July 27, 2024
El nino comments and fear of drought article by Manikrao Khule
Home »    ओरड एल-निनोची, अन् भिती दुष्काळाची ?
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

   ओरड एल-निनोची, अन् भिती दुष्काळाची ?

येत्या पावसाळी हंगामावर भारतात एल निनोच्या अस्तित्वाचे सावट घोगावणार, पर्यायाने देशात दुष्काळाचे परिणाम भोगावे लागणार कि काय? अशी शंका येऊ लागलीय. तशी परिस्थिती येऊ शकते कि काय? अश्या बातम्या सध्या झळकू लागल्यात. म्हणजेच बातमी खरी की खोटी ? हे माहिती नाही. पण ह्या बातमीने भितीचे भुत शेतकरी, जनता, शासनकर्ते आदींच्या मनी आत्ताच नाचू लागली. त्याने होवु नये इतका नकारात्मक परिणाम मार्केटमध्ये होवु शकतो, ह्याची प्रसार माध्यमांना जाणीव व गंभीरता आहे काय ? माहीत नाही. पण हे मात्र खरे कि एल-निनोमुळे जगाच्या वातावरणावर जरी नकारात्मक परिणाम होत असला तरी जबरदस्त वाईट परिणाम फक्त भारत देशाच्या पावसाळ्यावर सर्वात अधिक होतो. मग एल निनोची कोठून आली बातमी? बातमीत तथ्य किती?

माणिकराव खुळे,
जेष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे.
संपर्क – ९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२

 अमेरिकन वेदर एजन्सीज ‘ नोआ (NOAA-नॅशनल ओसॅनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन)’ ने ह्या संबंधी एकदा नव्हे तर दोनदा काही महिन्यांच्या अंतराने ह्या वर्षी एन्सो (ENSO- El-Nino South Oscillations) म्हणजेच एल-निनोचे पॅसिफिक समुद्रात पूर्व व मध्य विषूववृत्त दरम्यान एल-निनो चे अस्तित्व व सक्रियता असण्याची शक्यता खुप अधिक आहे, असे मत व्यक्त केले आहे.

‘ला-निना ‘ तर मग नाही !

ठिक आहे, हा झाला एक भाग कि सुरवातीच्या प्राथमिक निरीक्षणाच्या आधारे त्या एजन्सीने आपले मत व्यक्त केले असावे, असे वाटते. पण मग एल-निनोचे अस्तित्व आहे पण तो तटस्थेत जाऊ शकतो काय ? हा दुसरा भाग त्यात सहजरित्या येतो. तर मग त्याचे काय ? तर त्यांचे म्हणणे असे आहे कि एल- निनोची शक्यताच इतकी अधिक आहे कि एल-निनो तटस्थ असण्याची शक्यता फारच कमी जाणवते. ‘ला-निना ‘ तर मग नाहीच नाही, असा त्याचा अर्थ निघतो.

एल-निनो किती वर्षांनी येतो ?

प्रत्येक ३ ते ६ वर्षांनी डोकावणारा व भारतीय पावसाळ्याला दणका देणारा एल-निनो मागील शेवटचा २०१८ साली हजेरी लावून त्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस देऊन गेलेला आपण अनुभवला आहे. दर ३ ते ६ वर्षांनी डोकावणारा म्हटल्यावर आपल्या देशात तो २००४, २००९, २०१४ व २०१८ म्हणजेच ५, ५, ४ वर्षाच्या अंतराने तो अवतरला गेलेला आहे. आणि ह्या वर्षी जर तो अवतारला तर त्याच ५ वर्षाच्या अंतराने आला असाच त्याचा अर्थ होईल.

एल-निनोच्या सकारात्मकतेमुळे जर कदाचित ह्या वर्षी २०२३ चा जूनपासुन भारतीय उपखंडात सुरु होणाऱ्या  मोसमी पावसावर उशिरात म्हणजे  ४ महिन्याच्या हंगामाच्या उत्तर्धात तो नकारात्मक परिणाम घडवून आणण्याची शक्यता नकळत वर्तवली जात आहे. म्हणजेच आपल्या देशात येणाऱ्या २०२३ च्या जून ते सप्टेंबर ह्या पावसाळी हंगामाच्या कालावधीत १५ जुलै किंवा १ ऑगस्ट २०२३ नंतर पावसाला ओढ बसण्याची  दुष्काळाचे सावट, पाणी टंचाई, नापिक शेती अशी परिस्थिती निर्माण होवु शकते. असाच त्यातून कळत-नकळत स्पष्ट  शब्दात अर्थ प्रतीत होतो.

वैज्ञानिक संशोधनाला आव्हान

खरं तर ही बातमी सखोल अश्या पुर्ण निष्कर्षांवर आधारित आहे काय ? अशी शंका घेण्यास मात्र निश्चितपणे वाव मिळतो आहे, असे वाटते. विज्ञान व संशोधनाच्या आधारे २०२३ च्या जून नंतरच्या नियोजनासाठी वैज्ञानिक संस्थानकडून अचूक आगाऊ बातमी मिळणे हे जरी वैज्ञानिक संशोधनाला आव्हान असले तरी हीच विज्ञानाची व संशोधनाची खरी कसोटी होय.

पण भारतीय हवामान तज्ज्ञांना हे माहिती आहे की नको ती गोष्ट वेळे आधी सनसनाटीसाठी ही बातमी परदेशीं संस्थानकडून प्रसूत होणे म्हणजेच बातमीत नक्कीच काहीतरी फोलपणा अर्धवटपणाच असावा,असाच भ्रमित अर्थाचा आकलनीय आवाज घुमतो असे वाटते. तरी देखील  ५० टक्के एल-निनोची शक्यता आज जरी ते वर्तवत असले तरी ह्या महिन्याच्या अखेरीस अधिक प्रकाश कदाचित ह्या विषयावर खात्याकडून टाकला जाऊ शकतो, असे वाटते.

वर्षातील पुर्ण व अंतिम पावसाळी हंगामाचा अंदाज व्यक्त करण्याच्या निष्कर्षाप्रत येण्यासाठी हवामान तज्ञ ह्यांना जागतिक पातळीवरील विविध ठिकाणांचा व विविध प्रकारच्या हवामान घटकांचे निरीक्षणे व त्यांच्या माहितीच्या आकड्यांची माहिती हातात असणे गरजेचे असते.

म्हणून तर भारतीय हवामान विभाग प्रत्येक वर्षी मागील वर्षाच्या ऑक्टोबर पासुन ते त्यापुढील वर्षातील एप्रिल महिन्यापर्यंत अश्या ७ महिन्याच्या कालावधीत जागतिक पातळीवर विविध हवामान घटकांचे निरीक्षण करून माहिती संकलित करत असतो. त्याआधारे त्यावर्षी येणाऱ्या प्रत्येक पावसाळ्याचा पहिला अंदाज एप्रिलच्या मध्यावर तर दुसरा ४५ दिवसानंतर म्हणजे मे अखेर तर तर तिसरा अंदाज ६० दिवसानंतर म्हणजे जुलैअखेर प्रत्येक अंदाज सुधारितपणे वर्तवत असतो. अश्या प्रत्येक अल्प अवधीतील हवामान घटकांच्या निरीक्षणातूनही टप्प्यानुसार सुधारित अंदाज व्यक्त करत असतांना झालेले बदलही हवामान तज्ञ ह्यांच्या लक्षात आलेले आहेत. म्हणूनच पुर्ण निरीक्षणे झाल्याशिवाय भारतीय हवामान विभागाकडून भाष्य केले जात नाही.
     
दुसऱ्या व तिसऱ्या ह्या शेवटच्या केवळ ४५ व ६० दिवसाच्या लघुअवधीतील निरीक्षनेही तितकेच महत्वाचे वाटतात म्हणून तर १५ एप्रिल नंतर ३१ मे पर्यन्त ४५ दिवसांचा व ३१ मे नंतर ३१ जुलै पर्यन्त  ६० दिवसांचा कालावधी ठरवला गेला आहे. व अजुन तर पहिला अंदाज व्यक्त करण्यासच  आज मितीपर्यंत ६० दिवसांचे निरीक्षणे बाकी आहेत. त्यानंतरची ४५+६० असे १०५ दिवसांचे निरीक्षणे बाकी आहेत.  सुधारित अंदाजातील बदलही म्हणजे असे विशेष काय घडते की ज्यावर प्रत्येक अंदाज सुधारितपणे  वर्तवण्यास मदत होते?

१५ एप्रिल व ३१ मे २०२३ मधील  सुधारित अंदाजातील बदलही अश्या कोणत्या जागतिक वातावरणीय घडामोडी किंवा निरीक्षणावर अवलंबून असतात की ज्यावर प्रत्येक अंदाज सुधारितपणे  वर्तवण्यास मदत होते. ती निरीक्षणे अशी –

ह्यासाठी २०२३ मॉन्सूनचा अंदाज व्यक्त करावयाचा आहे, असे समजून उदाहरण दाखल घेतला आहे.

           १. नोंर्वे फिनलॅंड पासून ते फ्रांस स्पेन पर्यंतच्या यूरोप खंडातील देशातील जानेवारी २०२३ महिन्यातील जमिनीवरील विसंगत तापमानाची नोंद.
          २. विषुववृत्तावरील पॅसिफिक समुद्राच्या पृष्ठभागावरील गरम पाण्याची वाढलेल्या पातळीची फेब्रुवारी व मार्च २०२३ ह्या दोन महिन्यातील घडलेल्या विसंगतीची नोंद.  
          ३. डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३ महिन्यात  डेन्मार्क देशाच्या पश्चिम किनारपट्टीजवळील वायव्य अटलांटिक महासागराच्या  तसेच कॅनडा देशाच्या वायव्य पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील समुद्री पाण्याच्या तापमानात वेगाने घडून येणाऱ्या  बदलाची नोंद (टेम्परेचर ग्रॅडिएन्ट)
          ४. फेब्रुवारी २०२३ महिन्यातील इंडोनेशियाच्या पश्चिम किनारपट्टीकडील विषुववृत्तीय आग्नेय भारतीय महासागरीय पृष्ठभागीय समुद्री पाण्याच्या तापमानाची नोंद 
         ५. इंडोनेशिया सिंगापूर पासून ते व्हीएतनाम म्यानमार पर्यंतच्या पूर्व एशियन देशांच्या फेब्रुवारी व मार्च २०२३ मधील ह्या दोन महिन्यातील जमिनीवरील हवेच्या दाबाची नोंद 
         ६. मार्च, एप्रिल, मे २०२३ तसेच  डिसेंबर२०२२, जानेवारी,फेब्रुवारी २०२३ ते मार्च, एप्रिल, मे २०२३ पर्यंतचे निनो ३.४ च्या समुद्राच्या पृष्ठभागीय पाण्याच्या तापमानाच्या दोन्हीही नोंदीच्या वृत्ती
(टेंडनसीज) 
         ७. अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टी समोरील उत्तर अटलांटिकवरील मे २०२३ महिन्यातील समुद्रसपाटीचा हवेचा दाबाच्या नोंदी  
        ८. रशिया चीन ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीपासून ते उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंतच्या उत्तर  मध्य पॅसिफिक भागावरील समुद्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीवरील मे २०२३ मधील वाऱ्यांची स्थिति(पॅटर्न)च्या नोंदी
          तर प्रत्येक अश्या काही दिवसांच्या मध्यंतरानंतर भारतीय मान्सूनवर परिणाम करणारे जागतिक पातळीवरील घटकांचे निरीक्षणांच्या मदतीने झालेले हवामानातील बदल अंतर्भुत करण्यास ह्या थोड्या अवधितही वाव मिळतो व प्रत्येक अंदाज सुधारित होवून अचूकतेकडे नेला जातो. एन्सो(ENSO)संबंधीचे विशेष बदल उन्हाळ्यातच अधिक जाणवतात त्यामुळे एप्रिल मे मधील निरीक्षणे अधिक महत्वाची असतात.

         एल -निनो हा फॅक्टर भारत देशाबरोबर इतर आशियाई देशावरील पावसाळी हंगामावर परिणाम करत असतो. परंतु भारत देशाच्या पावसाळी हंगामावर एल – -निनो बरोबरच सर्वात महत्वाचा ‘नोआ ‘ ने अचर्चित ठेवलेला ‘ भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता ‘ म्हणजेच ‘ इंडियन ओशन डायपोल ‘  कि जो त्यावेळच्या अरबी व बंगाल उपसागरातील  पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानातील फरकावर ‘धन’ किंवा ‘ऋण’, किंवा ‘तटस्थ’ अवस्थेत आहे त्यावरून भारत देशाच्या पावसाळी हंगामावर त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम करणार आहे, हे ठरवले जाते.  म्हणूनच ‘ भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता ‘ म्हणजेच ‘ इंडियन ओशन डायपोल ‘ ला केवळ भारताचाच ‘ एल – निनो ‘ समजतात. त्याची म्हणजे ‘आयओडी ‘ ची धन अवस्था कधी कधी पावसाळी हंगामावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या मूळ एल – निनोच्या प्रभावाला मारक ठरतो. व त्या वर्षी एल-निनो असुनही देशात चांगला पाऊस पडतो. तो मुद्दाही येथे गौणच ठेवलेला जाणवतो, त्याचा उहापोह झालेला दिसत नाही म्हणून एल-निनोचा देशाच्या पावसावर विपरीत परिणाम होईल हा आज काढलेला निष्कर्ष निराधार आहे, असे वाटते.

आणि म्हणूनच एक गोष्ट येथे मुद्दाम नमूद करावीशी वाटते कि जागतिक हवामान संघटनेसहित संपूर्ण जगात भारतीय हवामान शास्रज्ञ व भारतीय हवामान विभागाचा ‘वर्षानुवर्षे आतापर्यंत कायम परंपरागत दबदबा ठेवणाऱ्या  इंडियन समर मान्सून ‘च्या  ४ महिन्याच्या पावसाळी हंगामाच्या अंदाजाकडे जगातील इतर हवामानशास्रज्ञ व तज्ञ यांचे लक्ष असते.

भारतीय शास्त्रज्ञांचा दबदबा

आता जगात भारतीय शास्रज्ञ यांचा का दबदबा झालाय हे ही जाता जाता बघणे गरजेचे आहे.
भारतीय हवामान शास्रज्ञ, हवामान विभाग व त्यांची उत्कृष्ट कामगिरी ह्यासारख्या जगात झळकणाऱ्या गोष्टी सर्वांचे श्रेय इतर विभागासारखेच ह्या देशात पुढील गोष्टीवर अवलंबून आहे. भारतीय विद्यार्थ्यांना संशोधनांसाठी सरकारकडून स्वातंत्र्यानंतर उपलब्ध करून प्रोत्साहित करणाऱ्या देशातील उच्चं दर्जाच्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्था, त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर, करत असलेले अर्थसाहाय्य ह्यामुळे तेथे होत असलेले संशोधन, भारत सरकारची आतापर्यंत चालत आलेली शैक्षणिक धोरण व नीती,  देशातील आदर्शवत शिक्षणप्रणाली, तसेच देशात गुरुकुलासारखे चालत आलेले शिक्षण संस्कार व ह्या भुमातेच्या उदरातुन बाहेर पडणारी बुद्धिमानण्यांची फौज ह्या सर्व गोष्टीतच हे सर्व दडलेले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या प्रसारित झालेल्या त्या त्या वर्षाच्या मोसमी पावसाच्या अंदाजानंतर ह्या विषयावर जागतिक हवामान संघटनेत विचारांची खळबळ चालु होते. तोपर्यंत म्हणजे एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया भारतीय हवामान विभागात स्वतंत्र सेलद्वारे गुप्तपणे राबवली जाते. तेंव्हा भारतीय हवामान खाते तोपर्यन्त कितीही मोठं-मोठ्या परदेशीं संघटनांच्या नावाचा उल्लेख करून उलट-सुलट बातम्या आल्या तरी त्यावर आपली प्रतिक्रिया देत नाही. पत्रकारांनी कितीही खोचकपणे विचारु द्या, तरी गुप्ततेचा भंग होईल अशी कोणतीही माहिती विभागाकडून माहिती प्रसारमाध्यमापुढे स्पष्टपणे उघड केली जातांना दिसत नाही. हा विभागाच्या धोरणाचा एक भाग समजावा.

अजुन दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक

थोडक्यात देशात ह्यावर्षी दुष्काळ किंवा टंचाईसदृश्य स्थिती असेल अशी माहिती पुढे येण्यास किंवा शिक्कामोर्तब होण्यास अजुन जागतिक हवामान निरीक्षणाचा अजुन २ महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. एल -निनो चे अस्तित्वमुळे भले पावसाचे प्रमाण काहीसे कमी असेल पण म्हणजे देशात दुष्काळच पडेल किंवा सरासरी पेक्षा कमीच पाऊस पडेलच असेही नाही.  शिवाय अजुन ‘आयओडी’ चे काय? तेंव्हा ‘ देलही तो अभी बहुत दूर है ‘ ह्या बोली म्हणी प्रमाणे आत्ताच आपण ह्या बातमीने विचलित होण्याची गरज नाही, असे वाटते. पण त्यामुळे येणारा उन्हाळा मात्र कडक असु शकतो, असेही वाटते.

तसेच काही असेल तर तोपर्यंत सरकारला नियोजनासाठी विभागाकडून गोपनीयपणे कदाचित सूचना केल्याही जाऊ शकतात. संशोधनाची धोरणे देशहितासाठीच राबवली जातात. विभाग अश्या सनसनाटी बातमीवर अनभिज्ञआहे असे समजू नये. त्यासाठी सामान्य नागरिकांने सध्या घाबरून जाण्याचे काही कारण नाही, असे वाटते. खरं तर आज मितिला निरीक्षणाचा कालावधी अजुन पुर्ण व्हावयचा आहे. त्यासाठी अजुन दोन महिने बाकी आहेत. अंतिम निष्कर्ष गोपनीय आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मी नि ती

झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख

पित्त देहात व्यापू नये यासाठी…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading