December 3, 2024
dr-v-n-shinde-article-on-beat-the-plastic-pollution
Home » प्लॅस्टिकचा विषारी विळखा !
विशेष संपादकीय

प्लॅस्टिकचा विषारी विळखा !

प्लॅस्टिकने जगाला व्यापले आहे. सर्वत्र प्लास्टीचा मुक्त संचार सुरु आहे. पाण्यात, अन्नामध्ये आणि मानवी रक्तामध्येही प्लास्टीचे अंश सापडत आहेत. त्यामुळे विविध आजाराने ग्रस्त लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनासाठी प्लास्टिक प्रदूषणाचा पराभव (Beat the Plastic Pollution) हि  संकल्पना सयुंक्त राष्ट्रसंघाने जाहीर केली आहे. त्यानिमित्त

डॉ. व्ही. एन. शिंदे
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

‘जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. विनाश अटळ आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवायची असेल तर सर्व देशांनी प्रयत्न केले पाहिजेत’, असा सूर सर्वत्र आळवला जातो. गल्लीपासून दिल्ली, नव्हे- न्यूयॉर्कपर्यंत सर्वत्र हे ऐकायला मिळते; मात्र, मनापासूनचे प्रयत्न, कोसो दूर आहेत. यामध्ये विकसित देशांचे म्हणणे, ‘अविकसित आणि विकसनशील देश जास्त प्रदूषण करतात, ते त्यांनी थांबवले पाहिजे’. त्याचवेळी ‘निसर्गाची पर्यावरणाची ही अवस्था विकसित देशांनी केलेल्या इंधनाच्या अतिरिक्त वापरामुळे उद्भवली आहे. आमची परिस्थिती अजून सुधारणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्याची जबाबदारी आमची नाही. विकसित राष्ट्रांनीच ही जबाबदारी उचलायला हवी’, असे अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांचे म्हणणे असते. त्यामुळे पर्यावरण रक्षणाबाबत केवळ चर्चाच होतात. संयुक्त राष्ट्रसंघाने मात्र याबाबत सर्वदूर जाणीव जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

      या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या ‘कॉन्फरन्स ऑन द ह्युमन एन्व्हायर्नमेंट’मध्ये प्रथम याबाबत चर्चा झाली. त्यानंतर दोन वर्षांनी १९७४ मध्ये ‘फक्त एक पृथ्वी’ या ब्रिदवाक्यास अनुसरून पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी साजरा करण्यात येतो. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्यासाठी, पर्यावरण रक्षणासाठी जागरूकता निर्माण व्हावी, हा यामागील मुख्य हेतू आहे. सागरी प्रदूषण जागतिक लोकसंख्या वाढ, जागतिक तापमानवाढ, शाश्वत विकास, वन्यजीव गुन्हेगारी इत्यादी विषयांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. या उपक्रमात १४३ पेक्षा जास्त देश सहभागी होतात. या वर्षी पन्नासावा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या पर्यावरण दिनाची ‘बीट प्लॅस्टिक पोल्युशन’ ही थीम आहे.

      या वर्षीच्या पर्यावरण दिनाचे यजमान पद दक्षिण आफ्र‍िकेतील कोटे डि’आयवोर या देशाकडे देण्यात आले आहे. त्यासाठी नेदरलँड पूर्ण सहकार्य करणार आहे. नेदरलँडने प्लॅस्टिक वापराबाबत मोठी पावले उचलली आहेत. प्लॅस्टिकचे संकट इतके गहिरे झाले आहे की, पाण्यामध्ये, अन्नामध्ये आणि मानवी रक्तामध्येही प्लॅस्टिकचे अंश सापडत आहेत. संशोधकांनी याबाबत यापूर्वी वारंवार इशारे दिले आहेत; मात्र] प्लॅस्टिक वापर काही कमी होत नाही.

प्लॅस्टिकचा शोध अलेक्झांडर पार्क यांनी १८५५ मध्ये लावला. पुढे त्याला जास्त चांगल्या आणि उपयुक्त रूपात लिओ बेकलँड यांनी आणले. तेव्हापासून प्लॅस्टिकचे उत्पादन सुरू झाले आणि होत आहे. खेळण्यांपासून विमानापर्यंत सर्वत्र प्लॅस्टिक वापरले जाते. तेल, पेट्रोलियम पदार्थ आणि इतर खनिज तेलांपासून प्लॅस्टिकचे उत्पादन करण्यात येते. प्लॅस्टिक वजनाने हलके आहे. प्लॅस्टिकचा उत्पादन खर्च कमी असल्याने स्वस्त मिळते. प्लॅस्टिकचा आकार बदलतो. त्याला कोणत्याही आकारात बदलता येते. प्लॅस्टिक पदार्थांची तन्यता जास्त असते. ते टिकाऊ आहे. वजन पेलण्याची चांगली क्षमता आहे. ते जलरोधक, रसायनरोधक आहे. पारदर्शक आहे. विद्युतरोधक असल्याने विद्युत वाहक तारांभोवती प्लॅस्टिकचे विद्युतरोधक आवरण बसवण्यात येते. या गुणधर्मांमुळे प्लॅस्टिक सर्वव्यापी बनले आहे. प्लॅस्टिकमुळे जीवन सोपे आणि अधिक आनंददायी बनले आहे.

मात्र प्लॅस्टिक लवकर विघटित होत नाही. जमिनीवर किंवा पाण्यामध्ये त्याचे विघटन होत नाही. उष्णतेचा प्लॅस्टिकवर परिणाम होऊन त्याचे विघटन होत नाही. ते हजारो वर्षे टिकून राहते. एक मिलीमीटर जाडीचे प्लॅस्टिक पूर्ण विघटित होण्यास ५००० वर्षे लागतात. हाच प्लॅस्टिकला मिळालेला शाप आहे आणि त्यामुळेच प्लॅस्टिक वरदान न बनता एक समस्या बनले आहे. तरीही त्याचा वापर कमी न होता वाढतच आहे.

      प्लॅस्टिकचे दोन प्रकारचे उत्पादन होते. एकल वापर करता येणाऱ्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर करता येत नाही. दुसऱ्या प्रकारच्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर करता येतो. दरवर्षी ४००० टन प्लॅस्टिकचे उत्पादन होते. त्यापैकी ५० टक्के प्लॅस्टिक पुनर्वापरायोग्य आहे. त्यातील केवळ १० टक्केपेक्षा कमी प्लॅस्टिक पुनर्वापरासाठी वापरले जाते. उरलेले प्लॅस्टिक फेकून देण्यात येते. ते गटारामध्ये, नद्यांमध्ये, उकिरड्यात, मातीत आणि समुद्रामध्ये जाते. हळूहळू त्याचे विघटन होत जाते. त्यामधून विषारी आणि घातक पदार्थ बाहेर पडतात आणि ते पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी सर्वात मोठा धोका बनत आहे. ते एक सजीवसृष्टीतील विविध जीवांमध्ये हळूहळू भिनणारे विष आहे.

      जमिनीवरील आणि पाण्यातील प्लॅस्टिकचे विघटन होताना त्याचे अंश मातीत आणि पाण्यात उतरतात. चाऱ्यात अडकलेले प्लॅस्टिक जनावरांच्या पोटामध्ये जाते. तसेच अनेक हॉटेलमधून अन्न प्लॅस्टिक पिशव्यांमधून दिले जाते. यातील शिल्लक अन्न त्याच पिशव्यांमधून बाहेर फेकले जाते. अन्नाच्या वासाने अनेकदा जनावरे प्लॅस्टिक पिशव्यांसह ते खातात. ते त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडत नाही. यामध्ये अनेकदा जनावरे मृत्यूमुखी पडतात. पाळीव जनावरे असतील आणि मालकाच्या लक्षात आले तर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येते. जनावरांच्या पोटातून किलोने प्लॅस्टिक बाहेर काढले जाते.   

प्लॅस्टिकमधून आणखी मोठा धोका वाढतो आहे तो मायक्रोप्लॅस्टिकचा. हे मायक्रोप्लॅस्टिक अन्नामध्ये, पाण्यामध्ये सहज मिसळते. आता तर ऐतहासिक जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या लोणार सरोवरातही सोळा प्रकारच्या मायक्रोप्लॅस्टिकचे अंश सापडले आहेत. विघटन प्रक्रियेत मायक्रोप्लॅस्टिकचे अंश पसरतात आणि अन्न, पाणी आणि हवेतून मानवाच्या आणि पशुंच्या शरीरात जाते. वनस्पतींतही मायक्रोप्लॅस्टिकचे अंश आढळतात.

मानवाच्या आणि प्राण्यांच्या शरीरात जाणारे प्लॅस्टिक घातक असते. प्लॅस्टिकमुळे हार्मोनशी निगडित समस्या प्रामुख्याने उद्भवतात. यातून अनेक घातक रोग होतात. प्रामुख्याने वंध्यत्व, ऑटिझम हे आजार होतात. मज्जारज्जूंची कार्यक्षमता घटते. कर्करोगाची शक्यता मोठी राहते. कॅडमियमसारख्या मूलद्रव्यांमुळे सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. पारा हा अत्यंत विषारी घटकही प्लॅस्टिकमुळे अन्न, पाणी आणि हवेत मिसळतो. दम्याची समस्याही निर्माण होते.

प्लॅस्टिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. प्लॅस्टिक कचरा वाढतच आहे. यातून समस्त जीवसृष्टीला धोका निर्माण होत आहे. पशूंचे जीवन कठीण होत चालले आहे. हा परिणाम हळूहळू घडतो. त्यामुळे कोणीही याकडे गंभीरपणे पाहत नाही. याचे गांभिर्य सर्वसामान्यांच्या लक्षात यावे, या उद्देशाने या वर्षीचा पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी प्लॅस्टिक समस्या चर्चेत यावी, असे संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केले आहे. जगभर यासाठी ५ जून रोजी कार्यक्रम आयोजित करावेत, असे अपेक्षित आहे. प्लॅस्टिकचा कचरा कमी व्हावा, प्लॅस्टिकचे विघटन करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे अपेक्षित आहे. आजवर या दिशेने मोठे संशोधन झाले आहे; मात्र, अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही.

प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबवणे शक्य नाही, असा सर्वदूर समज आहे. मात्र २०१६ पासून अँटिग्वा, बर्म्युडा या देशांनी प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. २०१७ पासून चीनने बंदी घातली आहे. २०१६ ते २०१८ या काळात कोंलंबिया, सोमालिया, सेनेगल, रवांडा, दक्षिण कोरिया, झिंबाब्वे, ट्युनिशिया, बांग्लादेश, कॅमेरून, अल्बानिया आणि जॉर्जिया या देशांमध्ये प्लॅस्टिकवर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. ऑक्टोबर २०१९ पासून भारताने एकल प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. मात्र भारतात आजही बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक वापरले जाते. स्थानिक स्वराज्य संस्था अधूनमधून अशा लोकांवर कार्यवाही करतात. मात्र हे प्रयत्न पुरेसे नाहीत.

एकल वापरायोग्य प्लॅस्टिकचे उत्पादन पूर्णत: थांबवले पाहिजे, ही आजघडीची सर्वात मोठी गरज आहे. यासाठी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. प्लॅस्टिकचे नेमके दुष्परिणाम काय आहेत, याची समाजातील सर्व घटकांना जाणीव करून देण्याची, जनजागृती करण्याची गरज आहे. प्लॅस्टिक वातावरणात जाळणे पूर्णत: थांबले पाहिजे. प्लॅस्टिक पाण्यामध्ये आणि मातीमध्ये मिसळू देणेही पूर्णत: थांबवायला हवे. पुनर्वापरायोग्य प्लॅस्टिक पुनर्वापरासाठी कसे जाईल, यासाठी सर्वंकष धोरण आखण्याची गरज आहे. कठोर उपाययोजना केल्याखेरीज प्लॅस्टिकच्या संकटापासून जीवसृष्टी वाचू शकणार नाही. हीच योग्य वेळ आहे, प्लॅस्टिकमुक्त होण्याची! 


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading