April 17, 2024
dehu-shila-mandir-narendra-modi-comment
Home » देहूचे शिळा मंदिर भक्तीच्या शक्तीचे केंद्र – नरेंद्र मोदी
काय चाललयं अवतीभवती

देहूचे शिळा मंदिर भक्तीच्या शक्तीचे केंद्र – नरेंद्र मोदी

17 व्या शतकातील संत, जगतगुरू तुकाराम यांच्या सन्मानार्थ पुण्याजवळ देहू येथे उभारण्यात आलेल्या शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी यावेळी संत तुकाराम यांची भक्ती करणाऱ्या आणि महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद देखील साधला.

विशिष्ट प्रकारच्या राजस्थानी दगडापासून बांधण्यात आलेले हे मंदिर, संत तुकाराम यांनी ज्या शिळेवर बसून 13 दिवस ध्यानधारणा केली त्या शिळेला समर्पित करण्यात आले आहे. पंढरपूरची वारी सुरु करण्यापूर्वी तुकाराम महाराजांचे भक्त असलेले वारकरी या शिळेचे दर्शन घेऊन प्रार्थना करतात.

या शिळा मंदिराच्या जवळच उभारण्यात आलेल्या संत तुकाराम यांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण देखील पंतप्रधानांनी केले. 17 व्या शतकात होऊन गेलेले भक्तिमार्गाचे उपासक कवी आणि संत तुकाराम त्यांच्या ‘अभंग’ या प्रकारच्या भक्तीभावाने भरलेल्या काव्यरचनांसाठी तसेच ‘कीर्तने’ म्हणून प्रसिध्द असलेल्या अध्यात्मिक रचनांसाठी सुप्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील वारकरी समुदायामध्ये त्यांच्या साहित्यकृतींनी मध्यवर्ती स्थान मिळविलेले आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले देहू हे या संतकवीचे जन्मस्थान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्याजवळ देहू येथे जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे उद्घाटन केले. संतांच्या भूमीत आल्यामुळे आपल्याला विशेष आऩंद होत असल्याचे त्यांनी सुरूवातीलाच सांगितले. संतांचा सत्संग मानवी जन्मातील दुर्मिळ विशेषाधिकार आहे, संतांची कृपा झाली तर साक्षात्कार होतो, आज देहूच्या या पवित्र तीर्थक्षेत्री आल्यावर मला हे जाणवत आहे, असे पंतप्रधानांनी धर्मग्रंथांचा संदर्भ देत सांगितले.

देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीच्या शक्तीचे केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्ग या मंदिरामुळे प्रशस्त झाला आहे असे ते म्हणाले. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे त्यांनी आभार मानले. काही महिन्यांपूर्वी पालखी मार्गांवर दोन राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणाच्या पायाभरणीचा बहुमान आपल्याला मिळाल्याचं त्यांनी सांगितले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाच टप्प्यात पूर्ण होणार असून संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन टप्प्यात पूर्ण होईल. यामध्ये 350 किलोमीटरहून अधिक लांबीचे महामार्ग बांधले जाणार आहेत. 11000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे टप्पे आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

जगातील सर्वात प्राचीन जिवंत संस्कृतींपैकी आपली संस्कृती ही एक आहे. याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते भारतातील संत परंपरा आणि ऋषीमुनींना आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारत ही संतांची भूमी असल्यामुळे भारत शाश्वत आहे, आपल्या देशाला आणि समाजाला दिशा देण्यासाठी कोणीतरी महान आत्मा अवतरत आहे. संत कबीरदास, संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि आदिशक्ती मुक्ताबाई यासारख्या संतांचे स्मरण त्यांनी केले. देश पुढे जात असताना संत तुकारामजींची दया, करुणा आणि सेवा त्यांच्या ‘अभंगा’च्या रूपात आजही आपल्यासोबत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

या ‘अभंगांनी’ पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग पावत नाही आणि शाश्वत काळाशी संबंधित असतो, तोच ‘अभंग’ असेही त्यांनी नमूद केले. आपल्या सांस्कृतिक मूल्यांशी सुसंगतपणे, संत तुकारामांचे अभंग आपल्याला ऊर्जा देत आहेत. ‘अभंग’ परंपरेतील महान संतांना आणि त्यांच्या गौरवशाली परंपरेला मंत्री महोदयांनी अभिवादन केले.

माणसामाणसांमध्ये भेदभाव करण्यास विरोध करण्याचा उपदेश करणाऱ्या तुकाराम महाराजांच्या शिकवणीचा पंतप्रधानांनी ठळक उल्लेख केला. ते म्हणाले की या शिकवणी अध्यात्मिक स्वरूपाच्या असल्यामुळे त्या देश तसेच समाजाप्रती सारख्याच प्रमाणात समर्पित आहेत. पंतप्रधान म्हणाले की हा संदेश वारकरी भक्तांच्या वार्षिक पंढरपूर यात्रेला अधोरेखित करतो. सर्वांची साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न या संकल्पनेची उर्जा अशाच महान परंपरांकडून मिळाली आहे. वारकऱ्यांच्या परंपरेत असलेली स्त्री पुरुष समानता तसेच अंत्योदयाची धारणा ही प्रेरक शक्ती असल्याचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला.

“दलित, वंचित, मागासलेले, आदिवासी, श्रमिक यांचे कल्याण करण्याला देशाने प्राधान्य दिले आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या जीवनात तुकाराम महाराजांसारख्या संतांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी संतांना श्रेय दिले. स्वातंत्र्य संग्रामात, जेव्हा वीर सावरकरांना शिक्षा झाली तेव्हा ते तुरुंगात हातातल्या बेड्या चिपळीसारख्या वाजवून तुकाराम महाराजांचे अभंग गात असत अशी आठवण पंतप्रधानांनी सांगितली. ते म्हणाले की, संत तुकाराम महाराजांनी वेगवेगळ्या काळात देशामध्ये चैतन्य आणि उर्जा जागविली. पंढरपूर, जगन्नाथ, मथुरेतील ब्रीज परिक्रमा किंवा काशी पंचकोसी परिक्रमा, चार धाम किंवा अमरनाथ यात्रा यांसारख्या अनेक धार्मिक यात्रांनी आपल्या देशाच्या विविधतेला एकत्र आणले आणि एक भारत, श्रेष्ठ भारत संकल्पनेचे चैतन्य निर्माण केले.

आपली राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी आपली प्राचीन ओळख तसेच परंपरा जिवंत ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. म्हणून, “आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा भारताच्या विकासाचा समान मार्ग होत असताना देशाचा विकास आणि वारसा या दोन्ही एकमेकांसोबत मार्गक्रमण करतील याची सुनिश्चिती आम्ही करत आहोत,” असे ते पुढे म्हणाले. त्यांचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पालखी यात्रेचे आधुनिकीकरण, चार धाम यात्रेसाठी बांधण्यात आलेले नवे महामार्ग, अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी, काशी विश्वनाथ धाम तीर्थक्षेत्राची पुनर्बांधणी आणि सोमनाथ येथे सुरु असलेले विकास कार्य यांची उदाहरणे दिली. प्रसाद योजनेअंतर्गत, तीर्थयात्रेची काही ठिकाणे विकसित करण्यात येत आहेत अशी माहिती देखील पंतप्रधानांनी दिली. रामायण मंडळ आणि बाबासाहेब आंबेडकर यांची पंच तीर्थे यांचा विकास करण्यात येत आहे असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की जर प्रत्येकाचे प्रयत्न योग्य दिशेने सुरु असतील तर सर्वात अशक्य समस्या देखील सोडविता येतील. आज, स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 व्या वर्षी, कल्याणकारी योजनांच्या संपृक्ततेच्या माध्यमातून देश 100 टक्के सक्षमीकरणाच्या दिशेने चालला आहे याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. या योजनांच्या माध्यमातून देशातील गरीब जनता मुलभूत सुविधांशी जोडली जात आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वच्छता राखावी असे आवाहन देखील त्यांनी केले. या राष्ट्रीय प्रतिज्ञांचा समावेश प्रत्येकाने स्वतःच्या अध्यात्मिक प्रेरणांमध्ये करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. नैसर्गिक शेती तसेच योगविद्येला लोकप्रिय करण्यासाठी आणि योग दिवस उत्साहाने साजरा करण्यासाठी त्यांनी उपस्थितांकडून अधिक जोरकस प्रयत्नांची मागणी देखील केली.

संत तुकाराम महाराज वारकरी संत आणि कवी होते, त्यांच्या ‘अभंग’ या प्रकारच्या भक्तीभावाने भरलेल्या काव्यरचनांसाठी तसेच ‘कीर्तने’ म्हणून प्रसिध्द असलेल्या अध्यात्मिक रचनांच्या माध्यमातून समुदायाधारित प्रार्थनेसाठी सुप्रसिद्ध आहेत. ते देहू येथे रहात होते. त्यांच्या निधनानंतर शिळा मंदिर बांधण्यात आले, पण त्याची उभारणी एखाद्या मंदिरासारखी नव्हती. दगडी बांधकाम करणाऱ्या कामगारांकडून या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. 36 कळस असलेल्या या मंदिरात संत तुकाराम महाराजांचा पुतळा देखील बसविण्यात आला आहे.

Related posts

लाळ्या खुरकूत नियंत्रणासाठी…

‘ध’ चा ‘मा’ पलीकडे अज्ञात राहिलेली आनंदीबाईं

संस्काराच्या कमाईवरच यशाची कमाई…

Leave a Comment