भारतीय भाषांमध्ये परस्पर अनुवाद-व्यवहार होत राहणे अत्यंत गरजेचे आहे. हे स्पर्धात्मकता म्हणून नव्हे, तर भाषासमृद्धीसाठी आवश्यक आहे. विविध भाषांमध्ये तुलनात्मक अभ्यास व्हावेत, अनुवाद संशोधन प्रकल्प हाती घेतले जावेत, जेणेकरून संस्कृतीवर्धनाला बळ मिळेल.
डॉ. माया पंडित
आपल्या बीजभाषणामध्ये डॉ. माया पंडित यांनी अनुवाद या साहित्य प्रकाराला आणि अनुवादकांना साहित्यविश्वात मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, साहित्यविश्वाने अनुवाद आणि अनुवादक यांची कायम उपेक्षा केली आहे. अनुवादांची समीक्षाही केली जात नाही, इतके दुय्यमत्व त्याला दिले जाते. अनुवादाचे सांस्कृतिक व्यवहारात स्थान काय, असा प्रश्न उप्सथित केला जातो. अनुवादक फक्त भाषांतर करतो, असे म्हणत त्यांना लेखकाचा दर्जाही नाकारला जातो, हे क्लेशकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
अनुवाद ही सृजनात्मक प्रक्रिया असल्याचे सांगून डॉ. माया पंडित म्हणाल्या, अनुवादाचे काम हे वाटते तितके सहजसोपे नसते. ते केवळ शाब्दिक भाषांतर नाही, तर मूळ साहित्यकृतीची साहित्यिक-सांस्कृतिक प्रतिकृती निर्माण करण्याचे कार्य आहे. शब्दांना नवे अर्थ, नवे आयाम प्रदान केले जातात. आपल्या भावविश्वाच्या आणि अनुभवविश्वाच्या कक्षा ओलांडून मूळ साहित्यात अनुस्यूत संस्कृतीची पुनर्उभारणी, पुनर्निर्मिती करावी लागते. कित्येकदा त्यासाठी अनुवादकाला संपूर्णपणे नवा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. मूळ संहितेचा केवळ वाचकच नव्हे, तर त्याचा अभ्यासक व्हावे लागते. मूळ लेखकाच्या पर्यावरणाचा अभ्यास करून त्याचा परिचय करून घ्यावा लागतो. अनुवादाचे म्हणून एक राजकारण असते, तेही अनुवादकाला लक्षात घ्यावे लागते. ज्वलंत विषयाच्या झळाही सोसण्याची तयारी कित्येकदा ठेवावी लागते. मूळ लेखनाइतकीच ही गुंतागुंतीची आणि सृजनाचा कस पाहणारी ही प्रक्रिया आहे.
अनुवादामुळे साहित्यव्यवहार प्रवाही राहात असल्याचे सांगून डॉ. पंडित म्हणाल्या, नवसाहित्य, नवसंस्कृती आणि नवप्रवाहांचा परिचय करवून घेण्यासाठी अनुवाद प्रक्रिया मोलाची भूमिका बजावते. त्यामुळे जागतिक स्तरावर भाषाव्यवहार वाढला पाहिजेच, पण भारतीय भाषांमध्ये परस्पर अनुवाद-व्यवहार होत राहणे अत्यंत गरजेचे आहे. हे स्पर्धात्मकता म्हणून नव्हे, तर भाषासमृद्धीसाठी आवश्यक आहे. विविध भाषांमध्ये तुलनात्मक अभ्यास व्हावेत, अनुवाद संशोधन प्रकल्प हाती घेतले जावेत, जेणेकरून संस्कृतीवर्धनाला बळ मिळेल. प्रस्थापित साहित्याच्या पलिकडे दलित, परीघावरील आणि परीघाबाहेरीलही साहित्य व्यापक प्रमाणात आहे. त्या साहित्याकडे अनुवादकांनी लक्ष पुरवावे. त्यातून समाजजागृतीबरोबरच समता प्रस्थापनेसाठी आवश्यक विश्वबंधुत्वभाव निर्माण होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.