हिरवळीचे खत : ताग आणि धेंचा
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
चांगले उत्पादन घेताना जमिनीचे आरोग्य अबाधित राखणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच भविष्यात आपली जमीन शाश्वत उत्पादन देत राहील. जमिनीला सेंद्रीय खत देताना ताग किंवा धेंचा या खताच्या पिकांचा उपयोग दर २ ते ३ वर्षातून एकदा करायला हवा.
ताग किंवा धेंचा ही पिके वाढत असताना हवेतील नत्र भरपूर प्रमाणात जमा करतात. जेव्हा या पिकाला जमिनीत गाडतो तेव्हा पुढील पिकाला नत्र उपलब्ध होत असते.
या खत पिकांचा उपयोग कसा करावा?
पहिल्या पावसात ताग किंवा धेंच्या बियांची हाताने सारख्या प्रमाणात फोकुन पेरणी करावी. फळपिके असतील तर दोन ओळींच्या मध्ये जेथे सूर्यप्रकाश पोहचतो तेथे या पिकांची पेरणी करावी.
पेरणीसाठी एकरी प्रमाण:
ताग – 20 किलो प्रति एकर
धेंचा – 10 किलो बियाणे प्रती एकर
काढणी केव्हा करावी?
पिकाला जेव्हा फुले यायला सुरुवात होते तेव्हा ताग/धेंच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीत गाडून टाकावा. या स्थितीत झाडे कोवळी असतात त्यामुळे जमिनीत असलेल्या सूक्ष्म जीवांच्या मदतीने याचे चांगले विघटन होते व जमीन सुपीक व्हायला मदत होते.
फायदे:
१) जमीन सुपीक होऊन जलधारणा क्षमता वाढते.
२) पिकाला नत्र उपलब्ध होते त्यामुळे रासायनिक खतांची बचत होते.
३) जमिनीत उपयुक्त सूक्ष्म जीव जिवाणूची संख्या वाढण्यास मदत होते.
४) जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यास मदत होते.
टीप:
शेतात पाणी साचत असेल अशा शेतात धेंच्या तर जेथे पाणी साचत नसेल तेथे ताग पेरावा.