March 25, 2023
Seeing and experiencing with the eyes of thoughts article by rajendra ghorpade
Home » विचारांच्या डोळ्यांनी पाहणे अन् अनुभवणे
विश्वाचे आर्त

विचारांच्या डोळ्यांनी पाहणे अन् अनुभवणे

विचारांना सुद्धा दृष्टी असते. ती दृष्टी सुद्धा चांगले विचार, वाईट विचार हे ओळखू शकते. म्हणजे विचारांच्या या दृष्टीचे कार्य कसे चालते हे जाणून घ्यायला हवे. या दृष्टीचा अनुभव घ्यायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

ऐसे विचाराचा डोळां । तिन्हीं गुण हे वेगवेगळां ।
दाविले जैसा आंवळा । तळहातींचा ।। 268 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ – तळहातावरील आंवळा जसा सर्व बाजूंनी दाखवावा, त्याप्रमाणे हे तिन्ही गुण विचारांच्या डोळ्यांना दिसतील असे दाखविले.

आपल्या मनात एखादा विचार आला की त्यानंतर त्याप्रमाणे आपण आपली कृती करतो. म्हणजेच आपल्या मनात तो विचार उत्पन्न होता तेंव्हाच आपणाकडून कृती होते. मनात उत्पन्न होणारे विचार शुद्ध असतील याची काळजी आपण घेतल्यास निश्चितच आपली सात्विक वृत्ती वाढेल. यासाठी मनात येणाऱ्या विचारावर नियंत्रण मिळवायला हवे. सदैव मनात चांगले विचार कसे उत्पन्न होतील याकडे लक्ष द्यायला हवे. मनाला अशुद्ध विचाराचा वासही लागणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. म्हणजेच मन सैदव चांगल्या विचारात गुंतवायला हवे. चांगल्या संगतील राहील्यास निश्चितच त्याचा परिणाम आपल्या मनावर होऊ शकतो.

विचारांना सुद्धा दृष्टी असते. ती दृष्टी सुद्धा चांगले विचार, वाईट विचार हे ओळखू शकते. म्हणजे विचारांच्या या दृष्टीचे कार्य कसे चालते हे जाणून घ्यायला हवे. या दृष्टीचा अनुभव घ्यायला हवा. आपण गाडी किंवा सायकल चालवत असतो तेव्हा अचानक कोणी समोर आले की आपोआपच आपला हात ब्रेकवर जातो. आपल्या मनात त्यावेळी अनेक विचार सुरु असतात, पण मन त्यात गुंतलेले नसते. म्हणजे विचारांच्या दृष्टीमुळे आपण ब्रेक लावतो. जर मन वेगळ्या विचारात गुंतलेले असेल आणि त्यातून आपण भानावर नाही आलो तर निश्चितच अपघात होतो. म्हणजे मन तिथे नसले तरी विचारांच्या दृष्टीमुळे ब्रेक दाबण्याची कृती घडते.

संगणकावर टाईप करताना आपली बोटे किबोर्डवर असतात. आपल्या मनात जे येते ते आपण टाईप करतो. पण कसे ? कारण तो किबोर्ड आपल्या मेंदूत साठवलेला असतो. मेंदूला चालणा दिल्यानंतर त्यातून जे प्रकट होते त्यानुसार किबोर्डवर आपली बोटे चालतात व त्यानुसार आपोआप शब्द उमटत जातात. मेंदूत किबोर्ड साठवलेला नसेल तर विचाऱ्यांच्या डोळ्याला तो पाहाता येणार नाही. म्हणजेच आपल्याकडून ती कृती होणार नाही. मेंदूत साठवलेला किबोर्ड विचाऱ्यांच्या डोळ्यांनी आपण तो पाहातो त्यावेळी आपली नजर किबोर्डवर नसली तरीही शब्द मात्र आपोआपच हवे तेच टाईप केले जात असतात. कारण सर्व किबोर्ड हा आपल्या मेंदूत साठवलेला असतो. तो साठवलेला नसेल तर आपण तो शोधत बसून टाईप करावे लागले असते. साठवलेले संदर्भ विचारांच्या डोळ्यांनी पाहीले नाहीत तर आपणास हवे असणारे विचार उमटणार नाहीत. म्हणजेच आपणाकडून योग्य ती कृती होणार नाही.

साधना करताना विचाऱ्यांच्या डोळ्याने सोहमचा स्वर अनुभवायचा आहे. त्या विचारात तो स्वर साठवायचा आहे. साधनेत निर्माण होणारे सात्विक, राजस, तामस भाव या विचारांच्या डोळ्यांनी पाहायचे असतात. अनुभवायचे असतात. पण यातून कोणताही भाव प्रकट करायचा नसतो तर तो फक्त अनुभवायचा असतो. त्यात गुंतून मात्र राहायचे नाही. या तिन्ही भावांचे अनुभवने जेव्हा संपते तेव्हा मग सोहमच्या स्वराचा नित्य अनुभव आपणास होऊ लागतो. त्या नित्यतेतूनच मग आपोआपच आत्मज्ञानाचा लाभ होतो. यासाठी ही प्रक्रिया समजून घेणे तसेच अनुभवने हे महत्त्वाचे आहे. विचारांना सुद्धा डोळे असतात हे समजून घेणे हे यासाठीच गरजेचे आहे.

Related posts

सकारात्मक विचारांची उभारू गुढी

समाधिपाद – साधनेत अडथळा ठरणारी विघ्ने कोणती ?

आत्मज्ञानानेच होतो संसारवृक्ष नष्ट

Leave a Comment