भास्कर बंगाळे, शशिकांत हिंगोणेकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, छाया कोरेगावकर आदींचा सन्मान
उदगीर : तालुक्यातील देऊळवाडी येथील कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानच्या वतीने सन २०२२ चे मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतींना देण्यात येणारे पुरस्कार बुधवारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास केदार यांनी जाहीर केले आहेत.
पंढरपूर येथील कथालेखक भास्कर बंगाळे यांच्या “वाटणी “कथासंग्रहाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर जळगावचे कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या युद्धरत आणि लातूरचे कवी ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांच्या अभंग ज्ञानेश्वर या कवितासंग्रहास जाहीर करण्यात आले आहे.
कादंबरी विभागातून मुंबईच्या छाया कोरेगावकर यांच्या रिक्त -विरक्त या कादंबरीस तर चंद्रपूरचे डॉ. प्रा. अनंता सूर यांच्या साहित्य समीक्षा शोध आणि बोध या समीक्षा ग्रंथाला जाहीर झाले आहेत. संभाजीनगर येथील डॉ. रामकिसन दहिफळे यांच्या अहिल्याबाई होळकर या वैचारिक ग्रंथाला ही हा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई येथील सदस्य विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीत रसूल पठाण, प्राचार्य चंद्रशेखर कळसे, प्रा. रामदास केदार, प्रा. चंद्रकांत मोरे यांनी १५७ ग्रंथातून ही निवड केली असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास केदार, सचिव देविदास केदार यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. मे २०२३ मध्ये एका विशेष कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहेत.