एकिकडे मानवी जीवन सुरक्षित राहावे, यासाठी कायम प्रयत्न करणारा हा संशोधक, स्वत:चे राष्ट्रप्रेम सिद्ध करण्याच्या नादात इतका वाहवत गेला की त्याची ओळख ‘खूनी’ अशी बनली. त्यांना स्वत:च्या कृत्याची इतकी भीती होती की ते नोबेल पुरस्कार घेण्यासही गेले नाहीत.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
आयुष्य कसे जगायचे, हा ज्याचात्याचा प्रश्न. मात्र आपण समाजात, गावात राहतो, ज्या देशात राहतो, त्या समाजावर, गावावर आणि देशावर प्रत्येकाचे प्रेम असलेच पाहिजे. मात्र ते राष्ट्रावर, देशावर असले पाहिजे. राष्ट्रप्रेम हे समाजातील कोणत्याही घटकाच्या, मानवतेच्या विरोधात नसले पाहिजे. आज जगातील पाच लोकांपैकी दोन लोकांचे जीवन ज्या संशोधकामुळे आहे, असे विज्ञान जगत मानते, त्यालाच खूनी संशोधक म्हणूनही ओळखले जाते. जगात शांती नांदण्यासाठी ज्याचे संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरले, त्यानेच लाखो लोकांना मारणारे संशोधन करून, ते त्या देशाच्या तत्कालीन नेतृत्वास पुरवले. विज्ञानातील संशोधन कधीच वाईट नसते. कोणताही शोध वाईट नसतो. त्याचा वापर चांगला किंवा वाईट असतो. आपल्याच संशोधनाचा वाईट वापर करणारा, हा संशोधक म्हणजे, फ्रिटझ हाबर.
फ्रिटझ हाबर यांचा जन्म प्रशियात १८६८ मध्ये झाला. आज त्यांचे जन्मगाव पोलंडचा भाग आहे. जन्माने ते ज्यू होता. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसातच आईचे निधन झाले. त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईशी त्यांचे सूर जुळले. मात्र वडिलांशी त्यांचा दुरावा अखेरपर्यंत होता. फ्रिटझला जगावेगळे आयुष्य जगायचे होते. देशामध्ये आपल्याला मानसन्मान मिळायला हवा, असे त्यांना वाटे. त्यांनी काही दिवस वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ते जमले नाही. त्यांना रसायनशास्त्रात रूची होती. मुलगा आणि वडील यांच्यात तीव्र मतभेद झाले. त्यांनी घर सोडले. तेथून पुढे फ्रिटझ यांची पुढे माणूसकी सोडून वागणारा क्रूर संशोधक अशी ओळख कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी जर्मनीतील स्थित्यंतर कसे झाले, हे समजून घ्यायला हवे.
फ्रिटझ तीन वर्षाचे असताना प्रशियन सत्ता संपुष्टात आली. राष्ट्रवादाने जोर धरला. त्यावेळी विल्यम कैसर याची सत्ता होती. त्यांच्या असे लक्षात आले की युरोपातील अन्य देशांच्या तुलनेत आपण खूपच मागास आहोत. त्यासाठी विज्ञान संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. यातूनच राष्ट्रवाद आणि देशप्रेम संकल्पनांचा जर्मनीत उदय झाला. देशप्रेमाच्या भावनेसोबत ज्यू धर्मियांविरूद्ध भावनाही तीव्र झाल्या. हिटलरला ज्यूद्वेष पसरवण्यासाठीची पार्श्वभूमी ३०-४० वर्षांपूर्वी अशी तयार झाली. दरम्यान फ्रिटझ घर सोडल्यानंतर खरेतर कंटाळले. त्यांची स्वप्ने खूप मोठी होती. त्यासाठी रसायनशास्त्र अभ्यासण्यासाठी बर्लिन गाठले. त्यांना तसे रसायनशास्त्र अवघड जात होते. त्यांनी विद्यापीठ बदलले. त्याचवेळी त्यांना जर्मनीतील वाढता ज्यू द्वेष जाणवला. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यांना केवळ सच्चा जर्मन नागरिक म्हणून सर्व मानसन्मान हवा होता. याच ध्येयामागे धावताना त्यांनी अनेक मानवतेच्या विरोधी गोष्टी केल्या. उठसूठ देशभक्ती सिद्ध करण्याच्या नादात एका चांगल्या संशोधकाचे काय होते, याचे हे डोळ्यात अंजन घालणारे उदाहरण आहे.
फ्रिटझ यांनी अत्यंत महत्त्वाचे केलेले संशोधन म्हणजे युरिया निर्मितीसाठीचे तंत्रज्ञान. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस कृषी उत्पादन वाढवण्याची नितांत गरज होती. त्यासाठी जमिनीतून पिकांना मोठ्या प्रमाणात नत्र मिळणे आवश्यक असते. मात्र वाढत्या शेतीमुळे दिवसेंदिवस मातीतील नत्र कमी होत होते. हवेत नायट्रोजन मोठ्या प्रमाणात असला तरी ते बाहेरून मातीत मिसळणे आवश्यक होते. यासाठी हवेतील नायट्रोजन पकडणे, वेगळा करणे आवश्यक होते. नेमका हाच प्रश्न घेऊन फ्रिटझ यांनी संशोधन केले. त्यांनी अमोनियाची निर्मिती केली आणि या शोधासाठी त्यांना १९१५ मध्ये नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. या संशोधनाच्या सहाय्याने युरियाची निर्मिती सुरू झाली. बाहेरून नत्र पुरवता येऊ लागले. उत्पादनात भरीव वाढ झाली. यामुळेच जगातील पाचपैकी दोन नागरिक फ्रिटझ यांच्यामुळे जगू शकतात, असे मानले जाते. या शोधाने हवेतून ब्रेड काढणारे शास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख झाली.
त्यांनी इतरही अनेक शोध लावले. त्या शोधावर आधारित पुस्तकेही लिहिली. हायड्रोकार्बनच्या ज्वलन आणि विघटनाबाबतही त्यांनी मूलभूत संशोधन केले. वाफेच्या इंजिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. खाणीतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही त्यांनी संशोधन केले. एकिकडे मानवी जीवन सुरक्षित राहावे, यासाठी कायम प्रयत्न करणारा हा संशोधक, स्वत:चे राष्ट्रप्रेम सिद्ध करण्याच्या नादात इतका वाहवत गेला की त्याची ओळख ‘खूनी’ अशी बनली. त्यांना स्वत:च्या कृत्याची इतकी भीती होती की ते नोबेल पुरस्कार घेण्यासही गेले नाहीत. पुढे ते १९१९ मध्ये तो त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांना फार मोठा जर्मन नागरिक व्हायचे असल्याने, स्वत:चे राष्ट्रप्रेम सिद्ध करण्यासाठी चूकीच्या गोष्टी करत राहिले.
पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांनी क्लोरिनचा शोध लावला. क्लोरिनमुळे बेल्जियममधील इप्रसमध्ये १९१५ साली अकराशे सैनिक मृत्यूमुखी पडले. क्लोरिन फुफ्फुसात गेले की तेथे हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होते. ते सर्व पेशी नष्ट करत जाते. क्लोरिन बाधेवर वेळीच उपचार न मिळाल्यास मृत्यू नाहीतर विकलांगता निश्चित. मात्र क्लोरिन प्रतिबंध करणारे तंत्र विकसीत झाले. त्यामुळे नव्या वायूची गरज भासली. फ्रिटझ यांनी तत्काळ फोसजिन वायू शोधला आणि त्याचाही वापर प्रथम इप्रसमध्येच करण्यात आला. हा वायू फुफ्फुसातील प्रथिनांशी संयोग पावत आणि रक्ताभिसरण थांबून मृत्यू येत असे.
पहिल्या महायुद्धात ९१ हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू विषारी वायुमूळे झाला. या शोधासाठी त्यांना कॅप्टन हे पद देण्यात आले. त्याची पार्टी सुरू असताना नवऱ्याच्या असल्या कामामुळे नाराज झालेली पत्नी कार्लाने आत्महत्या केली. तरीही फ्रिटझ काही सुधारले नाहीत. पहिल्या महायुद्धात जर्मनी हरली. जर्मनीवर बंधने घालण्यात आली. आर्थिक संकटातून जर्मनीला बाहेर काढण्यासाठी फ्रिटझनी समुद्रातून सोने मिळवण्यासाठी संशोधन केले. मात्र त्यांना यात यश मिळाले नाही. ज्यूंना मारण्यासाठी हिटलरने फ्रिटझ यांच्या संशोधनाचाच वापर केला. ख्रिश्चन धर्म स्विकारलेला असूनही एकदा विद्यापीठाच्या शिपायाने त्यांना ‘येथे ज्यूना प्रवेश नाही’ असे सुनावले. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. जर्मनीवर त्यांचे प्रेम हे एकतर्फी असल्याचे जाणवताच, ते अज्ञातवासात गेले. पुढे १९३४ मध्ये हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले, त्यांची एक खुनी संशोधक अशी ओळख ठेऊन!
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.