कौरव पांडवांच्या युद्धात कौरवांचा पराभव होतो. सर्व कौरव मारले जातात. धृतराष्ट्राचे पुत्र मारले जातात. दुर्योधनाचा वध भीम करतो. युद्ध समाप्तीनंतर धृतराष्ट्र पांडवांना भेटायला येतो. अर्थात तो भीमालाही भेटतो. गळाभेटीत धृतराष्ट्र भीमाला चिरडून मारण्याचा त्याचा डाव असतो. दुर्योधनाच्या वधाचा राग त्याच्या मनात असतो. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की दुसऱ्यावर विजय मिळवला तरी शत्रू पक्षाच्या मनातील राग, द्वेष कधीही जात नाही.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती ।
जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिका ।। २१२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा
ओवीचा अर्थ – देशोदेशींचे राजे भाट बनून तुझी कीर्ति वाखाणतात, ती ऐकून यमादिका नाहि धास्ती पडते.
चक्रवर्ती, सम्राट, बाहुबली, छत्रपती असे सार्वभौम राजांचे व्यक्तिमत्त्व कसे असते. नुसता राज्याभिषेक झाला म्हणजे तो छत्रपती झाला असे होत नाही. किंवा दरबारात शाहीर आणि भाट बसवून गोडवे गायीले म्हणजे सम्राट होत नसतो. सध्याच्या राजकारणासारखे मतांची बेजमी करून, नावाची हवा करूनही राजे होता येत नाही. दुसऱ्याची राज्ये बळकावूनही महान राजा होता येत नाही. मग कसे होता येते छत्रपती. जनतेला न्याय मिळेल असा कारभार करून, पराक्रम करून जनतेत विश्वास निर्माण करून संपन्न असे सुराज्य उभे करणे हे राजाचे ध्येय असायला हवे. यासाठी जनतेच्या मनातील भाव ओळखता यायला हवे. प्रत्येकवेळी जनता न्यायासाठी याचना करेलच असे नाही, पण न्याय देण्यासाठी स्वतः तत्पर असायला हवे. प्रसंगी स्वतःच्या जीवाची बाजीही लावता यायला हवी. जनतेच्या न्याय हक्कासाठी लढण्याची तयारी हवी. असा न्याय मिळालेली जनताच उत्स्फुर्तपणे राजाचे गोडवे गाते. हे गोडवे पिढ्यानपिढ्या गायीले जातात. कारण न्याय मिळालेली जनताच राजावरील प्रेमापोटी ते सुराज्य उभे करते अन् चालवतही असते. असा हा राजा जनेतेच्या प्रेमातूनच अवतार घेत असतो. अशा राजाची स्तुती देशोदेशीचे राजेही कायम करत राहातात अन् त्या राज्याकडे वाकड्या नजरेने पाहाण्याचे धाडसही ते कधी करू शकत नाहीत. इतकी धास्ती त्यांच्या मनात भरलेली असते.
अशी ही राजेशाही आता अस्तित्वात नाही असे जरी असले तरी राजा अन् राजाचे वारसदार आजही आहेत. न्याय दानातून ते कधीही राजे होऊ शकतात. त्यासाठी तो राजा राजमहालातच जन्माला यावा लागतो किंवा तो राजमहालातच वाढावा लागतो असे नाही. द्वारकेचा कृष्ण गोकुळात सर्व सामान्यांच्यातच वाढला. ही भारतीय संस्कृती आहे. राजाचा अवतार हा सर्वसामान्यांच्यातच झाला आहे. राजेशाहीतच लोकशाही दडलेली आहे. ही भारतीय संस्कृती अभ्यासायला हवी. कारण राजाला लोकांनीच उभे केले आहे. स्वतःच्या न्याय हक्कासाठी जनतेनेच राजाच्या नावे उभा केलेले राज्य आहे. म्हणूनच आजही भारतात लोकशाही बरोबरच राजेशाहीचाही मान राखला जातो. जनतेच्या मनात राजाबद्दल नेहमी आदराची भावना असते कारण तसे न्याय देणारे व्यक्तिमत्त्व त्या राजात असते. हृद्यातून जनतेने त्या राजाचा स्वीकार केलेला असतो.
कौरव पांडवांच्या युद्धात कौरवांचा पराभव होतो. सर्व कौरव मारले जातात. धृतराष्ट्राचे पुत्र मारले जातात. दुर्योधनाचा वध भीम करतो. युद्ध समाप्तीनंतर धृतराष्ट्र पांडवांना भेटायला येतो. अर्थात तो भीमालाही भेटतो. गळाभेटीत भीमाला चिरडून मारण्याचा त्याचा डाव असतो. दुर्योधनाच्या वधाचा राग त्याच्या मनात असतो. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की दुसऱ्यावर विजय मिळवला तरी शत्रू पक्षाच्या मनातील राग, द्वेष कधीही जात नाही. तो उफाळून येतोच. यासाठीच युद्धाने, लढाईने जग जिंकता येत नाही. ते प्रेमाच्या सुराज्यानेच जग जिकायला हवे. दुसऱ्याच्या मनातील कट-कारस्थान आपण संपवू शकलो तर निश्चितच शत्रूवर खऱ्याअर्थाने आपण जिंकलो असे म्हणता येईल. यासाठीच स्नेहाची, प्रेमाची जनताच सुराज्य उभे करते. राजेशाही असो वा लोकशाही दोन्हींसाठीही हाच नियम आहे. यातूनच मग खरे छत्रपती, सम्राट, बाहुबली जनतेच्या प्रेमापोटीच जन्मला येतात. अवतार घेतात. ही भारतीय संस्कृती आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.