अवलोकन आणि व्यक्तिविशेष हे दोन्ही ग्रंथ हा महत्त्वाचा दस्तावेज: डॉ श्रीपाल सबनीस
सर्वसमावेशक मानवतेचा पुरस्कार, बहुसांस्कृतिकता, बहुआयामी जीवनदृष्टी, भाषा व संस्कृती तसेच व्यक्तिंचे नेमके विशेष टिपणारी चिकित्सक, समग्र अशी जाणीव, भाषा, संस्कृतीचे विशेषतः मराठीच्या संदर्भात अध:पतन रोखणे, मराठी ज्ञानभाषा होणे यांची कळकळ अशा अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध असे चिंतन व लेखन असणारे ‘ अवलोकन ‘ आणि ‘व्यक्तिविशेष’
हे डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे दोन्ही ग्रंथ हा महत्त्वाचा दस्तावेज आहे, अशा अर्थाचे प्रतिपादन डॉ श्रीपाल सबनीस यांनी या दोन्ही ग्रंथांच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
अनुबंध प्रकाशनच्या वतीने भारतीय विचार साधना सभागृहात या ग्रंथांच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ कवी संतोष शेणई म्हणाले की, श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे लेखन हे नेहमीच चिंतन घेऊन येत असते, अवलोकन मधील त्यांचे लेखन देखील असेच भाषा, साहित्य, संस्कृती संदर्भातील विषयांच्या निमित्ताने ऐतिहासिक मूल्य असलेले चिंतन आहे.सांस्कृतिक मूल्यऱ्हासाकडे लक्ष वेधत,भाषिक राजकीयता व भाषेसंबंधातील विविध आयाम ते उलगडून दाखवते.तसेच भाषिक तत्वज्ञानाची उभारणी करते,भाषिक संघर्षाचे स्वरूप विशद करते, संबंधित समस्येतून मार्ग काढणारे ते चिंतन आहे.
‘ व्यक्तिविशेष’ या दुसऱ्या पुस्तकावर बोलताना ज्येष्ठ कवयित्री व समीक्षक डॉ अश्विनी धोंगडे म्हणाल्या की जागतिक, स्थानिक तसेच विविध क्षेत्रातील, संपर्कातील भावलेल्या महत्वपूर्ण व्यक्तिंची नेमक्या शब्दात,नेमकी स्वभावचित्रे असणारे हे लेखन मानवतावादी, पुरोगामी जाणीवांचे समान सूत्र घेत वावरते.ना. घ. देशपांडे यांच्यावरील लेखनाने तर ना. घंच्या कवितेच्या आकलनाला नवीच दिशा दिली आहे,तर फारसे ज्ञात नसलेले सुरेश भट इथे उलगडतात,माणूस वाचन म्हणजे काय ते या लेखनातून दिसते.या लेखकाला मानवी मूल्यांचे अवमूल्यन करणाऱ्यांबद्दल असणारी चीड इथे दिसते, पोथीनिष्ठेचा विरोध दिसतो, तटस्थपणे, वस्तुनिष्ठता बाळगत काढली गेलेली ही व्यक्तिचित्रे मराठीत वेगळी आहेत.
लेखक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी बुद्धिवंतांच्या, व्यवस्थेतील प्रभावी हस्तक्षेपाची गरज मांडली. प्रास्ताविक प्रकाशक अनिल कुलकर्णी यांनी केले. प्रकाशकांच्या व्यथा मांडताना त्यांच्यातील अनिष्ट व्यवहारांवर त्यांनी प्रहारही केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वाती यादव यांनी केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.