भ्रमणध्वनी किंवा मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर अपवादाने असे स्फोट झाल्याचे आपणास ज्ञात आहे. मात्र अशा घटना अपवादात्मक असतात. या ठिकाणी मात्र स्फोट हे अपवादात्मक नसून, कटाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले. हे कोणी केले, हा आपल्यासाठी महत्त्वाचा भाग नाही. हे कसे घडवले, हा महत्त्वाचा भाग.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
साधारण तीसेक वर्षांपूर्वी पेजर कमरेला लावलेले अनेक मार्केटिंग करणारे प्रतिनिधी दुचाकीवरून फिरायचे. तसे त्या काळी हे तंत्रज्ञान गरीबांच्या आवाक्यात नव्हते. आम्ही आपले असे पेजर कमरेला लावून फिरणारे युवक पाहून थोडेसे नाराज होत असू. आपल्याकडे हे तंत्रज्ञान वापरण्याची कुवत नसल्याचे लक्षात यायचे. पेजर मोजून पंधरा ते वीस वर्षे भारतात मोठ्या थाटात मिरवत होते.
पुढे मोबाईल अर्थात भ्रमणध्वनीचे तंत्रज्ञान आले. या तंत्रज्ञानाने पेजरना मागे ढकलले. जे तंत्रज्ञान वापरले नाही, त्याची तशी फारशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न त्या काळी केला नाही. कालबाह्य तंत्रज्ञान शिकावे, असे कधी वाटले नाही. पेजरचे तंत्रज्ञान पटकन आले आणि डोळ्याआड गेले, असा गैरसमज होता, हे मागील आठवड्यात लेबनॉनमध्ये झालेल्या पेजरच्या साखळी स्फोटाने सिद्ध केले. आजही एवढ्या मोठ्या प्रमाणात पेजर वापरले जातात आणि त्यांचा उपयोग मानवी जीवांना हानी पोहोचवण्यासाठी होतो, हे पाहून ‘विज्ञान शाप की वरदान’ हा शालेय जीवनातील निबंधाचा विषय आठवला.
जेम्स क्लर्क मॅक्सवेल या संशोधकांने सैद्धांतिक संशोधन केले. त्यांनी चार गणिती सूत्रे मांडली. प्रत्यक्षात ही सूत्रे म्हणजे त्याचे नवसंशोधन नव्हते. ॲम्पिअरचा सिद्धांत, फॅराडेचे नियम आणि गॉसचा सिद्धांत याची त्यांनी सांगड घातली. या तीन संशोधकांनी हे नियम एकतर विद्युत किंवा चुंबकीय बलांसाठी मांडले होते. मॅक्सवेल यांनी या सूत्रातून विद्युत आणि चुंबकीय बलांचा परस्परसंबंध मांडला.
यातून विद्युतचुंबकीय लहरींचे क्षेत्र प्रयोगासाठी खुले झाले. गॉस, ॲम्पिअर आणि फॅराडेच्या या सूत्रांच्या गुंफणीतून विद्युत ऊर्जेचे विद्युतचुंबकीय लहरीमध्ये रूपांतर करणे आणि त्या पाठवण्यासाठी अँटेना आणि स्वीकारण्यासाठी ग्राहकाची निर्मिती करण्याचे दरवाजे मॅक्सवेल यांच्या संशोधनाने दिसू लागले. यामध्ये निकोला टेस्ला, मार्कोनी, जगदिशचंद्र बोस या संशोधकांनी रेडिओ तरंगांचा वापर करून संदेशवहनाला सुरुवात केली. अर्थात हे सर्व संशोधन विसाव्या शतकाच्या पूर्वीच सुरू झाले. पुढे यातून रेडिओ संदेशवहन आणि रेडिओ अस्तित्वात आले. पुढे दुसरीकडे दूरदर्शन अर्थात टेलिव्हिजन शोधले गेले. त्याचप्रमाणे वैयक्तीक पातळीवर संदेशवहन करता यावे, यासाठी दूरध्वनी यंत्रणा, वॉकीटॉकी, तसेच तारयंत्रांची रचना तयार झाली. मात्र यातील वॉकीटॉकी, रेडिओ आणि टेलिव्हिजन वगळता अन्य संदेशवहनासाठी तारांचे जाळे आवश्यक होते. ते टाळून संदेशवहन करता यावे यासाठी संशोधन सुरू झाले. यातून अस्तित्वात आले ते पेजर!
पेजरची रचना करण्यामध्ये सर्वप्रथम ए.आय. ग्रॉस यांना यश मिळाले. त्यांनी १९४८ मध्ये प्रथम पेजरवर संदेश पाठवला. हा संदेश अक्षरांच्यारूपात होता. पुढे यामध्ये अक्षरांसोबत अंकही मिसळून पाठवता येणे शक्य झाले. पेजर हे अत्यंत छोटे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. यामध्ये साधारण ४० किलोमीटर अंतरापर्यंत संदेश पाठवता येणे शक्य झाले. यामध्ये एकाने पाठवलेला संदेश, टॉवरवरील ग्राहक स्वीकारून तो संदेश स्वीकारणाऱ्या पेजरपर्यंत पाठवत असे. तो संदेश स्वीकारणाऱ्या पेजरवर बीप-बीप असा संदेश आल्यावर आवाज येत असे. त्यामुळे पेजरला बीपर असेही म्हणत. बीपरचा सर्वप्रथम वैद्यक व्यवसायात वापर सुरू झाला. डॉक्टर्सना रूग्णाची तब्येत बिघडल्यास सत्वर संदेश देण्यासाठी पेजर वापरण्यास सुरुवात झाली. १९९० च्या दशकात भारतात पेजर आले. व्यावसायीक कारणासाठी पेजर वापरले जाऊ लागले. मात्र अवघ्या १५-२० वर्षात मोबाईल तंत्रज्ञान आले. यासाठी उच्च वारंवारितेच्या विद्युतचुंबकीय लहरी वापरल्या जाऊ लागल्या. भ्रमणध्वनीच्या तंत्रज्ञानात झपाट्याने बदल झाले आणि होताहेत. त्या आणखी उच्च वापरताना आता ५-जीचे तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. या तत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसणारे पेजर गायब झाले.
मात्र भ्रमणध्वनीमुळे त्यातही अँड्रॉइड प्रणालीच्या संगणकामुळे आपले सर्वकाही गुगलसारखी कंपनी जाणून घेऊ लागली. त्यामुळे आपल्या हालचालीची नोंद होऊ लागली. आपण कोठे आहोत काय करतोय, हे कोणीतरी पाहू लागले. हे पेजरबाबत नव्हते. त्यामुळे गोपनियता आवश्यक असणाऱ्या लष्करी कारणासाठी आजही पेजर वापरात असल्याचे या स्फोटाने सर्वसामान्यापर्यंत पोहोचवले.
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह ही एक संघटना. तसे लेबनॉनमधील प्रत्यक्ष प्रशासन हीच संघटना चालवते. त्यांच्या सर्व सदस्यांचे परस्परांशी संदेशवहन पेजरच्या माध्यमातून होते. त्यासाठी पाच हजार पेजर अपोलो गोल्ड या कंपनीकडून त्यांनी मागवले. त्यातील तीन हजारपेक्षा जास्त पेजरवर एक विशिष्ट संदेश आला. संदेश आल्याचे पेजरने बीप आवाज करून सांगितले. त्यानंतर पेजरच्या वापरकर्त्याने काय संदेश आहे, हे पाहण्यासाठी तो पेजर घेतला. अर्थातच हे पाहण्यासाठी तो डोळ्यासमोर घेतला आणि संदेश वाचण्यासाठी बटन दाबताच त्यामध्ये स्फोट झाला. असे एक दोन नव्हे तर तीन हजार पेजरबाबत घडले.
भ्रमणध्वनी किंवा मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर अपवादाने असे स्फोट झाल्याचे आपणास ज्ञात आहे. मात्र अशा घटना अपवादात्मक असतात. या ठिकाणी मात्र स्फोट हे अपवादात्मक नसून, कटाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले. हे कोणी केले, हा आपल्यासाठी महत्त्वाचा भाग नाही. हे कसे घडवले, हा महत्त्वाचा भाग. या घटनेमध्ये पेजरमध्ये वापरण्यात आलेली बॅटरी आणि प्रणाली दोन्ही बदलण्यात आले. केवळ बॅटरी बदलली असती, बॅटरीमध्ये स्फोटक पेरले असते, तर पेजर विशिष्ट काळ सुरू राहिल्यास स्फोट झाले असते. मात्र तसे घडलेले नाही. पेजरमध्ये स्वतंत्र साधारण तीन ग्रॅम स्फोटकांचा छोटा बाँब बसवण्यात आला. पेजरचे वजन २०० ग्रॅमपर्यंत असते. त्या तुलनेत ३ ग्रॅम लक्षात येणे शक्य नव्हते.
त्यामध्ये विशिष्ट संदेश आल्यानंतर, तो वाचण्यासाठी कळ दाबताच त्या बाँबला विद्युतपुरवठा व्हावा, यादृष्टिने त्याच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करण्यात आले. त्यामुळे एकाच वेळी अनेक पेजरवर विशिष्ट संदेश पाठवण्यात आले. तो वाचण्यासाठी पेजरचे बटन दाबताच स्फोट घडले. अर्थात हे करण्यासाठी पेजर ज्या फ्रिक्वेन्सीवर कार्यरत होते, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये बाहेरील व्यक्तीने घुसून बाहेरून संदेश पाठवणे गरजेचे होते. हे सर्वकाही करून हे स्फोट झाले. पाठोपाठ वॉकीटॉकी संचामध्येही स्फोट याच तंत्राने घडवले गेले. मात्र त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात एक भिती निर्माण झाली. विज्ञान शाप की वरदान हा प्रश्न पुन्हा चर्चेत आणला.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.