February 1, 2023
duty that determines our superiority article by rajendra ghorpade
Home » कर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व
विश्वाचे आर्त

कर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व

सर्वांनी उत्तम व्यवहार केला तर कमीपणा येण्याचे कारण नाही. हलके काम करताना मनाला कमीपणा वाटता कामा नये. कर्तव्य पार पाडण्यासाठी करावे लागणारे कोणतेही चांगले कर्म हे शोभूनच दिसते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

तैसें वर्णाश्रमवशें । जें करणीय आलें असे ।
गोरेया आंगा जैसें । गोरेपण ।। ८८६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – गोऱ्या अंगाला जसा गोरेपणा शोभतो. त्याप्रमाणे वर्णाश्रमधर्माप्रमाणें जे कर्तव्यकर्म ज्याच्या भागाला आले असेल, तें त्यालाच शोभते.

सध्या असे बोलले जाते की आता काळ बदलला आहे. पूर्वीसारखे काही राहिले नाही. कोणत्याही जातीतील मनुष्य कोणतेही काम करताना पाहायला मिळत आहे. उच्चवर्णाची व्यक्ती क्षुद्राचे काम करताना दिसतो. उच्चनीच असा भेदभाव आता संपला आहे. ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार त्याला काम मिळत आहे. हे आत्ताच्या काळातच पाहायला मिळते असे नाही. तर इतिहासातही असे घडल्याची अनेक उदाहरणे देता येतील. क्षत्रियाने क्षुद्र कर्म करू नये असे कोठेही लिहिलेले नाही किंवा क्षुद्राने वेदपठण करून नये असेही कोठेही लिहिलेले नाही. राम वनवासात गेल्यानंतर पोट भरण्यासाठी त्यांना फळेपाणी गोळा करावेच लागले ना. स्वतःची कामे त्यांना स्वतः करावी लागली ना. ते म्हणाले असते मी राजा आहे. राज कुळातील आहे. राजाचा वंशज आहे. हे कर्म माझे नाही. मी फळेपाणी गोळा करणार नाही? मग मात्र त्यांना जगणेच अशक्य झाले असते. कारण तेथे कोणी त्यांना या गोष्टी आणून दिल्या नसत्या. तेथे त्यांना राजासारखे वागून चालणारे नव्हते. जंगलात जगण्यासाठी आवश्यक त्या सुविधा त्यांना स्वतः उभ्या कराव्या लागल्या. तेव्हा ते राजाचे वंशज नव्हते असे नव्हते. ते राजकुळातीलच होते. पण प्राप्त परिस्थितीत त्यांना ते कर्म करावे लागले. म्हणजे त्यांची पात्रता ढासळली असे होत नाही.

पांडव वनवासात होते तेव्हाही त्यांना अशीच कामे करावी लागली. संसार चालविण्यासाठी ही कर्मे करावी लागतात. घरात लागणाऱ्या गोष्टी स्वतः आणण्यात लाज वाटण्यासारखे, कमीपणा मानण्यासारखे काही नाही. इतिहासातही असे कधी घडले नाही मग आताच्या उच्चशिक्षित पिढीला लाज का वाटते. शेती करताना लाज का वाटते? शेतात जाऊन नांगर धरला किंवा पिकांना पाणी दिले तर त्यात कमीपणा मानण्याचे काहीच कारण नाही. एखादा उच्चवर्णीय शिकलाच नाही, तर काय करणार? शेवटी त्याला काही ना काही तरी काम करावेच लागणार. ते काम हलके आहे. असे म्हणून चालणार नाही. कुटुंब सांभाळायचे तर त्याची जबाबदारी स्वीकारायलाच हवी. जबाबदारीने कामे करायलाच हवीत. घर सांभाळणे हे त्याचे कर्तव्य आहे. त्यासाठी योग्य कर्म करून संसारासाठी लागणारे साहित्य जमा करणे ही त्याची गरज आहे. कर्म हलके असले तरी चालते. वाईट मार्गाने तरी तो धनसंचय करत नाही ना. मग ते कर्म हे योग्यच आहे. ते त्याला शोभणारे नाही, असे कधीही होत नाही. घरात लागणारा भाजीपाला, दळण-कांडप स्वतः केले तर काय झाले. शेवटी स्वतःच्या घरचेच तर काम करत आहोत ना.

घरात स्वच्छता राखण्यासाठी स्वतःच घरातील कचरा काढला तर किंमत कमी होते असे कोठेही लिहिलेले नाही. स्वतःचे घर स्वतःच स्वच्छ ठेवा असे सांगितले जाते. एक उच्चवर्णाची व्यक्ती महानगरपालिकेत भंगी कामास नोकरीला लागली. सर्वच जण त्याला नावे ठेवू लागले. तो चार पैसे कमवत होता. त्यात त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. आनंदाने तो त्याचे जीवन जगत होता. यामध्ये कमीपणा मानण्याचे काहीच कारण नाही. हे कर्म त्याला त्याच्या पात्रतेनुसार मिळाले आहे. तो शिकला असता तर उच्चपदावर काम करू शकला असता. पण तो शिकलाच नाही. यात दोष कोणाचा? आणि शिकला असता पण बेरोजगार राहण्याऐवजी त्याने मिळेल ते चांगले कर्म केले तर त्यात कमीपणा कसला? उलट ते कर्म ही त्याची गरज होती.

आजकाल शहरातील अनेक मुले दीपावली व उन्हाळ्याच्या सुटीमध्ये दुकानामध्ये कामे करतात. त्यांनी कमावलेला पैसा त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतो. कमवा आणि शिका हा मंत्र थोरांनी दिला आहे. असे वागणे हे आताच्या पिढीचे कर्तव्यच आहे. मी उच्चवर्णीय आहे ही कामे मला शोभणारी नाहीत. अशा कामाने माझी पात्रता कमी होईल असे कधीही घडत नाही. कर्मधर्मसंयोगाने जे काम मिळाले ते उत्तम प्रकारे केले तर त्याची प्रशंसाच होते. एका उच्चशिक्षिताने वडापावचा गाडा सुरू केला. त्यात त्याला अमाप फायदा झाला. सायकलवरून हिंडणारा तो पोरगा चारचाकीतून हिंडू लागला. त्याचा वडापाव खाण्यासाठी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती स्वतः त्याच्या गाड्यांवर येत. तो म्हणाला असता मी उच्चशिक्षित आहे. मी वडापावचा गाडा का चालवावा. तर हा मान त्याला मिळाला असता का? नाही ना. चांगले कर्म केले, कर्तव्य पार पाडले तर ते कर्म त्याला शोभून दिसते. त्याची पात्रता ते कर्म करण्याची नाही असे म्हणता येत नाही.

ज्याच्या त्याच्या हाताचा गुण वेगळा असतो. कोणाला उत्तम चित्रे काढता येतात. ही कला त्याने जोपासली व या कलेतून त्याने करोडो रुपये कमावले तर त्यात गैर काय? उच्चवर्णीयांनीच धर्म ग्रंथाचे पठण करावे. बाकीच्यांनी पठण करू नये असे कोठेही सांगितलेले नाही. सर्वांना तो अधिकार आहे. आपापल्या कर्मामध्ये पूर्णरत असलेल्या मनुष्याला वैराग्य प्राप्त होते. कोणतेही कर्म करा पण ते चांगले असावे. योग्य असावे. वाल्ह्या कोळीने शेकडो लोकांची हत्या केली. तो मरा, मरा असा जप करायचा पण मरा, मरा चा राम, राम असा जप केव्हा झाला हे त्यालाच कळले नाही. पुढे वाल्ह्याचा वाल्मीकी ऋषी झाला. दुष्कर्माचे सत्कर्मात रूपांतर झाल्यानेच हा बदल झाला.

राम, पांडव हे राजे होते. पण त्यांनाही वेळप्रसंगी क्षुद्र कर्म करावे लागले. हातात नांगर धरावा लागला. झाडे लावावी लागली. शेती करावी लागली. झोपडी उभी करण्यासाठी झाडे तोडावी लागली. मोळी उचलावी लागली. मग आपण घरची कामे करताना लाज का बाळगावी. स्वतःच्या शेतात उत्पादित झालेला भाजीपाला विकण्यात लाज का बाळगावी. चोरी तर करत नाही ना? कष्टाने कमवत आहे. मग कमीपणा कसला. त्याच्यावर तुमची पात्रता ठरत नाही. कमीपणा त्याने येत नाही. कोणतेही चांगले कर्म करण्यात कमीपणा नसतो. चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते. चुकीचे कर्म केल्यास कमीपणा येतो. जनतेची फसवणूक करून पैसा कमविला तर कमीपणा येतो. व्यवहार कसा करता यावर तुमची पात्रता ठरते. सर्वांनी उत्तम व्यवहार केला तर कमीपणा येण्याचे कारण नाही. हलके काम करताना मनाला कमीपणा वाटता कामा नये. कर्तव्य पार पाडण्यासाठी करावे लागणारे कोणतेही चांगले कर्म हे शोभूनच दिसते.

Related posts

सेवाभाव हा स्वधर्म अंगी जोपासावा

फलसूचक कर्म…

राजा गरीब जरी झाला तरी, तो कर्तृत्त्वाने राजाच ठरतो

Leave a Comment