिरले ते दारोदार
घेऊनी हातात झोळी

स्पृश्यास्पृश्यता त्यांनी
नाही कधीही मानली
दलितांकरिता त्यांनी
विहीर हो खुली केली

निर्मिले वाचनालय
आणली अमृतगंगा
ज्ञानार्थी घालती बघा
त्याच्या भोवताली पिंगा

बापू नामवंत कवी
‘श्यामवेल’ प्रकाशित
करूनी राजकारण
जपले राष्ट्रीय हीत

मराठी साहित्य प्रांती
नाव त्यांचे हो गाजले
रंजल्या गांजल्याचे
आईवडील हो जाहले

अखंड ज्ञानसाधना
घेतली गरुड भरारी
जीवन केले अर्पण
वाजे यशाची तुतारी

भव्य दिव्य सातपुडा
गुरूजींची गातो गाणी
जगावेगळे आहे हो
बाणगंगेचे रे पाणी

फुले आंबेडकरांचा
चालविला हो वारसा
करतो त्यांना वंदन
माणूस वागा सारखा!

कवी शिवराज जामोदे.

Related posts

निमशिरगाव येथे २८ व २९ मे रोजी साहित्य संमेलन

श्रीमद् ग्रंथराज दासबोध…. “अभ्यास” करण्यासाठीचा ग्रंथ….!

नव्या कृषी कायद्यावर कृषी तज्ज्ञांचे मत…

Leave a Comment