June 16, 2024
God in stone spiritual concept article by rajendra ghorpade
Home » दगडातले देवपण समजून घेऊन व्हा आत्मज्ञानी
विश्वाचे आर्त

दगडातले देवपण समजून घेऊन व्हा आत्मज्ञानी

देह आणि आत्मा वेगळा आहे. तसा तो दगड आणि चैतन्य वेगळे आहे. मानसिकतेमुळे ते एकच वाटते. अज्ञानी राहू नका ज्ञानी व्हा. देव व दगड यातील फरक ओळखा. हा फरक ज्याला समजला तो आत्मज्ञानी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

ऐसा विपायें देवो मानिजे । तरी पाषाणमात्रचि जाणिजे ।
आणि आत्मा तंव म्हणिजे । देहातेंचि ।। ५७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – कदाचित देव मानला तर याप्रमाणे तो देव म्हणजे फक्त दगडाची मूर्तीच समजतो आणि आत्मा तर देहालाच समजतो.

दगडी कोरीव बांधकाम असलेले एक पुरातन मंदिर होते. त्यामध्ये अनेक रूढी परंपरा चालत आल्या आहेत. त्या काळातील राजाने या परंपरा सुरू केल्या होत्या. गुन्हेगार गुन्हे कबूल करत नसत. त्यांना बोलते करणे हे राजासमोर मोठे आव्हानच होते. राजाने काही युक्त्या त्यावेळी लढविल्या. गुन्हेगारांना बोलते करण्यासाठी या मंदिराचा त्याने आधार घेतला. मंदिराच्या प्रांगणात राजाने एक मोठा गोलाकार कोरलेला दगड ठेवला. प्रत्येक भाविक हा देवाचा दगड समजून उचलून पाहत. अनेकांना हा देवाचा दगड सहज उचलला जायचा. तो दगड उचलण्यासाठी तशी मानसिक तयारी असावी लागते.

काही गोष्टी ताकदीपेक्षा युक्तीने लढल्या जातात. त्यात सहजता असते. त्यामुळे काही जण हा दगड अगदी सहजपणे उचलत असत. हा दगड तयार करण्यामागे राजाचा मुख्य उद्देश हा गुन्हेगारांना बोलते करणे हा होता. राजा त्या मंदिरात गुन्हेगारांना घेऊन येत असे व सांगत असे तू गुन्हा केला नाहीस ना मग उचल पाहू हा दगड. खोटे बोलणाऱ्यांना हा दगड कदापि उचलत नाही. प्रत्येक गुन्हेगार काही धडधाकट नसत. ते हा दगड पाहूनच खरे बोलण्यास सुरवात करत. काही धडधाकट गुन्हेगार मात्र हा दगड उचलण्याचा प्रयत्न करत. गुन्हेगारांना गुर्मीच असते हा दगड आपण सहज उचलू व राजाला मी गुन्हा केला नाही याचा प्रत्यय देऊ, पण खरा गुन्हेगार दगड उचलण्याआधी राजाच्या मानसिक प्रश्नांचा बळी जायचा.

राजा त्याठिकाणी गुन्हेगारांना अनेक प्रश्न करायचा. त्याची मानसिकता तपासायचा. गुन्ह्याची वारंवार त्याला आठवण करून द्यायचा. वारंवार गुन्ह्याची आठवण करून दिल्याने खऱ्या गुन्हेगाराची मानसिकता ढळायची. त्याच्याकडून तो दगड उचलला जात नसे. अखेर घाबरून तो सर्व गुन्हा कबूल करायचा. काही गुन्हेगार खरोखरच गुन्हा केलेले नसायचे पण काही कारणाने ते त्यात अडकले जायचे. ते त्या गुन्ह्याशी संबंधित नसल्याने त्यांच्यावर राजाच्या मानसिक तपासणीचा फारसा फरक पडायचा नाही आणि ते हा दगड सहज उचलत असत.

राजाची ही युक्ती दैवी शक्ती मानली जायची. पुढच्या काळात ही युक्ती गावागावात वापरली जाऊ लागली. काही गावांची ही परंपरा झाली. मानला तर तो देवाचा दगड होता. गुन्हेगार अचूक शोधायचा. गुन्हेगारांसाठी, चोरांसाठी तो दैवी दगड होता. कारण ते त्या दगडाला घाबरायचे. तो दैवी दगड नव्हताच मुळी तो केवळ एक दगडच होता. पण मानसिकतेने त्यात देवत्व आले होते. अज्ञानी व्यक्ती त्याला दैवी दगड समजायचे. अज्ञानी व्यक्तीच देहाला आत्मा समजतात. तसाच तो प्रकार होता. देह आणि आत्मा वेगळा आहे. तसा तो दगड आणि चैतन्य वेगळे आहे. मानसिकतेमुळे ते एकच वाटते. अज्ञानी राहू नका ज्ञानी व्हा. देव व दगड यातील फरक ओळखा. हा फरक ज्याला समजला तो आत्मज्ञानी.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts to your email.

Related posts

मराठी साहित्य संमेलन आयोजक संस्थाना अर्जाचे आवाहन

रानमाणूस प्रबोधनात्मक लघुपट (व्हिडिओ)

महाराष्ट्रात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषित

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading