April 14, 2024
Over 30000 fauna of Western Ghats documented by Zoological Survey of India
Home » पश्चिम घाटातील 30,000 हून अधिक जीवजंतूंचे भारतीय प्राणी सर्वेक्षणमार्फत दस्तऐवजीकरण
काय चाललयं अवतीभवती

पश्चिम घाटातील 30,000 हून अधिक जीवजंतूंचे भारतीय प्राणी सर्वेक्षणमार्फत दस्तऐवजीकरण

  • पश्चिम घाटातील 30,000 हून अधिक जीवजंतूंचे भारतीय प्राणी सर्वेक्षणमार्फत दस्तऐवजीकरण, DNA अहवालाचे कामही वेगाने सुरू
  • भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिमी प्रादेशिक केंद्रामार्फत पुण्यात वन्यजीव न्यायवैद्यक प्रयोगशाळा स्थापनेसाठी प्रस्ताव

पुणे – भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिमी प्रादेशिक केंद्राने देशातील पश्चिम घाटात आढळून आलेल्या सुमारे 30,000 हून अधिक जीवजंतूंच्या प्रजातींचे दस्तऐवजीकरण केले आहे, अशी माहिती केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ.बासुदेव त्रिपाठी यांनी दिली आहे.

या सर्व जीवजंतूंसंदर्भात झेडएसआयमार्फत संशोधनकार्य सुरू असून त्या सर्वांचा डीएनए अहवाल तयार करण्याचे कामही वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेमार्फत पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. त्रिपाठी बोलत होते. यावेळी झेडएसआयच्या पश्चिमी प्रादेशिक केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ.अपर्णा कलावटे, डॉ.सतिश तलमले, डॉ. सचिन पाटील आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

डॉ.त्रिपाठी पुढे म्हणाले की, पश्चिम प्रादेशिक केंद्र,पुणे येथे उभारण्यात येणाऱ्या पश्चि घाट प्राणीसंपदा संग्रहाला भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने तत्त्वत: मान्यता दिली असून लवकरच त्यासाठी स्वतंत्र अशी नवीन इमारत बांधली जाणार आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून पुण्यात वन्यजीव न्यायवैद्यक प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी भारत सरकारकडे प्रस्ताव देण्यात आला असून, त्याबाबत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय सक्रियपणे विचार करत आहे.

भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेली झेडएसआय ही भारतातील एक अग्रगण्य वैज्ञानिक संस्था आहे. 1916 मध्ये कोलकाता येथे स्थापन झाल्यापासून हे सर्वेक्षण भारतातील जीवजंतूंचे दस्तऐवजीकरण आणि अभ्यास करत आहे. सध्या झेडएसआयची भारतभर 16 प्रादेशिक केंद्रे आहेत, जी महासागराच्या खोलीपासून हिमालयाच्या शिखरांपर्यंत सर्व परिसंस्थांमध्ये कार्यरत आहेत.

या संस्थेच्या पुणे येथील पश्चिम प्रादेशिक केंद्राची स्थापना 1959 मध्ये करण्यात आली आणि शहरामध्ये त्याच्या अस्तित्वाची 65 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि देशाच्या पश्चिम भागात बांधलेले ZSI चे पहिले केंद्र होण्याचा मान पुण्याला मिळाला. पश्चिमी प्रादेशिक केंद्राने आत्तापर्यंत प्रमुख परिसंस्था, संरक्षित क्षेत्रे, महाराष्ट्र राज्य, गोवा आणि गुजरात आणि कर्नाटकचा काही भाग, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांमधील वन्यजीवांचे दस्तऐवजीकरण आणि सर्वेक्षण केले आहे. या राज्यांमधून 30,000 हून अधिक जीवजंतूंचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.

यामध्ये सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, मासे, शंख-शिपली, खेकडे, विंचू, कोळी, फुलपाखरे, भुंगे, चतुर, ड्रॅगनफ्लाय, डॅमसेफ्लाय, पित्त मिडजे, मुंग्या, मधमाश्या यांचा समावेश असून संबंधित विषयात तज्ज्ञ असलेल्या शास्त्रज्ञांनी यासाठीच्या कामात सहभाग नोंदवला.

भारतीय प्राणी सर्वेक्षण पश्चिमी प्रादेशिक केंद्र हे पुण्यातील आकुर्डी परिसरात स्थित असून येथे विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी आणि जैवविविधता आणि त्याच्या संवर्धनाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध प्राण्यांच्या सुमारे 375 प्रजातींचे 750 हून अधिक नमुने असलेले एक संग्रहालय देखील आहे. त्याचप्रमाणे, 5000 पुस्तके आणि प्राणीशास्त्राशी संबंधित अनेक नियतकालिके आणि पुस्तके असलेली एक सुस्थापित लायब्ररी जैवविविधता संशोधनात स्वारस्य असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांची गरज पूर्ण करते, असे ते म्हणाले.

संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पुस्तके, पुस्तक प्रकरणे, संशोधन लेख आणि लोकप्रिय लेखांच्या स्वरूपात असंख्य प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे. यामध्ये रात्रीचे प्राणी (विंचू आणि कोळी), राज्यातील प्राणी (महाराष्ट्र आणि गोवा), संरक्षित क्षेत्रातील प्राणी (मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,) यांचा समावेश आहे. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य, चंदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना वन्यजीव अभयारण्य, लोणार वन्यजीव अभयारण्य, फणसाड वन्यजीव अभयारण्य आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्य), आणि पाणथळ परिसंस्थेचे प्राणी (नाथसागर आणि उजनी) या प्रमुख कामांचा डॉ. त्रिपाठी यांनी उल्लेख केला.

याव्यतिरिक्त, महाराष्ट्र पोलीस, वनविभाग, गुन्हे शाखा, केंद्रीय उत्पादन शुल्क, सीमाशुल्क विभाग इत्यादींकडून पडताळणीसाठी जप्त केलेल्या वन्यजीव सामग्रीसह विविध वन्यजीवांची ओळख आणि सल्लागार सेवा देखील केंद्र प्रदान करत आहे, अशी माहिती डॉ. त्रिपाठी यांनी दिली.

भारतीय प्राणी सर्वेक्षणद्वारे गेल्या 100 वर्षांत प्रकाशित साहित्य (पुस्तके, रेकॉर्डस्) faunaofindia.nic.in या संकेत स्थळावर मोफत उपलब्ध असून त्याचा अभ्यासक आणि संशोधकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

Related posts

विकारांच्या विषाणूला मारणारी औषधी विषाणूपासूनच…

प्रदूषण निवारण योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पाच नद्यांसाठी 1183 कोटी रुपये मंजूर

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरुनगर शाखेचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

Leave a Comment