March 27, 2023
Zhadiboli literature function in Junasurla article by Laxman Khobragade
Home » आंतरिक जिद्दीचा यशस्वी सोहळा: २९वे झाडीबोली साहित्य संमेलन
काय चाललयं अवतीभवती

आंतरिक जिद्दीचा यशस्वी सोहळा: २९वे झाडीबोली साहित्य संमेलन

आंतरिक जिद्दीचा यशस्वी सोहळा: २९वे झाडीबोली साहित्य संमेलन

कित्येक क्षण जीवनाचे
झिजतोस लेका स्वतःसाठी ।
गर्व असावा मातीचाही
पेट एकदा गावासाठी ।।

🙏 लक्ष्मण खोब्रागडे 🙏

शाखाध्यक्ष
झाडीबोली साहित्य मंडळ जुनासुर्ला

कोरोनासारख्या महाभयंकर महामारीत सारे विश्व चिंतामग्न झालेले असताना ; मनाच्या गाभार्‍यात उफाळून आलेली प्रतिभा कवी म्हणून ओळख देऊन गेली. सतत मिळत गेलेली प्रेरणा आणि माझ्यात असलेला आत्मविश्वास यातून अवघ्या तीन महिन्यात मोरगाड आणि लिपन या दोन अस्सल झाडीबोलीतील काव्यसंग्रहाची निर्मिती करता आली. काव्यसंग्रहातील आशय आणि झाडीबोलीच्या ग्रुपवरील संवादामुळे सर्वांच्या नजरेत आल्याने मनात ठरवलेले पूर्णत्वास नेण्याची क्षमता माझ्यात असल्याचा विश्वास झाडीबोली केंद्रीय समितीला पटला. माझ्या ध्यानीमनी नसताना 29 वे झाडीबोली साहित्य संमेलन जुनासुर्ला (ता. मूल , जि. चंद्रपूर) येथे घेण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवण्यात आला. साहित्यक्षेत्रात नुकतेच पदार्पण झाले होते. आजवरी साहित्य संमेलन काय असते, याची साधी कल्पना नाही, कधी संमेलन बघितले नाही ; पण जीवनात संघर्ष किंवा वेगळेपण करून दाखवल्याशिवाय जगण्याला अर्थ नाही, या विचाराची पकड असल्याने तसेच जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर व ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांची साथ आणि मार्गदर्शन लाभणार असल्याने मी आव्हान स्वीकारले. त्याआधी ॲड. लखन सिंह कटरे सर यांच्याशी अरुण झगडकर यांच्यामार्फत संपर्क सुरूच होता, ही माझी जमेची बाजू. त्यांच्या विचारांचा बाणेदारपणा हा माझ्या हातून काहीतरी वेगळे घडवणार या ओढीने मी अधिक उत्साही, आनंदी झालो होतो.

29 व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचा विडा मी उचलला. नवखा असल्याने मला मार्गदर्शन करणारे जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांना यशस्वीततेबाबत शंका उपस्थित होण्याआधीच माझी सकारात्मकता पाहून थक्क व्हायचे. सर्व ठीक असले तरी ज्या गावात संमेलन घ्यायचे त्या गावाचे सहकार्य घेणे महत्त्वाचे होते. माझा गाव असल्याने मला वाटणारा अभिमान इतरांना पटवून देणे महत्त्वाचे होते. दुधात साखर पडावी अशी जमेची बाजू म्हणजे, गावचे प्रथम नागरिक माननीय रंजीत समर्थ आणि विरोधी बाकावर असलेले माझे लहान बंधू गणेश खोब्रागडे व मी; आमचा बालपण एकत्र गेल्याने संमेलन घ्यायचे आहे असे सांगताच त्यांनी होकार दिला. आमचे मार्गदर्शक किशोर आनंदवार; ज्यांच्या नेतृत्वात आम्ही घडलो त्यांची या कामी खूप मदत झाली. त्यांच्यासह माणिक पाटेवार व गावातील शासकीय सेवेत असलेले सर्व सुपुत्र , यांनी वातावरण निर्मिती केली. संमेलन कसे असतात आणि काय तयारी करावी लागते, यासाठी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर केंद्रीय अध्यक्ष डॉ. हरिश्‍चंद्र बोरकर , रामकृष्ण चनकापुरे , संतोष मेश्राम , प्रशांत भंडारे, वृंदा पगडपल्लीवार यांच्या नेतृत्वात अनेक सभा झाल्या. प्रत्येक सभेगणिक नवीन ऊर्जा घेऊन सरपंच रंजीत समर्थ आणि गणेश खोब्रागडे गावात वातावरणनिर्मिती करीत होते. त्यांचा उत्साह पाहून संमेलनाची यशस्विता माझ्या डोळ्यासमोर नाचत होती.

केंद्रीय समितीच्या एकमताने स्वागताध्यक्ष म्हणून रंजीत समर्थ तर कार्याध्यक्षपदी गणेश खोब्रागडे व सहकार्याध्यक्ष म्हणून खुशाल टेकाम यांची निवड करण्यात आली. परंतु जूनासुर्ला हा गाव पुरातन असून त्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. वैनगंगेच्या काठावर वसलेल्या या गावात वाकाटककालीन गुहा व मंदिरे असल्याने त्याचा इतिहास या संमेलनानिमित्त जगासमोर यावा, असा गावकऱ्यांचा सूर लक्षात घेऊन त्यादृष्टीने संमेलनाध्यक्ष निवडल्या जावा, याबाबत ॲड. लखन सिंह कटरे यांच्याशी विचारविनिमय करून अरुण झगडकर व बंडोपंत बोढेकर यांच्या माध्यमातून पुरातत्व अभ्यासक डॉ. मनोहर नरांजे यांची केंद्रीय समितीकडे शिफारस करण्यात आली. झाडीबोली समितीच्या केंद्रीय समितीने त्याला एकमताने मंजुरी देऊन गावाचा इतिहास उजेडात आणण्यास मौलिक पाऊल उचलले. सारे सोपस्कार पार पडल्यानंतर 12 व 13 मार्च 2022 ला 29 वे झाडीबोली साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित झाले.

शनिवार १२ मार्च २०२२ चा सूर्य उजाळला आणि सा. कन्नमवार साहित्यनगरी जूनासुर्ला येथे साहित्यिकांची रेलचेल सुरू झाली. गावकऱ्यांबरोबर रस्त्याला लागलेले क्रांतिवीर बाबुराव शेडमाके प्रवेशद्वार, महर्षी वाल्मिकी प्रवेशद्वार व संत रोहिदास प्रवेशद्वार स्वागतासाठी गर्वाने उभे होते. श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूलच्या पटांगणात उभारलेला शामियाना गर्दी पाहून हृदयातून गदगद होत होता. सकाळी १०:०० वाजता पुस्तकपोहा (ग्रंथदिंडीला) सुरुवात झाली आणि जनसागराला उधान आले. जनसागरात लोकपरंपरा दाखविण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या वेशभूषा व नृत्य आनंदाच्या लाटा उसळवत होत्या. केशवनाथ मंदिरापासून सुरू झालेल्या ग्रंथदिंडीचा प्रवास क्रांतिवीर बिरसा मुंडा पुतळा, अहिल्यादेवी पुतळा ओलांडून मारुतीच्या मंदिरापासून सारा गाव पालथा घालत संमेलनस्थळी पोहोचला. तिथे उसळलेली गर्दी आणि उत्साह संमेलनाच्या यशस्वीतत्तेचा परमोच्च शिखर म्हणावा लागेल.

या अफाट गर्दीच्या साक्षीने शाहीर नंदकिशोर मसराम यांनी गायलेल्या झाडीगीताने अवघा आसमंत डोलत होता. धुंद वातावरणात अतिथींचे आगमन, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या करकमलांनी झालेले उद्घाटन हर्षीताचा फवारा उडवत होता. आग ओकणाऱ्या सूर्याच्या उष्णतेची तमा न बाळगता सोहळ्यात उपस्थितांचे, आपल्या सुमधूर आवाजात अरुण झगडकर लिखित स्वागत गीत गाऊन विद्या कोसेने मंडप मंत्रमुग्ध केले. उद्घाटकीय भाषण व विजय वडेट्टीवार, मंत्री मदत व पुनर्वसन यांनी गावाकरिता वाचनालयसाठी ३० लाख व ग्रामपंचायतच्या नवीन इमारती करिता 25 लाख असे एकूण 55 लाखांची जाहीर केलेली मदत संमेलन घेण्याचे सार्थक देऊन गेले. मंत्री महोदयाकडून नगद मिळालेले ५१ हजार रुपये वेगळाच भाव खाऊन गेले. मान्यवरांच्या भाषणातून झाडीबोलीचा गोडवा आणि गावाचा इतिहास अधिकाअधिक प्रकाशित होत गेला. केंद्रीय अध्यक्ष डॉ. हरिश्‍चंद्र बोरकर यांचे मनोगत व ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांची प्रस्तावना साहित्य संमेलनाचे रेशिंबंध घट्ट विणत गेले. तर संमेलनाध्यक्ष डॉ. मनोहर नरांजे यांची कृतज्ञता व अभ्यासूवृत्तीतून साधलेला संवाद साहित्यिक व गावकर्‍यांच्या मनात घर करून बसला. आजवरी साहित्य संमेलनाबाबत अनभिज्ञ असलेला प्रत्येक भोळा गावकरी संमेलन घेण्याचे भाग्य लाभल्याची पुण्याई डोळ्यातून प्रसवत होता. अद्भुत, अविस्मरणीय या शेऱ्यांनी गावकऱ्यांचा ऊर भरून येत होता. आग ओकणारा सूर्यही या उत्साहापुढे लाजून सर्व क्षण आपल्या डोळ्यात नक्कीच साठवत असावा, इतका दृष्ट लागण्याजोगा सोहळा आजवरी कोणी पाहिल नसल्याचे उद्गार मेहनतीचे सार्थक करीत गेला.

उद्घाटनानंतरही शालेय विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध नृत्याची मेजवानी चाखत वाढलेली गर्दी आणि त्यांच्या समक्ष झालेले पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन झाडीबोलीची उज्ज्वल परंपरा वृद्धिंगत करीत होते. त्या परंपरेचे शिलेदार सक्षम व्हावे यासाठी ‘आता लिवा कता’ हा परिसंवाद झाडी शब्दसाधकात लेखनासाठी दहा हत्तीचे बळ भरून गेला. ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. परशुराम खुणे आणि ज्येष्ठ साहित्यिक ॲड. लखनसिंह कटरे यांच्या मुलाखतीतून झाडीपट्टी विभागाच्या गौरवासाठी त्याग भावना रुजत गेली. त्यानंतरच्या अशिक्षित स्त्रीयांनी गायलेल्या लोकगीतातून अशिक्षित असूनही मायबोली समृद्ध करणाऱ्या अलिखित ग्रंथाला अनुभवण्याची संधी प्राप्त झाल्याने सर्व धन्य पावले. कधी कीर्तनातून तर कधी हातचलाखीतून आपल्या विनोदी शैलीने अंधश्रद्धा, व्यसन व अनैतिकतेवर प्रहार करणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी हिरालाल पेंटर यांची लोकजागृती तर साहित्य संमेलनाचा कळस सोनेरी करून गेली. शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांची नृत्ये वन्स मोअरचे धनी ठरले. झाडीपट्टीच्या कृषिप्रधान संस्कृतीचा जल्लोष आपल्या दंडारितून मांडत गजानन दंडार मंडळाने सार्‍या गर्दीचा शीण घालवला.

13 मार्च 2022 दुसऱ्या दिवशी झाडीबोलीचा गुण व वैशिष्ट प्रतीत करण्यासाठी जवळपास 125 कवींनी आपल्या कविता सादर करून झाडी साहित्याचा प्रकाश पघरून दिला. लोकगीतातील गर्भ आणि त्यांचे कांगोरे उघडण्यासाठी ‘चला या ना ! गावा गाना !’ चर्चासत्र साहित्यिकांच्या विचारविश्वात भर घालून गेला. व्यक्तिमत्व विकासात प्राथमिक शिक्षण मोलाचे असून, प्राथमिक शिक्षण बोलीत देणे किती महत्त्वाचे आहे, यासाठी मान्यवरांनी मांडलेली मते प्राथमिक शिक्षणाची दशा आणि दिशा दाखवून गेली . ‘न भूतो न भविष्यती ‘, अशी मखलाशी चढलेल्या या 29 वे झाडीबोली साहित्य संमेलनाचा शेवट चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, संजय पाटील येनूरकर, डॉक्टर बळवंत भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या संमेलनात झाडीपट्टीच्या उद्धारासाठी ५ ठराव मांडण्यात आले. त्याची शासन दरबारी नक्कीच दखल घेतल्या जाईल, अशी अपेक्षा आहे. या संमेलनात जसे पाच ठराव मांडले गेले तसेच माझ्या दृष्टीने पाच अंगाने हा संमेलन ऐतिहासिक ठरला .

१) 29 व्या झाडीबोली साहित्य संमेलन निमित्ताने जूनासुर्ला या गावचा इतिहास उजेडात आला.
२) संमेलनाच्या यशस्वीततेसाठी सत्ताधारी आणि विरोधक पर्यायाने संपूर्ण गाव एकत्र येऊन झटला. गाव विकासासाठी एकीचे महत्व जाणीवपूर्वक रुजले.
३) साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गावात वाचनालयासाठी ३० लाखाचा निधी पालकमंत्री महोदयाकडुन प्राप्त झाला.
४) पालकमंत्री महोदयांच्या निधीतून ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीकरिता 25 लाखांचा निधी प्राप्त झाला.
५) साहित्य संमेलन कसे असते , हे आजवर न अनुभवलेल्या ग्रामस्थांना प्रत्यक्ष सहभाग घेता आला . आपली लोककला व लोकपरंपरा उजेडात आणता आली.

वाचत होतो लिहित होतो
पुस्तक प्रकाशित कधीकधी।
जिवंत कणकण गावाचा
धन्य केले देऊन संधी ।।

Related posts

दोन देशात घडलेली अद्भुत कहाणी…

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अविनाश ठाकरे

बोलीमुळेच मराठी अधिक समृद्ध : आचार्य ना. गो. थुटे

Leave a Comment