एकदा का तुम्ही त्यांच्या वर सगळा भार टाकून सद्आचरण करत असाल तर प्रत्येक संकटातून सुटका करून घेण्याचा मार्ग ते दाखवतात. दुःख सहन करण्याची शक्ती देतात.आणि अंती मोक्षपदाला नेतात.
सौ. सुनेत्रा जोशी
रत्नागिरी
अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम्।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।।
भावार्थ: त्या महान गुरुला माझे वंदन ज्याने मला पूर्ण ब्रह्मांडात व्यापून राहिलेल्या (अगदी सजीव आणि निर्जीवात सुद्धा) तो परमेश्वर आहे याचा अनुभव दिला…
आज गुरुपौर्णिमा…जीवनात गुरुंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक जण हा गुरुला शरणागत असतोच. तोच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. आणि अंती त्या परमात्म्याची भेट घडवून आणतो. गुरुवाचून गती नाही असे म्हणतात ते खरेच. नदी पार करण्यासाठी जसा नावाडी हवाच. तसेच हा भवसागर पार करायचा तर गुरु हवाच. पाणी कुठे खोल आहे. कुठे संकटाचा भोवरा आहे हे त्यांनाच कळते आणि ते टाळून पुढे कसे जाता येईल हे तेच सांगू शकतात.
प्रथम गुरु मातापिता असतात. ते आपल्याला चालणे बोलणे शिकवतात आणि चांगले संस्कार देतात. नंतर ज्ञान देणारे शिक्षक भेटतात. ते जगात जगण्यासाठी आवश्यक ते ज्ञान देतात. ज्या ज्ञानाच्या उपयोगाने आपण अर्थार्जन करतो आणि ऐहिक सुखे प्राप्त करतो. या सोबतच आपण समाजात वावरताना असंख्य लोकांकडून काही ना काही शिकतच राहतो. त्या त्या गोष्टींमध्ये ते आपले गुरू होतात. आपल्याला जेव्हा काही बरेवाईट अनुभव येतात तेव्हा ते अनुभव आपले गुरु होतात..
कुणी आपल्याला फसवले तर सावध राहणे शिकतो. कधी संकटात सापडलो तर त्यातून सुटका करून घेऊन कसे प्रसंगावधान राखावे हे शिकतो. आणि मग तेव्हा कुणी गुरू आपल्या आयुष्यात येतात. अर्थात गुरु आयुष्यात येणे हे भाग्य देखील प्रत्येकाला लाभतेच असे नाही. आपण गुरू निवडला तरी आपण त्या योग्य आहे किंवा नाही हे बघूनच ते आपल्याला जवळ करतात. आणि एकदा का तुम्ही त्यांच्या वर सगळा भार टाकून सद्आचरण करत असाल तर प्रत्येक संकटातून सुटका करून घेण्याचा मार्ग ते दाखवतात. दुःख सहन करण्याची शक्ती देतात.आणि अंती मोक्षपदाला नेतात.
पण आपण सर्वसामान्य लोक तेवढी भक्ती करतच नाही. संसारात गुरफटतो. पण संसारात राहून सुद्धा आपण गुरुंची सेवा करु शकतो. त्यांची भुतदयेची तशीच सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याची शिकवण आचरणात आणून. आपण ज्यांना दत्तगुरू म्हणतो त्यांना पण गुरु होते. ते पण एक दोन नाही तर चक्क चोवीस गुरू. .
निसर्गात झाडे पशु पक्षी आपले गुरू होतात. त्यांच्यापासून आपण जे घेतो त्यापेक्षा अनेक पटीने देण्याची शिकवण आपल्याला मिळते. झाडांना आपण जी खते किंवा पाणी देतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने ती झाडे फुले फळे तर देतातच. शिवाय अजून झाडे निर्माण होणाऱ्या बिया पण देतात. तसेच त्या सोबत जगण्यासाठी अत्यावश्यक असा प्राणवायू देतात ते वेगळेच. त्यामुळे शोधले तर अवघ्या चराचरात गुरू सापडतील. पण ते शोधण्याची दृष्टी मात्र हवी.
आपले मित्र मैत्रिणी ज्यांच्या कडून नकळत काही ना काही शिकत असतो ते देखील आपले गुरु असतात. आईबाबा हे प्रथम गुरु असे आपण मानतो. पण खरे तर जन्माला येणारे ते मुलच अगदी गर्भात असल्यापासून आपल्याला शिकवत असते. नंतर देखील त्याला चांगले वळण लागावे किंवा चांगले संस्कार त्याच्या वर व्हावे म्हणून आपण देखील आपल्या काही सवयी सोडून त्या मुलासोबत काही नवीन सवयी अंगी बाणत असतो.
उदा. लहानपणी आपण शुभंकरोती म्हणतो पण थोडे मोठे झाल्यावर ती सवय कधी गळून पडते कळतही नाही. आणि मग शिकायला नोकरीला बाहेर पडलो की तर देवाला हात जोडणे पण विसरतो. तेच मुल लहान असेल तर त्याच्या सोबत पुन्हा नव्याने ती सवय लावून घेतो.. त्याने सगळे जेवणातले पदार्थ खावे ही शिकवण देण्यासाठी आपणही नावडती भाजी पानात टाकून न उठता खातो. तसेच आई कितीही रागावली तरी ते मुल आईला चिकटते. तसेच जीवनात वाईट प्रसंग आले तरी गुरुंना सोडू नये. कारण आई एक चापट मारते हे खरे पण दुसर्या क्षणी जवळ पण घेते. तसेच गुरू देखील आपली परीक्षा घेत असतात. आणि धावा केल्यावर संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग पण दाखवतात. हीच शिकवण ते मुल सहज वागण्यातून देते. म्हणजे एक प्रकारे ते मुल आपले गुरू होते.
माझ्या नशिबाने मला श्री गजानन महाराज गुरू लाभले आणि त्यांचा वरदहस्त माझ्यावर आहेच याची मला सतत प्रचिती येते. खरेच आपण त्यांची भक्ती करावी आपल्याला काय हवे ते गुरुंना माहित असतेच आणि आपल्या साठी काय योग्य आहे ते पण गुरू जाणतात.. तेव्हा गुरुपदी लीन होऊन रहा ते सतत मार्गदर्शक बनून आपल्याला योग्य ठीकाणी नेऊन सोडतात असा माझा विश्वास आहे.
गुरुविण जगी नाही दाता
सुख त्यालाच मागावे
तोच संकटातून तारील
दुःख त्यालाच सांगावे…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
उरावर नाच