गावाच्या उभारणीचा, वाटचालीचा, सांस्कृतिक वारशाचा, प्रगतीचा ,जपणूकीचा इतिहास मांडणारा हा ग्रंथ पुढील पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे मला वाटते.
डॉ श्रीकांत पाटील
संभाजी चौगले लिखित गावकुसाची कहाणी हे माजगाव ता पन्हाळा या गावाची बाराव्या शतकापासून ते 1985 पर्यंतच्या इतिहासाच्या पाऊल खुणा शोधणारी कहाणी आहे. आपल्या जन्मभूमीचा सामाजिक, सांस्कृतिक ,आर्थिक आणि कलात्मक अंगाने लेखकाने थोरामोठ्यांच्या कडून ऐकून, स्वतः संशोधन करून मांडलेल्या माहितीचा धांडोळाच आहे. जवळपास वीस प्रकरणातून लेखकाने विविध घटकांच्या अनुषंगाने आपल्या गावाचा वस्तुनिष्ठ मागोवा घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे हे यातील लेख वाचत असताना दिसून येते.
बाराव्या शतकात कासारी खोरा हा अतिशय घनदाट झाडीने व्यापलेला होता. विविध प्रकारच्या झाडाझुडपांनी, रानगवतानी इथल्या परिसरात आपले साम्राज्य निर्माण केलेले होते. यातूनच छोटे-मोठे ओहोळ वाहत होते. अशा परिस्थितीत या खोऱ्यात झाड- झाडोरा तोडत कांही लोक या जंगलात आले. त्यांच्या अस्तित्वाने इथल्या वन्य प्राण्यांनी धूम ठोकली आणि हळूहळू तिथे माणसांचा वावर सुरू झाला. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस असे जवळपास पाच-सहा दिवसाचा प्रवास करून ही मंडळी टेकडी समोर आल्यानंतर त्यांनी जागा साफ केली आणि आपल्या झोपड्या वसवल्या.
मातीची भांडी तयार करण्यासाठी अस्सल मातीच्या शोधात आलेली ही कुंभार समाजाची माणसं होती. हळूहळू इथली वस्ती वाढत गेली. मातीचे दिवे, ठावण्या, मातीच्या चुली येथे तयार होऊ लागल्या आणि तयार झालेला माल आजूबाजूच्या गावामध्ये खपू लागला.
गावातील लोकांच्या आगमनाची वहिवाट एक, वहिवाट दोन, वहिवाट तीन लेखकाने विस्ताराने या पुस्तकात मांडलेली आहे. सोळाव्या शतकातील वाटचाल, गावामध्ये सापडलेले वीरगळ, त्यावरअसणाऱ्या सांकेतिक आकृत्या, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे गावातील आगमन, कुंभार कामातील भेंड्याच्या विटा आणि चोपणीची खापरी या प्रकरणातून 12 ते 16व्या शतकापर्यंतची गावाची वाटचाल लेखकाने नेमक्या भाषेत वस्तुनिष्ठपणे व तटस्थपणे मांडलेली आहे.
एक प्रकारे हा गावाचा इतिहासच आहे. हा इतिहास मांडत असताना लेखकाने एकूण कालखंडातील काही वास्तूंचा, व्यक्तींचा, संस्थांचा आणि घटना प्रसंगांचा उहापोह विविध प्रकरणांमधून या पुस्तकात केलेला आहे. त्यामध्ये गावातील तालीम खाना ,गावातील शाळा आणि गावातील ग्रुप ग्रामपंचायत या संस्थांचा इतिहास सांगितला आहे तसेच गावातील देवदेवतांचे आणि मंदिरांची माहिती तसेच त्या पाठीमागील अध्यात्मिक पार्श्वभूमी व लोकांची श्रद्धा याचीही महत्ता वर्णन केलेली आहे.
गावामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना हे प्रकरण वैशिष्ट्यपूर्ण आहे. अर्वाचीन कालखंडातील इतिहासाचे एक गावाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे पान आहे. तसेच गावावर आलेले संकट, लोकरंजनासाठी असणाऱ्या नाटका वेळी झालेला अपघात, गावातील म्हाई, दुष्काळ, गडाला पडलेला वेढा,सुईन, गावच्या वाटा आणि पोटवाटा ,गावात साजरे होणारे सण समारंभ, तसेच खेळ आणि करमणुकीची मांदियाळी व एक रुपयात जोतिबाचा रविवारचा खेटा ही प्रकरणे लेखकाने संवेदनशील भावनेतून तर काही मनोरंजक व रोमांचकारी पद्धतीने लिहिलेली आहेत.
गावकुसाची कहाणी हा गावची महती सांगणारा महत्त्वाचा दस्तच आहे.गावाच्या जन्मापासूनच्या घटनांची मालिका मांडणारा हा एक ललित ग्रंथ आहे.गावात वस्ती ठाकल्यापासून गावातील स्थिती- गतीचे चलचित्रण लेखकाने लालीत्यपूर्ण शैलीत तटस्थपणे आणि त्रयस्थपणे केलेले असल्याने याला ऐतिहासिक स्वरूप आलेले आहे.
देव जाधव तात्याजी, मुंबईवाला, कृषी उद्योगपती, नाथाजी कुंभार ही व्यक्तिमत्वे साकार करत असताना लेखकाने आपले कौशल्य पणाला लावलेले आहे. समाजामध्ये लोकांच्या जवळ असलेले कर्तृत्व, दातृत्व, सहकार्यवृत्ती, मनाचा मोठेपणा हा निश्चितपणे आजच्या समाजासमोर आदर्शाचा वास्तुपाठ निर्माण करणारे आहेत.
एक प्रकारे हा एक संशोधन ग्रंथच आहे. लेखकाने बाराव्या शतकापर्यंत मागे जाऊन आपल्या गावाचा सूक्ष्मदृष्टीने शोधच घेतलेला आहे ग्रंथाच्या शेवटी परिशिष्टामध्ये ते विविध गोष्टींचा इत्यंभूत तपशील देतात व आपल्या गावाची ओळख अधोरेखित करतात. गावाच्या उभारणीचा, वाटचालीचा, सांस्कृतिक वारशाचा, प्रगतीचा ,जपणूकीचा इतिहास मांडणारा हा ग्रंथ पुढील पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे मला वाटते. अतिशय चिकाटीने, जिद्दीने माहितीचे संकलन करून त्याचे सुसूत्रीकरण करून या ग्रंथाची निर्मिती केल्याबद्दल लेखक संभाजी चौगले यांचे मनःपूर्वक अभिनंदन. कवी म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या आणि कविता या टोपण नावाने काव्य लेखन करणाऱ्या संभाजी चौगुले यांनी अशा प्रकारे ललित लेख लिहून आपल्या गावाचा इतिहास नव्या पिढीसमोर आणून कवितेबरोबर आपण लेखही उत्तम लिहू शकतो हे सिद्ध केलेले आहे.
पुस्तकाचे नावः गावकुसाची कहाणी.
लेखकः संभाजी चौगले
प्रकाशकः हृदय प्रकाशन कोल्हापूर.
पृष्ठे-१९२
मूल्य-२३०रू