प्राण हाच आत्मा आहे. त्याचे अस्तित्व जाणायचे आहे. मी ब्रह्म आहे याचा बोध घ्यायचे आहे. ज्याला हा बोध झाला तो ब्रह्मज्ञानी होतो. त्याला अमरत्व प्राप्त होते. जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
जे वायूचा श्वासोश्वासु । जे गगनाचा अवकाशु ।
हें असो आघवाचि आभासु । आभासे जेणें ।। ९३३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – जें ब्रह्म वायूचा श्वासोच्छवास आहे व ज्या ब्रह्मरुपी पोकळीत आकाश राहीले आहे, हे राहू दे ! हा सर्व जगद्रूपी भास ज्याच्या योगाने भासतो.
श्वास म्हणजे प्राण. प्राण असणारा वायू प्राणवायू. ऑक्सिजन हा प्राणवायू आहे. श्वासोश्वास म्हणजे आत ओढला जाणारा आणि बाहेर टाकला जाणार वायू. हे दोन्हीही वायू वेगवेगळे आहेत. आत ऑक्सिजन घेतला जातो. बाहेर कार्बनडायऑक्साईड सोडला जातो. यासाठी हवेत जास्तीत जास्त ऑक्सिजन असायला हवा. असे नसेल तर आपण गुदमुरून मरून जाऊ. हवेतील ऑक्सिजन नाहीसा झाला, तर सर्व जीवसृष्टीच नष्ट होईल.
हा प्राणवायू ज्याच्यामध्ये सामावला आहे ते ब्रह्म आहे. या ब्रह्मामध्ये सर्व आकाश सामावलेले आहे. हा सर्व आभास आहे. पण हा आभासही त्याच्यामुळेच आहे. अनेकजण देवाचे अस्तित्व मानत नाहीत. ठीक आहे. पण जे घडते आहे. त्याच्यामागे कोणती शक्ती आहे. ती शक्ती तरी मान्य करावीच लागेल ना? या शक्तीसच आपण देवत्व मानत आहोत ना?
या प्राणासच तर देव मानत आहोत. सोहम म्हणजे काय? सो म्हणजे श्वास आत घेणे आणि हम म्हणजे श्वास बाहेर सोडणे. हा प्राणवायू आत घेणे आणि सोडणे. याच्यावरच तर साधनेत नियंत्रण ठेवायचे असते ना? सद्गुरू हाच तर मंत्र देतात. हेच तर शिकवतात. त्यांच्या मार्गदर्शनाने हे सर्व आत्मसात करायचे असते. अनुग्रह देताना हेच तर सांगितले जाते.
या साध्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. साधना मात्र आपण करायची असते. त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे हे आपल्याच हातात आहे. फक्त सद्गुरूंच्या कृपेने प्रगती होते. मनाची तयारी होते. मनाला धीर मिळतो. आधार वाटतो. त्यांच्या पाठीशी आधार मिळाल्यावर मनात भीती राहात नाही.
एक हटयोगी होता. त्याने श्वासावर नियंत्रण मिळविण्यासाठी साधना सुरू केली. गुरूंचे मार्गदर्शन न घेताच त्याचा हा प्रयत्न सुरू होता. तो श्वास कोंडून ठेवायचा. यातच त्याचा मृत्यू झाला. श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे ही नैसर्गिक क्रिया आहे. फक्त या क्रियेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मन यावर एकाग्र करायचे आहे. यात श्वास कोंडण्याचा, दाबायचा, जबरदस्ती करायची अशी कोणतीही क्रिया नाही. सहज सुरू असणारी क्रिया फक्त लक्षात घ्यायची आहे. सद्गुरूंच्या कृपेने हे शक्य होते.
प्राण हाच आत्मा आहे. त्याचे अस्तित्व जाणायचे आहे. मी ब्रह्म आहे याचा बोध घ्यायचे आहे. ज्याला हा बोध झाला तो ब्रह्मज्ञानी होतो. त्याला अमरत्व प्राप्त होते. जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.