चालू वर्षी अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने प्रामुख्याने तांबेरा आणि पानावरील तपकिरी ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या रोगावर नियंत्रण कसे मिळवायचे याबद्दलचा हा लेख…
रोगांची ओळख :
जुलै ते डिसेंबर दरम्यान असलेल्या आर्द्रतायुक्त, उष्ण व दमट हवामानामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नदीलगत, जास्त पर्जन्यमान व हवेमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असलेल्या कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील भागामध्ये ऊसाच्या पानावर विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. चालू वर्षी अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने प्रामुख्याने तांबेरा आणि पानावरील तपकिरी ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या पानावर आढळणाऱ्या बुरशीजन्य रोगांमुळे रोगाच्या तीव्रतेनुसार अंदाजे ५ ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते. या रोगांची लागण झाल्यामुळे पानाच्या पेशी, त्यामधील हरीतद्रव्य यांचा नाश झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत व्यत्यय येऊन अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे उसाचे उत्पादन घटते आणि साखर उतारा सुद्धा घटतो. अनुकूल वातावरण असल्यास नवीन उसाचा पोंगा व कोवळी पाने रोगाने प्रादुर्भावग्रस्त झालेली आढळून येतात आणि ऊस उत्पादन व उत्पादकतेवर परिणाम दिसून येतो.
१. तपकिरी ठिपके (ब्राऊन स्पॉट) :
पश्चिम महाराष्ट्रामधील जास्त पावसाचे प्रमाण असलेल्या भागामध्ये सॅरकोस्पोरा लॉन्जिपस नावाच्या बुरशीमुळे मान्सून हंगामामध्ये हमखास आढळणारा हा बुरशीजन्य रोग आहे. रोगाच्या नावाप्रमाणे सुरूवातीला उसाच्या जुन्या पानांच्या दोन्ही बाजूवर अंडाकृती आकाराचे लालसर ते तपकिरी रंगाचे ठिपके आढळून येतात. अशा ठिपक्याभोवती पिवळ्या रंगाचे वलय दिसते. ठिपक्याच्या मध्यभाग वाळून, सुकून करड्या रंगाचा ठिपका, सभोवती लाल कडा त्याला लागूनच पिवळे वलय असे एकमेकांत मिसळलेले असंख्य ठिपके निदर्शनास येतात. बळी पडणाऱ्या जाती, अनुकूल वातावरण असल्यास रोगाची तीव्रता वाढून सर्व पानावर याचा प्रादुर्भाव दिसून येतो. पानांवरील ठिपक्यांची संख्या वाढून शेजारील ठिपके एकमेकात मिसळून मोठे ठिपके तयार होतात. अशा ठिपक्यांमधील पेशी मरतात आणि प्रकाश संश्लेषण होत नाही. त्यामुळे ऊसाच्या उत्पादनावर आणि साखर उताऱ्यावर अनिष्ट परिणाम होतो. रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्यास उसाच्या कांड्याची लांबी व जाडी कमी होते.
२. तांबेरा :
उसाच्या पानावरच दिसून येणारा हा बुरशीजन्य रोग आहे. सुरूवातीस बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूस होऊन पानावर लहान, लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात. कालांतराने ठिपक्याची लांबी वाढून त्यांचा रंग लालसर तपकिरी होतो. ठिपक्याच्या भोवती फिक्कट पिवळसर हिरवी कडा तयार होऊन, पानाच्या खालच्या बाजूस ठिपक्याच्या जाग्यावर उंचवटे तयार होतात. असे ठिपके फुटून नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. तांबेराग्रस्त पाने हातावर चोळल्यास बिजाणूची पावडर पडते. हवेद्वारे या बिजाणूंचा प्रसार होऊन रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. पानांवरील ठिपक्यांची संख्या वाढून शेजारील ठिपके एकमेकांत मिसळून मोठे ठिपके तयार होतात. या रोगग्रस्त ठिपक्यातील पेशी मरून जाऊन पाने करपलेली दिसून येतात. प्रकाश संश्लेषण क्रियेत व्यत्यय आल्याने उसाचे उत्पादन घटते.
रोगांचा प्रसार :
उसाच्या पानावर पावसाच्या अथवा द्रव्याच्या स्वरूपातील असलेले पाणी प्रामुख्याने रोग वाढीसाठी महत्वाचे व अनुकूल घटक आहे. पानावर ओलसरपणा असतांना बिजाणू रुजून बुरशी तयार होते. ही बुरशी पानांच्या आंतरभागात प्रवेश करून रोग निर्मिती करते. पानामध्ये रोगनिर्मिती प्रक्रिया सुरू झाल्यापासून ३ ते ४ दिवसात पानावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रामुख्याने या रोगाचा दुय्यम प्रसार हवेमार्फत व पाण्यामार्फत होतो. तसेच या रोगाचा प्रसार बेण्यामार्फत अगदी कमी प्रमाणात होतो. काही ठिकाणी मान्सुनचा पाऊस संपल्यानंतर पानावर आढळणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होत गेलेला आढळून येतो.
रोगाचा प्राद्रुर्भाव वाढण्याची कारणे अशी –
महाराष्ट्रामध्ये या रोगांची लक्षणे प्रामुख्याने जुलै ते डिसेंबरपर्यंत दिसून येतात. या रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार वाढण्याची प्रमुख कारणे अशी –
- जुलै ते सप्टेंबरपर्यंत असणाऱ्या मान्सून पावसामुळे वाढणारी हवेतील सापेक्ष आर्द्रता साधारण ८० ते ९० टक्के.
- ढगाळ उष्ण व दमट वातावरण, वाहणारे वारे आणि सकाळचे धुके व पडणारे दव.
- बळी पडणाऱ्या रुंद पानाच्या जातीची मोठ्या प्रमाणावर लागवड.
- नत्रयुक्त खतांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर.
- ऊस पिकाच्या मुख्य वाढीचा काळ (३ ते ७ महिन्याचा ऊस) उशीरा एप्रिल ते मे महिन्या व योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत झालेली ऊस लागवड.
- खोडवा पिकात रोगाची तीव्रता लागणीच्या पिकापेक्षा जास्त दिसून येते.
- सखल भागातील पाणी साचणे.
असे मिळवा रोगावर नियंत्रण :
ऊस पिकाचे सर्वेक्षण करून, रोगांची लक्षणे, तीव्रता व पिकाची अवस्था पाहून उपाययोजना करावी.
- मान्सून हंगामामध्ये रोगाच्या प्रादुर्भावाबाबत ऊस पिकाचे सर्वेक्षण अथवा पाहणी करून प्रतिबंधक शिफारशीत बुरशीनाशक फवारणी करावी.
- तुटून गेलेल्या जमिनीत पुनर्लागवड करावयाची असल्यास पूर्वी तुटून गेलेल्या ऊसाचे अवशेष गोळा करून त्यांचा नायनाट करावा.
- ऊसातील रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावी.
- निरोगी बेणे मळ्यातील रोगमुक्त बेणे लागवडीसाठी वापरावे.
- रोगप्रतिकारक्षम जाती निवडून त्यांची लागवड करावी. ( को ८६०३२)
- योग्य निचरा होणाऱ्या जमिनीत ऊस लागवड करावी.
- लागवडीसाठी रुंद सरी किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब केल्यास ऊसामध्ये सुर्यप्रकाश व हवेचे प्रमाण वाढून रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
- नत्राची मात्रा शिफारशीनुसार द्यावी. जास्त वापर झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
- पावसाळ्यात जास्त काळ पाणी साचलेल्या ऊस भागातील पाण्याचा निचरा करावा.
- पानांवरील तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब अथवा कॉपर ऑक्सीक्लोराईड यापैकी एक बुरशीनाशक ०.३ टक्के (३ ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात घेऊन १५ दिवसांच्या अंतराने स्टिकरचा वापर करून २ ते ३ फवारण्या कराव्यात. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर नियंत्रणासाठी ३ ग्रॅम / लि. पाणी मॅन्कोझेब किंवा टेबुकोन्याझोल १ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने स्टिकरचा वापर करून २ ते ३ फवारण्या कराव्यात.
- सामुहिक पद्धतीने रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजनाचा अवलंबन करावे.
( सौजन्य – उपविभागीय कृषि अधिकारी, श्रीरामपूर, तालुका कृषि अधिकारी, राहुरी, मंडळ कृषि अधिकारी, राहुरी/ राहुरी फॅक्टरी / देवळाली प्रवरा / वांबोरी )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.