मनुष्य हा जन्मजात गुन्हेगार नसतो. त्याच्यासमोरची परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. प्राप्त परिस्थितीत जे सत्कर्म करावे लागते त्यास धर्म म्हणतात अशी धर्माची व्याख्या आम्ही यासाठीच केली आहे. या धर्माच्या चौकटीमुळेच आपल्यातील असुरी गुण नियंत्रणात राहातात. हे लक्षात घ्यायला हवे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
अहा सांगतां वाचा रडे । आठवितां मन खिरडे ।
करा रे मूर्खी केवढे । जोडिले निरय ।। ४२१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा
ओवीचा अर्थ – अरेरे ! त्या असुरांच्या कथा सांगताना वाचा रडकुंडीला येते, त्यांच्या कथेची आठवण झाली की मन मागें हटतें हाय हाय त्या मूर्खांनी केवढा नरक प्राप्त करून घेतला आहे बरे.
असुर हा कोणी एक व्यक्ती नाही, तर तो गुण आहे. ती वृत्ती आहे. एखादा समाज, जात किंवा व्यक्तीवर केलेली ही टीका नाही तर त्या वृत्तीवर केलेली टीका आहे हे लक्षात घ्यायला हवे. ही वृत्ती बळावते तेव्हा ती व्यक्ती असुरी होते. प्रत्येक मानवामध्ये हा गुण, ही वृत्ती असू शकते. पण ती सुप्तावस्थेत असेल तेवढे चांगले. त्या वृत्तीला जागे करणारे पोषक वातावरण निर्माण झाल्यास ती प्रकट होते. तेंव्हा त्यावर नियंत्रण मिळवणे तितकेच गरजेचे असते. पावसाळ्यात पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर शेतात तणे आपोआप उगवतात. तशी ही वृत्ती उत्पन्न होते. पण तणांप्रमाणे या वृत्तीलाही काढून टाकायला हवे. तरच मुख्य पिकाची वाढ जोमदार होईल. ही असूरी वृत्ती आपल्यात बळावणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी. मनाला तसे नियम लावून घ्यायला हवेत. तरच सदवृत्तीचे, सदविचाराचे पिक जोमदार वाढेल.
मनुष्य हा जन्मजात गुन्हेगार नसतो. त्याच्यासमोरची परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. प्राप्त परिस्थितीत जे सत्कर्म करावे लागते त्यास धर्म म्हणतात अशी धर्माची व्याख्या आम्ही यासाठीच केली आहे. या धर्माच्या चौकटीमुळेच आपल्यातील असुरी गुण नियंत्रणात राहातात. हे लक्षात घ्यायला हवे. एखादा आपल्यावर अन्याय करत असेल अन् आपण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता होणारा अन्याय सहन करतो आहोत हे किती योग्य असू शकते. ठराविक मर्यादेपर्यंत आपण होणारा अन्याय सहन करू शकतो. पण अन्यायाने मर्यादा ओलांडली तर मात्र अन्यायाविरुद्ध आवाज हा उठवावाच लागतो. म्हणूनच धर्माची व्याख्या प्राप्त परिस्थितीत करावयाचे सत्कर्म अशी केली आहे.
समाजात सर्वच व्यक्ती सारख्या नसतात. काही परिस्थितीचा फायदा उठवणारेही असतात. तर काही परिस्थितीनुसार इतरांचे शोषण करणारेही असतात. अशा वृत्तीच्या उच्चपदस्थ व्यक्तींमुळे मोठमोठाली साम्राज्येही नष्ट झाली आहेत. हा इतिहास आपण विसरता कामा नये. यासाठीच सत्ता कोणाच्या हातात द्यायची हे जनतेने विचार करून ठरवायला हवे. लोकशाहीत तर गुप्त मतदान आहे. मतदानातून आपल्या भावना आपण गुप्तपणे प्रकट करू शकतो. त्यामुळे इथे धोकाही कमी आहे. पण सध्यातर सर्वच पक्ष एकाच वृत्तीचे वाटू लागले आहेत. अशावेळी काय करायचे ? हा सुद्धा प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये यालाही पर्याय दिलेला आहे. पण त्याचा पर्याय प्रत्येक व्यक्ती करतोच असे नाही. यासाठीही आता प्रबोधनाची गरज आहे.
लोकशाही गुण्यागोविंदाने नांदावी, यासाठीच हे नियम केलेले आहेत. राजेशाहीत अशी संधी असू शकेल, असे सांगता येत नाही. असुरी राजाच्या राजवटी विरुद्ध जनतेनेच आवाज उठवला आहे, अन् त्या सत्ता उलथवून लावल्या आहेत. जनतेची संघटीत शक्ती हे कार्य करू शकते. जुलमी सत्ता उलथवण्याचे सामर्थ्य या संघटीत शक्तीत आहे. फक्त तशा क्रांतीकारी विचारांची गरज आहे. जुलमी सत्तेविरोधात अशा जनतेने क्रांती घडली आहे. अत्याचाराने मन सु्न्न होते इतका भयानक हाहाकार माजवल्यानंतर अशा कथांचा शेवट हा संघटीत शक्तीच्या क्रांतीनेच होतो हे मात्र लक्षात घ्यायला हवे.
असुरीशक्ती विरुद्ध संघटीत होऊनच लढा द्यावा लागतो. स्वतःच्या शरीरातील असुरी शक्ती विरुद्धही असाच इंद्रियांचा संघटीत लढा उभा करावा लागतो. असुरी विचारावर सर्व इंद्रियांवर नियंत्रण मिळवून उभे राहावे लागते. सर्व इंद्रियांचे संघटन करून त्यावर नियंत्रण मिळवून असुरी शक्ती विरुद्ध लढा उभा करायला हवा. सोहमच्या तलवारीला इंद्रियांच्या संघटीत शक्तीने धार येते. या संघटीत शक्तीनेच मग आत्मज्ञानाची क्रांती स्वतःमध्ये घडवता येते.