May 22, 2024
Rajendra Ghorpade article on Fortune favors
विश्वाचे आर्त

दैव अनुकूल झाले, तर….

मीपणाचा गर्व नाही. हा अहंकार आता नाही. कारण आता मला समजले आहे, हे मी जरी लिहीले असले तरी मी या ठिकाणी निमित्तमात्र आहे. प्रत्यक्ष हे विचार उमटवणारा दुसरा आहे. मनात येणारे विचारही त्याच्यामुळेच प्रकट होत आहेत. त्याला आता मला पकडायचे आहे. मी कोण आहे याची अनुभूती तो देतो. तो सोहमची अनुभूती देतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

होय अदृष्ट आपैतें । तैं वाळुची रत्ने परते ।
उजू आयुष्य तै मारितें । लोभु करी ।। २२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा

ओवीचा अर्थ – दैव जर अनुकूल झाले, तर वाळूची रत्ने होतात, अथवा जर आयुष्य अनुकूल असेल, तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो.

दैव जर अनुकूल झाले, तर वाळूची रत्ने होतात. अथवा जर आयुष्य अनुकूल असेल, तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो इतके सामर्थ या दैवात आहे; पण दैवाचा हा खेळ कोणाला कळला ? आत्मज्ञानाने दैवाचा खेळ समजतो; पण आयुष्यात घडणार आहे, ते कोणी टाळू शकत नाही. नशिबात एखादी घटना घडणार असेल, तर ती घडतेच. दैवात जे लिहून ठेवले आहे तेच घडते. विधिलिखित कोणालाही टाळता आले नाही आणि कोणालाही बदलता आले नाही. भविष्य समजले म्हणून त्यात बदल करतो म्हटले तर ते बदलता येत नाही. घडायचे तेच घडणार.

अनेक नवे शोध लागले. नवनव्या तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली, पण त्सुनामीसारखी एखादी लाट क्षणात सारे उद्ध्वस्त करते. हा दैवाचा भाग आहे. दैवाची कृपा झाली, तर नराचा नारायण होतो. जीर्णावस्थेत काबाडकष्ट करणारा महान राजाही होऊ शकतो. यासाठी दैवाची कृपा व्हायला हवी. मरा मरा म्हणून जप करणारा, वाल्ह्याचा महान वाल्मीकी ऋषी झाला. कारण मरा मरा म्हणता तो केंव्हा राम राम म्हणू लागला हे त्यालाच कळले नाही. अन् त्याच्यावर कृपा झाली. कृपा कशी होईल, हे सांगता येत नाही.

चोवीस तास जप करणाऱ्या व्यक्तीलाही कधी काहीच भेटत नाही, असेही घडते. नुसती जपायची माळ ओढून चालत नाही. तो भाव मनात प्रकट व्हायला लागतो. यासाठी सद्गुरूंची कृपा व्हायला हवी. मग माळा जपायची गरज भासत नाही. आपोआप साधना होते नाही, तर ती करवून घेतली जाते. दैवाच्या कृपेनेच हे विचार मनात प्रकटतात. दैवाच्या कृपेनेच, सद्गुरूंच्या आशीर्वादानेच तर हे लिखाण माझ्याकडून करवून घेतले जात आहे. प्रत्यक्षात लिहीत मी आहे, पण हे लिहून घेणारा, हे विचार सुचविणारा, हे विचार मनात प्रकट करणारा कोणी तरी दुसरा आहे. हे काम तो माझ्याकडून करवून घेत आहे. ते विचार तो माझ्या मनात भरत आहे. तेच इथे उमटत आहेत. त्याचे अस्तित्व माझ्यात कोठे तरी आहे. यामुळेच हे लिखाण माझ्याकडून होत आहे. यामुळे मी केले, मी लिहिले, हा अहंकार आता माझ्यामध्ये उरलेला नाही.

मीपणाचा गर्व नाही. हा अहंकार आता नाही. कारण आता मला समजले आहे, हे मी जरी लिहीले असले तरी मी या ठिकाणी निमित्तमात्र आहे. प्रत्यक्ष हे विचार उमटवणारा दुसरा आहे. मनात येणारे विचारही त्याच्यामुळेच प्रकट होत आहेत. त्याला आता मला पकडायचे आहे. मी कोण आहे याची अनुभूती तो देतो. तो सोहमची अनुभूती देतो. तो सोहमचा नाद मला पकडायचा आहे. ती लय मला धरायची आहे. त्याच्यातच आता मला माझे मन रमवायचे आहे. कारण तोच ह्या सर्व विचारलहरींचा निर्माता आहे. त्याच्यातूनच हे सर्व प्रकट होत आहे. त्याच्या विचारलहरीतूनच हे विचार प्रकट होत आहेत. ते दैव मला पकडायचे आहे. दैवाला मला अनुकूल करून घ्यायचे आहे. हे माझे ध्येय आहे. इतकेच नव्हेतर हे पृथ्वीवरील सर्व मानवजातीचे हे ध्येय आहे. यासाठीच हे आयुष्य आपल्याला मिळालेले आहे.

दगडामध्येच ग्रॅनाईट सापडते. विविध रत्ने सुद्धा मिळतात. पण शेवटी तो दगड आहे. पण दैवीशक्तीने त्याच्यात रत्न आले आहे. आयुष्याचा हा अर्थ जर समजला तर आत्महत्या होणार नाहीत. आत्महत्येचा विचार करणारेही आत्महत्या न करता जीवनातील या खऱ्या आयुष्यासाठी आपला जीव ओवाळून टाकतील. हे विश्वच ब्रह्माने भरून टाकतील. दुष्ट विचारही चांगल्या विचारात कसे बदलले इतके सामर्थ्य हा विचारात आहे. यासाठीच आयुष्याचा खरा अर्थ समजून घेऊन जगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. असे केल्यास सर्वचजण सुखी होतील.

Related posts

साहित्यकृतीचा सहृदयतेने घेतलेला शोध

अध्यात्म म्हणजे काय ?

आजचा दिवस तिचा होता…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406