नामांकित सरकारी महाविद्यालयापेक्षा नामांकित खाजगी शिकवणीला प्रवेश घेणे प्रतिष्ठेचा प्रश्न मानला. त्यातही कहर म्हणजे शिकवणीसह एकात्मिक महाविद्यालय (Integrated College) घेणे कसे गरजेचे आहे हे पालकांना पटवून अजून शुल्क आकारून खाजगी शिकवण्या बक्कळ पैसा कमवू लागल्या.
अॅड. सौ. सरीता सदानंद पाटील.
वेदांत कॉम्प्लेक्स,ठाणे (प).
भारतीय संविधानानुसार( ८६ वी घटनादुरुस्ती) कायदा,२००२ अनुच्छेद २१अ (भाग ३) नुसार सर्वांना वयाच्या १४ वर्षापर्यंत म्हणजेच १ ली ते ८ वी पर्यंतचे शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले आहे. भारतीय घटनेनुसार शिक्षण हा प्रत्येक नागरिकाला मुलभूत अधिकार दिलेला आहे. साधारण नव्वदच्या दशकापर्यंत शिक्षण हे फक्त आणि फक्त खेड्यांतून जिल्हा परिषदेच्या वा शहरातून महानगर पालिकेच्या शाळांतून अगदी मोफत दिले जाई. त्यामुळे खाजगी शिकवण्या त्यावेळी अस्तित्वातच नव्हत्या असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. त्या काळात कुठेतरीच घरगुती शिकवण्या अगदीच बेताच्या मुलांसाठी लावल्या जायच्या. त्याही अगदी मोफत किंवा तुटपुंज्या रकमेत दिल्या जायच्या. मग जो काही बोर्डचा निकाल येईल तो अगदी प्रत्येकाच्या मेहनतीवर व हुशारीवर अवलंबून असे. मध्यम व उच्च- मध्यम वर्गीयातील मुले दहावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी जवळच्या तालुक्यात किंवा थोड्या दूर शहरात जात. नव्वदच्या दशकानंतर फक्त ११ वी व १२वी विज्ञान शाखेसाठी हुशार मुले डॉक्टर वा अभियंता होण्यासाठी किंबहुना थोड्क्यासाठी आपला प्रवेश हुकु नये म्हणून हळूहळू ह्या शिकवण्या लावू लागली. मग मात्र काळानुसार सर्वच मुले परवडत नसले तरी काही तरी करुन शिकवण्या लावू लागली आणि त्यानंतर मात्र कालांतराने कुत्र्याच्या छत्री सारख्या गल्ली बोळात शिकवण्यांचे पेव फुटले आणि त्यानंतर मात्र ह्या शिकवण्यांचा वटवृक्ष कधी झाला हे कोणालाच कळले नाही.
मग मोठ्या शहरात खाजगी इंग्रजी माध्यमाच्या अगदी टकाटक दिसणाऱ्या शाळा सुरु झाल्या. मग मराठी माध्यमातून शिकून शहरात येऊन नोकरी धंदे करणारे पालक सुध्दा आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या त्याहून पुढे (CBSE, ICSE,IB) या शाळेत घालू लागले आणि मग भाषेची अडचण येवू लागली आणि खाजगी शिकवण्या लावण्यावाचून पर्याय उरला नाही. आणि हळूहळू शाळेतील शिक्षणाकडे कानाडोळा होऊ लागला. त्यानंतर सरकारी शाळांकडे लोकांनी पाठ फिरवून खाजगी इंग्रजी शाळांत मुलांना प्रवेश घेऊ लागले. काही हुशार मुले सोडली तर सर्वच मुले खाजगी शिकवण्या लावून परीक्षार्थी बनून फक्त जास्त टक्केवारी मिळवू लागली. मग गुणांच्या स्पर्धेत खरी गुणवत्ता मागे पडून फुगलेली गुणवत्ता पालकांना व शिक्षकांना आकर्षित करू लागली . त्यासाठी मग वाट्टेल ती फी भरून गरीब श्रीमंत सर्व पालक खाजगी शिकवण्या लावू लागले. मातृभाषेतून शिक्षण नसल्या मुले पालकांना मुलांचा अभ्यास घेणे अडचणीचे ठरले. इंग्रजी न येणाऱ्या पालकांनी तर १०० टक्के शिकवण्यावर भरवसा ठेवला. आणि आपल्या पाल्याची खरच अभ्यासात प्रगती होते कि फक्त तो/ती गुणांच्या स्पर्धेत धावत आहे याकडे कोणीही लक्ष दिले नाही. मग शाळा महाविद्यालयातून शिक्षकांचे मन लावून शिकवणे हळूहळू बंद नाही झाले तर नवलच नाही का ?
याचा सर्वात कहर म्हणजे सध्या शहरातून ११ वी १२ वी विज्ञान शाखेसाठी ज्या लोकप्रिय मोठ्या शिकवण्या आहेत त्यांचे दहावीची परीक्षा झाल्या झाल्या पालकांना आपणहून फोन करुन मार्केटिंग सुरु झाले. आपलीच शिकवणी कशी भारी याची आणि १०० टक्के यशाची खात्री देऊ लागले. तुमच्या पाल्याला नामांकित महाविद्यालयात प्रवेश नक्की मिळेल याची खात्री देवून पालकांना आकर्षित करुन आय.आय. टी. , एन.आय. टी. वा स्वायत्त महाविद्यालात प्रवेश नक्की मिळेल यांचे आमिष दाखवून प्रसंगी थोडीसी शिष्यवृत्तीची लालच देऊन पालकांना प्रवेश घेण्यास भाग पाडू लागले. पालक व विध्यार्थी आय. आय. टी. , एन.आय. टी. वा स्वायत्त महाविद्यालातील प्रवेशाची व त्यानंतर चार वर्षानी आपल्याला गलेलठ्ठ पॅकेजची नोकरी लागेल याची स्वप्ने पाहतात. दहावीमध्ये ८० ते ९० टक्के गुण मिळाले कि सर्व पालक व पाल्य खुश होतात आणि या फक्त दोन वर्षांच्या शिकवणीला प्रत्येक पाल्यामागे ३ ते ८ लाखात फी मोजून आपल्या पाल्याची बुद्धिमत्ता न बघताच प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली. हळू-हळू कोल्हापूर, पुणे, ठाणे, डोंबिवली, कल्याण, मुंबई आदी शहरात या शिकवण्यांचे गल्लोगल्ली प्रस्थ वाढून शिक्षणाचा बाजार झाला आणि मोठे उद्योगपती सुद्धा या धंद्यात उतरून अजून बक्कळ पैसा कमवू लागले.
नामांकित सरकारी महाविद्यालयापेक्षा नामांकित खाजगी शिकवणीला प्रवेश घेणे प्रतिष्ठेचा प्रश्न मानला. त्यातही कहर म्हणजे शिकवणीसह एकात्मिक महाविद्यालय (Integrated College) घेणे कसे गरजेचे आहे हे पालकांना पटवून अजून शुल्क आकारून खाजगी शिकवण्या बक्कळ पैसा कमवू लागल्या. महाविद्यालयात न जाण्यासाठी अधिक १ ते २ लाख भरणे हे काही अपवाद वगळता सर्वच पालकांनी मान्य केले कारण का तर महाविद्यालयात नाही गेले तरच आपला/ली पाल्य दिवसाचे २४ तास अभ्यास करू शकतो अन्यथा नाही. या महाविद्यालयांचे व शिकवण्यांचे लागू बंधू (Tie Up) असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे पाल्याची महाविद्यालयात न जाता ७५ टक्के हजेरीची अट आधी पैसे देऊन आपोआप पूर्ण झाली. पण एवढी गडगंज फी भरून या तथाकथित शिकवण्यांमधून सामान्य मुलांची कदर न करता वरच्या पातळीने शिकवले जाते हे पालकांना व पाल्याना समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
आम्ही जेइई अॅडव्हान्स, जेईई मेन्स, सी. ई. टी आणि नीट या प्रवेश परीक्षाची खूप चांगली तयारी कारण घेऊ याची खात्री शिकवणीतले शिक्षक देतात त्यामुळे पालक फारच बिनधास्त होतात. या तिन्ही परीक्षा अभियांत्रिकी मध्ये अनुक्रमे आय.आय टी. , एन.आय टी. व स्वायत्त महाविद्यालातील प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असतात. आणि नीट हि प्रवेश परीक्षा संपूर्ण भारतातील वैद्यकीय महाविद्यालातील प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असते. पण खरे सांगायचे तर अभियांत्रिकी सी. ई. टी मध्ये २०० पैकी किमान १५० गुण मिळाले तर प्रत्येक राज्यातील सरकारी किंवा स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालातील प्रवेश निश्चित मिळतो. त्यामुळे महाराष्ट्रातील वरच्या दर्ज्याच्या आठ महाविद्यालयात प्रवेश मिळून चांगल्या नोकरीची हमी पण असते. कारण सी. ई. टी मध्ये नकारात्मक गुण पद्धत नसते. पण जेइई अॅडव्हान्स, जेईई मेन्स या दोन्ही परीक्षा संपूर्ण भारतात राष्ट्रीय चाचणी एजेन्सी (National Test Agency ) आयोजित करते. त्यामुळे या परीक्षांचा NCERT चा अभ्यासक्रम खूप कठीण असतो शिवाय या परीक्षांमध्ये नकारात्मक गुण पद्धत असते. या जेईई मेन्सला दरवर्षी साधारण साढे-आठ लाख विद्यार्थी बसतात आणि त्यातून दीड लाख विद्यार्थी जेइई अॅडव्हान्स अॅडव्हान्सला पात्र ठरतात. जेइई अॅडव्हान्स अजूनच कठीण असते. कारण या दीड लाखमधून केवळ ४०,००० विद्यार्थी जेइई अॅडव्हान्स मध्ये यशस्वी होतात. या ४०,००० मधून फक्त १०,००० विध्यार्थ्यांना वरच्या २३ आय.आय टी. महाविद्यालयात प्रवेश मिळतो . आणि त्यानंतर एन.आय टी. मधील महाविद्यालयात साधारण २०,००० -२५००० सीट्सना जेईई मेन्सच्या गुणांवर प्रवेश मिळतो आणि साधारण ५००० (सीट्सना) विध्यार्थ्यांना ट्रिपल आय.आय टी (IIIT) मध्ये प्रवेश मिळतो. म्हणजे साढे-आठ लाख पैकी साधारण ४०,००० विद्यार्थीच आय.आय टी, एन.आय टी, व ट्रिपल आय.आय टी, सारख्या महाविद्यालयात प्रवेशास पात्र ठरतात. म्हणजे केवळ ५ टक्के विद्यार्थी पात्र ठरतात.
त्यामुळे शिकवण्यामधील ९५ टक्के विद्यार्थी असे असतात की ज्यांची सामान्य बुद्धी असते मात्र ते जेइई एडव्हान्स, जेईई मेन्सच्या मागे लागून भरडले जातात. या विध्यार्थ्यांना अगदी बेसिक पासून शिकवावे लागते पण या शिकवण्यामधून एकदम वरच्या पातळीने शिकवले जाते. दोन वर्षातले पहिले सहा महिने या मुलांना काहीच समजत नाही. मग ते नाराज होतात कारण शुल्क तर भरलेले असते. खरे तर या शिकवण्यामधून एम. .एच.टी सी. ई. टी. ची तयारी सुद्धा करुन घेतली पाहिजे. आणि पालकांनी पण आपल्या मुलाची बुद्धिमत्ता ओळखून फक्त सी. ई. टी वर लक्ष केंद्रित करायला सांगितले पाहिजे की जेणेकरून आपल्या पाल्याला निदान स्वायत्त/ अनुदानित महाविद्यालयात प्रवेश नक्की मिळून त्याला कॅम्पस मधून चांगली नोकरी सुद्धा मिळू शकते. कारण काय होते की जेइई एडव्हान्स, जेईई मेन्सच्या मागे लागल्यामुळे सी. ई. टी चाही अभ्यास होत नाही आणि जेईई मेन्स व जेइई एडव्हान्सचाही. मग एवढे लाख खर्च करुन “तेलही नाही तूपही नाही हाती धुपाटणे राहिले” अशी परिस्थिती पालक आणि पाल्य या दोघांचीही होते आणि काही मुले तर नैराश्याची शिकार होतात. कारण जानेवारीनंतर फेब्रुवारीमध्ये बोर्ड परीक्षा चालू होते तर त्यामध्ये १ महिना निघून जातो. मे च्या पहिल्या आठवड्यात अभियांत्रिकीची सी. ई. टी असते. त्यामुळे फक्त १-१.५ महिन्यांमध्ये पुरेसा अभ्यास होत नाही. मग तिथेही मुले मागे पडतात. कारण जो सी. ई. टी चा अभ्यासक्रम फक्त ११वी व १२ वी एच एस.सी चा असतो तो मुलांना सहज जमणारा असतो फक्त शिकवण्यामधून मुलांकडून थोडे जास्तीचे पेपर सोडवून सराव घेतला तरी चालतो आणि ही स्पीड टेस्ट असते. पण काही अपवाद वगळता सर्व शिकवण्यामधून जेईई मेन्समधूनच सी. ई. टी होतेच असे खोटे सांगितले जाते पण ते तसे होत नाही.
हे फक्त अगदी वरच्या ४०,००० मुलांच्या बाबतीत शक्य होते. बाकीच्या मुलांचा वेगळे ग्रुप करुन त्यांचा १२ वी सुरुवातीपासून सी. ई. टी व बोर्ड घेतले तर त्या मुलांना सी. ई. टी मध्ये चांगले गुण मिळून मेरिटवर चांगल्या महाविद्यालयात प्रवेश नक्की मिळून त्यंIच्या नोकरीचा प्रश्न सहज सुटू शकतो आणि पैसे पण वाया जात नाहीत. पण असे न होता जेईई मेन्स साठी सुरुवातीला अगदी सोप्या-सोप्या ४-५ लेसन वर चाचण्या घेतल्या जातात त्यामध्ये मुलांना १५०-२०० गुण मिळतात मग पालक व मुले खुश होतात. पण हे अर्धसत्य आहे पूर्ण ११वी अशीच निघून जाते. सत्य असं आहे की फिजिक्स व गणित मधील अवघड लेसन उदा. अनुक्रमे मेकॅनिक्स व लॉजिक, कॅलक्यूलस, मॅट्रायेसेस ई. नंतर सुरु करतात. हे लेसन साधारण मुलांना अवघड जातात. कारण साधारण मुलांचे फिजिक्स व गणितचे कन्सेप्ट क्लिअर नसतात. नुसता रट्टा मारून ह्या परीक्षांचा अभ्यास होत नाही . मग साधारण १ वर्षांनी तुमच्या पाल्याला जेईई मेन्स जमत नाही म्हणून सांगायचे आणि मग समजून सांगणेकडे दुर्लक्ष होते. मग काही अपवाद सोडले तर बर्याच शिकवण्या मधून १२ वीचा अभ्यासक्रम नोव्हेंबर आला तरी संपवत नाहीत .त्यामुळे सर्व अभ्यासक्रमावर म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र व गणित या तिन्ही विषयातील सर्व लेसन वर सराव परीक्षा पुरेशा घेतल्या जात नाहीत कारण जानेवारी दुसऱ्या आठवड्यात पहिली व एप्रिल मध्ये दुसरी जेईई मेन्स राष्ट्रीय चाचणी एजेन्सीकडून घेतली जाते. निकाल दहा दिवसांनी जाहीर होतो पण सर्व साधारण मुले यामध्ये ३०० किंवा ३६० पैकी १०० गुण सुद्धा मिळवू शकत नाहीत. काहीजण केवळ १०० ते १२० गुण मिळवून फक्त अॅडव्हान्स पात्र ठरतात पण नुसते पात्र ठरून काहीच उपयोग होत नाही.
बाकीची काही जण स्वतः अभ्यास करुन सी. ई. टी पार करतातही. खूप कमी मुले सी. ई. टी मधून मेरीट मिळवून राज्यातील वरच्या आठ उदा. सी.ओ.ई.पी. , वी.जे.टी.आय., एस.पी., एम.आय.टी., डब्लू.सी.ई. ई. महाविद्यालयात प्रवेश मिळवतात. पण उरलेल्या आठ लाख पैकी साधारण सात लाख मुले उगाच ५ते ८ लाख फी भरून एकाही परीक्षेत यशस्वी होत नाहीत. आणि मग पुन्हा खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात जेथे प्लेसमेंट नाही तिथे भरपूर फी भरून मिळेल त्या शाखेला प्रवेश घ्यायचा. हे ११वी व १२ वी चे शुल्क आणि पुन्हा चार वर्ष अभियांत्रिकीचे शुल्क भरून मध्यमवर्गीय पालक अगदी मेटाकुटीला येतात. पण काही पालक तर कर्ज काढून मुलाची फी भरतात. एवढे करुन फक्त २०-२५ हजाराची नोकरी मिळते आणि दोघानाही फक्त मनस्ताप होतो.
हे सर्व कुठेतरी थांबले पाहिजे. हे सर्व टाळण्यासाठी निदान अभियांत्रिकीसाठी शिकवणी लावताना काही उपाय सुचवू इच्छिते.
१) पहिले तर पालकांनी आपल्या पाल्यास ‘ए’ ग्रुप कि ‘बी’ ग्रुप ठेवायचा आहे हे निश्चित करावे.
२) पालकांनी व पाल्यांनी अनुक्रमे आपल्या पाल्याची व स्वतःची बुद्धिमत्ता ओळखून फक्त सी.ई.टी. ची तयारी करायची की जेईई मेन्स व जेइई एडव्हान्स हे निश्चित करून तसे शिकवणी मध्ये सांगावे.
३) शिकवण्यामधून पण बुद्धिमत्ता ओळखून सी. ई. टी. ची तयारी करणाऱ्या मुलांचा वेगळा विभाग करुन त्यांना तसे मार्गदर्शन करावे व तेवढीच फी आकारावी.
४) उगाच तिन्ही परीक्षांचा भडीमार करून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारू नये.
५) ज्या मुलांना खरोखर जेईई मेन्स व एडव्हान्स करायचे आहे किमान दोन वर्षे नियमित दहा-बारा तास अभ्यास करावा. एवढे जमत नसेल तर ११वीतच सहा महिन्यानंतर सी.ई.टी वर फोकस करावे.
६) शिकवण्यामधून १२ वी च्या सप्टेंबर शेवटपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करुन भरपूर पेपर सोडवून त्यांचे मूल्यांकन करुन द्यावे व त्यानुसार मार्गदर्शन करावे.