July 24, 2024
Forts in Sindhudurg book by Sandeep Tapkir
Home » मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी
पर्यटन

मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी

  • मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले
  • अनोखी सफर- मालवणी मुलखातील गड-किल्ल्यांची

तुम्हाला जर कष्टात, गरिबीत; पण स्वाभिमानाने, रसिकतेने प्रत्येक गोष्टीत कलात्मक पद्धतीचा आविष्कार करीत स्वत:शी खूश असणारी, जराशी ओळख झाल्यावर भरभरून बोलणारी, आपल्या अजब जीवनकथा व चटका लावणाऱ्या व्यथा विशिष्ट हातवारे, अभिनय करीत उत्कट जीवन जगणारी माणसं पाहायची आहेत, तर तुम्हाला येथे वारंवार यावे लागेल. कुणाही रसिक निसर्गप्रेमीला पुन:पुन्हा यावे असा मोह वाटेल, असा हा निसर्गरम्य प्रदेश आहे.

 प्रा. डॉ. बाळकृष्ण रामचंद्र लळीत,  मराठी विभाग प्रमुख,
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर, जि. पुणे – ४१२२१०
भ्रमणध्वनी : ९६६५९९६२६० ईमेल : brlalit@gmail.com

शुक्रवार, दि. १-११-१९९१ रोजी संध्याकाळी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड-किल्ले आणि माझी भ्रमंती’ या विषयावर मी एक जाहीर व्याख्यान दिले होते. या घटनेला आता जवळ-जवळ तीस वर्षे झाली. ‘आपल्या इतिहासाची स्मृतिचिन्हे म्हणून गड-किल्ले यांची जोपासना आपण इतिहासप्रेमींनी केली पाहिजे,’ असे आवाहन मी त्या वेळी केले होते. दुसऱ्या दिवशी या संदर्भातील वृत्त बहुतेक स्थानिक वृत्तपत्रांच्या आवृत्तीतून प्रसिद्ध झाले होते. अर्थात, मी त्यापूर्वी निवडक मित्रांना घेऊन ‘दुर्गमित्र’ या नावाची एक संस्था स्थापन केली. सात-आठ गडदर्शन मोहिमा, शिवजयंती, निबंध स्पर्धा असे उपक्रम घेतल्यावर सात-आठ वर्षांनी अनेक कारणांमुळे ते काम थांबले. अर्थात, तसे होणे नैसर्गिक होते; मात्र मनात सिंधुदुर्गातील गड-कोटांविषयी असलेला अभिमान आजही तसाच जागृत आहे.

नुकताच फेब्रुवारीत मी भेडशीजवळच्या खानयाळे गावच्या मंदिराच्या पूर्वेकडे असलेल्या डोंगरावरील ‘भोसल्याचा गड’ दुरून पाहिला. ‘भोसल्याचो’ म्हणजे,  ‘सावंतवाडीकर भोसले यांचा गड,’ असे त्याचे नाव असावे. माझे मित्र आनंदराव शेट्ये हे त्या ठिकाणी अनेकदा गेले आहेत. ‘माथ्यावर आजही पडक्या अवस्थेतील तटबंदी व अन्य बांधकाम आहे,’ असे ते म्हणाले. भेडशीजवळच आयनोडे-मांगेली येथेही एक किल्ला आहे. परमे येथेही एक गढीवजा ऐतिहासिक भुईकोट आहे. मणेरी, आकेरी येथेही भुईकोट होते, हे मी ऐकून आहे. आकेरीच्या भुईकोटाचा शोध नुकताच लागला, असे वाचनात आले; पण २०१३मध्ये प्रकाशित सतीश अक्कलकोट यांच्या पुस्तकात त्याविषयीची माहिती यापूर्वीच उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर प्रथम एका  निसर्गरम्य; पण सांस्कृतिक-ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा म्हणून ‘मालवणी मुलखा’ची थोडक्यात ओळख करून घेऊ व नंतर संदीप भानुदास तापकीर यांच्या या लेखनासंदर्भात विचार करू या.

पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा होय. या प्रदेशाला ‘मालवणी मुलूख’ अशी स्वतंत्र ओळख प्राप्त झाली आहे.

मालवणच्या कुरटे बेटावर भर सागरात छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग या जलदुर्गामुळे १ मे १९८१ रोजी या दक्षिण कोकणाला ‘सिंधुदुर्ग जिल्हा’ हे स्वतंत्र बाणेदार नाव प्राप्त झाले. सुमारे ५२१९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ, १२१ किलोमीटर सागरकिनारा या जिल्ह्याला लाभला आहे. संपूर्ण साक्षर असलेल्या या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे नऊ लाख एवढी आहे. देवगड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग असे आठ तालुके असलेल्या या जिल्ह्याला समृद्ध निसर्गसंपदा लाभली आहे. जलश्री, वनश्री व शैलश्री या तिन्हींचा जणू अपूर्व संगमच येथे पाहायला मिळतो.

उत्तरेला विजयदुर्गची खाडी आणि दक्षिणेला तेरेखोलची खाडी, पश्चिमेला अथांग सिंधुसागर; तर पूर्वेला उत्तुंग सह्याद्रीचे कडे – दऱ्या आणि डोंगर. सागर सह्याद्रीच्या मधल्या भागात लाल मातीचा हा मुलूख साहित्य, संगीत, नृत्य, लोककला, शिल्प या क्षेत्रांत खूप आघाडीवर आहे. लाल माती, काळीभोर कातळे, जांभा खडक, नारळ – पोफळी, आंबा, काजू, फणस यांच्या सदाहरित बागा, हिरवेगार भातमळे, पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, प्रत्येक गावात एकापेक्षा एक अधिक घनदाट देवराया, त्याच्यासोबत माउली, सातेरी, भूमिका, पावणाई, रवळनाथ, वेतोबा इत्यादी देवतांची विस्तीर्ण सभामंडप असलेली भक्ती, शांती व समाधान प्राप्त करून देणारी मंदिरे, खास प्राचीन बारा-पाचाची देवस्थानपद्धती, दशावतार ही उत्स्फूर्त नाट्याविष्कार दाखवणारी लोककला, हौशी मराठी रंगभूमीचे माहेर आणि फक्त जिल्ह्यापुरती खास ठसकेबाज, नादमधुर, चिमटे काढीत; पण समोरच्याच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘मालवणी’ बोली, ही या प्रदेशाची स्वतंत्र ओळख आहे. तुम्हाला फणसांचे – आंब्यांचे शेकडो प्रकारचे स्वाद चाखायचे असतील, कोकम रस, सोलकढी, अप्रतिम शाकाहारी भोजन, तसेच असंख्य प्रकारचे चवदार स्वाद प्राप्त झालेले ‘मच्छाहारी’ भोजन हवे असेल तर,  ‘मालवणी मुलखाला’ महाराष्ट्रात दुसरा पर्याय नाही. वडे – सागोती, तिखला, पापलेट, सरंगा, माशांची कढी, सांबारे, भाजी – पाव – उसळपाव, कांदाभजी, शेवकांडे किंवा चिरमुऱ्याचे लाडू, जत्रेतले आले घातलेले  गुळाचे खाजे, ग्रामीण भागात मिळणारी खोबऱ्याची कापे, एवढेच काय, जांभूळ, करवंदे, हसोळी, नीव, जगमे – चाफरे, ओवळधोडे, चार भाजलेल्या किंवा उकडलेल्या आठल्या (फणस बिया) – चिनी, कणग्या, कारंदे हा सारा रानमेवा व त्यांचा अनोखा स्वाद घ्यायचा असेल, ओल्या काजूगरांचा गूळ – खोबरं घातलेला  ‘मोवला’, काळ्या वाटाण्याची उसळ, आंबोळी, गरमागरम उकडा भात व सोबत रसदार फजाव, वालीचे झणझणीत सांबारे यांची चव हवी असेल, तर या प्रदेशात वेगवेगळ्या ऋतूंत यावे लागेल.

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रांगणा, पारगड, मनोहर – मनसंतोषगड यांसारखे २९ गड – किल्ले (काहींनी हा आकडा ३८वर नेलाय), आंबोली हे थंड हवेचे ठिकाण, श्रीसंत सोहिरोबा, साटममहाराज, टेंबेस्वामी, राऊळमहाराज, भालचंद्रमहाराज अशा संत-महंतांचे मठ, असंख्य साहित्यिक – कवी, कलावंतांची घरे – गावे (अवश्य वाचा माझे ‘सिंधुरत्न – भाग १’ हे पुस्तक), कुडोपी, हिवाळे, बुधवळे परिसरांतील अत्यंत प्राचीन कातळशिल्पे, नेरुर-वालावल-पेंडूरचा अनोखा निसर्ग, पेंडूरचे प्राचीन जैन मंदिर, मठगाव आणि वेतोरे येथील प्राचीन शिलालेख, वेंगुर्ले येथील ‘डच वखार’, दाभोलीचे ‘कुडाळ देशकर मठ संस्थान’, बांदा येथील बैल – रेडे घुमट, सावंतवाडीची लाकडी खेळणी, मोती तलाव, नरेंद्र डोंगर, धामापूरचा शांत – नीरव तलाव, तिलारीचे मातीचे धरण, हत्तीचे वास्तव्य असलेला परिसर, पिंगुळीची ठाकर आदिवासींची लोककला, धनगरांचे ‘चपई नृत्य’, सावंतवाडीचे शिल्पग्राम, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, देवगड तालुक्यांतील असंख्य प्रेक्षणीय स्थळे… हे सारे मालवणी मुलखाचे बाह्यरूप झाले. तुम्हाला जर कष्टात, गरिबीत; पण स्वाभिमानाने, रसिकतेने प्रत्येक गोष्टीत कलात्मक पद्धतीचा आविष्कार करीत स्वत:शी खूश असणारी, जराशी ओळख झाल्यावर भरभरून बोलणारी, आपल्या अजब जीवनकथा व चटका लावणाऱ्या व्यथा विशिष्ट हातवारे, अभिनय करीत उत्कट जीवन जगणारी माणसं पाहायची आहेत, तर तुम्हाला येथे वारंवार यावे लागेल. कुणाही रसिक निसर्गप्रेमीला पुन:पुन्हा यावे असा मोह वाटेल, असा हा निसर्गरम्य प्रदेश आहे. या पार्श्वभूमीवर येथील समृद्ध परंपरा लाभलेला या जिल्ह्याचा ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा, जलदुर्गांचा परिचय करून घेऊ या.

आजवर अनेकांनी या परिसरातील  गड-किल्ल्यांवर लेखन केले आहे. यातच नवी भर म्हणून संदीप भानुदास तापकीर यांचे ‘मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले’ हे ३० भागांत लिहिलेले पुस्तक आपल्या हाती येत आहे. कणकवली तालुक्यातील भैरवगडापासून आपण माहिती घ्यायला सुरुवात करतो नि वाटेत कुडाळ तालुक्यातील सोनगड, कुडाळ कोट, मनोहरगड, मनसंतोषगड, पारपोली घाटावर नजर ठेवण्यासाठी सावंतवाडीकर फोंड सावंत यांनी १७०९ – १७१३दरम्यान बांधलेला नारायणगड, महादेवगड, सावंतवाडी कोट (राजवाडा), बांदा येथील भुईकोट, अलीकडे जीर्णोद्धार करण्यात आलेला व पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकेल, असा फुकेरीचा ‘हनुमंतगड’ यांबद्दलची भरपूर माहिती संदीप तापकीर आपल्याला या पुस्तकातून देतात. या खूप कष्ट घेऊन, प्रत्यक्ष भटकंती करून लिहिलेल्या पुस्तकात आजवर फारसे माहीत नसलेले, नजरेत न पडलेले संदर्भ लेखक तापकीर आपल्याला देतात. उदा. आवाडे कोटाची माहिती. मणेरी या तत्कालीन महालाच्या गावी असलेला भुईकोट लेखकाने प्रत्यक्ष पाहिला आहे. ते लिहितात, ‘या किल्ल्याला भेट देण्यासाठी बांद्याहून दोडामार्ग रस्ता पकडायचा. दोडामार्गच्या आठ किलोमीटर अगोदरच बांद्यापासून २० किलोमीटरवर मणेरी गाव आहे. या गावामध्ये किल्ला न विचारता, ‘देवचार किंवा कोट कोठे आहे,’ असे विचारावे. मुख्य रस्त्यापासून गावात जाताना घरांच्या मध्येच डावीकडे थोडे आत देवचाराची घुमटी आहे. तीदेखील पटकन दिसत नाही. ‘देवचार हा काय प्रकार आहे,’ असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. येथील गावकरी ‘गाव आणि कोट या भागांत हा देवचार रात्री फिरून आपले संरक्षण करतो,’ असे मानतात. त्यांच्या मते, या देवचाराचे ठाणे वृक्षावर आहे. ही देवचाराची छोटेखानी घुमटी गाव आणि किल्ल्याचा तट यांच्या मध्येच आहे. देवचाराची घुमटी पाहून आपण झाडांमधून वाट काढत आपला मोर्चा किल्ल्याकडे वळवायचा. आज या किल्ल्याच्या तटबंदीची फक्त जोतीच शिल्लक आहेत. ही जोतीदेखील घनदाट झाडी असल्यामुळे सापडत नाहीत. किल्ल्याच्या तटाबाहेर खंदकाचे अवशेष आहेत. त्यामध्येदेखील भरपूर झाडी वाढलेली आहे. हा छोटेखानी किल्ला तिलारी खोऱ्यात उगम पावणाऱ्या मणेरी नदीच्या काठावर वसलेला आहे. पुढे ही नदी चापोरी नदीला मिळते. येथून पूर्वेला रामघाट दिसतो,’ अशी माहिती ते देतात. मी या गावापासून सहा-सात किलोमीटरवर राहत असून व असंख्य वेळा या गावी जाऊनही हा कोट वा आता त्याची फक्त शिल्लक असलेली तटबंदी पाहिलेली नाही. या पुस्तकामुळे ती मी आता पाहणार आहे. मा. पांडुरंग पिसुर्लेकर यांच्या ‘पोर्तुगेज-मराठे संबंध’ या अमूल्य ग्रंथात मणेरीचा अनेकदा उल्लेख येतो; पण असे असूनही संदीप तापकीर यांच्यामुळेच आता मणेरी कोट पाहायचाय. दर्शन घ्यायचे व गावकरी मंडळींना ‘हा ऐतिहासिक ठेवा जतन करा. पर्यटन केंद्र करा!’ म्हणून  विनवणी करणार आहे.

यानंतर आपण वेंगुर्ला कोट, डच वखार, निवतीचा किल्ला, पद्मदुर्ग, राजकोट, सर्जेकोट, फारसा कुणालाही माहीत नसलेला पेंडूर गावातील १२ एकरांवर पसरलेला वेताळगड, की जो, १७८६-८७दरम्यान सावंतवाडीकर सावंत यांनी उभारला. त्याची पाहणी करायला म्हणे १८६२मध्ये इंग्रज आले होते, अशी माहिती  या पुस्तकात  वाचायला मिळते. मालवणजवळचा नांदोसचा किल्ला १८०३ ते १८०७दरम्यान बांधला गेला. यांशिवाय भरतगड, भगवंतगड, सिद्धगड, रामगड, कोटकामते भुईकोट, साळशीच्या सदानंदगडापासून देवगड, विजयदुर्ग, खारेपाटणचा किल्ला अशी सारी शब्दरूपी सफर आपल्याला  संदीप तापकीर घडवतात.

संदीप तापकीर हे दुर्गअभ्यासक आहेत; तसेच ते ‘शिवव्याख्याते’ही आहेत. यापूर्वी पुणे, सातारा, रत्नागिरी, नाशिक व अहमदनगर परिसरांतील गड-कोटांवर त्यांनी ग्रंथलेखन केले आहे. अनेक दिवाळी अंकांतून ते गड-कोटांवर सातत्याने लिहितात. तसेच ‘दुर्गांच्या देशातून…’ हा केवळ किल्ल्यांना वाहिलेला दिवाळी अंक ते गेली १२ वर्षे संपादितही करत आहेत. दुर्गसंवर्धन हाही त्यांच्या जिव्हाळ्याचा व अभ्यासाचा विषय आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड-कोटांची माहिती पुन्हा एकदा करून देत आहेत. सिंधुपर्यटनाच्या दृष्टीने ही नक्कीच कौतुकाची व महत्त्वाची बाब आहे. या जिल्ह्यातील सांस्कृतिक, सामाजिक, साहित्य  क्षेत्रातील एक कार्यकर्ता म्हणून  मला हे कार्य अभिमानाचे वाटते. ते त्यांनी केले, याबद्दल त्यांना धन्यवाद देतो.

सिंधुदुर्गातील गड-किल्ल्यांवर अलीकडे अनेक जण लिहितात. पूर्वीही लिहिले गेले आहे. मी स्वतः ‘दुर्गमित्र’च्या स्थापनेनंतर अनेक लेख प्रकाशित केले; पण श्री. संदीप तापकीर यांनी हे लेखन करताना काही ठिकाणांची सहसा वाचायला न मिळणारी माहिती लिहिली आहे, याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. मात्र, पुढील आवृत्तीत त्यांनी  ‘शिवलंका सिंधुदुर्गवर’ जरा अधिक विस्तृत लेख लिहावा. तापकीर यांनी जी माहिती  दिली आहे, त्यामागील त्यांचे कष्ट खरंच अभिनंदनीय आहेत. उदाहरणादाखल पुढील  माहिती अवश्य वाचावी…

‘१८०८मध्ये दुर्गाबाई जेव्हा सावंतवाडी संस्थानचा कारभार पाहत होत्या, त्या वेळी त्यांनी आपल्या जवळच्या सरदारांच्या नेमणुका अनेक किल्ल्यांवर केल्या. तेव्हा त्यांनी कुडाळच्या कोटावर कुडाळकर सावंतांची नेमणूक केली. आज हा ‘कुडाळचा कोट कोठे आहे,’ असे कुडाळ गावात विचारले तर, ‘माहीत नाही, येथे असा काही कोट नाही,’ असेच उत्तर गावकऱ्यांकडून ऐकायला मिळते (अलीकडे  लोक अवश्य  सांगतात). आज या भुईकोटाचे फार थोडे अवशेष शिल्लक आहेत; पण त्याच्यावर नव्याने काम झाल्यामुळे ते पटकन ओळखू येत नाहीत. इंग्रजांच्या नोंदीनुसार, कर्ली नदीकाठावरच्या या किल्ल्याचे क्षेत्रफळ १६० चौरस यार्ड (१४४० स्क्वेअर फूट) होते. हा किल्ला चिखल व दगडाने बांधलेला होता. किल्ल्याला सर्व बाजूंनी खंदक, बुरूज होते; मात्र किल्ल्याचे बांधकाम अजिबात बळकट नव्हते. किल्ल्याच्या आग्नेय कोपऱ्यात तीन दरवाजे, तर पश्चिमेला चोरदरवाजा होता. या दरवाजांची पडझड झालेली होती. किल्ल्यात काही बिनउपयोगाच्या तोफा होत्या.’ (कुडाळ कोट या कोटाप्रमाणे प्रभानवल्लीकर प्रभावळकर घराण्याचा ऐतिहासिक वाडा, देवघर यांचा उल्लेख करणे आवश्यक  होते.)

‘शिवचरित्रप्रदीप’ या ग्रंथातील मनोहरगडाची माहिती  देताना श्री. संदीप तापकीर पुढील माहिती नोंदवतात… ती मला तरी प्रथमच वाचायला मिळाली. ते लिहितात, ‘श्री शिवराय आग्य्रातून आल्यानंतर जेव्हा सिंधुदुर्गला गेले होते, तेव्हा काही काळ या मनोहरगडावर होते. २४ जुलै १६६६ रोजी महाराजांच्या दप्तरखान्यातून पाटगावला गंगाजी देसाईच्या चुलत्याची कागदपत्रे पाठवून देण्यासाठी पत्र पाठवले होते. तेव्हा पाटगाव तर्फ मनोहरगडावर होते. कुडाळ परगण्याचे सुभेदार येसाजी गोविंद यांनी १७ ऑगस्ट १६६६ रोजी मनोहरगडाच्या किल्लेदाराला पत्र पाठवून एक नामवंत व्यक्ती कुडाळला विसेखू पेठेतील लोकांची घरे पाडत असल्याने त्यांना रोखावे, अशी विनंती केली. २१ ऑगस्ट १६६६च्या पत्रावरून बाजी घोलप मनोहरगडाचा किल्लेदार असल्याचे समजते. हे पत्र रांगण्याचा किल्लेदार विठोजी जाधवने मनोहरगडाचा किल्लेदार व कारकून यांना लिहिले आहे. त्यातून ‘मनोहरगडाचा सरनोबत बाबा हरी याला आम्ही पकडले आहे. त्याला आम्ही शिक्षा केली, तर तुम्हाला राग येईल; म्हणून त्याला तुमच्याकडे पाठवू का?’ असे विचारले आहे. १६६६च्या पत्रावरून मनोहरगडाचा हवालदार बाजी घोलप, सबनीस रामाजी विश्वनाथ व सरनोबत रुद्राजी तुकदेव (त्यापूर्वी काही महिने बाबा हरी) असल्याचे दिसते.’ (मनोहरगड).

बांदा हे आज मुंबई – गोवा महामार्गावरील महत्त्वाचे शहरवजा गाव आहे. येथील कोटाविषयी माहिती श्री. तापकीर यांनी सविस्तर दिली आहे, ती वाचकांनी वाचावी. ते  लिहितात, ‘किल्ल्याच्या गडफेरीत याशिवाय दोन जुन्या इमारतींचे जोते व विहीर दिसते. मोकळ्या जागेत लावलेल्या आंबा व काजूच्या झाडांमुळे सावली मिळते. हा आटोपशीर, छोटेखानी किल्ला पाहायला अर्धा तास पुरेसा होतो. हा किल्ला चहूबाजूंनी तटबुरुजांनी बंदिस्त असून, ही तटबंदी आजही सुस्थितीत दिसते. तिच्यात ठिकठिकाणी जंग्यांची सोय आढळते. किल्ला पाहून परत पूर्वाभिमुखी दरवाजातून बाहेर पडायचे. डावीकडे वळून रस्त्याने खाली (उत्तरेकडे) आपण तेरेखोल नदीच्या बांधीव घाटावर जायचे. येथून झाडीने झाकलेली, दोन वेगवेगळे थर असणारी, दोन वेगवेगळ्या काळांत बांधलेली गडाची तटबंदी व बुरूज सुंदर दिसतात… ‘छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर जून १६८९मध्ये खेम सावंतांनी मोगलांच्या मदतीने बांद्याचा किल्ला जिंकला. त्याप्रीत्यर्थ नबाब बहादूरखानाने १० जून १६८९ रोजी खेम सावंतांचा सन्मान केला.

मोगलांच्यावतीने सावंत बांद्याचा कारभार पाहू लागले. पुढे १७०७मध्ये मराठ्यांच्या यादवी युद्धात सावंतांनी  महाराणी ताराराणींची बाजू घेऊन १७०८मध्ये त्यांच्याकडून बांद्याची सनद मिळवली; पण लवकरच शाहूराजांचा वाढता प्रभाव पाहून त्यांनी पक्ष बदलून शाहूराजांकडून बांद्याची सनद मिळवली. म्हणजे, बांदा शेवटपर्यंत सावंतांच्या अमलाखाली राहिला. तेरेखोल नदी सागराला जेथे खाडीवर मिळते, तेथे सावंतांनी तेरेखोलचा किल्ला बांधून नदी/सागरी वाहतुकीवर नियंत्रण मिळवले; पण १७४६मध्ये पोर्तुगिजांनी तेरेखोलचा किल्ला जिंकला. त्यामुळे बांद्याला जाणारे प्रत्येक जहाज पोर्तुगिजांच्या हद्दीतून जाऊ लागले. बांदा न जिंकताही त्यांनी बांद्याच्या व्यापारावर लगाम लावला… १८३२मध्ये चंद्रोजी सुभेदार हाच सावंतांच्या वतीने बांद्याचा किल्लेदार होता. तेव्हा किल्ल्यात किल्लेदार, दोन कारखानीस, ६५ लोकांची शिबंदी, एक हकेकरी, एक कुणबीण असे लोक होते. या सर्वांच्या खर्चासाठी १२४९ रुपयांची तरतूदही होती.’

असे ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या बांदा या गावी विजापूरची आदिलशाही, पोर्तुगीज, सावंतवाडीकर भोसले, छत्रपती शिवाजीमहाराज व मोगल बादशाहा औरंगजेब यांनी वेळोवेळी आक्रमणे केली. हे शहर व किल्ला प्रत्येकाने ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. माझे शिक्षण बांदा या गावी झाले; पण तापकीर यांनी दिलेली माहिती माझ्यासाठी व अनेक बांदेकर मंडळींनाही नवी असावी (बांद्याचा किल्ला). अशी भरपूर  माहिती  तापकीर यांनी खूप कष्ट  घेऊन संकलित केली आहे.

फुकेरी गावात असणाऱ्या  ‘हनुमंतगडा’वरही तापकीर यांनी लिहिले आहे; पण त्यांनी हा लेख लिहिताना प्रा. वि. सी. सातवळेकर सर यांचा किंवा मी स्वतः लिहिलेला लेख अभ्यासणे आवश्यक होते. शिवाय, अलीकडे या किल्ल्यावर काही दुर्गप्रेमींनी, संस्थांनी एकत्र येऊन, श्रमदान करून गडरक्षणाचे कार्य केले आहे. त्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. दुसऱ्या आवृत्तीत याचा अवश्य विचार करावा. चंद्रोबा सुभेदार यांनी निपाणीकरांचा पराभव केला. १८३२मध्ये हनुमंतगड पुन्हा सावंतवाडीकरांच्या ताब्यात आल्यावर गडावर असलेल्या किल्लेदार, गडकरी, कामकरी यांच्याविषयीची माहिती महत्त्वाची आहे; मात्र या लेखनात आवश्यक मूळ संदर्भ कोठून मिळवले, याचा उल्लेख लेखकाने करणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील आवृत्तीत ते अवश्य द्यावेत, असे मी सुचवेन!

या पुस्तकातून दक्षिण कोकणाच्या ऐतिहासिक घटना, प्रसंग, वास्तू यांचे अत्यंत महत्त्वाचे दर्शन वाचकाला घडते, यात संशय नाही. म्हणून मी पुन्हा एकदा या ग्रंथाचे लेखक संदीप भानुदास तापकीर यांचे विशेष अभिनंदन  करतो. खरे तर हे पुस्तक लिहून आम्हा मालवणी इतिहासप्रेमी मंडळींना त्यांनी ऋणातच ठेवले आहे, असे मी म्हणेन. अर्थात, यापूर्वी ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले’ या शीर्षकाचे एक रंगीत पुस्तक सांगली येथील सतीश अक्कलकोट यांनी २०१३मध्ये प्रकाशित केले होते (सह्याद्री प्रकाशन, सांगली). संदर्भ म्हणून तेही महत्त्वाचे आहे. आदरणीय गो. नी. दांडेकर, प्र. के. घाणेकर, सतीश लळीत व मी स्वतः व अशा अनेकांनी दक्षिण कोकणातील गड-कोटांवर सातत्याने स्थानिक वृत्तपत्रे, माहिती पुस्तिका यांतून लिहिले आहे. या विषयावर महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क खात्यातर्फे एक ध्वनिचित्रफीत बनविण्यात  आलेली आहे. सिंधुदुर्ग पर्यटन करणाऱ्या  प्रत्येकाच्या  हाती हे  पुस्तक आले, तर ‘मालवण- तारकर्ली’पुरती बंदिस्त झालेली ‘सिंधुदुर्गची सफर’ आणखी दोन दिवस वाढू शकेल, अशी खात्री मला वाटते.

शेवटी, माझे या क्षेत्रातील आदरणीय (ज्यांना मी प्रत्येक गडावर गेल्यावर तेथून पत्र लिहीत असे, त्या दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर यांच्या शब्दांत सांगावे तर असे… ‘दुर्ग, गडकोट पाहणे, हा श्रीमंती छंद आहे. आयुष्य त्यामुळे समृद्ध  होते. आयुष्यात तो एकदा लागला, म्हणजे कायमचाच! गड-कोट पाहून, सफर करून उपेक्षेच्या ओझ्याखाली दडपलेले हे किल्ले पाहण्याचे आपले वेड वाढते राहो!’ (११-०४-१९९०)… आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘आपण गड-कोटांवर माया करता, खरोखरच मनापासून आनंद होतो. आज हे गडकोट बेवारशी वृद्धांप्रमाणे खिन्न, उदास होऊन मरणाची वाट बघत आहेत. एके काळी या देशाचं भाग्य या गड-कोटांनी उजळवलं; पण आज या स्थळांची भयाण अवस्था झालेली आहे. आपण नव्या रक्ताच्या तरुणांना या गड-कोटांचे महत्त्व पटवून देत आहात. तरुण या प्रेरणेतून स्वतःच गड-कोट बनतील आणि आपल्या आजच्या हिंदवी स्वराज्याचा ‘यशकीर्ती प्रताप महिमा’ वाढवतील, अशी खात्री वाटते. याचे स्फूर्तिस्थान हे गड-कोटच असतील. गड-कोटांनाही यातच धन्यता वाटेल!’

 प्रा. डॉ. बाळकृष्ण रामचंद्र लळीत

पुस्तकाचे नाव – मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले
लेखक – संदीप भानुदास तापकीर
प्रकाशक – विश्वकर्मा प्रकाशन, पुणे
किंमत – २७५ रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

”कोल्हापुरी चप्पल” घालूया.. कोल्हापूरची ओळख जपूया..! – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कशाने येते मनास स्थिरता ?

गुळवेल विषारी नसल्याचे आयुष मंत्रालयाचे स्पष्टीकरण

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading